Features

ब्रुटस्, तू सुध्दा? – माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र

जे जे अनन्य अभिमत विद्यापीठ स्थापनेची प्रक्रिया सुरू होत असतानाच डी नोव्हो चळवळीत प्रमुख वाटा असलेल्या डॉ संतोष क्षीरसागर यांना प्रभारी अधिष्ठाता पदावरून बाजूला करण्याचा निर्णय घेतला गेला. ज्येष्ठ कलाकार आणि ‘एक जेजे’ – आजी माजी विद्यार्थी संघटनेचे संचालक आशुतोष आपटे यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना एक जाहीर पत्र लिहून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांचे ते पत्र कला क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना मुळातूनच वाचता यावे यासाठी चिन्हमध्ये प्रकाशित करत आहोत.

———-

प्रति,

माननीय मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य

 

[दुर्दैवाने शेक्सपियरच्या ज्युलियस सिझर या नाटकातील सिझर मरता मरता आपल्या मित्राला म्हणतो,

“ब्रुटस्, तू सुध्दा?”

या वाक्याची आठवण आली.

तात्यासाहेब शिरवाडकरांनीही नटसम्राटमध्ये हे वाक्य वापरले आहे.]

 

 

विषय : सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये शासन करीत असलेला अनागोंदी कारभार..

 

महोदय,

 

आपले महाराष्ट्र राज्य प्रगतीचे राज्य आहे.. शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर आहे.. कला-संस्कृतीच्या बाबतीत पुढारलेले आहे…

हे खरे नक्कीच आहे परंतु आपल्या शासनातील काही तानाशाह याला गालबोट लावत आहेत.

त्या नोकरशाहांना त्वरीत आळा घालावा अन्यथा शासनप्रमुख म्हणून खापर शेवटी आपल्यावरच फुटेल.

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट हे १८५७ सालापासून महाराष्ट्राच्या भूमीत वसत असलेले महाराष्ट्राचे सांस्कृतिक व कला शिक्षणाचे वैभव आहे.

आपल्या भारतातील ही एकमेव कलाशिक्षण संस्था आहे, की जिला १९ ऑक्टोबर २०२३ रोजी डीनोव्हो (अनन्य) दर्जा मिळाला व सर जे. जे. स्कूल अभिमत विद्यापीठ झाले.

भारताचे शिक्षणमंत्री मा. श्री.धर्मेन्द्र प्रधान, महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती मा. श्री.राहुल नार्वेकर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री.देवेन्द्र फडणवीस, शिक्षणमंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षणमंत्री मा. श्री.दिपक केसरकर, मुख्य शिक्षण सचिव मा. श्री. रस्तोगी साहेब आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाचे आदरस्थान कलासंचालक मा. श्री. राजीव मिश्रा या शासकीय तसेच पद्मश्री विभूषित अनेक मान्यवर, जे. जे. चे आजी माजी विद्यार्थी गण अशा सर्वांच्या उपस्थितीत हा डीनोव्होचा हृद्य सोहळा महाराष्ट्र शासनानेच अतिशय सुंदररीत्या संपन्न केला.

महाराष्ट्र शासनाने सेक्शन आठ कलमाखाली तयार करण्यात आलेल्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन फाऊंडेशनला सर जे. जे. चा सर्व कारभार सुपूर्द केला. त्या फाउंडेशनचे चेअरमन महाराष्ट्र शासनाचे शिक्षण सचिव असणार आहेत. सध्या सन्माननीय श्री. रस्तोगी हेच चेअरमन आहेत. मा. रस्तोगींनी मा. श्री. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व मा. श्री. उदय सामंत शिक्षण मंत्री असतानाच्या काळातही अनेकांचा राजकीय विरोध पत्करून डिनोव्हो होण्याच्या न्याय्य मार्गावर आम्हा सर जे. जे. च्या आंदोलनकारी माजी विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाची साथ दिली. डिनोव्होच्या विजयाच्या शिल्पकारांमध्ये मा. रस्तोगी यांचा मोलाचा वाटा आहे. आज मा. चंद्रकांत दादा पाटील शिक्षणमंत्री आहेत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे डिनोव्हाचे कार्य मा. रस्तोगी यांनी पूर्णत्वास नेण्यास मा. निपुण विनायक यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमणे आणि जे. जे. फाउंडेशन अस्तित्वात आणणे असे मोलाचे कार्य केले आहे.

 

मी लिहिलेली वरील सर्व वाक्ये ही महाराष्ट्र शासनासाठी निश्चितच कौतुकास्पद विधाने आहेतच.

 

पण आजची परिस्थिती?

आजची परिस्थिती अशी की जे. जे. विषयी असूया असल्यासारखे आपल्या शासन दरबारातील काही नोकरदार माणसे वागतात व जे. जे. चा बट्याबोळ होण्याचे कारस्थान रचतात अशी खेदाची आहे.

