Features

‘चिन्ह आणि मी’ – भाग १

अमोल पालेकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन या मंगळवारपासून जहांगीरमध्ये भरत आहे. त्या प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिका पालेकरांकडून ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांना आल्यावर त्यांच्या मनात असंख्य जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कारण श्री नाईक हे जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना काही काळ प्रायोगिक रंगभूमी चळवळीत सहभागी होते. त्या काळात कळत नकळत जे काही शिकावयास मिळालं त्यामुळे आपल्या जगण्याला दिशा मिळाली असं त्यांना प्रामाणिकपणे वाटतं. तेच मांडायचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या या दीर्घ लेखाद्वारे केला आहे. हा लेख ४ भागांमध्ये प्रस्तुत करत आहोत. चिन्ह आणि मीया संकल्पित आत्मकथनपर पुस्तकात त्यांचं हे लेखन प्रकाशित होणार आहे.

———-

भाग १

 

१९७२-७३ साल असेल. मी जेजेमध्ये प्रवेश घेतला होता. जेजेमध्ये म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये नव्हे. जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये. त्याचादेखील एक किस्सा आहे. खरं तर मला पेंटर व्हायचं होतं. आयुष्यभर पेंटिंग करायची अशी स्वप्न मी बालपणी पाहिली होती. पण मला काही फौंडेशनला जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळाला नाही. कारण मला ठाऊकच नव्हतं असं काही कॉलेज असतं. मी आपला प्रवेशासाठी जे जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टमध्ये गेलो. पण तिथं मला काही प्रवेश मिळाला नाही.

मग कुणीतरी सांगितलं. बोरीबंदर स्टेशनसमोर कॅपिटल सिनेमाच्या मागे ‘करियर’ नावाची इन्स्टिट्यूट आहे. तिथं तू जा. फौंडेशनला तुला तिथं नक्की प्रवेश मिळेल. नंतर तुला हवं तर जेजेत प्रवेश घेता येईल. जेजेत शिकायचं स्वप्न बाजूला सारून मी तिथं प्रवेश घ्यायला गेलो. एस के लुथ्रा नावाचे गृहस्थ ती इन्स्टिट्यूट चालवत असत. स्वामी नावाचा त्यांचा एक असिस्टंट होता, अगदी शिडशिडीत. त्यानं माझे प्रवेशाचे सोपस्कार पूर्ण केले. रानडे, गोखले, आचरेकर, नागपूरकर असे अनेक दिग्गज कलाशिक्षक त्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत असत.

करियरची एक शाखा दादरला होती. ‘करियर’ची ही दादरची शाखा. तिथं आठवड्यातून दोन वेळा जावं लागायचं. कारण दोन्ही शाखांची लेक्चर्स एकाच ठिकाणी होत. लुथ्रा यांनी तिथल्या शिक्षणाची छान घडी घातली होती. मला जेजेसारख्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकायचं होतं आणि हे काय मी इथं शिकतोय असे विचार कधीकधी मनात येत. पण वर्गात चांगली मुलं (विशेषतः मुली) असल्यामुळं दिवस मोठे छान जात असत. (त्यातल्याच एकीशी मी नंतर लग्न केलं)

त्या काळी वार्षिक परीक्षेचं केंद्र जे जे स्कूल ऑफ आर्ट होतं. परीक्षा द्यायला मी अप्लाइड आर्टमध्ये आलो होतो. पण परीक्षा झाली आणि नंतर काय झालं कुणास ठाऊक त्या ‘करियर’ इन्स्टिट्यूटची मान्यता सरकारनं काढून घेतल्याची बातमी आली. त्या काळी शिक्षणांमध्ये गैरव्यवहार केल्यास ते करणाऱ्यांना शिक्षा देण्याची पद्धत किंवा प्रथा कला संचालनालयात रूढ होती. त्यानुसारच ती कारवाई झाली होती. आता काय होणार? आम्हाला प्रश्न पडला.

