Features

साबुदाणा वडा तळायला लावणारं कलाशिक्षण !

चित्रकलेच्या क्षेत्रात जेजे अनन्य अभिमत आणि राज्यस्तरीय विद्यापीठ असे दोन गटतट पडले आहेत. ज्यांना राज्यस्तरीय विद्यापीठ हवंय ते जेजे अनन्य अभिमत विद्यापीठाला निकराचा विरोध करताहेत तर जेजेवाले म्हणतात, ‘आम्हाला अनन्य अभिमत पाहिजेच ! राज्यस्तरीय विद्यापीठाला आमचा विरोध नाही. अनन्य अभिमत आणि राज्यस्तरीय विद्यापीठ या दोघांचाही परस्पर संबंध नाही.’ इतकी स्पष्टता जेजेवाल्यांमध्ये आहे. तर दुसरीकडे विद्यापीठवाले मात्र आपली बोथट झालेली हत्यारं वापरून समाजमाध्यमांवर अपप्रचार करण्याचा प्रयत्न करताहेत. काय आहे खरी परिस्थिती ? याचंच दर्शन घडवणारी ही विशेष लेखमाला… खरं तर ही कालच सुरु झाली, पण कधी संपेल हे मात्र सांगता येत नाही. तुम्ही फक्त वाचत राहा, वाचत राहा…

कालचा लेख हातावेगळा केला आणि तो प्रकाशित करण्यासाठी पाठवून दिला. पण का कुणास ठाऊक तो पाठवून दिल्यावर देखील मनात थोडी अस्वस्थता आली. उदाहरणार्थ लेख तितकासा जमला नाही की काय ? काही लिहायचं बाकी राहिलं की काय ? वगैरे… आणि त्याच अस्वस्थतेतून मी त्या लेखात उल्लेख केलेल्या तरुणाला कधी फोन लावला माझं मलाच कळलं नाही !

खरं तर नंतर त्याच्याशी मी बोलायला हवं होतं, पण अनेकदा आपल्याला शहाणपण हे नंतरच सुचतं. तसंच काहीसं झालं आणि म्हणूनच तो लेख अर्धवट वाटला असावा. त्याच अस्वस्थतेतून मी फोन केला होता. त्या तरुणाचं नाव गाव काही मी सांगणार नाहीये किंवा त्याला ओळखता येईल अशी कुठली खूण देखील मी सांगणार नाहीये.
त्या चित्रकार तरुणानं उत्तर महाराष्ट्रातल्या एका नामवंत कला महाविद्यालयातून आपलं जीडी आर्टचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर त्यानं डीपएड देखील पूर्ण केलं होतं. मग त्याला वाटलं की आपण एमएफए देखील करून टाकू, म्हणून त्यानं नागपूरला जाऊन एमएफए देखील केलं. त्याचं काम चांगलं होतं त्यामुळे त्याला एका स्पर्धेत गोल्ड मेडल देखील मिळालं होतं. राज्यपालांच्याच हस्ते त्याचा सत्कार झाला होता. इतकंच नाही तर जहांगीर आर्ट गॅलरी, आर्टिस्ट सेंटरसारख्या ठिकाणी त्याच्या चित्रांची प्रदर्शनं देखील भरली होती.
हे सारं कमी पडलं म्हणून की काय त्यानं २००८ साली नेटसेटची तयारी देखील सुरु केली. १०-१२ वर्षानं त्यानं ते देखील पूर्ण केलं. त्याला पीएचडी देखील करायची होती, पण त्याला कुणाचं चांगलं मार्गदर्शन मिळेना आणि ते तसंच राहून गेलं. मधल्या काळात चारितार्थासाठी म्हणून तो एका कला महाविद्यालयात शिकवू लागला. पगार किती ? तर फक्त १०,०००/- ! एका शासकीय कला महाविद्यालयात त्याला नोकरी मिळाली. ती नोकरी अर्थातच कंत्राटी, त्यामुळे दिवसभर राबून महिन्याला फक्त २३,००० त्याच्या हातात पडायचे. याच काळात तासावर पगार देण्याची टूम सुरु झाली, मग त्यानं तेही काम सोडून दिलं. मध्यंतरी लग्न झालेलं, मुलं झालेली, भावाच्या नाकर्तेपणामुळे वडिलांचं थोडं फार कर्ज डोक्यावर बसलेलं. त्यात कोरोनाची कुऱ्हाड पडलेली. जगायचं कसं हेच त्याला उमगेना ! त्याच्याकडे कॅमेरा होता, फोटो काढायचा.. हातात चित्रकला होती, मिळेल ती कामं करायचा. लॉकडाऊननं मात्र त्याला पारच उघडं पाडलं ! काय करायचं ? कसं जगायचं ? त्याला काही कळेना ! परवा माझ्याशी बोलताना त्याचा बांध फुटला तो त्यामुळेच बहुदा असावा.

