Features

सीईटी पुन्हा घ्यावीच लागेल ! आणखी एक मोठा गौप्यस्फोट !

सीईटीमध्ये काय घोळ झाले हे आपल्या सगळ्यानांच माहीत आहे. पण काही नवे मुद्देही जाणकारांशी चर्चा करताना प्रकाशात येत आहेत. या काही नव्या मुद्द्यांची चर्चा या लेखात आम्ही केली आहे. हे वारंवार करण्याचे कारण हेच की ही पूर्ण परीक्षाच होतकरू मुलांवर अन्याय करत आहे. सध्या ऍडमिशन प्रक्रिया सुरु झाली असली तरी, या परीक्षेतल्या तीन हजार विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी एक पालक जरी कोर्टात उभा राहिला तरीही संपूर्ण परीक्षेची प्रक्रिया रद्द करून  कला संचालनालयाला दुसर्यांदा परीक्षा घ्यावी लागेल इतकं हे गंभीर प्रकरण आहे.  वाचा !

सीईटी परीक्षेच्या एक एक सुरस कथा आम्ही हळूहळू प्रकाशित करणार आहोत हे आम्ही काही दिवसापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार यादीचा  जेव्हा अभ्यास केला आणि जाणकारांना मतं विचारली तेव्हा परीक्षेतील अजून एक घोळ आमच्या लक्षात आला. सीईटी परीक्षेची तपासणी  जेव्हा केली जाते तेव्हा ४ पेपरचे एकूण गुण प्लस इंटरमिजिएट परीक्षेचे ग्रेडनुसार गुण  दिले जातात ते ग्राह्य धरले जाते. यात इंटरमिजिएट परीक्षेत ए ग्रेड मिळाली असेल तर १० गुण , बी ग्रेड मिळाली असेल तर ६ गुण आणि सी ग्रेड असेल तर ३ गुण समाविष्ट केले जातात . 

जर आपण सीईटीची संपूर्ण सुधारित यादी पाहिली तर त्यात किमान १० तरी नंबर असे मिळतील ज्यांना समान गुण आहेत. उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याला  सीईटीला गुण मिळाले १३९. यात ६ गुण इंटरमिजिएटचे समाविष्ट आहे. १३३+६=१३९. दुसरा एक मुलगा त्याचे गुण  पण १३९. यात त्याचे सीईटीचे गुण समजा १२९ आहेत आणि त्याला जास्तीचे १० गुण इंटरमिजिएट परीक्षेचे मिळाले कारण त्याला या परीक्षेत ए ग्रेड होती . इथपर्यंत सर्व ठीकच आहे.

पण प्रश्न कुठे येतो जेव्हा दोघांमध्ये सारख्या गुणांमुळे टायअप होतो तेव्हा . आता इथे सर्व तपासणी ही गॅझेटमधील नियमानुसार केली जाते. नियमानुसार टायअप झाला तर बारावीचे गुण धरले जातात. तेही सारखे आले तर १०वीचे गुण धरले जातात. इथेही गुणांमध्ये   साम्य असले तर वय ग्राह्य धरले जाते. आता इथपर्यंत पोचण्याची गरज भासत नाही. बहुंतांशी १२ वीच्या गुणांवरूनच निवड कोणाची करायची हे ठरवता येते. पण यावर्षीची जी सीईटी झाली त्यात असे लक्षात आले की ज्या विद्यार्थ्याना  इंटरमीजिएटचे १० गुण आधीच मिळाले आहेत त्याना पुन्हा ए ग्रेडमुळे यादीमध्ये वर नेण्यात आलं आहे.  इथे घोळ असा आहे की जर इंटरमिजिएट ग्रेडचा बेनिफिट किंवा फायदा जर आधीच मिळाला आहे तर तो पुन्हा पुन्हा लिस्टमध्ये वर आणण्यासाठी का दिला जातो? 

