Features

चित्रकला…लहान मुलांसाठी सुट्टीतलं ब्रेन टॉनिक

बाल चित्रकला हा मुलांच्या बौद्धिक विकासासाठी महत्वाचा विषय, पण शाळा – पालक यांच्याकडून दुर्लक्षिला गेलेला ! मोबाईल क्रांतीचं अतिक्रमण जेव्हा मुलांच्या निरागस आयुष्यावर होऊ लागलं तेव्हा कुठे पालकांना चित्रकलेची पुन्हा आठवण झाली आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही ‘चिन्ह’मध्ये बालचित्रकलेवर एक लेख दिला होता. त्या लेखाला पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला ! अनेकांनी मुलांसाठी काही विशेष उपक्रम घ्यावा अशी विनंतीही आम्हाला केली. त्यामुळे चित्रकला मुलांच्या विकासासाठी महत्वाचे योगदान देऊ शकेल आणि प्रत्यक्षरित्या हे घडेल कसे याची माहिती देणारी एक विशेष लेखमाला आम्ही प्रसिद्ध करत आहोत. या लेखमालेतून ‘चिन्ह’च्या छोट्यांसाठीच्या एका विशेष उपक्रमाची माहितीही हळूहळू आम्ही जाहीर करूच. पण तत्पूर्वी प्रत्यक्ष अभ्यासातून तयार झालेले प्रतोद कर्णिक यांचे हे लेख पालकांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरतील याची आम्हाला खात्री आहे.

इईईsssssssss…

शेजारची छोटीशी सना तळ मजल्यावरच्या लॉबीमध्ये अशी जोरात किंचाळली. वरती तिसऱ्या मजल्यावरच्या आजींनी करवादत दरवाजा उघडून, “झोपून तरी देणार आहात का दुपारी तरी…” म्हणत तार स्वरात दम भरला.

सुट्टीत मुलांचा दंगा हा नित्याचाच. पाच मुलं, त्यात सनाचा लाडका दादू आणि त्याचे तीन मित्र आणि ही बया. दादू वय वर्ष साडेपाच. दिवस उजाडायची खोटी. लगेच आठ नाही वाजत तर खेळायला सगळी गॅंग खाली. दिवसभर बाहेर तर सूर्यनारायण असे तापलेले… बाहेर जाऊन खेळायची सोय नाही.

सकाळी आठला ही मंडळी समोरच्या विस्तीर्ण मैदानात फूटबॉल‌ खेळायला जातात. तिथे आधीच मोठी मुलं खेळत असतात. या चिंटू,पिंटू पार्टीला शिरकाव करणंच मुश्किल. तरीही शिताफीनं आपली जागा मिळवत यांचा खेळ सुरु होतो. पण दहा नाही वाजत, तर वरुन उन्हाचे चटके सहन होत नाहीत. मग तो भला मोठा फुटबॉलचा बॉल घेऊन आमच्या बिल्डिंगच्या लॉबीत खेळायला हजर. मग एखाद्या दरवाजावर बॉल ठाम्मकन् आदळला की आतून एखाद्या ताई, काकू, मावशी, आजी दार उघडणार तेवढ्यात गॅंग गायब. पण पुढली दहा मिनिटं काकूंचा नुसता टणटणाट…

मला माझं लहानपण आठवलं.
या मुलांचा तो टळटळीत उन्हातला बाहेरच्या लॉबीतला धिंगाणा ऐकत मी आत बसून माझं काम करत होतो. नकळत माझ्या चेहऱ्यावर जुने दिवस आठवून स्मित उमटलं. तेवढ्यात बाजूच्या दारावर बॉल आदळला. परत तोच नेहमीचा सीन सुरु.

संध्याकाळी मी बाजूच्या सुपर मार्केटमधे गेलो. काही वाणसामान आणायला. एका शेल्फवर ड्रॉइंगच्या वह्या, रबर, पेन्सिली, लहान खडूच्या पेट्या, रंगपेट्या मांडलेल्या दिसल्या. मी पटकन त्यातली एक छोटी क्रेऑनची रंगपेटी उचलली. आणि ती पहात आसताना एकदम वीज चमकावी तशी माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी इतर सामाना बरोबर त्या लहान क्रेऑन खडूच्या आठ रंगपेट्याही घेतल्या. पिशवीत पॅकेट ठेवलं आणि घरी निघालो.