आता तो काय करतो माहितीये ? एका हॉटेलसाठी चक्क साबुदाणा वडे तळून देतो. ५०० रुपये दिवसाचे मिळतात. दिवसभर विस्तवासमोर उभं राहावं लागतं, पण भीक मागण्यापेक्षा ते परवडलं ! ‘आणि दुसरा पर्यायही नाही माझ्याकडं’ असं तो असहाय्यपणे सांगत होता. चित्र, अभ्यास, पोर्ट्रेट, लँडस्केप सगळं सध्या बाजूला ठेवलंय. जगण्याचाच लढा चालू ठेवलाय. वेळ मिळाला की स्वीगीची देखील कामं करतो डिलिव्हरीची !

आजच्या महाराष्ट्राच्या कलाशिक्षण व्यवस्थेचं हे भेसूर सत्य मी सुन्न होऊन ऐकत होतो…
१९८५ सालची गोष्ट असावी… युतीचं सरकार आलं होतं. कला संचालक बाबुराव सडवेलकर नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. प्रा. शांतीनाथ अरवाडे यांनी एक वर्ष प्रभारी कला संचालक म्हणून काम केलं आणि नंतर पुण्याहून एक कला संचालक आले. त्या कला संचालकांनी मात्र कला संचालनालयाची थेट कबरच खणायला घेतली. आपण कला संचालक झालो आहोत म्हणजे शिक्षकांना मेमो देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, असं त्याला वाटत होतं. तिथूनच त्यानं कामाला सुरुवात केली.
१९-२० अनुदानित कला महाविद्यालयं त्या काळात महाराष्ट्रात कलाशिक्षण देण्याचं काम करत होती. आटोपशीर पसारा होता, अतिशय गुणवंत अधिकारी कला संचालनालयात काम करत होते. एखाद्या छोट्या कुटुंबाचंच स्वरूप कला संचालनालयाच्या कार्यालयाला होतं, पण पुण्याहून हा इसम आला आणि त्यानं होत्याचं नव्हतं करायला सुरुवात केली. त्यानं जे केलं ते जसंच्या तसं नावानिशीवार २००८ सालच्या ‘चिन्ह’च्या ‘क(।)लाबाजार’ अंकात आम्ही प्रसिद्ध केलं होतं. आता ज्यांना कुणाला ते वाचावंसं वाटत असेल त्यांनी तो अंक आवर्जून मिळवून सारा वाचावा. त्या अंकाची पीडीएफ या वेबसाईटवर लवकरच देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत, पण आता पुन्हा मात्र मी त्यावर काही लिहू इच्छित नाही.

त्या गृहस्थांनी एका वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात  सुलभ शौचालयं उघडतात तशी गावोगावी कला महाविद्यालयं उघडली. राजकारणी, साखर सम्राट, रॉकेल सम्राट, मद्य सम्राट, खाटीक, कला संचालनालयातले सेवानिवृत्त अधिकारी, सेवानिवृत्त शिक्षक या साऱ्यांनीच त्या कला महाविद्यालयाच्या गंगेत आपले हात धुवून घेतले. सगळीकडे शिक्षक तयार करणारे एटीडीचे कारखाने सुरु झाले आणि मग महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाची पुरती वाताहत सुरु झाली, प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला. पुण्यातल्या एका कला महाविद्यालयातले तर ओळीनं तीन-चार प्राचार्य तुरुंगाची हवा खाऊन आले. राज्य कला प्रदर्शनातल्या बक्षिसांचा देखील लिलाव मांडला गेला. एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेडच्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशात हात घालायला देखील हे लोकं कचरले नाहीत. सी ची बी, बी ची ए ग्रेड करण्यासाठी या नालायक लोकांनी शाळेतल्या मुलांच्या पालकांकडून देखील पैसे उकळायला कमी केलं नाही.

