Features

चित्र जाणीवा प्रगल्भ करणारा ग्रंथ

ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांनी गेले काही वर्ष मौजसारख्या विविध दिवाळी अंकात चित्रकलेवर विपुल लेखन केले आहे. या चिंतनपर लेखांचा संग्रह म्हणजे प्रभाकर कोलते लिखित आणि रवी जोशी संपादित ‘दृक चिंतन’ हा ग्रंथ होय. हा ग्रंथ म्हणजे केवळ लेख संग्रह नाही तर कला अभ्यासकांना संदर्भ ग्रंथ ठरेल असा महत्वपूर्ण कला दस्तऐवज आहे. हल्ली इंटरनेटवरून इमेजेस घेऊन त्या जशा मिळाल्या तशा वापरण्याचा जमाना आहे. मात्र संपादक रवी जोशी यांनी तसे न करता प्रत्येक चित्रकारांच्या वारसदाराशी संपर्क साधून प्रसंगी त्या चित्राची फी भरून योग्य रंगसंगतीमध्ये ते चित्र पुस्तकात छापून येईल याची काळजी घेतली. ह्या पुस्तकाची निर्मिती करताना प्रभाकर कोलते आणि संपादक जोशी यांनी किती मेहनत घेतली, याचे हे उदाहरण. इतक्या मेहनतीतून साकारलेला हा उत्कृष्ट ग्रंथ घराघरात पोचणे गरजेचे आहे. तरच भावी पिढ्या आणि समाजाची कलेसंबंधीची उदासीनता काही अंशी तरी कमी होईल. या तळमळीतून अभिनेते आणि कवी सौमित्र यांनी हा ग्रंथ वाचल्यानंतर ‘दृक चिंतन’ पुस्तकाचे महत्व अधोरेखित करणारे पत्र लिहिले आहे. हे पत्र लेखस्वरुपात खास चिन्ह आर्ट न्यूच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

रवी जोशी आणि संतोष क्षीरसागर हे माझे गेल्या पंचवीस तीस वर्षांपासूनचे मित्र. दोघेही जेजे स्कूल ऑफ आर्ट मधले. आज संतोष जेजेचा उपयोजितचा अधिष्ठाता झाला आहे हे अजूनही खरं वाटत नाही इतका तो जवळचा मित्र. त्या दोघांसोबत बरेचदा जेजेमध्ये जाण्याचा योग आला. जेजेचा संपूर्ण परिसर, तिथले वेगवेगळे विभाग, तिथलं कॅन्टीन हे सगळं भुरळ पाडणारं होतं. ‘आपणही या कॉलेजमध्ये असतो तर?’ असा प्रश्न बरेचदा पडत होता. पण ‘आपल्याला कुठे चित्र काढता येतं?’ किंवा ‘आपल्याला कुठे कॅमेरा हाताळता  येतो?’, किंवा ‘आपल्याला कुठे साधा मातीचा गणपतीही करता येतो?’

इथे येणाऱ्या प्रत्येकात हे ‘काहीतरी’ असायलाच हवं असतं. मग आपल्याला कसा इथे प्रवेश मिळणार होता ? असे अनेक विचार संतोष, रवीसोबत जेजेमध्ये फिरताना येतच होते. पण नंतर नंतर मी नाटक सिनेमांतून रेंगाळत चाललो असताना, नाटक सिनेमात सगळ्याच कला एकत्र येऊन एक चालता बोलता ‘दृश्यानुभव’ तयार होतो हे कळलं आणि आपल्याला थोडे तरी रंग कळायला हवेत, चित्र-चित्रकला कळायला हवी असं वाटू लागलं. जसंच्या तसं हुबेहूब चित्र काढणं किंवा पेन्सिलने स्केचिंग करून फोटो काढल्यागत चेहरे रेखाटणं म्हणजे चित्रकला नव्हे. समोरलं निसर्गदृश्य रंगांमध्ये तंतोतंत पकडणं म्हणजे चित्रकला नव्हे आणि तसे करणारा चित्रकार नव्हे हे कळायला खूप काळ जावा लागला.

