Features

‘चिन्ह आणि मी’ – भाग ३

अमोल पालेकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन येत्या मंगळवारपासून जहांगीरमध्ये भरत आहे. त्या प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिका पालेकरांकडून ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांना आल्यावर त्यांच्या मनात असंख्य जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कारण श्री नाईक हे जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना काही काळ प्रायोगिक रंगभूमी चळवळीत सहभागी होते. त्या काळात कळत नकळत जे काही शिकावयास मिळालं त्यामुळे आपल्या जगण्याला दिशा मिळाली असं त्यांना प्रामाणिकपणे वाटतं. तेच मांडायचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या या दीर्घ लेखाद्वारे केला आहे. हा लेख ४ भागांमध्ये प्रस्तुत करत आहोत. चिन्ह आणि मीया संकल्पित आत्मकथनपर पुस्तकात त्यांचं हे लेखन प्रकाशित होणार आहे. या मालिकेतील आजचा हा तिसरा भाग. 

———-

भाग ३

 

जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये मी चित्रकला शिकलो. पण या मंडळींमध्ये पाच वर्ष राहून यापेक्षा बरंच काही शिकलो. त्यामुळेच तर नंतर मी पत्रकारितेत बिनधास्तपणे प्रवेश करू शकलो. कॉलेजमधून अगदी थेट मेनस्ट्रीम पत्रकारितेत आलो. ते प्रायोगिक रंगभूमीच्या या चळवळीत, कॉफी हाऊसमध्ये किंवा प्रत्यक्ष तालमींमध्ये, नाटकाच्या प्रयोगांमध्ये आणि पहिल्या प्रयोगानंतर होणाऱ्या पार्ट्यांमध्ये जे काही शिकलो त्यामुळेच, असं मला आजही वाटतं. ‘चिन्ह’सारखा चित्रकलाविषयक अंक काढण्याचं धाडस मी करू शकलो ते केवळ त्या पाच वर्षात बेधुंदपणे घेतलेल्या प्रत्येक अनुभवामुळेच, असं आज मागे वळून पाहताना मला प्रकर्षानं जाणवतं.

 

***

 

अमोलच्या प्रदर्शनाचं निमंत्रण आल्यावर या साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. मन तब्बल चाळीस वर्ष मागे गेलं. अमोलच्या ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ ‘गोची’ ‘वासनाकांड’ या नाटकांसाठी मी बॅकस्टेजला काम केलं. तोही एक वेगळाच अनुभव होता. तिथंही खूप शिकावयास मिळत असे.

अमोलचं एक अत्यंत गाजलेलं नाटक . 'गोची'. लेखक सदानंद रेगे आणि अभिनेते होते दिलीप कुलकर्णी , जयराम हर्डीकर आणि अनुया पालेकर. या नाटकाचे प्रयोग त्या काळात अक्षरशः घराघरात , शाळा कॉलेजात केले..
सत्तरच्या दशकातलं अमोलचं गाजलेलं नाटक वल्लभपूरची दंतकथा. रेखा सबनीस.(बहुदा) एकनाथ हट्टंगडी आणि अमोल

‘वासनाकांड’ प्रकरणाचा वाद आणि त्यावेळचं कोर्टकचेरी प्रकरण ज्या पद्धतीनं अमोलनं हाताळलं तो साराच प्रकार ग्रेट होता. त्याच दरम्यान ‘छोटीसी बात’ या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं होतं. पंच्याहत्तर साली तो चित्रपट प्रकाशित झाला आणि एकदम हिट झाला. आणि त्या चित्रपटानं अमोल अक्षरशः स्टार झाला. ‘वासनाकांड’च्या शेवटच्या प्रयोगापर्यंत मी त्याच्या टीममध्ये होतो. त्यानंतर मात्र माझा नाटकाशी संबंधच तुटला.

पुष्पा भावे यांनी' माणूस' मध्ये अमोल वर अतिशय सुरेख लेख लिहिले होते. त्यातलाच हा एक...

‘वासनाकांड’च्या पुण्याच्या प्रयोगाचा एक किस्सा मला आठवतो. आजही तो अगदी जसाच्या तसा स्मरणात राहिलाय. पुण्याच्या बालगंधर्वमध्ये प्रयोग ठरला. सेन्सॉर  बोर्डाच्या पराक्रमामुळे नाटक आधीच गाजलं होतं. त्यात सारं प्रकरण कोर्टात गेल्यानं पुण्यातल्या प्रेक्षकांना प्रयोगाविषयी खूपच उत्सुकता होती. त्यातच अमोलचा ‘छोटीसी बात’ हिट झालेला. त्यामुळे पुण्याचा प्रयोग हाऊसफुल झालेला. आता हे वाचताना नव्या पिढीतल्या अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल पण खरंच सांगतोय पुण्याला रस्तामार्गे जाताना सात-आठ तास तरी लागायचे. प्रयोग रात्री साडेनऊचा होता. पण आम्ही सकाळीच निघालो होतो. बासू चॅटर्जीनी त्यांच्या युनिटची बहुदा मेटॅडोर आम्हाला दिली होती. गाडीच्या टपावर वाड्याचा भव्य दरवाजा आणि दोन तीन शिल्प. (ती बहुदा आमच्या शानभाग सरानी केली होती) आणि इतर किरकोळ सामान. आणि आत अमोल अनुयासह सहदिग्दर्शक दिलीप कुलकर्णी, मेकअपमन आचरेकर आणि बॅकस्टेजचे आम्ही म्हणजे मी, नलेन  भिवंडकर, प्रमोद किंवा विनोद गुरुजी (किंवा दोघंही) आणि बहुदा अनंतराव भावे असे सगळे.

