Features

‘जनाना महाला’तले दिवस !

शासकीय कला महाविद्यालय अर्थात “शाकम”,  छ. संभाजीनगरच्या महाविद्यालयाच्या सध्याच्या नवीन कॉलेजच्या आधी एक जुनी वास्तू होती. या वास्तूचं वैशिष्ट्य म्हणजे ही इमारत जेजेपेक्षाही पुरातन आहे. ही वास्तू थेट औरंगजेबाच्या काळातील आहे आणि औरंगजेबाची मुलगी झेबुन्निसाचा हा ‘जनाना महाल’ होता. अनेक विद्यार्थी या वास्तूमध्ये शिकले. तिथे विद्यार्थ्यांची जडणघडण झाली त्यामुळे त्या वास्तूमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात या वास्तूसाठी विशेष प्रेम आहे. सध्या वास्तूची झालेली भग्न अवस्था बघून हे विद्यार्थी व्यथित होतात. या वास्तुसाठी काहीतरी करावं आणि तिचं पूर्व वैभव तिला मिळवून द्यावं असं या विद्यार्थ्यांना खूप वाटतं. पण सरकारी नियमांमुळे कोणालाच काही करता येत नाही. मग उरतो तो फक्त आठवणींना उजाळा देण्याचा एक सकारात्मक प्रयत्न. या जुन्या वास्तूत शिकलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक म्हणजे स्वप्निल कुमावत. स्वप्निल कुमावत हे फोटोग्राफर / डिझाइनर आहेत. नुकतीच या वास्तूला भेट देऊन त्यांनी या शासकीय कला महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीचे ताजे फोटो काढलेले आहेत. या फोटो फीचर बरोबरच त्यांनी या लेखाच्या माध्यमातून आपले मनोगत देखील व्यक्त केलं आहे.

खूप वर्षांनी मला शासकीय कला महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे जाण्याचा योग आला. कॉलेजच्या नवीन इमारतीशी काहीही संबंध नसल्यामुळे, नकळतच माझे पाय जुन्या वास्तूकडे कडे वळले. चालता-चालता महाविद्यालयातील प्रवेशाच्या दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्या. २५ वर्षांपूर्वी मी शासकीय कला महाविद्यालयात प्रवेश केला अन् मी चाळीसगाव सोडलं. सगळ्यांपासून दूर जातांना वाईट वाटत होतंच पण यापुढे आजीची नेहमीसारखी भेट होणार नाही याचा मनाला एक वेगळाच त्रास होता.

कार्यालयाकडे जाण्यासाठीची कमान.

माझी आजी एकदम खमकी, रुबाबदार, स्वभावाने कडक, शेतात राब राब राबायची त्यामुळे राकट. …प्रेमळ पण तेवढीच शिस्तप्रिय ,रागीट होती, चिडचिड करायची… मी जसा मोठा होत गेलो, तसे मला तिच्या स्वभावाचे सगळे पैलू समजायला लागले, डोक्यातला गुंता सुटायला लागला… खरं तर हे माझं सगळ्याच लोकांबद्दल, गोष्टींबद्दल आणि आपल्या कल्पनांबद्दल घडत गेलं, “जे जसं आहे ते तसंच असतं, आणि जेव्हा आपली वैचारिक पातळी, समज वाढत जाते तेव्हा सगळं उलगडायला लागतं”…हां , तर आजी… आजीचा खरा मायाळू स्वभाव अन् त्याची खोली समजायला लागली… ह्या विचारांमधून बाहेर पडलो ते सरळ जुन्या कॉलेजच्या आवारात.

जुना फौंडेशन चा वर्ग, शेवटचे काही वर्ष तो बंद करण्यात आला होता.