  • ” निसर्गाने आधी घडवले , मग पाहिले अशी माझी गाढ श्रद्धा आहे म्हणूनच ..मलाही ‘पाहून रंगवण्या पेक्षा रंगवून पाहण्याची’ सवय जडली आहे”

 : प्रभाकर कोलते.

  • जे.जे.मधली विद्यार्थ्यांसाठीची पाच वर्षे म्हणूनच खूप महत्त्वाची ठरतात. तिथे रंग, कॅनव्हास यांच्यासोबत काव्य+संगीत+सिनेमा इत्यादी कलांच्या आस्वादांनीही चित्रकार समृद्ध होऊ शकतो. आणि ती  पाच वर्षे पूर्ण करून बाहेर पडलात तरी, शिक्षण संपत नाही. स्वतःला समजून घेण्याचं एक नवं पर्व सुरू होतं.
  • जगण्याचे प्रश्न सोबत चिकटून असतातच पण,  खरा कलावंत कोण? चित्र म्हणजे खरंच काय? आणि खरा चित्रकार कोण? का? कसा? या प्रश्नांसोबत तिथला विद्यार्थी जगू लागतो.
  • “जे अगोचर आहे, अमूर्त आहे, अव्याख्येय आहे, शाश्वत आहे त्याच्याशी गळामिठी पडावी, निदान त्याच्याशी डोळाभेट व्हावी ही तळमळ प्रथमतः कुठल्याही कलावंतांच्या निर्मितीला कारण असते.”

: महेश एलकुंचवार.

बऱ्याचदा मी जहांगीर आर्ट गॅलरीत जाऊन तिथली प्रदर्शनं पाहायचो. भिंतीवर लावलेल्या चित्रांसमोरून काळासारखा फक्त टिक् टिक् करत पुढे सरकायचो. एखाद्या चित्रासमोर काही काळ थांबायचो. का थबकायचो ते कळत नव्हतं. आजही आपल्याला चित्र पाहता येतं आणि ते पाहिल्यावर कळतं असं मला वाटत नाही. पण इतक्या वर्षांच्या रवी आणि संतोषच्या सहवासामुळे ‘चित्र पाहणं म्हणजे डोळ्यांची केवळ यांत्रिक क्रिया नसते, तर त्यात मन-बुद्धी-संवेदना यांचासुद्धा सहभाग असावा लागतो आणि कुठलीही गोष्ट कळलीच पाहिजे या अट्टाहासापासून आपण स्वतःला वेगळं करायला हवं..’ हे कळलं नाही, तर जाणवलं.

इथपर्यंत पोहोचायला हवं असं वाटायलाही खूप काळ जावा लागला. जेजे स्कूल मधल्या विद्यार्थ्यांसाठी तो काळ शिक्षणामुळे जरा कमी होत असेल लवकर असं तेव्हा वाटलं.

  • ” अमूर्ताचा विचार म्हणजे पाण्यावर उठणाऱ्या लाटांसारखा आहे ..तो पाण्यातच सुरू होतो आणि पाण्यातच विरून जातो …उठलेल्या लाटेला गोठवण्याचं कौशल्य कलावंताकडे असणं आवश्यक असतं… “

इतर कलांच्या तुलनेत चित्रकलेकडं आपल्या समाजानं अंमळ दुर्लक्षच केलेलं दिसतं. कारण आपला समाज ‘चित्रसाक्षर’ नाही हे दुर्दैवी वास्तव आहे. गणपतीभोवती केलेली थर्माकोलची आरास व रांगोळी यांच्या स्पर्धा, माणसांना समोर उभं करून तस्सच रंगवणं आपला समाज कला मानतो. याला अगणित कारणं आहेत. आपल्याकडल्या मोठमोठ्या शहरांमध्येही चित्र संग्रहालयं नाहीत, कलादालनं नाहीत आणि पोटतिडकीने चित्रकलेबद्दल बोलणारे-शिकवणारे शिक्षकही नाहीत.

