Features

डिग्रीच्या सीईटीसाठी डिप्लोमा होल्डर परीक्षक ?

जे जे स्कूल ऑफ आर्टसारख्या महाराष्ट्रातल्या, जेथे जेथे पदवी अभ्यासक्रम राबवला जातो अशा सुमारे १० पेक्षा अधिक कलाशिक्षण संस्थांमध्ये कला संचालनालयातर्फे सीईटी प्रवेश परीक्षा घेतली जाते. या डिग्री अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या परीक्षकपदी यंदा नवे प्रभारी कला संचालक साबळे यांनी महाराष्ट्रातील डिप्लोमा अभ्यासक्रम शिकवल्या जाणाऱ्या संस्थातील कलाशिक्षकांच्या परीक्षक म्हणून नेमणूका केल्या आहेत. आणि सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे जे जे स्कूलसारख्या जागतिक दर्जा प्राप्त कलाशिक्षण संस्थेच्या परिसरातील अध्यापकांना मात्र डेटा एंट्री करण्याचं काम दिलं आहे. हे जर खरं असेल तर हे भयंकर आहे ! याच सर्व प्रकारावर ‘चिन्ह’नं टाकलेला हा प्रकाशझोत. 

जे जे स्कूल ऑफ आर्ट, जे जे इन्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट वगैरे सारख्या जेथे पदवी अभ्यासक्रम शिकवले जातात अशा कला महाविद्यालयात बॅचलर ऑफ फाईन आर्टच्या ( BFA ) प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतल्या जातात. गेल्याच आठवड्यात या परीक्षा मुंबई आणि इतर १० शहरांमध्ये पार पडल्या. या परीक्षांसाठी ३५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. या परीक्षांच्या तपासणीवरून जे जे स्कूल ऑफ आर्टच्या परिसरात आता रणकंदन माजणार असं दिसतंय !

त्याला कारणीभूत ठरला आहे तो प्रभारी कलासंचालक विश्वनाथ साबळे यांनी बदललेला नियम. या नियम बदलावरून जेजेत आता चर्चेला तोंड फुटलं आहे. नुकतेच पायउतार झालेले प्रभारी कलासंचालक राजीव मिश्रा यांनी आपल्या तीन-चार वर्षाच्या कार्यकाळात या परीक्षा जास्तीत जास्त निर्दोष पद्धतीनं कशा घेता येतील याकडे विशेष लक्ष दिलं होतं. ते स्वतः आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्यातच मुंबई विद्यापीठाचे ‘सुशिक्षित’ पदवीधारक. त्यामुळे या परीक्षांसाठी त्यांनी एक विशेष नियमावली देखील बनवली नसती तर नवलच ठरलं असतं. हीच नियमावली प्रभारी कलासंचालक विश्वनाथ साबळे यांनी यंदा बदलली आहे असा आक्षेप जेजे परिसर आणि शासकीय कला महाविद्यालयातील अध्यापकांनी घेतला आहे.

ही नियमावली तयार करताना राजीव मिश्रा यांनी सीईटी परीक्षांचे पेपर तपासण्यासाठी शासकीय महाविद्यालयं किंवा जेथे पदवी अभ्यासक्रम शिकवला जातो अशाच कला महाविद्यालयातील शिक्षकांच्या नेमणूका केल्या जाव्यात असा अलिखित नियम केला होता असे कळते. आणि ते योग्यच आहे. साहजिकच तसा निर्णय त्यांनी घेतला असेल तर त्यात चुकीचं असं काहीच नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की, पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी पदवी देणाऱ्याच कला महाविद्यालयातील शिक्षकांच्या नेमणूका करणं आवश्यक आहे. पदविका देणाऱ्या कला महाविद्यालयातील शिक्षकांच्या नेमणूका येथे करण्यामागे पदवी आणि पदविका या दोन्ही अभ्यासक्रमात मूलभूत फरक आहे. त्यांचं ध्येय आणि उद्दिष्ट वेगळं आहे आणि मुख्य म्हणजे दोन्हीची शिक्षणप्रणाली वेगळी आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या कार्यकाळात या परीक्षांच्या आयोजनात कोणताही वाद होऊ दिला नव्हता.

