Features

सहाशे चित्रांचा अवलिया संग्राहक !

‘चिन्ह’साठी काम करताना असंख्य फोन येतात. नव्या ओळखी होतात. अशाच एका सकाळी पुण्याहून शुभदा गोखले यांचा फोन आला. शुभदा ताईंचा वैयक्तिक तसा चित्रकलेशी काही संबंध नाही. पण त्यांनी फोनवर जी माहिती दिली ती भन्नाट होती. जवळपास अर्धा तास त्या आपले पती दिलीप गोखले यांची चित्रकला आणि चित्रकला प्रेम याबद्दल बोलल्या. कसं असतं ना कधी घरच्यांचा दबाव, किंवा स्वतःलाच स्वतःबद्दलची शंका यामुळे अनेक जण चित्रकलेची उपजत आवड असताना वेगळाच मार्ग निवडून चाकोरीबद्ध करिअर करतात. अनेकांना बरी नोकरी लागते आणि जीवन सुरळीतपणे पुढे चालू लागतं . पण काही ध्येयवेडे मात्र चांगलं करिअर सुरु असताना पुन्हा चित्रकला त्यांना खुणावू लागते. आणि ते काहीतरी नवीन, वेगळं असं काम करून ठेवतात. हे काम भलेही खूप मोठं नसेल.  पण या कामामुळे चित्रकला, दृश्यकला यांना मानवी इतिहासात चिरंतन ठेवण्याच्या प्रक्रियेत एक पणती तेवत ठेवण्याचं काम ते निश्चित करतात. या पणतीला  तेवत ठेवणं आपल्या सगळ्या कलारसिकांची जबाबदारी आहे, नाही का? शुभदाताईंशी मारलेल्या गप्पांमधून तयार झालेला  हा लेख म्हणजे दिलीप गोखले या भन्नाट गृहस्थाने चित्रकलेचा जो संग्रह आपल्यामागे सोडला आहे त्याची कहाणी आहे. 

दिलीप गोखलेंना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. गोखले कुटुंबीय मूळचं  मिरजचं. दिलीप गोखले यांचे वडील आयपीएस असल्याने ते वडिलांच्या नोकरीनिमित्त भारतभर फिरले. या काळात देशभरातील कलासंग्रह त्यांनी पाहिले होते. वडील आणि मुलगा दोघांनाही संगीत आणि सर्व कलांची आवड होती. दिलीप गोखले यांना हा वारसा मिळाला होता. 

शालेय शिक्षण संपल्यावर सगळ्यांना असं वाटलं की दिलीप गोखले विज्ञान शाखा करिअर म्हणून निवडतील. पण इतर हुशार विद्यार्थ्यांप्रमाणे विज्ञान शाखा न निवडता त्यांनी कला शाखेची निवड केली. अर्थशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी प्रथम वर्ग मिळवून पदवी मिळवली. नंतर १९६७ नवीनच सुरू झालेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. सुरुवातीला काही काळ सिकॉम आणि  नंतर सॅण्डोज ॲग्रो या बहुराष्ट्रीय कंपनीत त्यांनी नोकरी केली. कंपनीत उच्च पदावर काम करत असताना त्यांना स्वित्झर्लंड आणि थायलंडमध्ये राहण्याची संधी मिळाली. अनेक सन्मानही मिळाले. 

करिअर, संसार अशी गाडी व्यवस्थित सुरु असताना चित्रकलेची उपजत आवड गोखले यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे मग त्यांनी वेळ मिळाला की रंग आणि कॅनव्हासला हाताशी धरलं. आपल्या  कुंचल्यातून ते चित्रं साकारू लागले. पण स्वतःच्या मर्यादा कुठेतरी त्यांना लक्षात येत असाव्यात. त्यामुळे जगभर फिरत असताना ते त्या त्या देशातल्या चित्रकलेचा, तिथल्या कला संग्रहाचा अभ्यास करू लागले. या अभ्यासामुळे चित्रकलेची त्यांची चांगली नजर तयार झाली होती. उच्च पदावरच्या जबाबदारीच्या नोकरीमुळे ते चित्रकलेला जमेल तेवढाच वेळ देऊ शकत होते. त्यामुळे त्यांनी त्या त्या देशातील चित्रकारांशी स्नेह वाढवला. १९९९ दरम्यान दिलीप गोखले स्विझर्लंडमध्ये कामानिमित्त वास्तव्य करून होते. या काळात खास पेंटिंग करण्यासाठी त्यांनी टस्कनीची ट्रिप केली. 

२००५ मध्ये गोखले यांची सिंजेंटा कंपनीतर्फे थायलंडमध्ये नेमणूक झाली. या काळात त्यांनी बँकॉक शहरातील कलाविश्व जवळून पहिले. थायलंड आणि भारतीय संस्कृतीमध्ये विलक्षण साम्य आहे. त्यामुळे कलेमध्येही हे साम्य दिसून येतं. या काळात कामानिमित्त गोखले यांच्या चीनमध्येही बरेचदा जाणं झालं. चित्रकलेच्या आवडीमुळे तेथील काही चित्रकारांशी त्यांचा परिचय झाला. या चित्रकारांकडून त्यांनी बरीच चित्रं काढून घेतली. यामध्ये ऍबस्ट्रॅक्ट, वास्तववादी, इम्प्रेशनिस्ट, भारतीय अजिंठा शैली, राजा रवी वर्मा यांच्या शैलीतील चित्रं  अशी भरपूर चित्रं त्यांनी आपल्या बँकॉकमधील वास्तव्यात काढून घेतली. 