शासकीय कला महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगरच्या वास्तूत मी माझ्या आयुष्याचे, शिक्षणाचे आणि सर्वार्थाने मोलाचे ५ वर्ष ह्या इमारतीत, खरं तर इमारत नाही, ह्या “महालात” जगलो आहे. ह्या इमारतीचं नाव “जनाना महल”. औरंगजेबाच्या सगळ्यात मोठ्या मुलीचं हे घर, झेब – उन – निस्सा असं तिचं नाव. अतिशय हुशार, विज्ञान, कायदा, इतिहास, साहित्य अशा बऱ्याच विषयात पारंगत, अशी बरीच माहिती तुम्हाला ह्या लिंकवर क्लिक केल्यावर मिळेल.
https://en.wikipedia.org/wiki/Zeb-un-Nissa

इमारतीत असणाऱ्या अनेक सुंदर खिडक्यांपैकी एक.

कलेविषयी तिला विशेष जिव्हाळा होता, ती स्वतः एक उत्तम कॅलिग्राफर, कवयित्री अन् उत्तम गायिका असल्याची माहिती मिळते. अशी ही झेब – उन – निस्सा ह्या वास्तूत अनेक मुघल स्त्रियांसोबत राहायची, म्हणूनच ह्याला जनाना (स्त्रिया) महाल म्हणतात. या  महालात शिक्षणाची ५ वर्ष अन तीही कला शिक्षणाची, हा योगायोग नक्कीच नसावा… ह्या वास्तूमध्ये खऱ्या अर्थानं कलेचं वास्तव्य असणार आहे, खूप चित्र रंगवली गेली असणार आहेत, खूप कविता लिहिल्या गेल्या असणार आहेत, माझ्या आधी इथे ३० वर्षांपासून ह्या महाविद्यालयातून खूप विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलंय, या कॉलेजात शिकवणारे प्रोफेसर्स पण खूप अनुभवी अन उत्तम मार्गदर्शक..त्यांनी आम्हाला कलाविश्वाची अन् त्याच्या अथांग अस्तित्वाची ओळख करून दिली, आमच्यातले काही विद्यार्थी कलाकार झालेत अन् काही कलाकार होण्याचा सातत्यानं प्रयत्न करीत आहेत.

वाचनालयाच्या समोरील भागातील बाल्कनीच्या सुंदर कमानी

अनेक सिनियर्सच्या अतुलनीय कल्पनांचा वारसा या जागेला लाभला आहे, या वास्तूनं अनेक कलाकृती आणि कलाकार घडवले आहेत. आम्ही कॉलेजला असतांना शनिवार अन रविवार सुट्टी असायची, पण मी आणि माझ्यासारखे बरेच विद्यार्थी न चुकता सुट्ट्या या महालातच घालवायचो. कुठंही बघा अन् स्केच करा, पेंटिंग करा, लँडस्केप करा… ही वास्तू प्रत्येकवेळी वेगळीच दिसायची. मनमोहक, भव्यदिव्य, अतिशय रुबाबदार…आणि खमकी !

वाचनालयाची दर्शनी बाजू

कल्पना करा की, कॉलेजात प्रवेश करतांना राजेशाही कमानी, ऑफिस समोरच्या पटांगणात चौथऱ्यांवर लोखंडी तोफा, वर्गांच्या ३/३ फूट रुंदी असलेल्या दगडी भिंती…जमिनीपासून ६/७ थरांमध्ये पसरलेल्या ह्या वास्तूत किती खोल्या होत्या हे अजूनही कोडं आहे, कित्येक भुयारी मार्ग, आत प्रकाशही पोहचू शकणार नाही अशा गूढ जागा. वर्गांच्या बाहेर कमळाची फुलं असलेलं ऐतिहासिक तळं. वर्गांच्या भिंतीवरती बुरुजांसारख्या जंग्या. एवढंच काय तर, कॉलेजात घुसताना समोर असणाऱ्या  मुतारीला देखील एक टुमदार घुमट होता.. आम्हाला त्याचंही खूप कौतुक !!

वाचनालयाची आतील बाजू.

