Features

चित्रकला आणि मध्यमवर्ग ! (भाग १)

चिन्ह आर्ट न्यूजचे संपादक सतीश नाईक यांनी मध्यमवर्गीयांच्या कलात्मक अभिरुचीचा विशेष संदर्भ घेऊन महाराष्ट्र आणि भारतातील बदलत्या कला परिस्थितीचा आढावा घेतला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांत जसा भारतीय अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला आहे, तसाच कला आणि कलात्मक अभिरुचीतही होत आहे. ही माहितीपूर्ण लेखमालिका गेल्या अनेक दशकांपासून आजपर्यंतच्या कलाविश्वाच्या विविध परिवर्तनीय टप्प्यांची झलक दाखवते.

प्रख्यात लेखक आणि कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे आणि माझे अतिशय चांगले स्नेहसंबंध होते. १९८० – ९० च्या दशकात त्यांची आणि माझी शनिवार, रविवार वगळता जहांगीर आर्ट गॅलरीमधल्या ‘समोवार’ रेस्टॉरंटमध्ये  रोजच भेट होत असे. या भेटीत भरपूर गप्पा-टप्पा, चर्चा होत असत. त्यात अर्थातच हळू आवाजात कुजबुजल्या जाणाऱ्या ‘ऑफ द रेकॉर्ड’ गप्पांचादेखील समावेश होत असे हे वेगळं सांगायला नकोच. आता नाडकर्णींचाच विषय निघालाय तर त्या गप्पांमध्ये खाण्यापिण्याचा अगदी भरपूर समावेश असे, हे देखील वेगळं सांगायला नकोच.

Cafe Samovar

नाटक, चित्रपट, संगीत, साहित्य, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रात नाडकर्णींचा मुक्त संचार असल्यामुळं त्या संदर्भातल्या ‘अधिकृत आणि अनधिकृत’ म्हणता येतील अशा भरपूर गप्पा या वेळी होत असत. पण प्रामुख्यानं या गप्पा चित्रकलेच्याच संदर्भात चालत असत. या गप्पांमध्ये नाडकर्णी अनेकदा त्राग्यानं बोलत असत. उदाहरणार्थ, तुमचे मराठी चित्रकार एकजात सारे अत्यंत XXXXX आहेत. ते काहीही वाचत नाहीत. त्यांना साहित्य कलाक्षेत्रातलं काहीएक ठाऊक नसतं. ते माझं लिखाणदेखील वाचत नाहीत. पण प्रदर्शन असलं का मात्र आवर्जून मला भेटायला येतात. लाडीगोडी लावू पाहतात. त्यांना त्यांच्या चित्राविषयी मी टाइम्समध्ये काहीतरी लिहिलेलं हवं असतं. बस्स ! त्यासाठी ते मला सतत चिकटू पाहत असतात. आता तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो असं म्हणून समोवारमध्ये त्यांना भेटायला आलेल्या चित्रकारांचे ते एकेक नमुने ते मला दाखवत असत. त्यांच्या धमाल नकलाही करुन दाखवत असत.

Mr Dnyaneshwar Nadkarni with Mrs Nadkarni

अनेकदा चिडून ते मला म्हणत, “तुमच्या मराठी समाजाला तर चित्रकलेचं अंगच नाहीये. त्यांना फक्त दलाल आणि मुळगावकरांची चित्रकला ठाऊक आहे. वासुदेव गायतोंडे आणि प्रभाकर बरवे हे भारतातले दोन सर्वश्रेष्ठ मराठी चित्रकार संपूर्ण भारतीय चित्रकलेवर अधिराज्य गाजवून आहेत. आणि याविषयी मराठी समाजाला काडीचंही ज्ञान नाही” असे उद्गार ते वारंवार त्राग्यानं उच्चारित असत. त्यांच्या या मताशी मी सहमत असल्यानं मी कधीही त्यांच्याशी प्रतिवाद केला नाही. मला आठवतं, नव्वदच्या दशकात पुण्याच्या साधना साप्ताहिकानं जो एक विशेष अंक प्रसिद्ध केला होता त्यात नाडकर्णींनी ही विधानं जाहीरपणे केली होती. आणि कलाक्षेत्रातील अनेकांची टीकाही त्यांनी ओढवून घेतली होती.

Artist Dinanath Dalal
A painting by Dinanath Dalal on the front page of ‘Deepavali’ magazine, 1957

‘मुक्तसंवाद’च्या संपादकांनी ऑगस्टच्या अंकासाठी मला ‘मध्यमवर्ग आणि कला’ अशा विषयावर लेख लिहावा म्हणून जे पत्र मला पाठवलं होतं ते वाचल्यानंतर मला ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या त्या विधानाची आणि वेळोवेळी आम्ही केलेल्या चर्चांची प्रकर्षानं आठवण झाली. ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी केलेलं विधान हे शब्दशः खरं होतं. किंबहुना नाडकर्णी यांचं निधन झाल्याला आता जवळ जवळ एक दशक लोटलं आहे, पण आजच्या परिस्थितीला ते विधान तितक्याच चपखलपणे लागू होत आहे यात शंकाच नाही.