मौज प्रकाशनानं नंतर वासनाकांड हे पुस्तक प्रकाशित केलं...

‘वासनाकांड’च्या पुण्याच्या प्रयोगाचा एक किस्सा मला आठवतो. आजही तो अगदी जसाच्या तसा स्मरणात राहिलाय. पुण्याच्या बालगंधर्वमध्ये प्रयोग ठरला. सेन्सॉर  बोर्डाच्या पराक्रमामुळे नाटक आधीच गाजलं होतं. त्यात सारं प्रकरण कोर्टात गेल्यानं पुण्यातल्या प्रेक्षकांना प्रयोगाविषयी खूपच उत्सुकता होती. त्यातच अमोलचा ‘छोटीसी बात’ हिट झालेला. त्यामुळे पुण्याचा प्रयोग हाऊसफुल झालेला. आता हे वाचताना नव्या पिढीतल्या अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल पण खरंच सांगतोय पुण्याला रस्तामार्गे जाताना सात-आठ तास तरी लागायचे. प्रयोग रात्री साडेनऊचा होता. पण आम्ही सकाळीच निघालो होतो. बासू चॅटर्जीनी त्यांच्या युनिटची बहुदा मेटॅडोर आम्हाला दिली होती. गाडीच्या टपावर वाड्याचा भव्य दरवाजा आणि दोन तीन शिल्प. (ती बहुदा आमच्या शानभाग सरानी केली होती) आणि इतर किरकोळ सामान. आणि आत अमोल अनुयासह सहदिग्दर्शक दिलीप कुलकर्णी, मेकअपमन आचरेकर आणि बॅकस्टेजचे आम्ही म्हणजे मी, नलेन  भिवंडकर, प्रमोद किंवा विनोद गुरुजी (किंवा दोघंही) आणि बहुदा अनंतराव भावे असे सगळे.

वासनकांण्डच्या पहिल्या प्रयोगाच्या वेळी जी स्मरणिका काढली होती तिच्यातली श्रेयनामावली...

कसेबसे आम्ही सारे साडेनऊ-पावणेदहाच्या सुमारास बालगंधर्वात पोहोचलो. थिएटरवर प्रचंड गर्दी होती. प्रयोग उशिरा सुरु होणार म्हणून आरडाओरडादेखील सुरु होता. गेल्याबरोबर आम्ही आधी सेट लावला. अमोल अनुया मेकअपला बसले. वातावरणात भयंकर तणाव. हे बहुदा सिनेमावाले प्रेक्षक असणार हे आम्ही अंदाजानं ओळखलं होतं. आमची गाडी बालगंधर्वात शिरतानाच माझ्या कानावर कुणा तरी टारगट प्रेक्षकाचं बोलणं ऐकू आलं. तो मोठ्यानं ओरडून सांगत होता. ‘अरे हे काय नाटक सिनेमावाले आहेत, बसले असतील कुठेतरी प्यायला! प्रयोग उशिरा सुरु होणार नाही तर काय? वगैरे वगैरे… पण प्रतिक्रिया द्यायला वेळ कुणाला होता. आणि तसाही मी त्यांच्यात लहानच होतो. पटापट सारं आटपून आम्ही प्रयोग सुरु केला. नाटक तसं अतिशय गंभीर होतं. सकाळपासून आम्ही नाही म्हटलं तरी तणावातच होतो. प्रयॊग संपताच आम्ही स्टेजवरच बसकण मारली. अमोलला भेटायला पुण्यातले नाटकवाले, पत्रकार वगैरे आलेले. तो त्यांच्याशी बोलत होता.

प्रयोग संपल्यावर जसा पडदा उघडला जातो तसा उघडला तर प्रेक्षागृहात बरेच प्रेक्षक बसलेले. पॉपकॉर्न वेफर्स वगैरे खात. आणि आम्ही पडदा उघडलेला पाहताच बरेचसे प्रेक्षक नाटक पुढं सुरु झालं म्हणून भराभर आत येऊ  लागले. आम्हाला काही कळेचना. त्यातले कुणीकुणी सांगूदेखील लागले की, हा आता करा सुरुवात वगैरे. तर आम्ही त्यांना सांगू लागलो की अहो, नाटक संपलंय! तर त्यांचा विश्वासच बसेना. इकडे आम्ही सेट काढतोय, त्यांच्याशी बोलतोय. अखेर आत जाऊन अमोलला आम्ही सांगितलं. अमोल बाहेर आला आणि निवेदन करू लागला. की प्रयोग संपलाय! आपण घरी जावं, वगैरे. पण प्रेक्षक ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आम्ही पुन्हा एकदा पडदा पाडला. की जेणेकरून त्यांनी नाट्यगृहाच्या बाहेर जावं म्हणून. पण त्याचा उलटाच परिणाम झाला. बाहेर पडलेले सारेच प्रेक्षक आता येऊ लागले.