मुळात चित्रकलेमुळे पोट भरत नाही या एका चुकीच्या, ढोबळ आणि घाऊक जाणिवेपायी समाजाकडून चित्रकलेकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं. व्यावहारिक जगातील रोजच्या जगण्यातलं सौंदर्य अनुभवण्यासाठी आपली दृष्टी तयार झालेली नाही.

माधुरी पुरंदरे त्यांच्या ‘व्हान गॉग’ या पुस्तकाच्या मनोगतात म्हणतात, “सर्वसामान्य माणसाला व्हान गॉग का माहीत असू नये ? मी कला विद्यालयात नसते तर कदाचित मलाही हे नाव कळलं नसतं. चित्रकला आणि प्रेक्षक यांच्या मधली दरी बुजवण्याचा दोन्हीकडून प्रयत्न झाला पाहिजे.”

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार स्वीकारताना रवी जोशी.

हे लिहिण्याचं कारण माझा मित्र रवी जोशी याला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी (२०२१) असलेला नी.स.गोखले पुरस्कार ‘दृक् चिंतन’ या पुस्तकाच्या संपादनासाठी नुकताच मिळाला. त्याबद्दल त्याचं मनःपूर्वक अभिनंदन

..! तसंच ‘अनुनाद प्रकाशन’चे आमचे मित्र कुंदन रुईकर यांचंही खूप खूप अभिनंदन

! हे औचित्य साधून सगळं मनातलं आज लिहितो आहे. 

या उपरोक्त उदास परिस्थितीने हतबल न होता भारतीय जनमानसात ही जी उदासीनता आलेली आहे ती का?  कला शिक्षण, आस्वाद आणि समीक्षा यांच्यामुळे आली का ? असे प्रश्न रवी विचारतो. नेमकं कोणी आणि काय केलं म्हणजे हा अभाव नष्ट होईल, याची सुरुवात कोणी आणि कशी करायची , या गंभीर समस्येकडे रवी आपले लक्ष वेधून घेतो आणि या पुस्तकाची मांडणी करतो.

चित्रकलेबद्दलची पुस्तकं मराठीत खूपच कमी आहेत. चित्रकारांची चरित्र आणि त्यांचे मराठीत अनुवादही खूपसे नाहीत. सर्वसामान्यांच्या दृक् जाणीवा अधिक संवेदनशील करणारे, चित्रकलेतील उन्नती व समृद्धी साधणारे तसंच चित्रकलेचा आस्वादक वर्ग तयार करणारं लेखन अत्यंत कमी प्रमाणात आहे हे रवी आपल्या निदर्शनास आणून देताना चित्रकलेबद्दल मराठी भाषेत असलेल्या दीडशेहून जास्त पुस्तकांची यादीच सोबत देतो. प्रत्यक्ष कृती करून त्यांत अजून एका चांगल्या पुस्तकाची भर घालत ‘दृक् चिंतन’ नावाचं एक अतिशय समृद्ध पुस्तक आपल्या हातात ठेवतो.

‘दृक् चिंतन’ हे पुस्तक केवळ मराठीतच नव्हे तर देशातल्या प्रत्येक भाषेत अनुवादित करून देशातल्या प्रत्येक प्राथमिक शाळा आणि घराघरात, वाचनालयात सतत लहान मुलांसमोर असलं पाहिजे असं प्रामाणिकपणे वाटतं. अनुवाद जरी नाही करता आला तरी हे आहे असंच….असंसुद्धा सर्व दूर पोहोचलं पाहिजे,  कारण या पुस्तकातली अनेक दिग्गजांची चित्र नजरेखालून सतत गेली तरी लहान मुलांची आणि इतर  ‘चित्र अशिक्षितांची’ दृश्यभाषा … दृ्क् भाषा आपोआप जागृत होईल. चित्र अशीही काढली जाऊ शकतात, रंगांकडे असंही पाहिलं जाऊ शकतं, ढोबळ आकारांची मोडतोड करून नवे ही आकार घडवले जाऊ शकतात, अवघड, अनाकलनीय, असंबद्ध असं काही नसावं, फक्त त्याकडे एक टक बराच वेळ पाहात राहिल्यावर मनातल्या मनात काहीतरी उमटू लागतं, सरपटू लागतं, हलू लागतं, हळूहळू गोचर होऊ लागतं …असं काहीसं जाणवण्यासाठी हे पुस्तक घरोघरी पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. आपला समाज चित्र साक्षर होण्यासाठी या पुस्तकाचा महत्त्वाचा वाटा असू शकतो हे शासकीय व्यवस्थेनेही लक्षात घ्यायला हवं.