Artist Raghuvir Mulgaonkar
A painting by Raghuvir Mulgaonkar on the front page of ‘Madhuri’ magazine, December 1950

मराठी समाजाचं चित्रकलेचं ज्ञान अजूनही दलाल मुळगावकरांच्या पकडीतून सुटलेलं नाही. फारफार तर त्यात एकदोन इलस्ट्रेशन करणाऱ्या कलावंतांचा समावेश करता येईल. याचा अर्थ मी दलाल आणि मुळगावकरांच्या कर्तृत्वावर टीका करु इच्छितो असा समज कृपा करुन कुणीही करुन घेऊ नये. उभयतांचं कर्तृत्व वादातीत होतं. किंबहुना माझ्या पिढीवर याच दोन कलावंतांचे दृश्य संस्कार झाले होते. आणि त्या संस्कारांमुळेच माझ्या सारखे असंख्य जण जे जे स्कूल ऑफ आर्टकडे आकर्षित झाले असावेत.

१९५०-६० च्या दशकात दलाल मुळगावकरांनी इतकं कर्तृत्व गाजवलं होतं की जवळजवळ प्रत्येक मराठी घराच्या भिंतीवर मुळगावकरांनी काढलेली चित्रं / कॅलेंडर्स झळकत असत, तर बहुसंख्य मध्यमवर्गीय घरातल्या टेबलावर ‘दीपावली’ अंकानं स्थान मिळवलेलं असे. मुळगावकरांचा ‘रत्नदीप’ हा दिवाळी अंक देखील त्या काळात मोठं नाव कमावून होता. दिवाळी झाली रे झाली की या दोन्ही अंकातून दलाल मुळगावकरांची चित्रं काढून ती फ्रेमिंगला देण्यासाठी मराठी घरातून अहमहमिका लागत असे.

Vasudeo Gaitonde
Vasudeo Gaitonde – Painting no. 1, 1952

जागतिकीकरणानंतर हळूहळू सारंच चित्र बदलत गेलं. आणि मध्यम वर्गीयांच्या घरातील भिंतींवरुन दलाल मुळगावकरांच्या चित्रांचं उच्चाटन होऊन तिथं बाजारु पोस्टर्सचा सुळसुळाट होऊ लागला. गंमत म्हणजे याच काळात चित्रकार वासुदेव गायतोंडे आणि चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या कलाकृतींचं भारतीय कलारसिकांकडून कौतुक होऊ लागलं होतं. हे कलारसिक अर्थातच भारतातले होते तसेच परदेशातलेदेखील होते. चित्रकार गायतोंडे तर पन्नासच्या दशकापासूनच आपलं कर्तृत्व गाजवत होते. तर चित्रकार बरवे सत्तरच्या दशकापासून.

Prabhakar Barwe
Prabhakar Barwe – Reflection, 1981

या दोघांचंही कर्तृत्व भारतीय चित्रकला क्षेत्राला पुरेसं परिचित झालं होतं. पण सर्वसामान्यांपर्यंत मात्र ते तोपर्यंत पोहचलं नव्हतं. ते पोचावयास सुरुवात झाली ती या दोन्ही मराठी महान चित्रकारांच्या मृत्यूनंतरच. त्यामानानं चित्रकार बरवे थोडेसे सुदैवीच. कारण त्यांच्या चित्रांची दखल मराठी माध्यमं घेऊ लागली होती. त्यांच्या डायरीतील पाने आणि विचार दिवाळी अंकांमधून लेख स्वरुपात प्रसिद्ध होऊ लागले होते. इतकंच नाही तर त्यांची चित्रंदेखील दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध होऊ लागली होती. बरवे यांच्या ‘कोरा कॅनव्हास’ या पुस्तकानं तर वैचारिकता जपणाऱ्या मराठी विचारवंतांनादेखील भुरळ घातली असं म्हटलं तरी ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही.

Pandit Bhimsen Joshi and M F Husain joint public performance, 1988

ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात हळूहळू चित्रकलेला देखील ग्लॅमर प्राप्त होऊ लागलं. त्याची सुरुवात भीमसेन जोशी आणि चित्रकार हुसेन यांच्या जुगलबंदीच्या जाहीर कार्यक्रमानं झाली. न रंगवता विकला गेलेला हुसेन यांचा कोरा कॅनव्हास त्या काळात तब्बल पाच लाखाला विकला गेला होता. (आज पाच लाख ही रक्कम आपल्याला थोडी वाटते. पण त्या काळात मात्र ती रक्कम खूपच मोठी होती. आणि त्या घटनेचं बातमीमूल्य देखील प्रचंड होतं.) भारतीय चित्रकलेच्या क्षेत्रात हाच टर्निंग पॉईंट ठरला. आणि मग टाइम्ससारख्या व्यावसायिक कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आणि या क्षेत्राचा चेहरा मोहराच जणू काही बदलून गेला. आठवतो? बोटीवरचा लिलाव? बोरीबंदर स्टेशनवरचं कलाप्रदर्शन वगैरे? चित्रकारांना अफाट प्रसिद्धी मिळू लागली ती तेव्हापासूनच. त्यांच्या कलाकृतींना प्रचंड किंमती मिळू लागल्या त्या तेव्हापासूनच. या साऱ्याचा फायदा चरितार्थासाठी मुंबईत आलेल्या किंवा येणाऱ्या कलावंतांनी घेतला नसता तर ते नवलच ठरलं असतं. अन्य क्षेत्रात जसा मुंबईतला मराठी माणूस मागे फेकला गेला, तसंच चित्रकलेचंदेखील झालं.

(क्रमश:)

*****

सतीश नाईक 

संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’

www.chinha.in

 

पूर्वप्रसिद्धी: ‘समतावादी मुक्त-संवाद पत्रिका’, ऑगस्ट २०२३

संपादकांच्या पूर्वपरवानगीने ‘चिन्ह आर्ट न्यूज’मध्ये पुन:प्रकाशित

I am text block. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.