Features

चिखलीचा जिद्दी चित्रकार!

जर आम्ही म्हणालो की चिखलीच्या एका चित्रकाराच्या चित्रांनी अमेरिकन फाऊंडेशनला निधी मिळवून दिला तर तुमचा विश्वास बसेल का?  शक्यतो उत्तर नाहीच येईलं. पण असं झालय खरं. सुनील बांबल हे चिखली (जि. बुलढाणा) येथील छोट्याशा गावातले चित्रकार. चित्रकार म्हणून काम करताना त्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी आल्या पण त्यांनी कलेची साथ सोडली नाही. साहाय्यक कला शिक्षकाची नोकरी करत त्यांनी कलासाधना सुरु ठेवली आहे. याच जिद्दीमुळे त्यांच्या कलेची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. आणि त्यांची चित्रे आंतरराष्ट्रीय लिलावात पोचली आहेत. रीडर्स डायजेस्टसारख्या नामवंत प्रकाशनानेही सुनील यांची चित्रे आपल्या अंकात  प्रकाशित केली आहेत. आपल्या कलेला व्यासपीठ मिळावे म्हणून अनेक चित्रकार खेड्यातून शहरात स्थायिक होतात. पण सुनील बांबल यांनी मुंबई सोडून चिखली या आपल्या मूळ गावी स्थलांतर केले. तिथून त्यांची चित्रे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचली. याचे कारण म्हणजे आपल्या कलेवरचा विश्वास आणि सोशल मीडिया या नव्या शस्त्राचा योग्य वापर! एका खेड्यातून येणाऱ्या चित्रकाराची ही यशोगाथा थक्क करणारी आहे. अनेक चित्रकारांना ती नक्कीच प्रेरणा देईल याची आम्हाला खात्री आहे. 

अमेरिकन फौंडेशनच्या लिलावात समाविष्ट झालेले बांबल यांचे एक चित्र.

मी चित्रकलेच्या शिक्षणाची सुरुवात औरंगाबादच्या यशवंत कला महाविद्यालयातून केली. तिथे फौंडेशन आणि आर्ट टीचर डिप्लोमा पूर्ण केला. पुढे तोरवणे सरांच्या सल्ल्याने अभिनव कला महाविद्यालय पुणे येथे जी डी आर्ट (drawing and painting ) पूर्ण केले. जीडी आर्टला सत्तर टक्के  गुण मिळवून मी राज्यात पाचवा  क्रमांक मिळवला. बहुतेक कलेचे शिक्षण घेणाऱ्यांना  सर जेजे कला महाविद्यालयात शिकावं असं वाटतं तसंच मला ही वाटायचं. मग शेवटी का होईना मी Dip.A.Ed ला जेजे  कला महाविद्यालय गाठलंचं . 

2008 ला कलाशिक्षण संपल्यापासून मी सातत्याने चित्रकला क्षेत्रात कार्यरत आहे. अधून मधून प्रदर्शन भरवतो. कोरोनाच्या वर्षी 13 एप्रिल 2020 ला माझा जहांगीर आर्ट गॅलरीला सोलो शो आयोजित केला होता. पण आर्थिक परिस्थिती मुळे मला तो रद्द करावा लागला.

 मी स्पर्धांपासून दूर आहे. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, कॅम्लिन आर्ट या स्पर्धांना कॉलेज संपल्यानंतर मी कधीच चित्रं पाठवली नाहीत. या स्पर्धांना चित्र पाठवायला जो खर्च लागायचा त्या पैशात मी कॅनव्हास कलर घेऊन त्यावर चित्र करतो.आणि त्यातील चित्र भविष्यात विकले तर तो मला मिळालेला पुरस्कार समजतो. अशा प्रकारे माझा कलेचा प्रवास चालू आहे. माझ्या सृजनात्मक चित्राचा प्रवास ‘प्रदर्शक’च्या शो पासून सुरू झाल , तो आज ही चालू आहे. 

मी निसर्गचित्रणापासून माझ्या व्यावसायिक कलाप्रवासाला सुरवात केली खरी पण माझं मन त्यात जास्त रमलं नाही. आर्ट पॉईंटच्या रोहिता दोषी मॅडमनी सर्व प्रथम माझी कामं त्यांच्या आर्ट गॅलरीत ठेवली,पुढे त्यांनी सॅफरॉन आर्ट गॅलरीला  माझं काम पाठवले. तेथून माझी अनेक चित्रं  विकली गेली.  

निसर्ग चित्र विकली जात होती पण तेच तेच करून कंटाळा आल्याने वेगळं काही तरी करावं म्हणून मी व्यक्तिचित्र आणि निसर्गचित्र यांचा  मिलाप करून माझी शैली निर्माण केली. माझी चित्र  विचारपूर्वक पहिली की ते लक्षात येतं.  मी जसजसं  काम करत गेलो तसतशी माझी शैली सुधारत गेली. 