दुसऱ्या दिवशी दुपारी साडेअकरा, पावणे बाराला मी माझ्या घराचं मेन डोअर उघडलं, उगाचच कुणाची तरी वाट बघत असल्या सारखा दीड दोन मिनिटं तिथंच थांबलो. मी बाहेर बघत उभा असताना, चिंटू पिंटू गॅंग मधेच एकमेकांकडे पहात होते. आणि दार न लावता लोटून घेत आत येऊन बसलो.

मी ओरडायला दार उघडून बाहेर आलो नाही, याची त्यांना मग खात्री पटली. मी माझ्या जागेवर बसून माझं काम करायला लागलो. जेमतेम दहा मिनिटं गेली असतील, नसतील… दार हळूच बाहेरच्या बाजूला ढकललं गेलं. परत दोन मिनिटांनी एक छोटासा चेहरा आत डोकावला. सना हळूच आतलं सगळं न्याहाळत होती. मी माझ्या कामात दंग असल्याच तिनं बघितलं. रंगांच्या बाटल्या, पॅलेट, ब्रश, पाण्याची भांडी अशा पसाऱ्यात  मी समोरच्या पेपरवर चित्र काढत होतो. पाच मिनिटांत बयेचा धीर चेपला. दबक्या पावलांनी सना आत येत मी काय करतोय ते बघायला लागली. मग माझं लक्ष जाताच तिनं हसून, हाय म्हटलं. मग ती बाजूला बसून मी कसा चित्र काढतोय ते बघत राहिली. बाहेरच्या चार पंटरना एव्हाना लक्षात आल़ होतं, चुलबुली सना कुठेतरी गायब झाली आहे. मग माझा दरवाजा उघडा दिसल्यावर त्यातला एकजण आत डोकावला. पटकन बाहेर होत त्यानी कुजबुजत सगळ्यांना सांगितलं. मग दोन तीन मिनिटांत सगळी गॅंग घरात. सनाच्या मागे उभे राहून मी काढत असलेलं चित्र पहायला लागले. पटकन मी सनाला हसत विचारलं, तुला आवडतं ड्रॉईंग करायला ? तिनं मानेनेच हो म्हटलं‌. मी बाजूला असलेला A 4 आकाराचा कोरा कागद आणि पेन्सिल तिच्या समोर ठेवली. अचानक तिच्या अंगात नवचैतन्य संचरल्या सारखी ती सरसावून बसली. कागदावर तिनं एक फूल आणि त्याला एक पान काढलं. पाकळ्या, पानं सगळं वेटोळं, गोलगोल. पण त्यातही एक मजा होती. मग तिचं ड्रॉईंग पूर्ण झाल्यावर मी तिला काल आणलेल्यातली रंगपेटी, जी आधीच जवळच ठेवली होती, ती देत म्हटलं, अरे वाsss काय छान फूल काढस गं सना… आता हे फूल छानपैकी रंगव. तशी ती खुदकन हसली आणि पेटीतला एक, एक छोटा खडू घेत तो घासत रंगवायला लागली. तो पर्यंत बाकीचे चौघेपण खाली बसून सगळं कौतुकानं  बघत होते. सनाचं चित्र रंगवून झालं. खडूच्या रेघोट्यांनी गिरगिटत तिनं चारही पाकळ्या रंगवल्या, मग पान रंगवलं. मी परत तिचं कौतुक करत तिला शाबासकी दिली. तेवढ्यात समोर बसलेला गोट्या म्हणाला, काका, मलापण ड्रॉईंग भारी आवडतं. मग मी त्यालाही कागद, पेन्सिल, रबर दिला. त्यांनी काड्या काड्यांचा माणूस काढत, त्याच्या हातात दोरी आणि वर फुगे…. असा फुगेवाला काढला. मग खडूची पेटी त्यांच्या जवळ सरकवत त्यानं ते चित्र रंगवायला घेतलं. एव्हाना उरलेल्या तिघांनीही एक, एक कागद घेत चित्र काढायला सुरवातही केली होती.

