Features

चित्रकला आणि मध्यमवर्ग! (भाग ४)

या लेखाद्वारे चिन्ह आर्ट न्यूजचे संपादक सतीश नाईक यांनी मध्यमवर्गीयांच्या कलात्मक अभिरुचीचा विशेष संदर्भ घेऊन महाराष्ट्र आणि भारतातील बदलत्या कला परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही माहितीपूर्ण लेखमालिका गेल्या अनेक दशकांपासून आजपर्यंतच्या कलाविश्वाच्या विविध परिवर्तनीय टप्प्यांची झलक दाखवते. लेखाच्या या चौथ्या भागात राज्यातील वाढतं शहरीकरण आणि ढासळणारी कला संस्कृती यांचा आढावा घेतला आहे.

आज बांधकाम व्यवसायाला मोठी बरकत आली आहे. कुठंही जा अगदी गावागावातसुद्धा टॉवर्स उभे राहू लागले आहेत. मालवण हे माझं गाव. मुंबईपासून सुमारे साडेपाचशे किलोमीटर अंतरावर. पण तिथंही परवाच्या भेटीत जेव्हा दहा बारा मजली टॉवर्स उभे राहिलेले पाहिले तेव्हाच लक्षात आलं की हे क्षेत्र आणि त्यापाठोपाठ संपूर्ण महाराष्ट्रच बिल्डरांनी अक्षरशः एकहाती काबीज करून टाकला आहे. पूर्वी शूरवीर राजे चढाया आक्रमणांनी एकएक भूप्रदेश काबीज करत असत. त्याचंच हे आधुनिक रूप. केवळ अपवाद वगळता जवळजवळ सर्वच राजकारणी आता बिल्डर झाले आहेत. त्यांच्या नेत्यांनीच आपल्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपायी अमाप काळा पैसा गोळा करून तो बिल्डर नावाच्या जमातीच्या घशात घालून शहरोशहरी मोठमोठाल्या वसाहती उभ्या करून महाराष्ट्रातल्या एकेका शहराची वाताहत करावयास सुरुवात केल्यानंतर त्यांचे अनुयायी तरी कसे मागे राहणार?

आधी मुंबई, मग पुणे, मग नाशिक, मग नागपूर अशी एकएक शहरं या नेत्यांनी पोसलेल्या बिल्डरांनी काबीज केल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून गावंच्यागावं सिमेंटकॉंक्रिटची करण्यास सुरुवात केली नसती तर ते नवलच ठरलं असतं. मालवणसारख्या ‘देवभूमी’ समजल्या जाणाऱ्या निसर्गरम्य शहरात सारे कायदेकानू धाब्यावर बसवून हे जे टॉवर्स उभे राहत आहेत त्याचा तोच तर अर्थ आहे.

निसर्गरम्य 'देवभूमी' मालवण (छायाचित्र: सतीश नाईक)

जे या अमर्याद राक्षसी महात्वाकांक्षा बाळगणाऱ्या, ‘संस्कृती’ या शब्दाचा लवलेशही ठाऊक नसलेल्या राजकारण्यांचं तेच त्यांच्या कच्छपी लागलेल्या निर्बुद्ध बिल्डरांचं. या अभद्र युतीनं महाराष्ट्राच्या शहरीकरणाचे, नागरीकरणाचे आणि संस्कृतीचे अक्षरशः तीनतेरा वाजवले आहेत. कोणे एके काळी महाराष्ट्रात ‘नगर रचनाकार’ हे पद कार्यरत होतं. माझ्या एका जेजेमधल्या मैत्रीणीचे वडील ते पद भूषवत होते म्हणून मला ते ठाऊक. त्यांच्याकडूनच या पदाचं महत्व मला कळलं होतं. पण आता ते अस्तित्वात आहे किंवा नाही मला ठाऊक नाही. बहुदा नसणारच. असलंच तर तिथं कुणीतरी वशिल्याचं निर्बुद्ध तट्टू नक्कीच आणून बसवलेलं असणार. साहजिकच महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यातले खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य इत्यादी सारेच्यासारे रातोरात ‘अनधिकृत नगररचनाकार’ बनले असल्यास त्यात नवल ते काय? त्याच्याच परिणामी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बांधकाम व्यवसाय फोफावला आणि जिल्ह्याजिल्ह्याचं शहरीकरण झालं.

हे होताना त्यात सुविद्य तंत्रज्ञांचा समावेश झाला असता तर हे शहरीकरण किमानपक्षी शोभनीय झालं असतं. पण ते न झाल्यामुळेच आणि अनिर्बंध वृक्षतोडीमुळं तसेच नदी व खाड्यांच्या सीमारेषेवर मोठ्या प्रमाणावर भराव घालून पूररेषा न जुमानल्यामुळे गावोगावी महापुरांचं प्रमाण वाढू लागलं. आणि सारी शहरं व गावं बकाल बनू लागली. कोकण, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्हा सोडला तर अन्य मराठी समाजावर कलेचे संस्कार असे झाले नव्हतेच. मॉन्टेसरीत असताना हातात घेतलेले रंगीत खडू किंवा पेन्सिली या पाचवीत जाताच हातातून गळून पडू लागल्यामुळेच मराठी समाजाचा आणि कलेचा संबंध तुटला तो तुटलाच.

रापण: प्रल्हाद अनंत धोंड

कोकणातून त्या काळात मोठ्या प्रमाणावर कलावंत निर्माण झाले. हळदणकर पिता-पुत्र, आचरेकर, आडारकर, आंबेरकर, धोंड मास्तर, फर्नांडिस, गायतोंडे, चिमूलकर, चुडेकर, दलाल,  नागेशकर, परांडेकर, पै, करमरकर, मांजरेकर, मुळगावकर, सडवेलकर, सुझा, सोनावडेकर अशी किती किती म्हणून नावं घ्यावीत. जिज्ञासूंनी या संदर्भात धोंड मास्तरांचं (मौज प्रकाशन) पुस्तक हे वाचायलाच हवं. त्यातून कोकणातल्या कलावंतांचा महाराष्ट्रावर कसा प्रभाव होता हे जाणून घेता येईल. यातली काही नावं गोव्यातली आहेत. पण तो पट्टा एकच असल्यामुळे मी ती जाणीवपूर्वक तशीच ठेवली आहेत. जे कोकणाबद्दल सांगता येईल तेच कोल्हापूरबाबत सांगता येईल. कोल्हापूर ही कलानगरीच. या नगरीचं कलाप्रेम काही औरच. बाबुराव सडवेलकरांनी सांगितलेला किस्सा आठवतोय.

(क्रमश:)

सतीश नाईक

संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’

 

पूर्वप्रसिद्धी: ‘समतावादी मुक्त-संवाद पत्रिका’, सप्टेंबर २०२३

संपादकांच्या पूर्वपरवानगीने ‘चिन्ह आर्ट न्यूज’मध्ये पुन:प्रकाशित

चिन्ह तर्फे आयोजित कलाशिक्षण महाचर्चा पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

कलाशिक्षण महाचर्चा | Panel Discussion About Art Education

https://www.youtube.com/watch?v=wn16ME4hHtc

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.