माझी  चित्र अनेक देशातील कला रसिकांनी विकत घेतली. जर्मनी , फ्रान्स, अमेरिकेतील कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, न्यूयॉर्क, बोस्टन, वॉशिंग्टन याठिकाणी तसेच जपान,स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, हॉंगकॉंग, दुबई, इंग्लंड, कॅनडा अशा अनेक देशात माझी चित्र पोचली. काही जगप्रसिद्ध मासिकातून माझ्या चित्रांना प्रसिद्धी मिळाली तर काही चित्रे लिलावांचा भाग बनली. 

मी सृजनात्मक चित्रांचं पहिले सोलो प्रदर्शन खार रोडच्या ‘प्रदर्शक आर्ट गॅलरी’त केलं. Portrait of village या नावाने मी हा शो वर्ष 2010 ला केला होता. गॅलरी अगदी लहान असल्याने लहान व मध्यम आकाराची मी 13 चित्र इथे प्रदर्शित केली होती. 14 ते 15 दिवसाचा कालावधी या शो साठी मिळाला होता. या शो दरम्यान माझं couple villege नावाचे एक चित्र 20 हजारांना विकले गेलं. चंचलानी नावाच्या व्यक्तीने ते घेतले होतं.  त्यानंतर पाठोपाठ मी लीला हॉटेलला सोलो शो केला. या शो मधून एक चित्र दक्षिण आफ्रिका येथील अल्बर्ट दिनून या व्यक्तीने 600 डॉलरला विकत घेतलं. या प्रदर्शनातील चित्रांना अभिप्राय ही चांगले मिळाले. पंडोल गॅलरीला प्रदर्शनाची आमंत्रण पत्रिका द्यायला गेलो असता तेथील व्यक्तीने आमच्या साहेबांना ही चित्र दाखवा त्यांना आवडेल असं म्हणाले होते. तसेच झवेरी नावाच्या व्यक्तीने ऑफर दिली की माझ्यासाठी 2 वर्ष चित्र कर मी सांगेल त्या विषयावर तुझ्या शैली मध्ये, पण तू या काळात तुझी  चित्रं  इतर कुठे द्यायची नाही असं बंधन टाकल्याने मी ती ऑफर नाकारली. 

 चित्र प्रवास चालू असताना 2012 साल उगवलं. हे वर्ष माझ्यासाठी खूपच आनंददायी ठरले, हे वर्षी आर्थिक,कौटुंबिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं होतं. याच वर्षी माझा दिल्लीला शो होता त्यातलं माझं चित्र जर्मन व्यक्तीने विकत घेतलं. या प्रदर्शनाची बातमी लोकमतला आली त्यामुळे मी जी मुलगी लग्नासाठी बघून आलो होतो तिच्या घरच्यांनी होकार कळवला. आणि 24 जून लग्नाची तारीख ठरली. 

२०११ च्या सुरुवातीला रीडर्स डायजेस्ट मासिकातून एक फोन आला. “आमच्या टीमने तुमचे एक चित्र ऑनलाइन बघितले आणि ते आम्हाला मे महिन्याच्या अंकात घ्यायचे आहे.  आम्हाला प्रदर्शकच्या हिरा मॅडम कडून तुमचा नंबर मिळाला. आम्हाला त्या चित्रविषयी आणि तुमच्या विषयी थोडक्यात माहिती सांगा.” 

जवळपास पाऊण तास चर्चा करून त्यांनी माझं चित्र आणि त्या विषयी लिहिले ते फक्त सहा ओळीत. पण त्या सहा ओळी मध्ये सर्व सामावलेलं होतं. 

चित्र छापून आलं त्या मासिकाची एक प्रत मला मिळाली त्यानंतर एक इन्व्हॉईस  त्यांनी सही करून परत पाठवायला सांगितले. त्यावर कॉपी राईट फी 4000 रु लिहिलेलं होते. पुढील महिन्यात मला धन्यवादाचे पत्र आणि 4000 रु चा धनादेश घरी आला. हे सर्व माझ्यासाठी नवीन होत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझं चित्र त्यांच्या अंकात छापायचे त्यांनी मला पैसे दिले होते. आणि दुसरे विशेष म्हणजे जे चित्र 2010 साली 20 हजार रु विकले त्या चित्राच्या फोटोने दोन वर्षानंतर परत चार हजार रु दिले. त्यामुळे मला भलताच आनंद झाला होता. आणि मला कळले होते की मी जे करतोय ते नक्कीच वेगळं आहे आणि हे मला ओळख मिळवून देईल.

