Features

‘इकठ्ठा: समकालीन कलेचे १० तरुण शिलेदार’

हिवाळी मोसम ही कला-रसिकांना पर्वणीच असते. कला-क्षेत्रातील अनेक महत्त्वाची प्रदर्शने याच काळात होत असतात. करोनामुळे गेली दोन वर्षे बंद असलेला कला-व्यवहार आता कुठे सुरळीत होतो आहे. अनेक चांगली प्रदर्शने होत आहेत. मुंबईचे सुप्रसिद्ध ‘काला घोडा आर्ट्स फेस्टिवल (KGAF)’ नुकतेच प्रचंड उत्साहात पार पडले. नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये ‘इंडिया आर्ट फेअर’ प्रदर्शन नुकतेच पार पडले आणि आता दिल्लीत चालू आहे. ‘व्हॅन गॉग ३६०°’ हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रदर्शन सध्या मुंबईत चालू आहे, आणि लवकरच दिल्लीत आणि त्यानंतर बंगळुरू, पुणे यांसह भारतातील एकूण १४ शहरांमध्ये येऊ घातले आहे. ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या वार्षिक स्पर्धेतील कलाकृतींचे प्रदर्शन सध्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चालू आहे, केरळमध्ये ‘कोची मुजिरिस बिन्नाले’ चालू आहे. नुकत्याच दिवंगत झालेल्या ललिता लाजमी यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या NGMA मध्ये चालू आहे. The Mumbai Urban Art Fair सध्या मुंबईच्या ससून डॉकमध्ये चालू आहे. अशी आमच्यासारख्या चित्र-दिवाण्यांची चहूबाजूंनी चंगळ चालू असताना एक नवी माहिती समजली ती ‘Po10tial’ नावाच्या कलाकारांच्या समूहाने ‘Po10पुर Studio’ नावाच्या कलादालनात भरवलेल्या ‘इकठ्ठा’ नावाच्या समूह प्रदर्शनाची. दहा तरुण नवोदित कलाकारांच्या निवडक कामांचं प्रदर्शन त्यात असणार आहे, कला-रसिकांनी अजिबात चुकवू नये असं हे प्रदर्शन आहे, अशी आतल्या गोटातील खबर मला मिळाली होती!

या कलादालनाचं नाव याआधी कधीही ऐकलं नव्हतं. ते मीरारोड भागात आहे याचाही अचंबा वाटला. मुंबईत कलाविषयक जे काही ‘हॅपनिंग’ असतं ते केवळ ‘साऊथ मुंबई’च्या उच्चभ्रू परिसरातच, असा पायंडा वर्षानुवर्षे पडलेला आहे. कारण बहुतेक सर्वच नावाजलेली कलादालने त्याच भागात आहेत. मात्र त्या परिसरापासून अतिशय दूर, मुंबईच्या उत्तरेला, पोस्टाच्या पत्त्यानुसार ठाणे जिल्ह्यात असलेली, स्वतंत्र चित्र-प्रदर्शन भरवणारी ही पहिलीच गॅलरी असावी. इथे कोणते कलाकार आपली कला सादर करत असतील? कोणते कला-रसिक तिथपर्यंत पोहोचत असतील? कोणत्या प्रकारची कला तिथे बघायला मिळेल? याबद्दल खूपच उत्सुकता वाटली, म्हणून वाट काढत तिथे पोहोचलो. मीरारोड रेल्वे स्थानकापासून रिक्षाने १०-१२ मिनिटांतच तिथे पोहोचलो. मी येणार असल्याचं अगोदरच कळवलं होतं. हा निवासी भाग असल्यामुळे आजूबाजूचा परिसर मुंबईच्या उपनगरांमधील असतो तसाच आहे, परंतु आत शिरताच मंद पिवळसर प्रकाश, सुंदर पिवळी-निळी रंगसंगती आणि शांत प्रसन्न वातावरण यामुळे कलादालनाचा माहौल तयार झाला होता, त्यामुळे अगदी छान वाटलं. तिथल्या कलाकार आणि व्यवस्थापक चमूने अतिशय उत्साहाने माझं स्वागत केलं. त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊन मी प्रदर्शनाकडे वळलो.