पण कला संचालनालयानं म्हणजे सरकारनं तातडीनं निर्णय घेऊन ‘करियर’च्या दोन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांना विशेष वर्ग काढून ‘जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट’मध्ये प्रवेश दिला. अशा तऱ्हेनं जेजेत प्रवेश घेण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. फॉर्म आणायला गेलो तर ऑफिस जवळ मीना सुखटणकर दिसली. म्हणजे आताची मीना नाईक. तिचं तेव्हा ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्र’ हे नाटक तेव्हा गाजत होतं. ते जरी मी पाहिलं नसलं तरी त्याविषयी मी वर्तमानपत्रातून खूप वाचलं होतं. त्यामुळे तिला मी चटकन ओळखलं. मग दामू केंकरे दिसले. या कॉलेजमध्ये आता आपण शिकणार या भावनेनं मला अतिशय आनंद झाला होता. पण मी चुकीच्या ठिकाणी प्रवेश घेतला आहे हे माझ्या नंतर लक्षात आलं. त्या काळात माझं वाचन खूप होतं. शाळेत असल्यापासूनच हातात मिळेल ते वाचायचं असा खाक्या होता. त्यातच नाटकाची आवड असल्यामुळं नाटकासंदर्भांत जो काही मजकूर वृत्तपत्रात प्रकाशित होई तो साराच्या सारा मी वाचलेला असे. नाटकाच्या पुस्तकाचं तर मी पारायण करीत असे.

भारतीय विद्याभवनच्या स्पर्धांविषयी मी खूप वाचून  होतो. पण त्या स्पर्धा तोपर्यंत बंद झाल्या होत्या. आणि उन्मेष युवक प्रायोगिक नाट्यमंच या तुलनेनं नवीन संस्थेनं आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा चौपाटीच्या बिर्ला क्रीडा केंद्रात सुरु झाल्या होत्या. जेजेची भारतीय विद्याभवनच्या स्पर्धेतली कामगिरी मला चांगलीच ठाऊक होती. प्रा दामू केंकरे, रमाकांत देशपांडे, इर्शाद हाश्मी, शांताराम पवार यांचं कर्तृत्वदेखील मला ठाऊक होतं. त्यामुळे मी ठरवलं की आपण जेजेतर्फे या स्पर्धेत भाग घ्यायचाच. कॅम्पसमध्ये असलेल्या जेजेच्या दुसऱ्या विभागात प्रिया तेंडुलकर शिकायला आली होती. मला ते कळताच तिला मी भेटायला गेलो. तीच जे जे स्कूल ऑफ आर्टची आणि माझी पहिली ओळख. तिथंच गुरुजी बंधुंशी माझी ओळख झाली. प्रियाला उन्मेषच्या स्पर्धेविषयी सांगताच तीही तयार झाली आणि भारतीय विद्याभवनच्या स्पर्धेनंतर बऱ्याच वर्षांनी जेजेच्या दोन्ही कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेला उतरल्या.

चंद्रकांत प्रभाकर देशपांडे यांची ‘बस’ नावाची एकांकिका बहुदा रमाकांत देशपांडे यांनी निवडली असावी. दिवसभर तालमी चालत असत. इर्शाद हाश्मी सर त्या घेत असत. मग संध्याकाळी रमाकांत देशपांडे सर येत. ते त्यात त्यांना हवा असलेला बदल करत. त्यामुळे स्पर्धेच्या प्रयोगापर्यन्त त्यात काय चाललं आहे हे आम्हाला समजतच नव्हतं. त्या एकांकिकेत पुरुषोत्तम बेर्डे, नलेश पाटील, रघुवीर कुलकर्णी हे नंतर नाटक साहित्य चित्रपट क्षेत्रात नाव कमावलेले जेजेचे माजी विद्यार्थी देखील काम करीत होते. ते मला खूप सिनियर होते. पण त्यांचं नाटकातलं ते पहिलंच पाऊल ठरलं. ‘या मंडळी सादर करू या’ आणि ‘टुरटूर’ हे त्याच्या नंतरचं. असो. पण अशा विचित्र पद्धतीनं तालमी चालल्यामुळं आमची ती ‘बस’ एकांकिका स्पर्धेत प्रचंड आपटलीच.

‘बस’ एकांकिकेच्या पहिल्या आणि शेवटच्या प्रयोगात मी अगदी उजव्या कोपऱ्यात. माझ्या मागे नंतर कवी म्हणून प्रसिद्ध झालेला नलेश पाटील, आणि सर्वात शेवटी टोपी घातलेला कंडक्टरच्या भूमिकेतला नंतर लेखक दिग्दर्शक संगीतकार म्हणून नावाजला गेलेला पुरुषोत्तम बेर्डे.

