Features

एका तरी प्रत मिळेल का ?

रविवार लोकसत्ताच्या  आजच्या म्हणजे ५ जून २२ च्या ‘ लोकरंग ‘ पुरवणीत जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टचे माजी अधिष्टाता मं गो राजाध्यक्ष यांनी ‘ कलास्वाद ‘ या सदरात वारली आणि मधुबनी या सारख्या लोककला ज्यांनी सर्वप्रथम जगासमोर आणल्या , इतकंच नाही तर शे सव्वाशे डायऱ्यांमधून आपलं जगणं चित्रांसह नोंदवून ठेवलं त्या चित्रकार भास्कर कुळकर्णी यांच्यावर लेख लिहिला आहे . सदर लेखात भास्कर कुळकर्णी यांच्यावर मी  ‘ चिन्ह’चा अंक प्रसिद्ध केल्यामुळे अगदी सुरुवातीपासून  शेवटपर्यत माझे उल्लेख आल्यामुळे सकाळ पासूनच माझ्या व्हाट्सअपवर सतत अंकासंबंधी विचारणा करणारे मेसेजेस येऊ लागले . अचानक हे कसं काय सुरु झालं असा विचार करीत असतानाच लोकसत्ताची ती पुरवणी नजरेस पडली आणि मग डोक्यात प्रकाश पडला .

येणारे मेसेजेस इतके आर्जवी होते की त्यांना स्पष्ट्पणे सांगून टाकणं देखील योग्य वाटेना . पण सकाळी सकाळी रविवारी करायची असंख्य कामं वाट पाहत असल्यामुळं सतत चॅटींग करणं शक्य नव्हतं , म्हणून काहींना  थोडंसं स्पष्टपणेच  सांगून टाकलं , पण तरीही उलट प्रश्न येतच राहिले ‘ बघाना , कुठे तरी एक तरी प्रत सापडेल , शोधांना वगैरे वगैरे . आता आली का पंचाईत ! यावर काय बोलायचं ? तो अंक प्रसिद्ध झाल्याला आता जवळ जवळ १९ वर्ष लोटलीत . इतक्या वर्षानंतर अशा अंकाची प्रत शिल्लक राहणं शक्य तरी आहे का ? समजा असं आपण धरून चालू की तो अंक अगदी साफ पडला असेल , विकलाच गेला नसेल तर असा अंक जो वृत्तपत्राच्या साध्या कागदावर छापला होता तो इतकी वर्ष गोडावून किंवा तत्सम ठिकाणी ठेवता तरी येऊ शकेल का ? पण भास्कर कुळकर्णी यांची जीवन कहाणी ऐकून लोकं  इतकी भारावलेली असतात की या साऱ्याचा विचार करण्याच्या ते पलीकडेच गेलेली  असतात आणि मग त्यातूनच  वर उल्लेखलेले संवाद निर्माण होतात .

या साऱ्याचा मला होणारा त्रास तर वेगळाच असतो . म्हणजे उदाहरणार्थ ‘चिन्ह’चा प्रत्येक अंक हा अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मी तयार केला होता . त्या प्रत्येक अंकाची कहाणी लिहायची म्हटली तर एक स्वतंत्र वाचनीय पुस्तकच तयार होईल .आज त्या दिवसांची नुसती आठवण जरी झाली तरी अंगावर सर्रकन काटा उभा राहतो असे ते प्रत्येक अंकाचे दिवस होते . भास्कर कुळकर्णी अंक तर प्रतिकूल दिवसांचा मेरुमणी ठरावा इतक्या त्याच्या भयंकर आठवणी आहेत. त्या केवळ आर्थिक बाबींशीच मर्यादित आहेत असे नाही.  मानवी स्वभावाचे विलक्षण कंगोरे दाखवणारे अनुभव या काळात मला घेता आले . आपण आपल्याच नादात असतो . धुंदीत असतो. पण समोरची माणसं तशी नसतात . ती फक्त व्यवहार पाहत असतात , आपण कलासक्त आहोत हे ते सतत भासवत असतात पण  त्याचे कुटील कावे आपल्या सारख्याना नंतरच कळतात किंवा फारच उशिरा कळतात .

