Features

एका चळवळ्या शिल्पकाराच्या मृत्यूची गोष्ट!

एखाद्या कलावंताचा जेव्हा अकल्पित मृत्यू होतो तेव्हा त्याला नशीबएवढंच कारण पुरेसं नसतं. त्याच्या जगण्यातून उद्भवलेली असंख्य कारणं त्यामागं असतात. उदाहरणार्थ त्याचं जगणं, अपेक्षाभंगाची दुःखं, त्याची दिनचर्या, त्याच्या संवयी, त्याची व्यसनं इत्यादी इत्यादी. ही झाली बाह्य कारणं. आत मानसिक पातळीवर प्रचंड मोठा संघर्ष सुरु असतो. द्वंद्व सुरु असतं. यातूनच मग त्याची दिनचर्या बदलते, सवयी बदलतात, व्यसनांची जवळीक होते आणि जगण्याची दिशाच बदलते. असंच काहीसं घडलं असावं शिल्पकार संजय तडसरकर यांच्या बाबतीत. आजच त्यांचं कराडजवळच्या तडसर गावात निधन झालं. त्या निमित्तानं हा विशेष लेख.

शिल्पकार संजय तडसरकर यांचं आज सकाळी कराड जवळच्या तडसर गावात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ५६ वर्षाचे होते. जे जे स्कूल ऑफ आर्टचे ते माजी विद्यार्थी. ऐंशीच्या दशकात त्यांनी आधी कोल्हापूरच्या दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमधून आणि नंतर जेजेच्या शिल्पकला विभागात शिल्पकलेचं रितसर शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये शिकतानाच्या काळात (१९८३ ते १९८७) एक हुशार आणि अत्यंत चळवळ्या विद्यार्थी म्हणून त्यांनी नाव कमावलं होतं. आशुतोष आपटे, प्रदीप वर्मा, यशवंत देशमुख हे नंतर नावारूपाला आलेले सारे कलावंत त्यांचे समकालीन.

सकाळी तडसरकर यांच्या निधनाची पोस्ट जेव्हा फेसबुकवर वाचली तेव्हा अक्षरशः धक्काच बसला. त्या पोस्टसोबत जो फोटो प्रसिद्ध केला होता तो तर ओळखण्याच्या पलीकडचा होता. नव्वदच्या दशकात अनेक वेळा संजय तडसरकर यांचा फोन येत असे. मोठ्या उत्साहानं ते आपल्या नव्यानव्या उपक्रमांविषयी माहिती देत असत, नव्या कल्पना सांगत असत. कोल्हापूरमध्ये कला विषयक चळवळ पुढं नेण्याच्या दृष्टीनं आपण काय प्रयत्न करतो आहोत याचीही ते माहिती देत असत. जहांगीर आर्ट गॅलरीत तर वरचेवर त्यांच्या भेटी होत असत. आर्टिस्ट सेन्टरमध्ये तर मला भेटण्यासाठी वारंवार ते येत असत. रवींद्र मेस्त्री, वडणगेकर सर ही त्यांची आत्यंतिक आदराची स्थानं होती. दोघांविषयी ते अतिशय भरभरून बोलत असत. कोल्हापूर आणि कोल्हापूरची कला याविषयी त्यांना अतिशय अभिमान होता.

२००० नंतर माझं जहांगीर किंवा अन्य कला दालनांमध्ये जाणं कमीकमी होऊ लागलं. साहजिकच अनेक कलावंतांशी प्रत्यक्ष संपर्क तुटला. २००१ साली ‘चिन्ह’ पुन्हा प्रकाशित होऊ लागल्यावर अंकांच्या देवाणघेवाणीच्या निमित्तानं त्यांच्याशी पुन्हा संपर्क होऊ लागला. पण तो फार काळ टिकला नाही. मध्यंतरी एकदा दोनदा कोल्हापूरला जायचा योग आला तेव्हा त्यांच्या खास कोल्हापुरी आदरातिथ्याचा अनुभव घेता आला. त्यावेळी वाटलं होतं की आता आपला कोल्हापूरकरांशी आणि कोल्हापूरच्या कलेशी चांगला संपर्क जुळून येईल. पण का कुणास ठाऊक तसं काही झालं नाही. कारणं काहीही असोत पण त्यानंतर मात्र संपर्क कमीकमी होत गेला तो गेलाच.