त्या काळात अतिशय सेवाभावी कलावंत कलाशिक्षक किंवा संस्था संचालक होते या क्षेत्रात, पण या भ्रष्टाचारानं ते पूर्णतः नामशेष झाले. त्यातले काही जणं तर हाय खाऊन मेले. महाराष्ट्रात जे इंजिनियरिंग किंवा मेडिकल शिक्षणसंस्थांचं कांड घडलं, तसंच किंवा तितकंच भयंकर हे कांड होतं, पण चित्रकला विषय दुर्लक्षित असल्यामुळं त्याला प्रसिद्धी मिळाली नाही. मी किंवा ‘चिन्ह’नं याविरोधात मोठी मोहिम उघडली, वृत्तपत्रांना सतत बातम्या दिल्या, पण या साऱ्यांचेच हात वरपर्यंत पोहोचलेले असल्यामुळं यांच्यावर कसलीच कारवाई झाली नाही !

त्याचीच फळं आज आपण भोगतो आहोत. जे जे स्कूल ऑफ आर्ट पूर्णपणे नामशेष करून टाकलं गेलं आहे. तिथल्या शिक्षकांचं पूर्णतः खच्चीकरण केलं गेलं आहे. ३० वर्षात शिक्षकांच्या नेमणूकाच होऊ शकल्या नाही. कायमस्वरूपी शिक्षक औषधाला देखील उरलेले नाहियेत. जे उरले आहेत त्यांच्याविषयी काही बोलावं अशी देखील परिस्थिती उरलेली नाही. ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत असे काही शिक्षक आणखीन दोन-चार वर्षात सेवानिवृत्त होतील आणि मग मात्र या संस्थेला कुणीही वाली उरणार नाही. म्हणूनच जेजेचं अनन्य अभिमत इन्स्टिट्यूटमध्ये रूपांतर व्हावं म्हणून ‘चिन्ह’नं पुढाकार घेतला आहे, लोकजागृती करायला सुरुवात केली आहे आणि तिला प्रतिसाद देखील चांगला मिळू लागला आहे. माझ्या मते जेजे सुधारावयाची ही अखेरचीच संधी आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी जेजेचाच विद्यार्थी विराजमान झाला असल्यामुळं अशक्य ते शक्य सहज जमून जाणार आहे. पण त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र करावी लागणार आहे.

जेजे अनन्य अभिमत संदर्भात समाज माध्यमांवर अतिशय चुकीचा प्रचार केला जातो आहे. वेड पांघरून पेडगावला गेल्यासारख्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. भ्रष्ट आचरणाखेरीज डोक्यात दुसरं काहीच नसल्यामुळं खोटेनाटे आरोप केले जाताहेत. राज्यस्तरीय विद्यापीठाची कल्पना एका रात्रीत जशी रत्नागिरीत जन्माला आली तशी अनन्य अभिमतची कल्पना एका रात्रीत अचानकपणे जन्माला आलेली नाही. २०१७ सालापासून तिच्यावर काम सुरु होतं. याची सुरुवात केली ती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी. त्यानंतर गेली काही वर्ष अनेक जणं या कामी रात्रंदिवस राबत होते. मंत्रालयातल्या अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखालून या योजनेचे मसुदे जात होते. केंद्र सरकारच्या विविध खात्यांबरोबर पत्रव्यवहार सुरु होता. इतकंच नाही तर १५ लाख इतकी प्रोसेसिंग फी सुद्धा सरकारकडून २०२० सालीच भरली गेली होती. असं असताना ‘राज्यस्तरीय विद्यापीठाला किंवा कला विद्यापीठाला विरोध का ?’ असा जो कांगावा केला जातो आहे तो किती खोटा होता किंवा बेगडी आहे हेच आम्हाला पुढील लेखांकात दाखवून द्यायचं आहे. सोमवारपासून आठवडाभर ही लेखमाला चालेल. अवश्य वाचा !

What's your reaction?

Related Posts

1 of 7