Features

‘डिनोव्हो’ची झलक दर्शवणारा कार्यक्रम!

चंद्रकांतदादा आपल्या जाहीर भाषणात म्हणाले की अवघ्या पाच दिवसांमध्ये जेजेच्या दहा अकरा एकर परिसराचा अक्षरशः कायापालट झाला.या विधानाकडं मंत्र्यांचं विधान म्हणून दुर्लक्ष केलं जाऊ नये. खरोखरच जेजेचा कायापालटच झाला आहे. ज्या पद्धतीनं संबंधितांनी अतिशय थोड्या वेळात इतक्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं ते खरोखरच कौतुकास पात्र होतं. विश्वास बसत नसेल तर या आठवड्यात जे जे स्कूल ऑफ आर्टच्या परिसराला भेट द्या. तिन्ही महाविद्यालयातील आजीमाजी विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचं प्रदर्शन तुमची वाट पाहतं आहे… 

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत संपलं आणि जेजेमध्ये त्या संध्याकाळी डिनोव्होच्या समारंभासाठी जमलेले आमच्यासारखे जेजेचे माजी विद्यार्थी कार्यक्रम संपला या जाणिवेनं भानावर आले. इतकी सुंदर संध्याकाळ होती, इतकं सुरेख आयोजन होतं, आणि इतकी सुरेख भाषणं झाली होती की हा कार्यक्रम संपूच नये असं माझ्यासारख्या अनेकांना वाटलं असणार. ही अतिशयोक्ती नाही. मला जे ओळखतात त्यांनादेखील माझ्या या विधानानं धक्का बसला असेल सदैव तिरकस आणि फटकळपणे सारं काही बोलून टाकणारा हा माणूस का एवढा स्तुती करतोय? असा त्यांना प्रश्नही पडला असेल.

पण खरंच अगदी मनापासून सांगतो कालची जेजेमधली संध्याकाळ अक्षरशः अविस्मरणीय झाली. साडेसहा वर्ष मी जेजेमध्ये शिकलो तो प्रत्येक दिवस मंतरलेला होता. सकाळी ८.०० वाजता जेजेच्या निसर्गरम्य परिसरात शिरलं की अगदी उशिरापर्यंत तिथंच बसून रहावंसं वाटायचं. अनेकदा रात्रीअपरात्री अधिष्ठाता संभाजी कदम कॅम्पसमध्ये फेरी मारण्यासाठी म्हणून येत आणि आम्हाला अक्षरशः बळेबळे घरी घालवत. रात्र फार झाली आहे आता तुम्ही घरी निघा, घरी आईबाबा वाट बघत असतील, असं म्हणून आम्हाला ते दमटवत आणि कॅम्पसबाहेर काढत असत. काल तसंच काहीतरी झालं. तिथून निघता निघावसंच वाटत नव्हतं. नुसतं त्या परिसरात फिरत होतो.

सारे जुने दिवस आठवले. अनेक जुने वर्गमित्र भेटले. वर्गमैत्रिणी भेटल्या. जे जे आर्किटेक्चर आणि जे जे अप्लाइडमधले ज्यांच्याशी तेव्हा केवळ तोंडओळख होती असे अनेकजण भेटले. काहीजण तर पंचवीस-पंचवीस तीस-तीस चाळीस वर्षानंतर भेटत होते. खूप जुन्या आठवणी निघाल्या. सारेच नॉस्टलजीक झाले होते. जुन्या आठवणीत रमून गेले होते. कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे तीनचा कार्यक्रम सहा सव्वासहाला सुरु झाला. पण कुणाचीही तक्रार नव्हती. छान गप्पा मारत कॅन्टीन वगैरे परिसरात फिरत होते. एक क्षण वाटलं लक्ष्मण कॅन्टिनवाला टॉवेल सावरत पटकन बाहेर येईल आणि तोंडभर हसून आपलं स्वागत करील. काय देऊ विचारील, चहा घेणार का विचारील. पण लक्ष्मण काही आला नाही. गेला बिचारा. कला संचालनालयातल्या नालायक अधिकाऱ्यांशी संघर्ष करतकरत तो बिचारा गेला.

पण कॅन्टिनमध्ये प्रवेश करत असतानाच समोरच्या आर्किटेक्चरच्या वर्कशॉपबाहेर हरी दिसला. हरी म्हणजे लक्ष्मणाचा धाकटा भाऊ. त्याला पाहून सर्वांनाच कोण आनंद झाला. कालच्या दिवसात जे संस्मरणीय क्षण अनुभवले त्यातला तो एक महत्वाचा क्षण होता. खूप वर्ष झाली लक्ष्मण गेल्याला पण आजही त्याच्या आठवणी काही सुटत नाहीत. तेव्हा आपण काही करू शकलो नाही याची आजही खंत वाटते. इतकं निबर सरकार होतं ते आणि अत्यंत निर्लज्ज व भ्रष्ट नोकरशाही त्यामुळेच काही घडू शकलं नाही. सरकारनं अलीकडच्या काळात जी संवेदनशीलता दाखवली आहे ती तेव्हाच्या सरकारच्या काळात असती तर निश्चितपणे लक्ष्मण वाचला असता आणि जेजेतल्या चित्रकारांच्या पिढ्यांपिढ्यांची सेवा करत राहिला असता. असो!