इतका की क्वचितच कधीमधी नाव आठवे, फोनवर बोलावसंदेखील वाटे पण माझ्याकडून फोन कधी केला गेला नाही ही वस्तुस्थिती आहे. आज जेव्हा त्यांचा निधनाची बातमी फेसबुकवर वाचली तेव्हा आधी फोनवर त्यांचा नंबर चेक केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या फोनमध्ये त्यांचा नंबर नव्हताच. महाराष्ट्रातल्या यच्चयावत चित्रकार शिल्पकारांचे फोन माझ्या मोबाईलमध्ये आहेत पण तडसरकरांचा नेमका फोन कसा डिलीट झाला हे सांगणं आता अवघड आहे.

मला अचानक आठवलं. २००६ किंवा २००७ साली कोल्हापुरात एका कार्यक्रमात सहभागी झालो असताना संजय तडसरकर आणि मगदूम दाम्पत्याशी चांगलीच ओळख झाली होती. म्हणून मग त्यांनाच फोन करायचं ठरवलं.

जयश्री मगदूम सांगत होत्या… आता गेल्या २० ऑक्टोबरला त्याचा वाढदिवस साजरा झाला होता. २४ तारखेला दसरा होता. त्याच दिवशी त्याची भेटदेखील झाली होती आणि तीच भेट शेवटची ठरली. आज बुधवार आहे. परवा सोमवारीच संजयचा फोन आला होता की आता मी गावाला चाललोय, तडसरला. तिथंच राहीन म्हणतोय आणि मग तो गावाला गेला. आणि आज सकाळी ही अशी त्याच्या निधनाची बातमी आली. त्याचा पुतण्या त्याला तडसरला सोडायला गेला होता. तो सांगत होता तडसरला जाण्याआधीचे दोन दिवस त्यानं मला कोल्हापुरात फिरवलं होतं. ज्या ज्या त्याच्या आवडीच्या जागा होत्या त्या साऱ्या ठिकाणी त्यानं मला नेलं होतं. अगदी तपशीलवारपणे तो साऱ्या आठवणी सांगत होता. जणू काही त्याला कळलं असावं की आता आपण परत काही कोल्हापुरात येत नाही. त्यामुळेच बहुदा त्यानं जिथं तो घडला, जिथं त्यानं काम केलं, ज्या जागांविषयी त्याच्या मनात आदराचं खूप स्थान होतं ते सारं तो पुन्हा पुन्हा डोळे भरून पाहून आत कुठंतरी रिचवत होता.

सोमवारी मला फोनवर म्हणाला होता आता इथं राहावसं वाटत नाही. गावाला जाऊन राहीन म्हणतोय भाऊ डॉक्टर आहे तो सारं पाहील. मुख्य म्हणजे मला मृत्यूपत्र करायचं आहे. आपण आर्टिस्ट मंडळी हे काही करत नाही आणि मग आपल्या पश्चात घरच्यांना आणि जवळच्यांना खूपच त्रास होतो. तो होऊ नये म्हणून मी ही काळजी घेतो आहे. इतक्या स्पष्टपणे तो त्या दिवशी मला सारं सांगत होता. मी त्याला धीर देण्यासाठी म्हटलं काही नाही रे होशील बरा. आणि येशील पुन्हा कोल्हापुरात. पण ते घडायचं नव्हतं. आज अचानक ध्यानीमनी नसताना ती बातमी आलीच.