चंद्रकांत प्रभाकर देशपांडे यांची ‘बस’ नावाची एकांकिका बहुदा रमाकांत देशपांडे यांनी निवडली असावी. दिवसभर तालमी चालत असत. इर्शाद हाश्मी सर त्या घेत असत. मग संध्याकाळी रमाकांत देशपांडे सर येत. ते त्यात त्यांना हवा असलेला बदल करत. त्यामुळे स्पर्धेच्या प्रयोगापर्यन्त त्यात काय चाललं आहे हे आम्हाला समजतच नव्हतं. त्या एकांकिकेत पुरुषोत्तम बेर्डे, नलेश पाटील, रघुवीर कुलकर्णी हे नंतर नाटक साहित्य चित्रपट क्षेत्रात नाव कमावलेले जेजेचे माजी विद्यार्थी देखील काम करीत होते. ते मला खूप सिनियर होते. पण त्यांचं नाटकातलं ते पहिलंच पाऊल ठरलं. ‘या मंडळी सादर करू या’ आणि ‘टुरटूर’ हे त्याच्या नंतरचं. असो. पण अशा विचित्र पद्धतीनं तालमी चालल्यामुळं आमची ती ‘बस’ एकांकिका स्पर्धेत प्रचंड आपटलीच.

‘बस’चा प्रयोग सुरू होण्याआधी मी विंगा वगैरे हलवतोय. शेजारी नंतर नाटक चित्रपट सृष्टी अभिनेता म्हणून प्रख्यात पावलेले आमचे शिक्षक आणि एकांकिकेचे दिग्दर्शक इर्शाद हाश्मी आणि त्यांच्या शेजारी नंतर बालनाट्य चळवळीत नावाजला गेलेला रामनाथ थरवळ.

भवन्स कॉलेजनं त्या स्पर्धेत ‘कॅम्प’ नावाची एकांकिका सादर केली होती. त्या एकांकिकेचा दिग्दर्शक होता विहंग नायक. सुमारे पंचवीस तीस नवशिक्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यानं जो प्रयोग बसवला होता तो केवळ अफाट होता. लक्ष्मीकांत बेर्डे हा त्या एकांकिकेत मॉबमध्ये होता. अवघी दोन किंवा तीन वाक्य त्याला असतील, पण त्यानं ती अशा पद्धतीनं पेश केली होती की स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट नटाचा पुरस्कार त्यालाच मिळून गेला. हा लक्ष्मीकांत आमच्या एकांकिकेचा प्रयोग चालू असताना अक्षरशः सुटला होता. त्यानं एखादं वाक्य उच्चारलं की प्रेक्षागृहात हशा आणि टाळ्यांचा नुसता गजर व्हायचा. खरं तर लक्ष्मीकांतचा भाऊ पुरुषोत्तम बेर्डे हा आमच्या एकांकिकेत मुख्य भूमिकेत होता. पण लक्ष्मीकांतनं कुठलीही दयामाया न दाखवता आमची एकांकिका उधळून लावली ती लावलीच. असो.

उन्मेषचे तीन संस्थापक: डावीकडून - नाटककार अच्युत वझे, त्याच्या शेजारी सुबोध गाडगीळ आणि मागे जयराम हर्डीकर

तो एकूणच अनुभव  माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. स्पर्धेत भाग घेण्याच्या निमित्तानं मी गिरगावात जाऊ लागलो. सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या इमारतीत उन्मेषचं ऑफिस होतं. तिथं अच्युत वझे, जयराम हर्डीकर, सुबोध गाडगीळ, गिरीधर मोरे, सुरेश साने, जयंत ओक, भालचंद्र गोखले अशा उन्मेषच्या मुख्य कार्यकर्त्यांशी भेटी गाठी होऊ लागल्या. आणि अगदी थोड्या वेळात मी त्यांच्यातलाच एक झालो. उन्मेषचं त्या वेळी ‘षड्ज’ हे अच्युत वझेंचं नाटक खूप गाजलं होतं. ते पाहून प्रख्यात नाट्य समीक्षक माधव मनोहर यांनी ‘सोबत’मध्ये असं लिहिलं होतं की इथून पुढली दहा ते पंधरा वर्ष ही उन्मेषचीच आहेत वगैरे.

