FeaturesGachhivaril Gappa

‘चिन्ह’च्या वाचकांशी ऑनलाईन गप्पा!

गायतोंडे जन्मशताब्दीवर्ष, जेजेचा डिनोव्हो दर्जाजे जे जगी जगलेआणि चित्रकार प्रभाकर बरवे‘ ग्रंथ प्रकाशनासंदर्भात ऑनलाईन गप्पा!

‘चिन्ह’च्या वाचकांशी किंवा चाहत्यांची शेवटच्या ऑनलाईन गप्पा कधी मारल्या ते आता आठवत नाही. पण त्याला बरेच दिवस झाले असणार हे निश्चित. म्हणूनच येत्या २ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘चिन्ह’च्या युट्यूब चॅनलवर तसेच शक्य झाल्यास फेसबुकवरदेखील ऑनलाईन संवाद साधायचा विचार आहे.

२ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘चित्रकार गायतोंडे जन्मशताब्दी’चं वर्ष सुरु होत आहे. २ नोव्हेंबर १९२४ रोजी गायतोंडे यांचा जन्म झाला. पुढल्या वर्षी म्हणजे २ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांचा शंभरावा वाढदिवस साजरा होईल. ते निमित्त साधूनच हा ऑनलाईन संवादाचा घाट घातला आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ वर्ष साजरं करील किंवा नाही या विषयी मला कल्पना नाही. पण बहुदा नसेलच असे गृहीत धरून चालूया. या संदर्भात ‘चिन्ह’नं खूप आधीपासून प्रयत्न करण्यास सुरुवात केली खरी पण त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही ही वस्तुस्थिती आहे.

महाराष्ट्रात एवढी राजकीय साठमारी-वाटमारी चालू आहे की असे विषय राज्यकर्त्यांसमोर काढावयास देखील संकोचच वाटतो. त्यामुळे ‘चिन्ह’नं एकला चालो रे… याउक्तीनुसार आपलं काम करायचं ठरवलं आहे. उदाहरणार्थ ‘गायतोंडे जन्मशताब्दी’चं संपूर्ण वर्ष ‘चिन्ह’ आपल्या कुवतीनुसार साजरं करणार आहे.

२ नोव्हेंबर पासून दर आठवड्याला नियमितपणे ‘चिन्ह’ आपल्या वेबसाईटवर गायतोंडे यांच्या संदर्भात एक पोस्ट प्रसारित करणार आहे. जेणेकरून या पोस्टमुळं गायतोंडे यांच्या स्मृती जन्मशताब्दी वर्षात किमान वर्षभर तरी निश्चितपणे जागवल्या जातील. याच बरोबर ‘चिन्ह’चा बहुचर्चित ‘गायतोंडे ग्रंथ’ इंग्रजीत प्रकाशित होणार आहे. आंतरराष्ट्रीय निर्मिती मूल्य लाभलेला हा ग्रंथ बहुदा २०२४ च्या मध्यावर प्रकाशित होईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत.

मागच्याच आठवड्यात जे जे स्कूल ऑफ आर्टला डिनोव्हो दर्जा देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ‘चिन्ह’नं गेली अनेक वर्ष हा विषय लावून धरला होता. या संदर्भात जे जे काही म्हणून प्रसिद्ध करता येईल ते ते सारं ‘चिन्ह’नं सातत्यानं प्रकाशित केलं होतं. अजूनही हा लढा पूर्णतः संपलेला नाही. म्हणूनच २ नोव्हेंबरच्या कार्यक्रमात या विषयावरदेखील जाहीरपणे बोलायचा विचार आहे.

आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ‘जे जे जगी जगले’ आणि ‘चित्रकार प्रभाकर बरवे’ या दोन अत्यंत महत्वाकांक्षी ग्रंथांचं काम ‘चिन्ह’तर्फे सध्या सुरु आहे. हे दोनही ग्रंथ ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ वर्षात म्हणजेच २०२४ सालात अनुक्रमे पूर्वार्ध आणि उत्तरार्धात प्रकाशित होणार आहेत. ‘बरवे’ यांच्यावरील ग्रंथ तर ‘गायतोंडे’ ग्रंथाप्रमाणेच इंग्रजीत देखील प्रकाशित होणार आहे. या संदर्भातदेखील ‘चिन्ह’च्या वाचकांशी, चाहत्यांशी जाहीर गप्पा मारायचा विचार आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ‘चिन्ह’च्या सर्वच चाहत्यांना, वाचकांना आणि चित्रकारांना हेच जाहीर निमंत्रण!

सतीश नाईक 

संपादक

‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 74

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.