एक आगळावेगळा दृश्यानुभव
माझ्यासोबत मार्गदर्शक म्हणून होते तिथले ज्येष्ठ कलाकार व Po10tial स्टुडिओच्या संघटकांपैकी एक असलेले अण्णाराय हंगरगी. त्यांनी सुरुवात करून दिली ती ‘The objects near me’ या मौशमी गांगुली या कलाकर्तीच्या व्हिडिओ-आर्ट प्रस्तुतीने. त्यामुळे इथे काहीतरी नवं आणि वेगळं अनुभवायला मिळणार, याची खात्री पटली. आपल्या आजूबाजूला जो मोकळा अवकाश असतो, तेच आपलं जग असतं. त्या अवकाशात असलेल्या आपल्या वस्तू आपल्याला प्रिय असतात. त्या वस्तू आपल्या या जगाचा अविभाज्य भाग असतात. आपण त्यांना किती जवळून पाहतो? ओळखतो? त्यांना एका व्यक्तीचा दर्जा देतो की वस्तू म्हणून वापरत राहतो? त्यांच्यापैकी एक वस्तू जरा इकडेतिकडे झाली तरी आपण अस्वस्थ होतो. तेव्हा मात्र त्यांच्याकडे अधिक सजगतेने पाहू लागतो. हे आणि असे अनेक प्रश्न आणि विचार एकही शब्द न बोलता केवळ आंगिक आणि मुद्राभिनय करून या कलाकृतीत सांगितलं आहे, ते प्रत्यक्षच अनुभवण्यात गंमत आहे. याच अनुभूतीमधून आलेली काही चित्रंसुद्धा पाहायला मिळतात.

यानंतर होते मनजीत गोगोई या तरुण कलाकाराने सादर केलेले ‘Resolve the environmental conflicts’ नावाचे शिल्प-प्रदर्शन. मनजीत मूळचा आसामचा. कलाशिक्षणासाठी मुंबईत आला, तेव्हा त्याला आसाममधला अस्पर्श निसर्ग आणि मुंबईतला आधुनिक जगात प्रदूषणामध्ये हरवत चाललेला निसर्ग यांच्यातील फरक प्रकर्षाने जाणवला. माणसाने वापरुन फेकून दिलेले प्लॅस्टिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू, धातूच्या वस्तू यांचा भडिमार निसर्ग सहन करतो आहे, त्यात माती, पाणी, वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये मिसळून हा सुका कचरा त्यांचा ऱ्हास घडवतो आहे, हे दाहक वास्तव त्याने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी लाकूड, बांबू, माती यांसारखी नैसर्गिक माध्यमे आणि जुन्या इलेक्ट्रिक तारा, प्लॅस्टिक इत्यादी मानवनिर्मित वस्तूंचा माध्यम म्हणून अतिशय कुशलतेने वापर केला आहे. या दोन प्रकारच्या गोष्टी एकमेकांमध्ये बेमालूमपणे मिसळून गेल्याचा भास होतो. त्यामुळे हे प्रदूषण किती खोलवर पोहोचले आहे, हे तीव्रतेने जाणवते.

त्यानंतर समोर आले रोशन अन्वेकर या तरुण कलाकाराचे ‘Fragrance of rustic life’ हे इंस्टॉलेशन. शहरातील समृद्ध समजले जाणारे आयुष्य, तिथली सुख-साधने यांचा स्पर्शसुद्धा न झालेले लहानश्या खेड्यातील जीवन त्यात जिवंत स्वरूपात साकार केले आहे. तिथे गेल्यावर आपण खरोखरच गावातील एखाद्या घराच्या अंगणात उभे आहोत, असा भास होतो. तिथली दृश्यं, ध्वनी, रंग, वास, टेक्स्चर्स हेसुद्धा अगदी गावातल्यासारखे आहे. हे निर्माण करताना त्याने कटाक्षाने नैसर्गिक रंग आणि साहित्य वापरले आहे. त्यामुळे अतिशय वास्तवदर्शी अनुभव येतो. 