घनदाट हिरवीगार झाडी, ह्या इमारतीला एक वेगळीच ऊर्जा देणारा उन्हाळा, तिचं सौंदर्य वाढवणारा पावसाळा अन् तिच्या उबेत खूप हवाहवासा वाटणारा हिवाळा…. आम्ही मनसोक्त अनुभवला / जगला आहे. या आमच्या शाकमच्या ( शासकीय कला महाविद्यालय ) कुशीत आम्ही उनाड मस्ती केली, मित्र बनवलेत, चित्र काढलीयेत, रंगांची उधळण केली, प्रेम केलं, भांडलो…थोडा थोडा कलेचा अभ्यासही केला…पण आमच्या नकळत या वास्तूनं आमच्या मनावर, आमच्या रक्तात, नसानसात खूप काही असं भरून दिलं की ज्याच्या शिवाय जगणं कधीच जमणार नाही. या वास्तूनं आमच्यावर कलेचे संस्कार केले…ह्याची परतफेड कशी होणार माहित नाही ?

महाविद्यालयाची मागची बाजू

माझं कॉलेज पूर्ण झालं अन मी मुंबईला घरी गेलो, मधल्या काही वर्षात घरी जाणं तसं कमीच झालं होतं. आजीला खूप वर्षांनी भेटलो, ती आजारानं पार थकली होती, डोक्यावरचे केस विरळ झाले होते, चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं, दात पडलेले, डोळ्यातील चमक फिकी झालेली पण मला बघताच तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू आलं, ती वय विसरली…”कसा आहेस तू”, या एका प्रश्नातच तिचं प्रेम अन आपुलकी जाणवली. मन भरून आलं, आजीला असं बघणं खूप त्रास दायक होतं… तिनं मला जवळ घेतलं अन तिच्या मिठीत तीच नेहमीची प्रेमाची उब अनुभवली…

उपयोजित कला वर्ग.

कॉलेजची, या महालाची तशीच दुर्दशा झालेली आहे, भिंती भंगलेल्या, छप्पर थकून वाकलेलं, दरवाजे खिडक्या मोडून पडलेल्या, झाडांचं आता जंगल झालंय…या वास्तूची ही अवस्था बघणं कठीण आहे, पण कुणास ठाऊक का माझ्या डोळ्यासमोर तिचं ते रुबाबदार रूप, भक्कम व्यक्तिमत्व अजूनही जसंच्या तसं आहे. ते तसंच राहणार. ह्या पडक्या अवशेषातून अजूनही इथल्या भव्य दिव्य महालाचा राजेशाही अंदाज झळकतोच.

मुद्रण विभागाच्या आतील बाजूच्या खोल्या.

सद्य परिस्थितीचा त्रास करून घेण्यापेक्षा आठवणींचा गोडवा अनुभवणे योग्य आहे. मला आजही ह्या पडक्या वास्तूत तेच जुने दिवस आठवलेत, तीच उब अन् तीच प्रेरणा मिळाली. आणि हो या सगळ्याची परतफेड म्हणून आयुष्यात कधीतरी असा क्षण यावा की ह्या वास्तूला तिच्या या विद्यार्थ्याच्या असण्यानं  अभिमान वाटावा ही इच्छा.

*******

– स्वप्निल कुमावत.
लेखक हे शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, छ. संभाजीनगरचे माजी विद्यार्थी आणि जाहिरातकर्मी आहेत.

मुद्रण विभागाच्या आतील बाजूच्या खोल्या.

ह्या जुन्या महालात कला अभ्यासाचे वर्ग भरायचे.

झेब ऊन निस्सा महालातील प्रसिद्ध कमळाची फुलं असलेला तलाव, आता सगळं भकास झालंय.

इमारतीत असणाऱ्या अनेक सुंदर खिडक्यांपैकी एक.

स्टाफरूम च्या आतली कमान.

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.