उन्मेषच्या अच्युत वझे लिखित 'षड्ज' या नाटकाची निमंत्रण पत्रिका....

मी उन्मेषचा सभासद झालो त्यावेळी दिलीप कोल्हटकर, वृंदावन दंडवते यांचं ‘बूट पॉलिश’ हे रस्तानाट्य बसवत होता. प्रायोगिक रंगभूमीच्या चळवळीची जणू ती सुरुवातच होती. याच ग्रुपमध्ये असलेला सुरेश वैद्य, प्रा दिलीप जगताप यांचं ‘एक अंडे फुटले’ हे नाटक बसवत होता. तर अमोल पालेकर उन्मेषसाठी ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ हे अच्युतचं नाटक बसवत होता. या सगळ्यांमध्ये असणं, त्यांच्यात वावरणं, तालमी संपताच रात्री अपरात्री घरी येणं यामधून मला खूप काही शिकावयास मिळालं.

आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा संपल्यानंतर त्या काळातले प्रख्यात छायाचित्रकार राजदत्त यांनी काढलेल्या या छायाचित्रात उन्मेषची तेव्हाची तरुण मंडळींची टीम. नावं आता इतक्या वर्षानंतर आठवतील तशी सांगतोय. बसलेले डावीकडून - चंद्रकांत मेहंदळे, विनय आपटे, सुहास पळशीकर, जयंत ओक, अच्युत वझे, विवेक लागू, जयंत करगुटकर, नरेश नातू. खुर्च्यांवर बसलेले उजवीकडून - जुईली देऊसकर, पुष्पा वैद्य, श्रीमती विनय आपटे, बहुदा सुनील जोशी, नंतरचं नाव आठवत नाही. विश्वास जोशी, सुबोध गाडगीळ, गिरीधर मोरे, विसू कामेरकर. मी स्वतः. विलास वंजारी. आणि मागे उभे डावीकडून - सुरेश वैद्य, वीरकर आणि कोपऱ्यात बाळ मोघे.

मोठे मंतरलेले दिवस होते ते. सकाळी जेजेत जायचं. साडेतीन वाजले की थेट साहित्य संघ. आणि मग नंतर गिरगावातच तालमीच्या विविध ठिकाणी जायचं. किंवा उन्मेषच्या ऑफिसमध्ये बसायचं. तालमी आटोपल्या की रात्री खूप उशिरा घरी परतायचं. अनेकदा दिलीप कोल्हटकर ट्रेनमध्ये असायचा. त्याची शेवटची गाडी ठरलेली असायची. मी सायनला उतरायचो तो पुढं डोंबिवलीला जायचा. जवळजवळ चारपाच वर्ष मी या साऱ्यांमध्ये रमून गेलो होतो. जणू काही नाटकवालाच झालो होतो. दुसरं काही दिसतंच नव्हतं मला.

उन्मेशच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ डावीकडून गिरीधर मोरे, राघू बंगेरा, परीक्षक अशोक जैन, सुरेश भागवत, सुहासिनी मुळगावकर ,प्रफुल्ला डहाणूकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, विनय धुमाळे, ज्योत्स्ना कार्येकर, दिलीप कोल्हटकर आणि अच्युत वझे. माईकवर बोलत आहेत सुरेश वैद्य.

तोपर्यंत मी अप्लाइड आर्ट सोडलं होतं. सगळे आले अप्लाइड आर्टला म्हणून मीही आलो होतो अप्लाइड आर्टला. फाईन आर्टचं वेगळं कॉलेज असतं / होतं हे मला ठाऊकच नव्हतं. ते कळल्यावर मात्र मी स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. आधी इंटेरियर डेकोरेशनचा कोर्स केला आणि मग थेट फाईन आर्टला प्रवेश घेतला. तब्बल सात साडेसात वर्ष काढली मी जेजे मध्ये, त्यामुळेच कदाचित जेजेविषयी अधिक आपुलकीची किंवा जवळीकीची भावना मनात निर्माण झाल्यामुळे नंतर जेजेच्या संदर्भात प्रचंड स्फोटक लिखाण करीत गेलो असणार असं आज मागे वळून बघताना वाटतं. जेजेमध्ये असतानाच मी एकांकिका वगैरे लिहू लागलो. त्यांना बक्षिसंदेखील मिळाली.

 

क्रमश:

 

सतीश नाईक

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.