दीपक या कलाकाराचे ‘Undictated issues’ हे इंस्टॉलेशन अगदी मितभाषी आहे तरीही ‘वन्यजीवांचे स्थलांतर’ या ज्वलंत समस्येवर समर्पक भाष्य करते. माणसाने चालवलेली शहरांची अनियंत्रित वाढ आणि त्यामुळे होणारे निसर्गाचे अमर्याद शोषण हे वन्यजिवांच्या जिवावर उठले आहे, हे त्यातून भेदक पण कल्पक पद्धतीने दाखवून दिले आहे. सुरेशकुमार सिंघा या तरुण कलाकाराच्या ‘Effects of layered opacity’ या कलाकृतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतानाच्या आठवणी तिथल्या अनुभवांच्या दैनंदिनीवजा लिखित नोंदी आणि टेंपेरा व संमिश्र माध्यमांचा कौशल्याने वापर करत केलेली चित्रं यांचा मिलाफ करून एकसंध कलाकृतीच्या स्वरूपात सादर केल्या आहेत. चित्र कुठे संपतं आणि दैनंदिनी कुठे सुरू होते हे कळतच नाही. 

विवेक दास या कलाकाराने ‘Introspective reflections’ या कलाकृतीद्वारे प्रेक्षकांना, स्वतःच स्वतःच्या आत दृष्टिक्षेप टाकत एका वेगळ्याच प्रकारे आत्मपरीक्षण करण्याची दृष्टी मिळवण्याची संधी दिली आहे, ते पाहून हरखून जायला होतं. ‘Amphibious abstraction’ नावाच्या कलाकृतीमध्ये श्रीनिवास मेहेत्रे या कलाकाराने समुद्र आणि जमीन यांच्या मध्यभागी असलेल्या जमिनीच्या पृष्ठभागाची दिवसभरात भरती-ओहोटीच्या चक्रासोबत बदलत जाणारी अमूर्त सौंदर्य असलेली मनोहारी रुपे सादर केली आहेत. हेमा म्हात्रे या कलाकर्तीने ‘Empowering with surroundings’ या मालिकेद्वारे अनेक सुंदर काष्ठशिल्पे सादर केली आहेत. तिचा त्यामागील विचार असा आहे की, आपल्या आजूबाजूच्या निसर्गाचा प्रभाव आपल्यावर कळत-नकळत पडत असतो, आणि त्यातील घटकांमधून आपण आपल्याच अस्तित्वाला बळ देऊ शकतो. हरदेव चौहानने ‘Cotton conversation with me’ ही चित्रमालिका सादर केली आहे. त्यामध्ये कापसाची शेती आणि त्यानंतर मिळणाऱ्या कापसापासून कपडे तयार होत असताना केल्या जाणाऱ्या प्रक्रिया यांच्यासंबंधी आपले अनेक दृश्यानुभव एकमेकांमध्ये गुंफून अतिशय नावीन्यपूर्ण चित्रे सादर केली आहेत.

सर्वात शेवटी पाहिले ते ‘मानवता ही धर्म है’ या शीर्षकाचे व्हिडिओ आर्ट सादरीकरण. यामधील संकल्पना अण्णाराय यांना कोव्हिड काळात स्फुरलेली असून त्यांच्या चमूतील अनेक कलाकारांनी त्यामध्ये भूमिका केली आहे. देवाचे मंदीर बांधण्यासाठी पैसे गोळा केले जातात, परंतु खरा देव किंवा धर्म हा मानवता धर्म हाच आहे, हा संदेश यामधून मिळतो. याचे सादरीकरण मुंबईच्या National Gallery of Modern Art (NGMA) मधील रंगमंचावर करण्यात आले होते.