भास्कर कुळकर्णी  अंकाच्या वेळी तर या साऱ्याचा अगदी कडेलोटच झाला होता . केवळ दांडग्या चिकाटीमुळेच मी त्यातून तरुन गेलो होतो यात शंकाच नाही .त्यामुळेच ‘ भास्कर कुळकर्णी अंकाची एखादी तरी प्रत शिल्लक आहे का विचारणारा फोन किंवा मेसेज आला की मला त्या अंकाच्या वेळी हातोहात फसवणारे दोन डावरे तथाकथित कवी – कलावंत पटकन डोळ्यासमोर येतात आणि माझा चेहेरा कळत नकळत आक्रसून जातो . मी काहीसा चिडचिडतो .कारण  त्यावेळचे सारेच मानापमानाचे प्रसंग सर्रकन माझ्या डोळ्यासमोरून  निघून गेलेले असतात . त्यामुळेच वाचक म्हणून कुणी नको तितकी जवळीक दाखवू लागलं , नको तितका आग्रह धरू लागला की मी बिथरतोच . अंक शोधण्याचा आग्रह धरणाऱ्या त्या व्यक्तीला थेट वयच विचारतो आणि तो विषयी पंचविशीतला नसला तर  मग इतक्या वर्षात  का नाही अंक घेतला म्हणून खडसावून देखील टाकतो . अंक ही तुमच्या दृष्टीनं आरामखुर्चीत किंवा पलंगावर पडून आरामात वाचायची गोष्ट असेलही पण त्याची निर्मिती ही तितकी सोप्पी नसते हेच मला त्यातून समोरच्याला सांगायचं  असतं . व्हाटसअप नव्हतं त्या काळात अनेकदा फोनवर वाद व्हायचे पण आता व्हाट्सअप असल्यामुळे दोन तीन वेळा चॅटींग झाल्यावर आपल्याला जे म्हणायचं आहे ते समोरच्याला  नेमकं पोचवता येतं असा माझं अनुभव आहे .

पहिला अंक प्रसिद्ध झाल्याला आता ३५ वर्ष झाली आहेत पण आजही ‘ पहिला अंक आहे का ? ‘ ‘ नाना पाटेकरचा अंक आहे का ? भारत दाभोळकरांचा अंक आहे का ? बरवे यांची डायरी असलेला अंक आहे का ?  गुरुदत्तच्या चित्रकार बहिणीचा लेख असलेला अंक आहे का ? झालंच  तर दीप्ती नवलनं लिहिलेले अमृता शेरगीलवरच्या  लेखाचे अंक आहेत का ? असे प्रश्न विचारणारे फोन सतत येत असतात . तरुण मुलं असतील तर त्यांना मी नक्कीच समजावून सांगतो . लवकरच नव्या वेबसाईटवर सर्व अंकाच्या पीडीएफ टाकण्याचा विचार आहे असंही सांगतो , पण सारं काम तयार असूनही मला ते   प्रत्यक्षात आणणं अद्याप जमलेलं नाही हे मान्य  करायलाच हवं . हा साराच मार्ग अवघड आणि वळणावळणाचा असल्यानं हे चालायचंच असं म्हणून मी मनातल्या मनात माझीच समजूत काढतो आणि पुढल्या कामाकडे वळतो . पण आता नवी वेबसाईट सुरु झाली आहे , ती चांगली वाचलीही जाते आहे , त्यामुळे एकेक अंक  वाचकांना लवकर उपलब्ध होईल याची मला खात्री आहे .

हे असे सतत अंकाची चौकशी करणारे फोन जेव्हा जेव्हा येतात तेव्हा माझ्या मनात एकाच विचार येतो की ” हे असे कित्येक वर्षानं फोन येतात  याचा अर्थ असा की इतकी वर्षं आपण टिकलो  म्हणून आनंद मानायचा ? ” का ”  ही अशी  इतक्या वर्षानं देखील ठणठणीतपणं वाजणारी नाणी आपल्यापाशी असताना देखील आपण  कुठंतरी कमी पडलो म्हणून दुःख करायचं ? ” या अंकाच्या निर्मितीतून आपल्याला काही कमवायचं तर नव्हतंच  पण त्यात घातलेले कष्टाचे पैसे तरी परत मिळावेत आणि त्यातून नवी निर्मिती सलग करता यावी कारण  आणखी  देखील असे कितीतरी कलावंत होतेच की .  ‘ आज जागी होणारी ही माणसं त्या वेळी जागी झाली असती तर मी किती तरी नव्या  उमेदीनं  आणखी अंक नक्कीच  काढू शकलो असतो ‘  असं जर मला वाटलं  तर त्यात माझं काय चुकलं ? म्हणूनच असा कित्येक वर्षांनी अवचित येणारा फोन किंवा मेसेज जखमेवरच्या खपल्या काढतो की काय असंच  मला सारखं वाटत राहातं . आज सकाळी देखील असंच काहीसं झालं .

सतीश नाईक
५ जून २०२२

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.