Features

‘डिनोव्हो’: दिवाळीचा मुहूर्त पक्का!

सोबत जे पहिलं छायाचित्र दिलंय ते आहे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल केलेल्या ट्विटचं. काल नवी दिल्लीमध्ये ते जे जे स्कूल ऑफ आर्टच्या शिष्टमंडळाला भेटले त्या संदर्भातलं ते आहे. चित्रपट अभिनेते मनोज जोशी (जे जेजेचे माजी विद्यार्थी आहेत) यांनी पुढाकार घेऊन घडवून आणलेल्या या भेटीमध्ये जेजेला डिनोव्हो दर्जा मिळण्यासाठी ज्यांनी गेली चार पाच वर्ष अपार कष्ट घेतले. त्या जे जे स्कूल आर्टच्या परिसरातील तीन महाविद्यालयांच्याअध्यापकांचा समावेश होता. जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे प्रभारी अधिष्ठाता डॉ संतोष क्षीरसागर, जे जे स्कूल ऑफ आर्टचे ज्येष्ठ अध्यापक डग्लस जॉन, अप्लाइड आर्टचेच ऍडजर्न प्रोफेसर झहीर मिर्झा आणि जे जे वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य राजीव मिश्रा यांचा समावेश होता. या साऱ्यांनीच डिनोव्हो प्रत्यक्षात येण्यास प्रचंड प्रयत्न केले आहेत. यांना साथ दिली होती ती अप्लाइड आर्ट आणि वास्तुशास्त्र महाविद्यालयातील अनुक्रमे शुभानंद जोग आणि मुस्तानशीर दळवी या अध्यापकांनी. पण ते मात्र या शिष्टमंडळात सहभागी होऊ शकले नाहीत.

Hon. Union Education Minister Dharmendra Pradhan's tweet

डिनोव्हो प्रत्यक्षात येण्यास याचं मंडळींनी अहोरात्र केलेलं काम कारणीभूत ठरलं आहे म्हणून याचा आवर्जून उल्लेख केला. कारण आतापर्यंत ही सर्वच नावं आणि त्यांचं कार्य अज्ञात राहिलं होतं. या सर्व मंडळींनी जेजेला  डिनोव्हो दर्जा मिळावा यासाठी जे जे म्हणून काही केलं त्या संदर्भात इतक्यात काहीही लिहायचं नाही किंवा बोलायचं नाही असा निर्णय या चळवळीशी संबंधित साऱ्यांनीच एकमतानं घेतला होता आणि तो पाळला देखील. त्यामुळे या साऱ्यांचंच कर्तृत्व लोकांसमोर आलं नाही. हे करण्यामागे गुप्तता पाळणं हाच एक मोठा हेतू होता. कारण जेजे परिसरातले आणि कलाक्षेत्रातले अनेक झारीतले शुक्राचार्य डिनोव्होला विरोध करायला टपलेलेच होते. त्यांना डिनोव्हो होऊनच द्यायचं नव्हतं. कारण त्या साऱ्यांनाच यात त्यांच्या शैक्षणिक अपात्रतेमुळे सहभागी होता येणार नव्हतं आणि शिवाय आजपर्यंत निर्विघ्नपणे चालत आलेली त्यांची दुकानं बंद होणार होती आणि त्यांचे अवैध धंदे देखील बंद होणार होते.

डिनोव्हो होऊ नये यासाठी त्यांनी काही करायचं शिल्लक ठेवलं नव्हतं. मंत्र्यांकडे गेले (कर्मधर्मसंयोगानं त्यातला एक मंत्री त्यांना पटला सुद्धा. तो डिनोव्होच्या विरोधात गेला देखील. अचानक सरकार बदललं आणि महाराष्ट्र एका कला विद्यापीठाला मुकला. ज्यांना भारतातलं एकमेव कला संचालनालय देखील धडपणे चालवता आलं नाही,आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या कलाशिक्षण व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे काढले, ती मंडळी महाराष्ट्रात कला विद्यापीठ स्थापन करायला निघाली होती म्हणे. पण चंद्रकांत दादांनी शिक्षणमंत्री पदावर नेमणूक होताच पहिलं काम कोणतं केलं असेल तर ती कला विद्यापीठ अभ्यास समितीच बरखास्त करून टाकली.) अर्थात डिनोव्होची प्रक्रिया इतक्या पुढे गेली होती की ती थांबवणं कुणालाच शक्य होणार नव्हतं. पण तरी देखील जेजेतले आणि कलाशिक्षण क्षेत्रातले अनेक काडी पैलवान काड्या करीत राहिले. म्हणूनच जेजेच्या संदर्भातल्या भविष्यात सर्वात मोठ्या ठरू शकेल अशा या कार्यामध्ये कुठलीही विघ्न येऊ नयेत या हेतूनेच या चळवळीशी संबंधित आम्ही सारेच जागरूक राहिलो होतो. कुठलीही नावं होता होईतो बाहेर येऊन दिली नाहीत.