समकालीन कलेच्या प्रवाहात या प्रयोगांचे महत्त्व काय?
व्हिडिओ आर्ट हा कलाप्रकार २००१ पासून युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर केला गेलेला असला तरीही भारतात अजूनही फारसा रूजलेला नाही. याची कारणे अनेक असतील. कला म्हणजे चित्रकला आणि शिल्पकला; त्यातही चित्रकला म्हणजे लँडस्केप, पोर्ट्रेट किंवा कुठलेही यथार्थदर्शी असे चित्रण, अशी सार्वत्रिक समजूत आहे. यापलिकडे जाऊन विचार आणि प्रयोग करणारे भारतीय कलाकार आणि प्रेक्षक दुर्मिळ आहेत. हे तरुण कलाकार मात्र असे प्रयोग करत आहेत. माध्यमे आणि सादरीकरणाच्या प्रचलित पद्धतींपेक्षा वेगळ्या वाटा शोधत आहेत, हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. माझ्या मते, कलेमध्ये सामाजिक जाणिवांचा महत्त्वाचा वाटा असणे, कला-निर्मिती करताना अनेकविविध माध्यमांचा वापर करणे, नवी माध्यमे शोधणे, विकसित करणे, कला ही केवळ दृश्य आनंदापुरती मर्यादित न राहता तिला लोकचळवळीचे स्वरूप येणे, ही खऱ्या अर्थाने समकालीन कलेची वैशिष्ट्ये आहेत आणि ही वैशिष्ट्ये ‘इकठ्ठा’ या प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळे भारतात तरुण कलाकार खऱ्या अर्थाने समकालीन कला असलेल्या कलेकडे वळत आहेत, ही मला येथील कलेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि भारतीय कलाकारांना आंतरराष्ट्रीय कलेच्या प्रवाहात आपला ठसा उमटवण्याच्या संधी निर्माण होण्यासाठी आशादायक बाब वाटते.

एक महत्त्वाचा संदर्भ
मौशमी गांगुलीचे व्हिडिओ सादरीकरण पाहताना मला साहजिकच Marina Abramović या थोर सर्बियन कलाकर्तीने १९७४ मध्ये सादर केलेले, सुमारे सहा तास चाललेले ‘Rhythm 0’ नावाचे जिवंत सादरीकरण आठवले. आज जगभर Grandmother of performance art अशी स्वतःची ओळख निर्माण करणारी मरीना त्यावेळी अवघ्या २८ वर्षांची तरुणी होती. तत्कालीन प्रस्थापित कला-समजुतींना हादरा देणारे असे ते क्रांतिकारक सादरीकरण होते. त्यातूनच Performance art या कला-सादरीकरणाच्या नव्या पद्धतीचा उदय झाला. त्यातून कालांतराने व्हिडिओ आर्ट विकसित झाले. ‘Rhythm 0’ मध्ये कलाकार आणि कला-रसिक यांच्यातील द्वैत खऱ्या अर्थाने संपवले गेले, हा प्रचंड मोठा बदल होता. या प्रयोगामध्ये मरीनाने ७२ वस्तू प्रेक्षकांसाठी ठेवल्या होत्या, त्यातील अर्ध्या आनंददायी होत्या, तर अर्ध्या वेदनादायी होत्या. सहा तासांच्या कालावधीत त्यापैकी कुठलीही वस्तू तिच्या शरीरावर कुठल्याही प्रकारे वापरण्याचे स्वातंत्र्य तिने प्रेक्षकांना दिले होते. मानवी मनाचा सखोल वेध घेणारी ती अतिशय धाडसी जिवंत कलाकृती होती. त्यामध्ये तिला अनेक दुखापती झाल्या आणि मानवी मनात खोलवर लपलेले अनामिक क्रौर्य व त्यासोबतच असलेला भ्याडपणा यांचे जिवंत दर्शन या प्रयोगामधून घडले, म्हणूनच तो कलेच्या इतिहासातील या प्रकारचा सर्वोत्तम प्रयोग मानला जातो.