मुळात जर प्रशासन एक सीईटी परीक्षा घेत आहे, तर इंटरमिजिएट परीक्षेला अवास्तव महत्व देऊन एखाद्या उमेदवाराला त्याचा “डबल बेनिफिट” का दिला जातो? याविषयावर संशोधन आणि अर्थातच चौकशीदेखील होणे गरजेचे आहे. कारण नियमानुसार अशा टाय अप परिस्थितीत बारावीचे मार्क्स गृहीत धरून उमेदवाराला प्राधान्य दिले जाणे गरजेचे आहे. 

इथे संशयास जागा निर्माण होते कारण इंटरमिजिएट परीक्षेला जर एवढे महत्व दिले जात आहे तर तिथे काही “अर्थ”पूर्ण व्यवहार होऊन उमेदवाराला फायदा दिला जातो का ? हे तपासणे गरजेचे आहे. आमच्या कानावर आतल्या गोटातून माहिती आली ती अशी की इंटरमिजिएट परीक्षेचे सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी अतिशय मोठा “अर्थ”पूर्ण व्यवहार केला गेला आहे .आता हे खरे की खोटे हे तपासण्याचे काम संबंधितांनी करावे यासाठी शिक्षण सचिवांनी काहीतरी व्यवस्था करणे आत्यंतिक गरजेचे आहे .आम्हाला आशा आहे की विकासचंद्र रस्तोगी साहेब आमच्या या मताशी सहमत होतील  आणि सीईटीला बसलेल्या तीन हजार  मुलांना न्याय देतील . 

आणि ते जर हे करु शकले नाही तर सीईटीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जनहित  याचिका  दाखल करून आता कोर्टातूनच न्याय मिळवावा असे आवाहन आम्ही करतो आहोत .

काही मुद्दे आम्ही आधीच्या लेखात मांडले आहेत, तरीही त्यांचा येथे पुनरुच्चार करणे आवश्यक आहे. डिग्री परीक्षेच्या सीइटीसाठी डिप्लोमा शिक्षक नेमणे हे चुकीचे आहे. सीईटी परिक्षेतील एकूण प्रात्यक्षिक पेपर असतात तीन. या प्रात्यक्षिक पेपर तपासणीसाठी प्रत्येक विषयाला पाच शिक्षक नेमले जातात. यानुसार एकूण शिक्षकांची गरज असते 15. आता हे 15 कायम स्वरुपी शिक्षक महाराष्ट्राच्या पदवी  देणाऱ्या कला महाविद्यालयातून सहज मिळू शकतील. मग डिग्रीच्या सीईटी परीक्षेसाठी डिप्लोमा झालेले शिक्षक का नेमले गेले हा आमचा मुद्दा आम्ही पुन्हा इथे मांडतो.

सीईटी परीक्षा पद्धत ही कालबाह्य झाली आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या परीक्षेत कालानुरूप बदल करणे गरजेचे आहे, तरच महाराष्ट्राचे कलाशिक्षण सुधारेल या मुद्द्याचा आम्ही वारंवार पुनरुच्चार करत आहोत.

****

मानसी जाधव या विद्यार्थिनीची उत्तरपत्रिका

या विद्यार्थिनीनेही चौकोनात डिझाईनचा पेपर सोडवला आहे. शिवाय मेमरी ड्रॉईंग या विषयात ज्या मानवी आकृती आहेत त्या प्रमाणबद्ध नाहीयेत. तरीही ही विद्यार्थिनी उत्तीर्ण आहे. तिची रँक ३८४ आहे. आहे की नाही गम्मत?

या लेखावरील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला 90040 34903 या व्हाट्सअप नंबरवर जरूर कळवा. त्या आम्ही पुढच्या लेखात जरूर प्रकाशित करू. लक्षात ठेवा आपल्या प्रतिक्रिया येणे महत्वाचे आहे तेव्हाच एक चळवळ उभी राहील आणि भविष्यात होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. 

‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.