यामागे त्यांचा उद्देश जाणून घ्यावा म्हणून मी शुभदा गोखले यांना अधिक खोलात जाऊन प्रश्न विचारले. शुभदाताईंच्या मते दिलीप गोखले यांना चित्रकलेची खूप आवड होती.  त्यांच्या स्वत:च्या चित्रसाधनेच्या काही मर्यादा होत्या. कामामुळे म्हणा किंवा जबाबदारीची पदे मिळत गेल्यामुळे म्हणा ते पूर्ण वेळ चित्रकलेला देऊ शकले नाहीत. मग त्यांनी हौस म्हणून इतर चित्रकारांकडून चित्रे काढून घेतली. यामागचा उद्देश म्हणजे त्या चित्रकारांना मदत करणे हा होताच पण भारतात परत आल्यानंतर स्वतःची गॅलरी सुरु करणे हादेखील होता. गॅलरी किंवा एक छोटं म्युझियम असा प्लॅनही त्यांनी तयार केला होता. 

नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. पुढे दिलीप यांना एक मोठी जबाबदारी मिळाली. ती म्हणजे युनोचे प्रमुख कोफी अन्नान यांचा सल्लागार म्हणून काम करण्याची. या जबाबदारीमुळे त्यांचं हे म्युझियम / आर्ट गॅलरीचं  स्वप्न मागे पडत गेलं. असं असलं तरी या दरम्यान परदेशात त्यांनी स्वत: काढलेली चित्रं आणि इतर चित्रकारांकडून काढून घेतलेली चित्रं गोखले दांपत्याने भारतात परत आणली. ही चित्रं भारतात परत आणणं  हे खूप जिकिरीचं काम होऊन बसलं होतं. कस्टमचे वेगवेगळे सोपस्कार, फी भरणे, सुमार सहाशेच्या वर चित्रं व्यवस्थित नोंदणी करून भारतात आणणं  हे खूप अवघड होतं. पण ते काम दिलीप गोखले यांनी पूर्ण केलंच. कस्टममध्ये आडकाठी येणार हे गृहीत धरून दिलीप गोखल्यांनी या चित्रकारांकडून चित्रावर सही मुद्दामच चित्रित करून घेतली नाही. ही सगळी चित्रं मग गोखल्यांच्या  पुण्याच्या घरात विराजमान झाली. 

पुढे दिलीप यांना दुसरी एक संधी चालून आली. ती म्हणजे साऊथ आफ्रिकेत स्वतःचा व्यवसाय करण्याची. हो नाही करत त्यांनी हे काम सुरु केलंच. या सगळ्या संधी आल्यामुळे गॅलरीचं काम मागे पडत होतंच. पण शुभदा गोखले  पुण्याच्या घरात राहून चित्रांची देखभाल करत होत्या. दोघांचं  आता वयही झालं होतं. हा साऊथ आफ्रिकेचा व्यवसाय सुरु असतानाच कोरोना सुरु झाला. दरम्यान दुर्दैवाने दिलीप गोखले यांचं साऊथ आफ्रिकेतच निधन झालं.

दिलीप गोखल्यांच्या अकस्मात निधनामुळे एवढ्या मोठ्या संग्रहाचं काय करायचं हा प्रश्न शुभदा गोखले यांच्यापुढे उभा आहे. वेगवेगळ्या शैलीतील ही दर्जेदार चित्रं योग्य त्या किमतीत विकण्याचा शुभदा गोखले यांचा मानस आहे. खरं तर दिलीप गोखले यांच्या स्मरणार्थ या चित्रांची एक गॅलरी करावी असा विचार शुभदा गोखले यांचा होता. पण त्यांची तिन्ही मुलं कामानिमित्त वेगवेगळ्या शहरात वास्तव्यास आहेत. त्यामुळं एकट्यानं असं काही करणं त्यांना शक्य नाही. गॅलरी सुरु करण्याचा प्रयत्नही शुभदा गोखले यांनी करून पहिला, पण दुर्दैवाने वय आता त्यांना साथ देत नाहीये. त्यात त्यांची काही ऑपरेशन्सही झाली. त्यामुळं हा अमूल्य ठेवा लवकरात लवकर योग्य हातात सोपवावा असाच त्यांचा मानस आहे. 

वाचकांच्या अवलोकनासाठी या चित्रांमधली काही निवडक चित्रं इथं देत आहोत. यातून जर ही चित्रं जाणकार रसिकांच्या हातात पोहोचली तर आम्हाला आनंदच आहे. यानिमित्तानं एका चित्रवेड्या व्यावसायिकाची कहाणी पुढं आली आणि ती इतर कोणालातरी चित्र संग्रह करण्याबद्दल नक्कीच प्रेरणा देईल. कसं आहे ना आपल्या भारतात धनिकांची उणीव नाही पण चित्र संग्राहक धनिक मात्र दुर्मिळ आहेत. तेव्हा हा लेख एक नवा संग्राहक तयार करेल अशी आम्हाला आशा आहे. 

शुभदा गोखले यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा मेल आयडी : shubhago@gmail.com

******

कनक वाईकर

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.