पण आता मात्र केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनीच ट्विट करून सारं जाहीर केलं असल्यामुळं आता हळूहळू ‘चिन्ह’मधून या संदर्भात सर्वच माहिती आम्ही प्रसारित करणार आहोत. खरं तर ही भेट अक्षरशः दहा मिनिटाची होती. पण तब्बल पंचेचाळीस मिनिटं ती चालली. जे जे महात्म्य आपल्याला महाराष्ट्रात राहून फारसं उमगत नाही पण दिल्लीत मात्र जेजे म्हटलं की खाडकन सारे दरवाजे उघडतात. ही अर्थातच जेजेच्या वास्तूची आणि जमशेदजी भाईंचीच पुण्याई. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे जेजेची पुण्याई चांगलीच जाणून होते. ज्यानं ऐंशीच्या दशकात जेजे खूप गाजवलं असा जेजेमधला एक माजी विद्यार्थी मंतोष लाल हा धर्मेंद्र प्रधान यांच्या निकटच्या मित्र परिवारातला. श्री प्रधान यांची लेटर हेडस आणि व्हिजिटिंग कार्ड्स मंतोष लाल यांनंच डिझाईन करून दिलेली. त्यामुळं जेजे महिमा त्यांना पूर्णपणे ठाऊक होता.

त्यातच चित्रपट अभिनेते मनोज जोशी हे त्यांचे मित्र निघाले. तेही जेजेचेच. त्यांनी जेजेचं प्रकरण त्यांच्याकडे सतत लावून धरलं. अनेकदा तर दिल्ली किंवा विमानतळावरच त्यांच्या धावत्या भेटी झाल्या. त्या प्रत्येक भेटीत त्यांनी जेजेचा विषय हा काढलाच. नंतर नंतर तर जोशी यांना तो विषय काढावाच लागला नाही. इतका तो श्री प्रधान यांच्या स्मरणात घट्ट रुतून बसला. आणि मग चंद्रकांत दादा शिक्षणमंत्री झाल्यावर जेव्हा जेव्हा दादांची आणि प्रधान यांची भेट झाली तेव्हा तेव्हा प्रधान यांनी जेजेचा विषय उपस्थित करून काय झालं त्याचं ? अशी विचारणा केली. त्यामुळेच डिनोव्होला गती प्राप्त होत गेली हे वेगळं सांगायला नकोच. आता आपल्याला जे दिसू लागलं आहे त्यामागे या साऱ्या मंडळींचं कर्तृत्व आहे.

खरं तर त्या विषयी खूप लिहिण्यासारखं आहे. आणि मी ते लिहिणार देखील आहे. कालच्या बैठकीत देखील खूप काही घडलं. खूप नव्या गोष्टी श्री प्रधान यांनी सुचवल्या. इतकंच नाही तर आपणहून त्या त्या व्यक्ती आणि संस्थाना त्यांनी फोन देखील केले. त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा होता निधीचा. महाराष्ट्र शासनाने दिलेले पन्नास पंचावन्न कोटी पुरेसे नाहीत. आपण आणखीन पैसे उभे करायला हवेत. ते कसे करायचे किंवा कसे करायला हवेत या विषयी देखील त्यांनी असंख्य सूचना शिष्टमंडळाला केल्या. असं आणखीन बरंच काही या बैठकीत घडलं. पण त्या विषयी पुन्हा कधी तरी लिहीन.

एवढं मात्र सांगतो की ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात जे जे स्कूल ऑफ आर्टच्याच परिसरातील एका मोठ्या कार्यक्रमात डिनोव्हो संदर्भातली सर्वात मोठी घोषणा निश्चितपणे होईल. तूर्त इतकंच.

सतीश नाईक 

संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.