Features

DAG, तुमचा दावा खोटा आहे!

दि 7 एप्रिलच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये चित्रकला क्षेत्रात उत्सुकता निर्माण करणारी एक मोठी बातमी आहे. ( वृत्तपत्रे अजूनही चित्रकलाविषयक मोठ्या बातम्या देतात हे बघून धक्का बसला.) या बातमीनुसार DAG अर्थात दिल्ली आर्ट गॅलरी कोलकाता येथील जेमिनी राय यांचे घर त्यांच्या कलाकृतीच्या संग्रहालयात रुपांतरित करणार आहे.  दिल्ली आर्ट गॅलरीच्या संग्रहात राय यांची अनेक मौल्यवान चित्रे आहेत. या मौल्यवान कलाकृतींचं संग्रहात रूपांतर करून ते रसिकांना पाहण्यासाठी खुले केले जाणार  आहे ही प्रचंड आनंदाची गोष्ट आहे, पण… 

टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आलेली बातमी.

या बातमीचं शीर्षकंच असं आहे की जेमिनी राय यांचं कोलकत्यातील घर हे देशातील पाहिलंच खाजगी स्वरूपातील एखाद्या चित्रकाराचं संग्रहालय ठरणार आहे हा दावा मात्र खोटा आहे. कारण अशीही जर स्पर्धा असेल तर या बाबतीत महाराष्ट्राने आधीच बाजी मारली आहे. पण आपल्या महाराष्ट्राचा कपाळ करंटेपणा म्हणा किंवा नियतीचा खेळ विनायक पांडुरंग करमरकर, चंद्रकांत मांडरे, केकी मूस यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराच्या अप्रतिम कामाचा ठेवा त्यांच्या घरांमध्ये जतन केलेला असताना उच्चभ्रू वर्तुळातील किती जणांना त्याबद्दल आस्था आहे हा खूप प्रश्न आहे. का हा एकप्रकारे जाणूनबुजून आपण करतो ते एकमेवाद्वितीय आणि भारतातले पहिलेच काम दाखवण्याचा प्रयत्न आहे? आश्चर्य म्हणजे जेमिनी राय यांच्या घराचे खाजगी संग्रहालयात रूपांतर करताना त्यांची तुलना मेक्सिकोसारख्या दूरच्या देशातील फ्रिडा कोहलो या चित्रकर्त्रीच्या घराच्या संग्रहालयाशी केली आहे. पण त्याच DAG ला महाराष्ट्रात उभी असलेली वास्तूरुपी संग्रहालयं दिसली नाहीत याच मात्र आश्चर्य वाटतं. 

करमरकर संग्रहालयातील शिल्प.

जेमिनी राय हे श्रेष्ठ कलाकार आहेत. ते केवळ श्रेष्ठ चित्रकार नव्हते तर एखाद्या बॉलीवूड सेलिब्रिटीला लाजवेल अशी प्रसिद्धी त्यांना त्यांच्या कारकिर्दीत मिळाली होती. बंगाली समाजाचं कलेवर किती निस्सीम प्रेम होत ( आजही आहे) हे दर्शवणारं हे उदाहरण. DAG त्यांच्या घराचं संग्रहालयात रूपांतर करत आहे ही पण कला क्षेत्रासाठी आनंदाची गोष्ट आहे. पण हे पहिलंच उदाहरण नाही तर महाराष्ट्रात अशी तीन तीन संग्रहालय दिमाखात उभी आहेत याकडे मात्र हेतुपुस्सरपने गॅलरी आणि माध्यमांकडून  दुर्लक्ष केलं जात आहे.

करमरकर संग्रहालयाचे प्रवेशद्वार आणि मागे टुमदार बंगल्यातील संग्रहालय.

यातील पाहिलं संग्रहालय म्हणजे शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचं मुंबई जवळील सासवणे येथील करमरकर संग्रहालय. करमरकर यांचं घरही त्यांच्या शिल्पांप्रमाणेच देखणं आणि नीटनेटकं आहे. अतिशय नेटक्या पद्धतीने घराच्या दुसऱ्या मजल्यावर करमरकरांची शिल्प मांडली आहेत. करमरकरांच्या मृत्यूनंतर त्यांची देवनार स्टुडिओ येथील सर्व शिल्पं  त्यांच्या घरी हलवण्यात आली. करमरकरांच्या शिल्पांचा विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी अगदी नाममात्र शुल्कात या संग्रहालयास भेट देता येते. मी २०१८ मध्ये या संग्रहालयास भेट दिली होती. तेव्हा नुकताच पावसाळा सुरु झाला होता. निसर्गरम्य अलिबागमधून सासवणे गावाकडे प्रवास करणे हा देखील सुंदर अनुभव असतो.  तिथे असलेल्या केअरटेकरने नाममात्र १० रुपये शुल्क घेऊन माझ्यासाठी संग्रहालय उघडले. संग्रहालयाला रोज भेट देणारे लोक कमीच असतात त्यामुळे हे खास माझ्यासाठी उघडले गेले. अनेक कलाकृती या घराभोवतीच्या बगिच्यात ठेवलेल्या पाहता येतात.