एकदा नसिरुद्दीन शहा यांच्याशी बोलत असताना तो म्हणाला होता की, ” कारपेंटर कुर्सी कैसे बनाई बता सकता है ,कुम्हार मटकी कैसे बनाई बता सकता है ..फिर हम ऍक्टरलोग …हम ऍक्टिंग करते हैं मतलब करते क्या हैं ये बताने में हमे क्यूँ मुश्किल आ रही है ?”

त्याचं म्हणणं बरोबरच आहे. आपल्या कलेचं व्याकरणशुद्ध विवरण आपल्याला खरंतर देता यायला हवं..काही काही कलावंत ते सांगू शकतात, मांडण्याचा प्रयत्न करू शकतात आणि काही काही प्रमाणात ते वाचणाऱ्या ऐकणाऱ्याला जाणवूनही देऊ शकतात, शब्द कळले नाहीत तरी. कोलते सरांनी चित्रकलेच्या केलेल्या चिंतनाबद्दल जे जे लिहिलं आहे ते ते अत्यंत मौलिक आहे. ते एक यशस्वी चित्रकार आहेतच याशिवाय बहुश्रुत वाचकही आहेत.

  • “मी सातत्याने प्रयत्न करतो की शांततेच्या साध्या धक्क्यांनीही माझ्या अणु-रेणुतली स्पर्श व्यवस्था जागी व्हायला हवी”

: प्रभाकर कोलते.

चित्रकारांच्या आयुष्याबद्दल ,जगण्याबद्दल ते सहज सह-संवेदनेने लिहितात. चित्र निर्मितीच्या सर्जन प्रक्रियेवर प्रकाश टाकतात. भाषा घडवून सांगतात, नेमके शब्द वापरण्याची किमया, भाषेतलं कवित्व यामुळे कोलते सरांचं लेखन कुठेही दुर्बोध होत नाही. आकार, रंग, रूप, अवकाश या चित्रकलेतील घटकांच्या परस्परसंबंधांच्या आकलनातून होणाऱ्या  रसनिष्पत्तीची अपरिहार्यता सांगणारी कोलते सरांची चित्र समीक्षा वाचकाच्या दृक्  जाणीवा समृद्ध करत जाते. सरांनी अनेक वर्षे दिवाळी अंकातून मकबूल फिदा हुसेन, नारायण श्रीधर बेंद्रे, प्रभाकर बर्वे अशा अनेक श्रेष्ठ कलाकारांबद्दल अतिशय रसपूर्ण असं लिहिलं आहे.

  • “निष्ठा डगमगली की व्यासंगाचा व्यवसाय व्हायला वेळ लागत नाही आणि एकदा व्यवसायात अडकलात की व्यासंग तुमच्याकडे पाठ फिरवतो “

: प्रभाकर कोलते.

हे सगळं लिहिताना त्यांच्यातील निष्ठावंत चित्रकार सतत जागृत होता आणि स्वतःकडे तटस्थपणे पाहत वाचकांशी हितगुज करत होता. “पाहून रंगवण्यापेक्षा रंगवून पाहण्याची प्रक्रिया” उलगडून सांगण्याचा सर प्रयत्न करतात. जगताना त्यांचा चित्र विचार सतत सुरू असतो आणि चित्रांच्या निर्मितीचा ते चित्रातूनच विचार करतात तेंव्हा ते म्हणतात “पाण्यात राहून पोहोण्याविषयी विचार करता येतो पण पोहता येत नाही, चित्र रंगवण्याचं ही तसंच आहे “

असे अनेक मौलिक विचार वाचून आपण आत समाविष्ट असलेल्या अनेक चित्रांकडे पाहत राहतो …रंग तेच असतात तांबडां, नारिंगी, हिरवा, पिवळा, निळा, जांभळा ..पण त्यांचा निरनिराळ्या पद्धतीने वापर करून ..त्यांना कधी एकटं पाडून..कधी त्यांच्यात गोंधळ माजवून देऊन ..कधी कॅनव्हासला प्रश्नचिन्ह बनवून ..कधी कॅनव्हासलाच उत्तर समजून.. दिग्गज चित्रकार आपापलं अंतरंग कसं उलगडतात?