परवा अचानक, ज्यांच्या पुढाकाराने डिनोव्होचा अभ्यासक्रम बनवला गेला. जे त्यांच्या सहकऱ्यांसमवेत गेली सहा सात वर्षे डिनोव्हो व्हावे म्हणून झटत होते.. ज्यांनी आय. आय. टी. मधुन डॉक्टरेट केली आहे, जे जागतिक पातळीवर सुलेखनकार म्हणून ओळखले जातात अशा मा. डॉ. संतोष क्षीरसागर यांचा अधिष्ठातापदाचा चार्ज काढून कोण्या नवख्या माणसाला आणून पाच टक्के वेतनाच्या अतिरिक्त दराने दरमहा अतिरिक्त वेतनासहित अधिष्ठाता पदाचा चार्ज देण्याचे ज्ञापन प्रसारित केले.

 

म्हणजे डीनोव्होचा एवढा सोहळा करून,

थोडक्यात देव, धर्म, अग्नीच्या साक्षीने समस्त गावाला दिपवील असे लग्न लावायचे, रजिस्टर पण करायचे आणि पाहुणे गेले की दुसरीलाच नांदवायचे..!

किंवा असे की नाव ऐन प्रवाहात आल्यावर अनुभवी नावाडी बदलायचा आणि ज्याला या नावेचा, किंवा प्रवाहाचा काहीही अंदाज नाही असा नावाडी आणून बसवायचा.

बरे याला आपल्या नोकरशाहीने नियमानुसार असे गोंडस आणि कायदेशीर नाव दिले, तरी हे अजिबात नैतिक नाही.

 

त्यातून शासनाने वेतन वगैरे सर्व बाबींसाठी वर्षाला पन्नास कोटींपेक्षा अधिक अनुदान जे.जे. साठी मंजूर केले आहे ते अनुदान शासन नव्हे तर शासनाने तयार केलेल्या स्वतंत्र अशा सर जे. जे. फाऊंडेशनला ते अनुदान निर्गमित करायचे आहे. व ते अनुदान फाउंडेशन स्पॉन्सरींग बॉडी म्हणून जे. जे.ला वितरित करू शकते. पण इथे स्वतःच नवीन अधिष्ठात्यांना थेट वेतन व अतिरिक्त वेतन देण्याचे पत्रात लिहून शासनानेच शासन निर्णयाचा अधिक्षेप केला आहे. हे कोणत्या नियमात बसते?

 

आता काही म्हणतील की मॅनेजिंग बॉडी, ॲकॅडमीक कौन्सिल वगैरे तयार व्हायचे आहे.. कुलगुरू ठरायचे आहे.. अरे हो, मग फाउंडेशनच्या माध्यमातून ते काम घ्यावे की हाती. नाही कोणी म्हंटले..!?

पण म्हणून नावाडी बदलण्याचे समर्थन करता येत नाही.

 

आणि त्यातूनही १९ ऑक्टोबर २०२३ च्या डिनोव्हो प्रदान पत्रात जे भारत सरकारच्या गॅझेट भाग एक सेक्शन एक मध्ये प्रकाशित करणे आहे, त्यात स्पष्ट म्हंटले आहे की, संस्था पुरेसे व सुयोग्य असे शैक्षणिक मनुष्यबळ भरती करेल (v. Institute shall recruit adequate faculty with requisite qualification). यानुसार संस्था ठरवेल ना, कोणाला पदावर भरती करावयाचे ते.  इथे MPSC किंवा शासन यांनी नाक खुपसण्याचे कारण नाहीच व तसे करणे अनैतिक तर आहेच आणि स्पष्ट सरकारी आदेश धुडकावणे आहे.

 

हे अज्ञान म्हणावे, सूडबुध्दी म्हणावी की राजद्रोह..?

पोस्ट ग्रॅज्युएशनचे नवीन अभिनव अभ्यासक्रम सुरू होणार आहेत, बाकी पदवी अभ्यासक्रम आखायचे आहेत, आर्किटेक्चर, पेंटिंग, शिल्पकला, कलाशिक्षण, आर्ट्स आणि क्राफ्ट, डिझाईन अशा अनेक शाखा संलग्न करुन नवा डिनोव्हाचा पाया रचायचा आहे. अशा नाजूक क्षणी हे करणारा, आय. आय. टी. मधून डॉक्टरेट घेतलेला, अनुभवी तज्ञ बदलायचा? खरे तर अधिष्ठाता पदाबरोबरच डॉ. संतोष क्षीरसागर यांना जे. जे. चा पहिला कुलगुरू करावयास हवे.

 

त्याऐवजी त्यांचा चार्ज काढून घेतला?

 

काय आणि कोणत्या थराचे हे घाणेरडे राजकारण?