पण प्रभारी कला संचालकपदी नियुक्ती होताच विश्वनाथ साबळे यांनी या नियमात परस्पर बदल केला आणि तेथे पदविका अभ्यासक्रम म्हणजे डिप्लोमाचे अभ्यासक्रम जेथे जेथे शिकवले जातात तेथील कला महाविद्यालयातील शिक्षकांच्या नेमणूक केल्या आहेत असे कळते. या संदर्भात जेजेच्या परिसरात मोठा असंतोष पसरला असल्याचे देखील कळते. आक्षेप घेणाऱ्या प्राध्यापक किंवा लेक्चरर्सचं असं म्हणणं आहे की, साबळे यांनी केलेलं हे कृत्य शैक्षणिक दृष्ट्या अतिशय चुकीचं आहे. त्यांना असा बदल करण्याचा कोणताही अधिकार नव्हता. ते स्वतः जरी पदविका ( डिप्लोमा ) अभ्यासक्रम शिकले असले आणि ते जे जे स्कूल ऑफ आर्टसारख्या मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतील कला महाविद्यालयाचे जरी अधिष्ठाता असले तरी त्यांना पदवीच्या ( डिग्री ) सीईटीसाठी पदविका शिकवणाऱ्या कला महाविद्यालयातील शिक्षकांच्या पदवी परीक्षेसाठी नेमणूक करण्याचा त्यांचा निर्णय हा आत्यंतिक मुर्खपणाचा आहे. त्यांना असा निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. असाही आक्षेप घेतला जातो की, त्यांची नेमणूक ही अपवादात्मक आहे. तेथे गुणवत्तेचा कुठलाही संबंध नाही, असंही जेजेच्या परिसरात बोललं जातं.

परीक्षा पद्धतीत इतका मोठा बदल करण्यासाठी त्यांनी कलाशिक्षण तज्ज्ञांशी विचारविनिमय करणं आवश्यक होतं. शिक्षण सचिवांची परवानगी घेणं अत्यावश्यक होतं, पण ते ही येथे केलं गेल्याचं दिसत नाही. सर्वात आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे जेजेसारख्या दीडशे वर्षाच्या जुन्या कला महाविद्यालयाच्या परिसरात शिकवणाऱ्या फर्स्ट क्लास मिळवलेल्या लेक्चरर्सच्या नेमणूका त्यांनी या परीक्षेच्या डेटा एंट्रीसाठी म्हणून केल्या आहेत आणि सांगली, कोल्हापूर, सातारा येथील डिप्लोमा कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या निवडक आप्तमित्र शिक्षकांच्या नेमणूका मात्र त्यांनी सीईटी परीक्षेचे परीक्षक म्हणून केले आहेत आणि या त्यांच्या निर्णयामुळे त्यांच्यावर टीका केली जाते आहे आणि निषेध व्यक्त केला जातो आहे.

मंत्री उदय सामंत बेपत्ता असल्यामुळं किंवा गुवाहाटीत गेले असल्यामुळं निषेध नोंदवणारी सर्व मंडळी आता शिक्षण सचिवांची भेट घेण्याच्या मनस्थितीत आहेत. असं म्हटलं जातं की, प्रवेश न मिळालेल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकानं जरी या नेमणुकीला आक्षेप घेऊन कोर्टात जनहित याचिका दाखल केली तर कला संचालनालयाच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे निघतील. बहुदा साबळे यांना तेच अपेक्षित असावं असं देखील जेजेच्या परिसरात म्हटले जाते आहे. लवकरच कळेल काय होतं ते !

फोटो सौजन्य : गुगल

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.