योगायोग असा जेमिनी राय यांच्या बंगालमध्ये करमरकरानीं काही वर्ष काम केले होते. ब्रिटिश सत्ता भारतात आपल्या वैभवाच्या शिखरावर होती तेव्हा म्हणजे 1891 मध्ये करमरकरांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांनी मातीच्या गोळ्यापासून शिल्प निर्मिती सुरु केली होती. हातात जन्मजात दैवी कला असल्याप्रमाणे ते सुंदर चित्र, शिल्प तयार करत होते. या कलेमुळे त्यांची ख्याती पंचक्रोशीत पसरली होती. ब्रिटिश सत्ता कितीही क्रूर असली तरी त्यांचा एक चांगला गुण म्हणजे ब्रिटिश माणूस हा कलेबद्दल कायम आदर दाखवणारा असतो. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात जेमिनी राय यांची ख्यातीही सर्वदूर ब्रिटिश टॉमीजमुळे पसरली. पहिल्या महायुद्धादरम्यान जे ब्रिटिश टॉमीज (ब्रिटिश सैनिकांना टॉमीज म्हटले जाई) बंगालमध्ये आले त्यांनी जेमिनी राय यांची चित्रे मोठ्या प्रमाणात खरेदी केली. अचानक वाढलेल्या मागणीमुळे जेमिनी राय यांना चित्रे पूर्ण करून घेण्यासाठी हाताखाली सहकारी ठेवावे लागले होते. तर अशाच एक ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हणजे रायगडचे तत्कालीन कलेक्टर ऑटो रॉथफील्ड यांनी करमरकरांची चित्र शिल्पकला पाहून त्यांना जेजे स्कूल ऑफ आर्टला पाठवावे असा सल्ला त्यांच्या वडिलांना दिला. एवढंच नाही तर त्यांच्या शिक्षणाची आर्थिक तरतूदही स्वतः रॉथफील्ड यांनी  केली! 

जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि मुंबईच्या  कला संपन्न वातावरणात सुरेंद्रनाथ टागोरांशी करमरकरांचा परीचय झाला. त्यांनीच करमरकरांना कोलकात्याला येण्याचे निमंत्रण दिले होते. 1916 मध्ये करमरकरांनी कोलकात्याच्या जोवताला रोड येथे  आपला स्टुडिओ थाटला. कोलकात्यात करमरकरांनी अनेक व्यावसायिक कामं  केली. पण पुढे रॉथफील्ड यांच्या मदतीने ते इंग्लंडला गेले. तिथे अनेक कला महाविद्यालयांना भेटी देऊन त्यांनी कलेचं आधुनिक शिक्षण घेतलं. दोन वर्षांनी भारतात परत येऊन त्यांनी आपला स्टुडिओ मुंबई येथे सुरु केला. एक महत्वाची गोष्ट म्हणजे करमरकरांच्या शिल्पकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पाने झाली आणि  सांगताही छत्रपतींच्याच शिल्पानेच झाली.  

आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक उत्तमोत्तम शिल्पांची निर्मिती केली. मत्स्यकन्या हे त्यांच्या उल्लेखनीय शिल्पांपैकी एक अप्रतिम शिल्प आहे. करमरकरांच्या शिल्पांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये केवळ मानवी शरीराचे बाह्य सौन्दर्य नसते तर मुग्ध निरागस भाव त्यामधून प्रगट  होतात. आपल्या आजूबाजूचे मनुष्य देह, प्राणी यांनाही करमरकरांनी आपला शिल्पविषय बनवला. आणि अप्रतिम अशा सौन्दर्याची उधळण शिल्पामधून केली.

करमरकर यांचा बंगला मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यांच्या कुटुंबाने विशेषतः त्यांच्या सूनबाईंनी हे संग्रहालय मोठ्या कष्टाने उभं  केलं. केवळ कौटुंबिक प्रयत्नातून उभे राहिल्यामुळे हे संग्रहालय म्हणावे तेवढे प्रसिद्ध झाले नाही. सरकारी पातळीवरील किंवा DAG सारख्या एखाद्या व्यावसायिक गॅलरीचे पाठबळ लाभले असते तर हे संग्रहालय अधिक मोठ्या प्रमाणावर जागतिक स्तरावर पोहोचले असते. DAG ने जेमिनी राय यांचे जे संग्रहालय उभे करण्याचा घाट घातला आहे त्याला मोठया प्रमाणावर प्रसिद्धी मिळत आहे. टाइम्स मधल्या बातमीने हे काम किती मोठ्या प्रमाणावर शिस्तबद्ध व्यावसायीक पद्धतीने केले जाणार आहे याची चुणूक शीर्षकातूनच दिसून येत आहे. असा मान मात्र महाराष्ट्रातील करमरकर, केकी मूस किंवा चंद्रकांत मांडरे यांच्या वास्तू रुपी संग्रहालयांना मिळाला नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