 

शिक्षण क्षेत्रात तेही डिनोव्हो म्हणजे कलाक्षेत्रातील पहिल्या अनन्य अभिमत विद्यापीठात शासन असा नगास नग आणून बसवणार? तेही कलाक्षेत्रात? रंगांची नावे तरी नीट सांगता येतील का नोकरबाबुंना? फाईलीतले जावक क्रमांक टाकता आले म्हणजे कलेचे ज्ञान झाले?

बरे यातून निष्पन्न काय होणार?

हे करणारे नोकरशहा थोड्या दिवसांत जातील निवृत्त होऊन.. एखादा श्रमसाफल्य वगैरे नावाचा बंगला बांधतील निवृत्तीनंतर. तिथेही जे. जे. चाच कोणी कलाकार फुकट किंवा स्वस्तात इंटेरियर वगैरे करायला वापरतील. पण डिनोव्हो नासण्याचे, जे. जे. सारखी अभिमानास्पद संस्था रसातळाला नेण्याचे पातक यांच्या आणि यांच्याच श्रमसाफल्याच्या बुडाशी असेल.

 

करतात हे आणि शिक्षणविभागाचे प्रमुख सचिव म्हणून विनाकारण मा. श्री. रस्तोगी यांच्या सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यावर बालंट येते. अर्थात मा. रस्तोगी साहेबांसारख्या कुशाग्र बुध्दीच्या व जागृक अधिकाऱ्याच्या हे कसे लक्षात आले नाही याचेही आश्चर्य..! म्हणजे त्यांच्या व शिक्षणमंत्री महोदयांच्या नकळत विपरीत गोष्टी घडतात असे दिसते. हे भयावह आहे. आता मा. रस्तोगी यांनाही नसेल कळले तर महाराष्ट्र कलाशिक्षणाचे आदरस्थान कलासंचालक मा. श्री. मिश्रा यांना तर चौकटी बाहेरच उभे केले असणार. अहो नाही, नाही..!! थांबा थांबा..!

 

कलासंचालक मिश्रा साहेबांच्या १६ ऑक्टोबरच्या पत्रानुसारच ही अधिष्ठाता ‘खो खो’ ची मान्यता देण्यात आली आहे.

 

अरे बापरे हे तर फारच गंभीर आहे. कारण १६ ऑक्टोबरला १९ ऑक्टोबरच्या कार्यक्रमाची तयारी चालली होती.. म्हणजे कलासंचालक, शिक्षणसचिव आणि अगदी आम्हा जनसामान्यांना देखील अंदाज आला होता की या कार्यक्रमात जे. जे. ला डिनोव्हो प्रदान करणार. तरी दोन दिवस आधी ही खेळी? आणि पत्र आता २४ नोव्हेंबरला?

 

मिश्रासाहेब आणि इतर मान्यवरहो, शेक्सपियरच्या ज्युलियस सिझर या सुप्रसिद्ध नाटकातले विश्वासघाती माणसाला उद्देशून म्हंटलेले वाक्य आठवले हों…..”you too, Brutus?” (Brutus makes a speech explaining that although he valued Caesar as a friend, it was appropriate to kill him for his ambition)

म्हणून कळकळीची विनंती, शासनाने स्वतःच हे जे. जे. डिनोव्होचे शिल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. त्याला त्याच्या अर्भकावस्थेत नख लावण्याचे काम नकळतपणेही आपल्या नोकरशहांकडून होऊ नये यासाठी तातडीने लक्ष घालावे.

 

आणि हे कारस्थान करणाऱ्यांची हयगय करु नये. डिनोव्होचे सुकाणू आधीपासून कार्य करणाऱ्यांचाच हाती द्यावेत. पुढे अर्थातच सुयोग्य, सक्षम व्यक्ती जे. जे. संस्थेने आपल्या अभ्यासक्रमानुसार नेमाव्यात.

धन्यवाद आणि आशा आहे की आपणास माझ्या प्रमाणिक भावना समजतील व त्वरित कार्यवाही होईल.

 

कळावे,

आपला स्नेहाभिलाषी,

 

आशुतोष राम आपटे

संचालक

एक जे. जे.

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर व अप्लाइड आर्ट (डिझाईन) आजी माजी विद्यार्थी संघटना..

CIN: U80904MH2022NPL392863 (EkJJ Alumni Association रजिस्टर्ड सेक्शन ८ कंपनी

———-

सध्या गाजत असलेला चिन्हतर्फे आयोजित ‘जे जे डिनोव्हो: एक स्फोटक चर्चा!’ विडियो पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

जे जे डिनोव्हो: एक स्फोटक चर्चा!

https://www.youtube.com/watch?v=dB2anH4kIcE

———-

———-

चिन्ह तर्फे आयोजित कलाशिक्षण महाचर्चा पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

कलाशिक्षण महाचर्चा | Panel Discussion About Art Education

https://www.youtube.com/watch?v=wn16ME4hHtc

———-

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.