“काय दिवसभर उच्छाद मांडतात. शाळेत असतात तेच बरं असतं”, हे पालुपद दिवसभर आळवणारी गोट्याची आई. अचानक एवढी शांतता कशी ? ते बघायला खाली आली.  माझ्या फ्लॅटचं दार दुपारच्या वेळी उघडं बघून त्या आत डोकावल्या. पहातात तर काय, मी चित्र काढतोय आणि बाजूला सगळी गॅंगही चित्र काढण्यात मग्न. त्यांचा बहुधा त्यांच्याच डोळ्यावर विश्वास बसेना. अरे… बापरे, हे भामटे इथे आहेत होय. मग माझ्याकडे पहात म्हणाल्या, “सर, तुमच्या कामात यांचा कशाला तुम्हाला त्रास ! चला रे पोरांनो बाहेर खेळा बरं…” सगळं अपेक्षीत घडत होतं. गोट्याच्या आईची एंट्रीपण. मी म्हटलं, अहो, मला कसला त्रास ? त्यांच ते चित्र काढतायत, माझं मी. मग जरा घुटमळत त्या परत वर गेल्या. लगेच मुलांमध्ये खसखस. एव्हाना बातमी तिन्ही मजल्यांवर पोहोचली होती. मग एकेकाच्या आया खाली आल्या. त्यांच्या लेकरांच्या चित्रांचं माझ्याकडून कौतुक होतंय पाहून जरा हरखल्या. मग तासाभरानी मुलं निघाली. निघताना मी प्रत्येकाच्या हातात काही कागद, दोन पेन्सिली, रबर, पेन्सिल कटर आणि रंगीत खडूंची पेटी दिली आणि  म्हटलं उद्यापासून दुपारी सगळे चित्र काढा. मग संध्याकाळी चित्र घेऊन यायच़ी दाखवायला, ज्याची चित्रं सगळ्यात छान, त्याला एक सरप्राईज गिफ्ट. मुलं हसत, हसत आपापल्या घरी गेली.

दुपारचा दंगा आणि सनाचं ते बेसूर कर्कश्श किंचाळणं पण थांबलं. रोज मुलं साडेपाचला आपली चित्र घेऊन येत दाखवायला.

मित्रांनो, या सगळ्यामधे त्या मुलांचा दुपारच्या वेळचा दंगाच थांबला असं नाही. तर रोज शाळेत जाऊन अभ्यास शिकणं, घरी येऊन दिलेला घरचा अभ्यास करणं या सगळ्यात त्यांच्या मेंदूला जो सततचा सराव, खुराक मिळत होता. रिकामटेकड्या उनाडक्यांमधे आणि दिवसभर उंडारण्यात जरी शारीरीक व्यायाम होत असला तरीही मेंदूचा सराव आणि खुराक जवळ जवळ थांबलाच होता. तो परत एकदा सुरु झाला. मधले दीड, दोन महिने या लहान मुलांच्या मेंदूला होणारा हा नियमित सराव अचानक थांबल्यामुळे, जेव्हा शाळा सुरु होतात, तेव्हा यातल्या कित्येक लहान मुलांना नवीन वर्गातला अभ्यास शिकताना सुरवातीला खूप त्रास होतो. त्यातून काही विद्यार्थ्यांचं मग अभ्यासावरुन मन उडतं किंवा दुर्लक्ष होत जातं.

म्हणूनच सगळ्या पालकांनी याकडे फार गांभिर्यानं बघायची गरज आहे‌. मुलांना कुठल्याही हॉबी कोर्सच्या शिकवणीला पाठवलं की तेवढीच उसंत मिळते, म्हणून चित्रकला, मातीकाम, मेणाच्या वस्तू बनवण्याच्या सुट्टीतल्या छंद वर्गात मुलांना पाठवू नका. काही छंद वर्गातही खूप प्रेमानी आणि छान शिकवतात, हे खरं आहे. पण मुळात क्लासला घातलंच पाहिजे असं नाही. पण तुमच्या मुलाला, त्याची त्याला चित्रकलेची गोडी लागेल हे बघा. त्याला जे हवंय, रेखाटावसं वाटेल ते त्याला करु द्या. त्यातही शाळेचा गृहपाठ करताना पालकच जास्त मेहनत घेतात, तसं करु नका. सुट्टीत सकाळ, संध्याकाळ मुलांना जरुर मैदानी खेळ खेळायला पाठवा. पण फावल्या वेळात, दुपारच्या वेळी त्यांना चित्र काढायला प्रोत्साहन द्या.

मे महिन्याच्या सुट्टीत हीच चित्रकला लहान मुलांसाठी एक  प्रकारे प्रभावी “ब्रेन टॉनिक”चं काम करत असते. चित्रकला लहान मुलांसाठी कसं आणि किती मोठं वरदान आहे, यावर जगभरात बरंच संशोधन झालं आहे. अमेरिकेतल्या आणि जगभरातल्या नामवंत विद्यापीठांत यावर जे संशोधन झालं आहे त्याबद्दल आपण पुढल्या भागात जाणून घेणार आहोत.

*****

क्रमश:

– प्रतोद कर्णिक
लेखक हे चित्रकार आणि जाहिरातकर्मी आहेत.

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.