त्यांचा अनाकलनीय दृश्य परिणाम जाणीव-नेणीवे पलीकडून आपल्याशी कसा अदृश्य संवाद साधतो …ते अनुभवणं म्हणजेच या पुस्तकातलं प्रत्येक चित्र होय.

त्या त्या चित्रकारांच्या परवानग्या घेऊनच (प्रसंगी त्यासाठी काही युरो फी भरून ) मूळ चित्राची हाय रिझोल्यूशन फाईल त्यांच्याच कडून मागवून, डाव्या बाजूचे पान मोकळे सोडून, प्रत्येक उजव्या पानावर ही सगळी चित्र स्वतंत्र छापली आहेत. तुमच्यात आणि चित्रांत कसलाही व्यत्यय नसावा हा यामागचा निर्मळ हेतू. म्हणून हे पुस्तक जरा महाग वाटू शकेल.परंतु परवानगी न घेता मायाजालावरून साभार घेऊन काहीही बेधडक छापण्याच्या या काळात  चित्रकारांचा असासुद्धा सन्मान रवीने केला आहे.

आजच्या सवंग दर्जाच्या करमणुकीने ओतप्रोत भरलेल्या, निकृष्ट दर्जाच्या मनोरंजनामुळे कुपोषित झालेल्या, कल्पनेमधील कवित्व हरवलेल्या काळात हे पुस्तक म्हणजे अत्यंत निकडीच्या वेळी आवश्यक असलेल्या “बूस्टर डोस” सारखेच आहे.

ती काळाची गरज ओळखून रवीने हे पुस्तक अथक मेहनतीने एखादा यज्ञ सिद्ध करावा तसंच सिद्ध केलं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुरस्कार देऊन त्याच्या कष्टांचा सन्मान केला आहेच. आता हा “बूस्टर डोस ” सर्व दूर पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे.

इतक्या नितांत सुंदर पुस्तकाची निर्मिती केल्याबद्दल आणि आजच्या काळात चित्र साक्षरता व चित्र जाणीवा जागृत करण्यासाठी निर्मितीचे हे कष्ट घेतले त्याबद्दल रवी, कुंदन आणि अनुनाद प्रकाशनाचे सर्व समाजाने आभारच मानायला हवेत.

साहित्य परिषदेच्या पावलावर पाऊल ठेऊन आता साहित्य अकादमीनेसुद्धा  कोलते सरांच्या या समीक्षात्मक लिखाणाला पुरस्कार द्यायला हवा. त्यामुळे त्या पुरस्काराचाच सन्मान होईल हे खरं, मात्र कोलते सरांच्या या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकणार नाही.

*****

– सौमित्र

आपल्यासाठी ‘दृक् चिंतन’ विशेष सवलतीच्या किंमतीत उपलब्ध आहे.

Anunaad Prakashan:

https://anunaadprakashan.com/drukchintan/

BooKGanga:

https://www.bookganga.com/R/8HVTG

Amazon:

https://www.amazon.in/dp/8195459609?ref=myi_title_dp

Google Pay, PhonePay इत्यादी वरून +919422322644 या क्रमांकावर UPI Payment करू शकता.UPI Payment केल्यानंतर खाली दिलेल्या लिंक वरून तुमची माहिती भरणे आवश्यक आहे म्हणजे आपली प्रत घरपोच पाठविणे सोयीचे होईल.

https://forms.gle/25PajTmrHQ8W5ndHA

अधिक माहितीसाठी संपर्क : अनुनाद प्रकाशन, पुणे

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.