जेजेमध्ये शिकत असल्यापासून आम्ही एकत्र काम करत होतो. तो शिल्पकला विभागात शिकत होता. तर मी फाईन आर्टमध्ये. त्यावेळी आमचा ग्रुप खूपच मोठा होता. ग्रुपमधल्या साऱ्यांनीच आपापल्या क्षेत्रात चांगलंच काम केलं. संजयनंदेखील कोल्हापुरात आल्यावर कला शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं. प्रख्यात चित्रकार कलातपस्वी जी आर वडणगेकर गुरुजी यांनी सुरु केलेल्या कला मंदिर / कला महाविद्यालयात आधी तो साहाय्यक अधिव्याख्याता म्हणून लागला. कलाशिक्षण क्षेत्रात त्यानं स्वतःला झोकून दिलं. विद्यार्थ्यांसाठी त्यानं नानाविध उपक्रम राबवले. प्रदर्शनं, स्पर्धा, प्रात्यक्षिकं, दस्तावेजीकरण यासारख्या अनेक उपक्रमातून त्यानं अनेक विद्यार्थी पुढं आणले. त्याचे विचार अतिशय आधुनिक होते. कोल्हापूरच्या कला महाविद्यालय चालकांना ते बहुदा पसंत नसावेत. त्यामुळे अचानकपणे त्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि तो स्वतंत्रपणे काम करू लागला. खरं तर जी आर वडणगेकर सरांचं हे कॉलेज. गुरुजींची नात मनीषा ही संजयची पत्नी. पण तरीदेखील संजय त्या कला महाविद्यालयापासून दूर झाला.

कालांतरानं संस्थाचालकांना त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी पुन्हा विनंती करून संजयला प्राचार्य पदावर आणून बसवलं. पण कदाचित त्याआधी घडलेल्या साऱ्या प्रकारामुळं संजयचं सारं बिनसल्यासारखंच झालं होतं. मधल्या काळात एकटेपणामुळे म्हणा किंवा मनाविरुद्ध असंख्य गोष्टी घडल्या असल्यामुळं म्हणा तो व्यसनांच्या आहारी गेला. त्यावर खूप उपचार करायचे प्रयत्न झाले. पण गाडी रुळावर काही आलीच नाही. मध्यंतरी तर त्याला व्यसनमुक्ती केंद्रातदेखील हलवलं होतं. पण ते तेवढ्यापुरतंच असायचं. पुन्हा पिणारे मित्र भेटले की पुन्हा सारं चालू व्हायचं. पिणारे मित्र कलावंत मात्र नव्हते वेगळ्याच क्षेत्रातले होते. त्यालाही नंतर जाणवलं होतं की हे काही योग्य नव्हे. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. लिव्हर सिरॉसिससारखा विकार त्याला जडला होता. आणि आज सकाळी त्यातच त्याचा अंत झाला. आमच्या कुटुंबाचा आणि त्याचा जवळजवळ चाळीस वर्षाचा स्नेह अकल्पितपणे संपला.

५६ हे काही कुठल्याही कलावंताचं मरण्याचं वय नव्हे. त्यामुळे अनेकदा प्रश्न पडतात की संजयला जे काही आधुनिक विचार, नवे विचार कोल्हापूरच्या कलाशिक्षण क्षेत्रात रुजवायचे होते, त्याला संबंधितांनी जर विरोध केला नसता तर ही जी काही त्याच्या आयुष्याची शोकांतिका झाली ती झाली असती का?

पुण्याच्या लाल महालातलं जिजाऊ, दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराजांचं शिल्प त्यानं घडवलं होतं. त्या शिल्पातल्या दादोजी कोंडदेवांना तर ‘मराठा’ राजकारण्यांनी अक्षरशः क्षणार्धात नाहीसंच करून टाकलं. अतिशय भयंकर प्रसिद्धी मिळाली त्या शिल्पाला. पण ज्यानं ते उभारलं त्या शिल्पकार संजय तडसरकर यांना मात्र कुणीही विचारलं नाही किंवा या भयंकर घटनेमुळं त्यांना काय वाटलं? याबाबत कुणी साधी चौकशी देखील केली नाही. याचं शल्य संजयला सतत बोचत असेल? आणि त्यातूनच तर तो व्यसनाधीन झाला नसेल? प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नसतात. या संदर्भात ज्याच्याकडे या प्रश्नांची उत्तरं होती तो संजय मात्र आपल्यातून आज सकाळीच  निघून गेला आहे…

 

सतीश नाईक 

संपादक

‘चिन्ह आर्ट न्यूज’

 

(जयश्री, संजीव मगदूम, कोल्हापूर यांच्या सोबत केलेल्या चर्चेमधून हा लेख आकारला आहे.)

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.