जवळजवळ सातशे आजी-माजी विद्यार्थी आणि कलारसिक काल समारंभाला उपस्थित होते. एका वर्षी जेजेमधून साधारणपणे पाचशे-सहाशे विद्यार्थी जर बाहेर पडत असतील तर उपस्थितांची संख्या निश्चितपणे कमी मानता येईल. पण या बाबतीत सांगायचं झालं तर जेजेवर ज्यांचं प्रेम आहे असे सारेच तिथं जमा झाले होते. सारेच जण काही मुंबईतले नसतात. बाहेर गावावरून जेजेत शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप मोठं असतं. आणि सर्वच काही मुंबईत राहतात असं नाही राज्यात अन्यत्र किंवा देश-परदेशात स्थलांतरित देखील होत असतात. त्यामुळे कालची उपस्थित संख्या ही माझ्या मते खूप मोठी होती.

जे समारंभाला उपस्थित राहिले ते मात्र अगदी धन्यधन्य झाले. जेजेचीच एक माजी विद्यार्थिनी स्नेहल मुळ्ये हिनं निवेदनाची जबाबदारी सांभाळली होती. एकदोन बारीक सारीक चुका सोडल्या तर तिनं अगदी चोखपणे आपलं काम बजावलं. सुरुवातच छान झाली आणि कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मुख्य सचिव विकास रस्तोगी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर या साऱ्यांचीच भाषणं सुंदर झाली. विकास रस्तोगी यांनी अनेक मूलभूत मुद्दे मांडले. (ज्या विषयी मी नंतर विस्तारानं लिहिणार आहे.), चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या  भाषणावरून त्यांनी जेजेच्या पोर्टफोलियोचा किती अभ्यास केला आहे हे क्षणाक्षणाला जाणवत होतं.

देवेंद्र फडवणीस हे तर तरुण पण मुरब्बी राजकारणी. पण जे जे स्कूल ऑफ आर्ट १८५७ ला स्थापन झालं त्याच वर्षी स्वातंत्र्यसंग्राम देखील सुरु झाला याची आठवण करून देऊन त्यांनी समारंभ एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवला. त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या काळात डिनोव्होच्या प्रस्तावाला चाल मिळाली होती. त्यामुळे ते काय बोलणार याविषयी उत्सुकता होती. त्यांनीही निराश केलं नाही. दीपक केसरकरदेखील मागे राहिले नाहीत. शालेय पातळीवरील शिक्षणात ते आता निश्चितपणे चित्रकलेला महत्वाचं स्थान देतील अशी आशा त्यांच्या भाषणानं वाटून गेली.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं भाषण तर अस्सल मुरब्बी राजकारण्याचं होतं. तिन्ही जेजेच्या वास्तूत फिरताना आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना त्यांनी तब्बल दोन तास जेजेत व्यतीत करून उपस्थित प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं होतं. साहजिकच त्यांनी केलेल्या प्रत्येक महत्वाच्या विधानाला आणि घोषणेला उपस्थितांकडून टाळ्या मिळाल्या. शेवटचं राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या पद्धतीनं सादर केलं त्यामुळेच समारंभ एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला यात शंकाच नाही.

अतिशय सुरेख असं या समारंभाचं आयोजन होतं. मंत्र्यांचे खाजगी सुरक्षा रक्षक, पोलीस, साध्या वेशातले पोलीस, कमांडो यांचा समारंभस्थळी प्रचंड वावर होता. पण कुणाही आमंत्रितांना त्याचा जराही त्रास झाला नाही हे इथं आवर्जून नमूद करायला हवे. जेवढी अपेक्षा केली होती त्यापेक्षा कितीतरी पट वरची श्रेणी या समारंभानं गाठली यात शंकाच नाही. माजी विद्यार्थी असलो तरी मोकळेपणानं सांगतो की जेजेतले जाहीर समारंभ अनेकवेळा अंगावर काटा आणत. अनेकदा भयंकर भाषणं ऐकून क्षणार्धात भूमिगत व्हावे की काय असंही मनात येत असे. साहजिकच संगीताच्या मैफिली वगळता अशा समारंभांना मी अनुपस्थितीतच राहत असे किंवा लांबूनच त्यात सहभागी होत असे. पण कालचा कार्यक्रम या साऱ्याला अपवाद ठरला यात शंकाच नाही.

म्हणूनच या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी ज्यांनी केलं त्या डॉ संतोष क्षीरसागर, शुभानंद जोग (जे जे अप्लाइड) आणि डग्लस जॉन (जे जे स्कूल ऑफ आर्ट) यांचं मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. या कार्यक्रमाचं वर्णन करताना ‘न भूतो न भविष्यती’ असा शब्द प्रयोग करणार नाही कारण या कार्यक्रमाद्वारे त्यांनी जी उंची त्यांनी गाठली आहे त्यापेक्षा अधिक उंची पुढल्या कार्यक्रमात हे तिघे निश्चितपणानं गाठतील याची खात्री मला या कार्यक्रमानं दिली आहे यात शंकाच नाही. जेजेतली ही संध्याकाळ खरोखरच आयुष्यभर लक्षात राहील. आणि त्यासाठी सध्याच्या सरकारतले सर्व संबंधित आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अप्लाइड आर्टमधले अध्यापक यांचं अभिनंदन कारण तितकं थोडंच आहे. ‘डिनोव्हो कसं असेल याची झलक दर्शवणाराच हा कार्यक्रम होता यात शंकाच नाही.

सतीश नाईक 

संपादक

‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.