ऑर्कुटवर वीरमणी मॅडम मित्र होत्या. तेव्हा त्यांना माझं एक चित्र विकत घ्यायचे होत पण त्यांना ते शक्य झालं नाही.कालांतराने ऑर्कुट बंद झालं त्याची जागा फेसबुकने घेतली आणि पुन्हा त्या मॅडम मला फेसबुक वर कनेक्ट झाल्या. माझी आता बरीच चित्र त्यांना बघायला मिळाली. त्यांनी माझ्या चित्राविषयी त्यांच्या अमेरिकास्थित बहिणीला सुनीता मॅडमला सांगितले. त्यांच्या बहिणीने मला माझी पेंटिंग्ज इमेल करायला सांगितले आणि त्यातील सात चित्र सिलेक्ट केली. यासाठी जवळपास 6 महिन्याचा कालावधी लागला. त्यांनी मला सांगितले की चार चित्र आम्ही आमच्या घरासाठी घेत आहोत आणि 3 चित्र अमेरिकन इंडिया फौंडेशनला डोनेट करणार आहोत. 

अमेरिकन इंडिया फौंडेशन ने इतरही नामवंत चित्रकारांची चित्र या लिलावासाठी मागवलेली होती. तसेच पिकासोचे  काही सेरीग्राफही या लिलावात होते. या लिलावात माझी तीन चित्र होती. या तीन चित्रातून एक चित्र अडीच लाख रुपये पेक्षा जास्त किमतीला विकले गेलं, दुसरे चित्र लाख रुपयांच्या वर विकले गेले. काँक्रीट जंगल नावाच्या माझ्या चित्राला मी विकलेल्या किंमतीच्या 5 पट किंमत मिळाली. हे सर्व त्यांनी मला ई-मेल द्वारे कळविले. आम्हा चित्रकाराच्या कलेतून अमेरिकन इंडिया फौंडेशन संस्थेसाठी मोठा निधी उभा राहिला. माझ्या कुटुंबासाठी या पैशातून मोठा आधार झाला होता. एकाच वेळी सात चित्र विकल्या गेल्याने मी खुश होतो. तसेच या लिलावामुळे माझ्या कलेचा योग्य प्रकारे सन्मान झाला होता.  

अमेरिकेतील ज्या शहरात माझे चित्र विकली गेली त्यांचा लिलाव झाला ते शहर इतिहासात बोस्टन टी पार्टी साठी प्रसिध्द आहे. या लिलावात काँक्रीट जंगल, रेड बुल फाईट, लेडी विथ स्वान ही ऍक्रॅलिक माध्यमातील चित्र समाविष्ट होती.  

यासाठी मी सुनीता मॅडम आणि ब्रायन सर यांचे विशेष आभार मानतो.

मी पूर्ण वेळ चित्रकार म्हणून काम करत होतो. मला असं वाटायचं की किमान वर्षाला  12 चित्र विकली जावी. सरासरी 20 ते 25 हजार महिन्याला मिळावे . पण काही वेळा सहा सहा महिने काहीच मिळायचे नाही तर काही वेळा वर्षभराचे एकदाच मिळायचे . या कलाप्रवासात अनेक  वेळा चढउतार आले. काही वेळा तर असं वाटलं चित्रकला सोडून दुसरे काही तरी करावं की काय  मी एकदा परिस्थितीमुळे हतबल होऊन एक कविता फेसबुकला टाकली होती. तेव्हा ती वाचून पुण्यातील विशाल शिंदे यांनी मला ती पोस्ट डिलीट करायला सांगितली. मला म्हणाले निराश होऊ नका. तुमचे काम चालू ठेवा. तुमचा बँक अकाउंट  पाठवा मी मदत पाठवतो. पण काम थांबवू नका. त्यांनी त्वरित पाच हजार रुपये मदत म्हणून मला पाठवले होते. त्यानंतर मी कधीच चित्र सोडायचा विचार केला नाही. मी आजही चित्रातच रमतो माझी चित्र खूप कमी लोकांना आवडतात पण ज्यांना आवडतात ते विकत घेऊन संग्रह करतात. 

कोरोनाकाळात संसार आणि कला जोपासणे कठीण झाले होते म्हणून सध्या मी खासगी शाळेत साहाय्यक कला शिक्षक म्हणून रुजू झालो आहे. घर खर्च सांभाळणे आणि कला जोपासणे हा माझा या मागचा हेतू आहे. 

मी सध्या सृजनात्मक कॅनव्हास पेंटींगसह, जलरंगातील निसर्गचित्र  तसेच रिऍलिस्टिक पेपर कोलाज ही करतो. प्रसिद्धी पासून दूर माझ्या चिखली या गावी राहून मी कला सेवा चालू ठेवली आहे. ऑर्कुट पासून फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटवर , आणि इतर सोशल मीडियावर मी सक्रिय आहे. 

आर्थिक दृष्ट्या थोडा ठीकठाक झाल्यावर तसेच कला बाजाराची स्थिती सुधारल्यावर भविष्यात जहांगीरला सोलो शो करण्याचा मानस आहे. तसेच भविष्यात पेपर कोलाज लँड्स्केपचा शोही करण्याची इच्छा आहे . पण म्हणतात ना सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग नाही करता येत त्यामुळे आर्थिक स्थिती ठीक झाल्यावर जहांगीरला शो करण्याचा मानस आहे. बघूया कसं जमत ते!

****

– सुनील बांबल 

चिखली , बुलडाणा,  महाराष्ट्र

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.