त्याच काळात चित्रपट विषयक ग्लोसी इंग्रजी नियतकालिकांनी अमोलच्या मोठमोठाल्या मुलाखती प्रकाशित केल्या होत्या ही मुलाखत सिनेब्लिटझ मधली...

अमोल वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेक्षकांना समजावू लागला पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत ते नव्हते. प्रयोग सुरु होण्यापूर्वी जे निवेदन अमोल करायचा त्यात या नाटकाला मध्यंतर नाही हे वाक्य उच्चारायला अमोल विसरला होता. साहजिक आहे ज्या ताणतणावातून आम्ही कसेबसे पुण्यात येऊन पोहोचलो होतो त्यामुळेच अगदी  अनवधानानं ती चूक अमोलकडून झाली होती. पण त्याचा गैरफायदा काही प्रेक्षकांनी घेतला आणि त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. पोलीस आले त्यांनी प्रेक्षकांना नाट्यगृहाबाहेर काढलं. पण प्रेक्षक तिथूनदेखील बाहेर जाईनात. अर्धच नाटक दाखवलत, आम्हाला फसवलंत आता आमचे पैसे परत करा म्हणून ते सांगू लागले. वातावरण एकदम बिघडलं. कुमार सप्तर्षींनी पुढाकार घेतला. आणखीही बरीच मंडळी आली आणि प्रकरण शांत करायचं प्रयत्न केला. पण प्रकरण हाताबाहेर गेलं होतं. प्रचंड घोषणा आणि आरडाओरडा सुरु झाला. अखेरीस सप्तर्षी म्हणाले ‘तुम्ही सारे आता मागच्या दरवाजाने मुंबईला निघून जा, तरच हे प्रकरण आता शांत होईल’ वगैरे. आम्ही त्यांचा सल्ला शिरोधार्य मानला आणि चंबूगबाळं आवरून तिथून निघालो. निघतानादेखील त्यांनी घोषणा दिल्या. चारदोन दगडदेखील आमच्यावर भिरकावले. थोडाबहुत पाठलागदेखील केला. पण आम्ही पुण्यातून सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झालो. आज इतक्या वर्षांनं हे सारं आठवतानादेखील त्यातला थरार जाणवतो आहे. पण गंमत म्हणजे त्याच पुण्यात कालांतरानं अमोल स्थायिक झाला आहे.

प्रसिद्धीसाठी त्या काळात अशी पॅम्प्लेट्स काढली जात..

लिहितालिहिता खूपच भूतकाळात शिरलो. तर पुन्हा कॉफी हाऊसमध्ये येऊया. सकाळी जेजेत जायचं, दुपारी कॉफी हाऊसमध्ये या सर्वाना भेटायचं. मग परत कॉलेजमध्ये जायचं. संध्याकाळी गिरगावात. उन्मेषच्या कार्यालयात किंवा साहित्य संघात अथवा कुठल्यातरी शाळेत तालमीच्या ठिकाणी असा माझा रोजचा शिरस्ता होता. कधीकधी कॉफी हाऊसमधल्या गप्पा खूप रंगत असत. अगदी संध्याकाळ होत असे. आणि मग तिथूनच मी या सर्व मंडळींबरोबर गिरगावात जात असे. कॉफी हाऊसमध्ये बसलो असतानाचा एक किस्सा मात्र सांगितल्याशिवाय राहवत नाही. एका टेबलावर अमोल बसला होता. बाजूला बहुदा अनुया असावी आणि रेखा सबनीस आणि आणखीन कुणीतरी दोघेतिघे असावेत आता नावं आठवत नाहीत. रेखाला चित्रकलेविषयी अतिशय आकर्षण होतं. साहजिकच तिनं अमोलला चित्रकलेविषयी काही तरी विचारलं. आणि अमोल त्यावर सविस्तर बोलू लागला. मी त्यावेळी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये इंटेरियरला शिकत होतो. मलाही चित्रकारच व्हायचं होतं. पण आधी पोटापाण्याचं काही तरी हवं म्हणून मी इंटेरियरला प्रवेश घेतला होता. त्यांची चर्चा ऐकून मी अचानकपणे अमोलला एक प्रश्न विचारला. की ताजमध्ये प्रदर्शन करण्यासाठी काय करावं लागतं? अशा अर्थाचा तो प्रश्न होता. त्यावर अमोलनं शांतपणे माझ्याकडं रोखून पाहिलं आणि आणखीन शांतपणे त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं मला उत्तर दिलं ‘त्यासाठी आधी चित्रं काढावी लागतात’ अमोलचं ते असलं उत्तर ऐकून मी अक्षरशः गार झालो. मनात म्हटलं बच्चमजी दाखवेनच मी चित्र काढून आणि प्रदर्शन भरवून.

 

क्रमश:

 

सतीश नाईक 

संपादक

‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.