FeaturesGachhivaril Gappa

लाईव्ह गप्पा गुरुवारी सायं ५.३०ला!

येत्या गुरुवारी म्हणजे २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘चिन्ह’चं युट्यूब चॅनेल आणि फेसबुकचं Satish K. Naik पेजवर मी आपल्याशी लाईव्ह गप्पा मारायला उपलब्ध असणार आहे. गेल्या अनेक महिन्यात असा संवाद झाला नव्हता हे हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचं मुख्य कारण. पण दुसरं महत्वाचं कारण म्हणजे चित्रकार गायतोंडे हयात असते तर २ नोव्हेंबर रोजी त्यांच्या निवडक चाहत्यांनी त्यांचा ९९ वा वाढदिवस साजरा केला असता. पण तसे घडले नाही. २२ वर्षांपूर्वी म्हणजे २००१ सालच्या १० ऑगस्टला वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांचं दिल्लीत वृध्दापकाळानं निधन झालं. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९२४ चा. म्हणजेच २ नोव्हेंबर २०२३ पासून ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ वर्षाला सुरुवात होत आहे.

गायतोंडे यांच्यासारखी लोकविलक्षण व्यक्तिमत्व शतकानुशतकात क्वचितच जन्माला येत असतात. पण निवडणुकीच्या राजकारणात आकंठ बुडालेल्या राज्यकर्त्यांना या विषयाचा गंधच नसल्यामुळं सरकारतर्फे ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ वर्ष साजरं केलं जाईल वगैरे अपेक्षा करणंच मूर्खपणाच ठरेल. या संदर्भात ‘चिन्ह’नं सुमारे वर्षभरापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारकडे हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्यास कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. म्हणूनच ‘चिन्ह’नं स्वतःच ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ वर्ष साजरं करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात ‘चिन्ह’चा वकूब हा छोटा आहे त्यामुळे अगदी छोट्याच प्रमाणावर जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं जाणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर दर आठवड्याला काहीनाकाही मजकूर प्रकाशित करून गायतोंडे यांच्या आठवणी वर्षभर जागवल्या जाणार आहेत.

या संदर्भात अधिक सांगायचं झालं तर गायतोंडे गेले त्याच वर्षी ‘चिन्ह’नं आपल्या अंकाचं पुनरुज्जीवन करून गायतोंडे यांच्या वरची एक विशेष पुरवणी देऊन ‘चिन्ह’चा अंक प्रसिद्ध केला. त्यानंतर गायतोंडे यांच्या चित्रांच्या किंमती भरमसाठ वाढू लागल्यावर २००६ साली ‘चिन्ह’चा गायतोंडे विशेषांक, तर २००७ साली आणखीन एक गायतोंडे पुरवणी असलेला अंक प्रसिद्ध करून गायतोंडे यांच्या चरित्राची सर्व साधनं उपलब्ध करून दिली. पण तरीसुद्धा कुणाही प्रकाशकानं किंवा गायतोंडे यांची चित्रं ज्यांनी करोडो रुपयांना विकली त्या गॅलरी चालकांनी गायतोंडे यांच्यावरील ग्रंथ प्रकाशित करण्याचं औचित्य दाखवलं नाही.

म्हणूनच २०१६ साली ‘चिन्ह’नं गायतोंडे यांच्यावरील एक दिमाखदार ग्रंथ प्रकाशित केला. मधल्या काळात ‘चिन्ह’मधील मजकुराची उचलेगिरी करून गायतोंडे यांच्यावरील इंग्रजी ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. ते सर्व प्रकरण आधी पोलिसात आणि नंतर न्यायालयात गेल्यानं मी इथं त्यावर जाहीर भाष्य करू इच्छित नाही. पण २००१ ते २०१६ आणि २०१६ ते २०२३ या काळात गायतोंडे यांच्यावरील उत्तम दर्जाचा ग्रंथ प्रकाशित न झाल्यामुळंच ‘चिन्ह’नं आता गायतोंडे यांच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजेच २०२४ सालात गायतोंडे यांच्यावरचा आंतरराष्ट्रीय दर्जा लाभलेला ग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचं शेवटच्या टप्प्यातलं काम आता सुरु झालं आहे. त्या निमित्तानंच २ नोव्हेंबर रोजी ‘चिन्ह’नं ऑनलाईन गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात आपण केवळ गायतोंडेच नव्हे तर ‘चिन्ह’चं लवकरच प्रकाशित होणारं महत्वाकांक्षी प्रकाशन ‘जे जे जगी जगले’ आणि त्या पाठोपाठ २०२४ च्या दुसऱ्या पर्वात प्रकाशित होणाऱ्या ‘चित्रकार प्रभाकर बरवे’ या ‘चिन्ह’च्या शेवटच्या प्रकाशनासंदर्भात देखील प्रश्न विचारू शकाल. याखेरीज ‘चिन्ह’नं गेली अनेक दशकं जे जे स्कूल ऑफ आर्टचा जो विषय नेटानं लावून धरला होता, तोही नुकताच तडीला गेला आहे. जेजेला डिनोव्हो दर्जा बहाल झाला आहे. त्या संदर्भात अलीकडच्या पिढीला अनेक प्रश्न पडतात. म्हणजे उदाहरणार्थ ‘चिन्ह’चा आणि जेजेचा काय संबंध? जेजेसाठी ‘चिन्ह’नं काय केलं आहे? काही तरुण मुलांनी तर ‘चिन्ह’नं जे केलं त्या संदर्भात ‘बाहेरच्यांची लुडबुड’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर दिल्या होत्या. त्या साऱ्यांनाच आता जाहीरपणे थेट प्रश्न विचारून या संदर्भात शंका निरसन करून घेता येईल.

या संदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया ९००४०३४९०३ या ‘चिन्ह’च्या नंबरवर कार्यक्रम सुरु होण्याआधी तुमचे प्रश्न अवश्य व्हाट्सअप करा. ‘चिन्ह’चे युट्यूब चॅनेल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेचच करा. प्रत्यक्ष कार्यक्रम चालू असताना देखील तुम्हाला थेट प्रश्न विचारता येईल. सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.

 

चिन्हयुट्यूब चॅनेल लिंक: https://www.youtube.com/channel/UC5_LJdUxWTDnqXIl9Epq5XA

‘चिन्ह’ फेसबुक पेज लिंक: https://www.facebook.com/Chinha.Satishnaik/

सतीश नाईक फेसबुक पेज लिंक: Satish K. Naik

 

सतीश नाईक 

संपादक

‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 74

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.