दुसरं संग्रहालय हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील केकी मूस यांचं घर. केकी मूस हे एक भन्नाट प्रकरण. आयुष्यभर घरात बंदिस्त राहून त्यांनी फोटोग्राफीमध्ये असंख्य प्रयोग केले. त्यांच्या जीवनाबद्दल असंख्य आख्यायिका पसरल्या आहेत. ‘चिन्ह’ प्रकाशन केकी मूस यांच्यावर एक विशेष अंकही काढणार होतं. फोटोग्राफर दिलीप कुलकर्णी त्याचं  लेखन करणार होते. पण ते शक्य झालं नाही त्यामुळे २०२० मध्ये लोकमत दीपोत्सवात त्यांनी केकी मूस यांच्यावर दीर्घ लेख लिहिला. केकी मूस यांनी असंख्य कलाकृती विविध माध्यमात तयार केल्या. त्यात काष्ठ शिल्प, पेंटिंग, फोटोग्राफी, ओरिगामी अशा विविध माध्यमात त्यांनी निर्मिती केली. त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले होते. जवाहरलाल नेहरू यांच्या राजकीय तत्वज्ञानावर आधारित त्यांनी काढलेले प्रतीकात्मक छायाचित्र खूप गाजले होते.  केकी मूस यांच्या मृत्यू पश्चात चाळीसगाव येथील कलाप्रेमींनी त्यांना शक्य होईल त्या प्रयत्नांनी केकी मूस यांचं ब्रिटिशकालीन घर संग्रहालयात रूपांतरित केलं आहे. सामूहिक प्रयत्नातून उभं राहिल्यामुळे इथे इतर सांस्कृतिक उपक्रमही आयोजित केले जात असतात.  

चाळीसगाव येथील केकी मूस संग्रहालय.

या मालिकेतलं महाराष्ट्रातील तिसरं उदाहरण म्हणजे कलामहर्षी चंद्रकांत मांडरे यांचं  कोल्हापूर  येथील कला संग्रहालय. चंद्रकांत मांडरे यांनी आपलं राहतं घर महाराष्ट्र शासनाला देऊ केलं आणि तिथे त्यांच्या चित्रांचं संग्रहालय उभं राहीलं. चंद्रकांत मांडरे हे सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते देखील होते. चंद्रकांत मांडरे बाबूराव पेंटर यांच्या  “महाराष्ट्र कंपनी” मध्ये सामील झाले.  तिथे त्यांनी अभिनेता आणि चित्रपट पोस्टर आर्टिस्ट शा दुहेरी रूपात काम केले. मांडरे यांनी विविध माध्यमात चित्रनिर्मिती केली त्यात प्रामुख्यानं निसर्गचित्रांचा समावेश आहे.  1977 पासून, त्यांच्या नावाने वर्षातील सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि कलाकारासाठी एक पुरस्कार दिला जातो. या आर्ट गॅलरीमध्ये मांडरे यांच्या चित्रपटातील छायाचित्रे, त्यांची चित्रे आणि रेखाटनं प्रदर्शित केली आहेत. निसर्ग बंगला, कोल्हापूर येथे  मांडरे कुटुंबीयांच्या निवासी जागेत ही आर्ट गॅलरी आहे.  हे कलादालन त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाला उदार हस्ते दान केले. 

कोल्हापूर येथील चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय.

महाराष्ट्र हा सांस्कृतिक दृष्ट्या कायम आघाडीवर होता. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे दृश्यकलेचा प्रसार व्हावा म्हणून शासन स्तरावर कला स्नाचालनालय  कार्यरत आहे. महाराष्ट्र हे ते राज्य आहे जिथं जेजे स्कूल ऑफ आर्ट सारखा कला विद्यापीठ आहे. आणि महाराष्ट्र ते राज्य आहे जिथे चित्रकाराचं घर कला संग्रहालय म्हणून जतन करण्याचा प्रयत्न एकदा नाही तर तीनदा झाला आहे. DAG सारखी कुठलीही आंतरराष्ट्रीय आर्ट गॅलरी पाठीशी नसताना हे प्रयत्न कधी कौटुंबिक स्तरावर, तर सामूहिक ट्रस्ट स्वरूपात महाराष्ष्ट्रात आधीच केले गेले आहेत. त्यामुळे DAG गॅलरी जो आम्हीच पहिले असा दावा करत आहे तो खोटा आहे. एक मात्र आहे जेमिनी राय यांच्या वास्तूचं ‘व्यावसायिक’ संग्रहालय करणं हे DAGच करू शकते. महाराष्ट्राला हे कधीच जमलं नाही.  

******

– कनक वाईकर

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.