‘Rhythm 0’ सादर करताना Marina Abramović. १९७४. (छायाचित्र: Museum of Modern Art (MoMA), New York यांच्या संग्रहातून साभार)

(Marina Abramovic Institute च्या यूट्यूब चॅनल वरून साभार)
वैधानिक इशारा: या व्हीडिओमधील काही दृश्ये आपल्याला विचलित करू शकतात.

उज्ज्वल कला-भविष्याची आशा
Po10tial ची स्थापना २०१५ मध्ये केली गेली त्यामागे नव्या कलाकारांना शोधणे, त्यांना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ देणे, आणि एकमेकांच्या सहकार्याने आपापली कला-निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित करणे ही उद्दिष्टे आहेत. कला-निर्मिती करत असताना सध्याच्या काळात भेडसावणाऱ्या सामाजिक समस्यांकडे विविध दृष्टीकोनांमधून पाहणे, प्रस्थापित विचारसरणीला प्रश्न विचारणे, आणि जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन निर्माण करणे या गोष्टींना त्यांनी महत्त्व दिलेले आहे. आपली कला समाजापर्यंत पोहोचवली, त्यामार्फत सामाजिक समस्यांबद्दल जागरूकता पसरवली, कलेद्वारे राष्ट्र आणि जगाला आकार देणाऱ्या वैविध्यपूर्ण वास्तवाचा सखोल अभ्यास केला, तरच त्या कलेला काही महत्त्व आहे, असे त्यांना वाटते. आतापर्यंत त्यांनी अनेक कला-प्रदर्शने आयोजित करून तरुण कलाकारांना त्यात आपले काम मांडण्याची संधी दिली आहे. Po10tial सारख्या समकालीन कलाप्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांच्या प्रयत्नांचे कौतुक करायला हवे ते यासाठीच. आतापर्यंत इकठ्ठा प्रदर्शनाला सर्वश्री प्रभाकर कोलते, भालचंद्र नेमाडे, शरद तरडे प्रभृतींसह अनेक ज्येष्ठ कलाकार व कला-रसिकांनी भेट देऊन कौतुक केले आहे. आपणही २३ फेब्रुवारीच्या आधी हे प्रदर्शन प्रत्यक्ष जाऊन बघायला हवे, कलाकारांशी बोलायला हवे, त्यांची कला-प्रक्रिया, त्यांचा कला-विचार समजून घ्यायला हवा. तिथे जाण्याआधी त्यांना कळवले तर चांगले. पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक या वेबसाइटवर आहेत.
https://po10tial.in/
Po10tial Studio चा यूट्यूब चॅनल व फेसबुक माध्यमातून त्यांच्या या प्रदर्शनाविषयी अधिक माहिती मिळवता येईल.

https://www.youtube.com/@po10tialteam95/featured

https://www.facebook.com/profile.php?id=100050498199142

चिन्हच्या खजिन्यातून…
Po10tial studio च्या माध्यमातून आपली कला जगासमोर आणणाऱ्या कुलदीप कारेगावकर या तरुण कलाकाराची दीर्घ मुलाखत चिन्हच्या ‘गच्चीवरील गप्पा’ या ऑनलाइन गप्पांच्या सदरात चिन्हचे संपादक श्री सतीश नाईक यांनी जानेवारी २०२२ मध्ये घेतली होती, ती या लिंकवर बघता येईल.

– विनील भुर्के
कृषी-व्यापार व ग्रामीण व्यवस्थापन क्षेत्रातील २० वर्षांचा कार्यानुभव. व्यवस्थापन शिक्षण या क्षेत्रात कार्यरत असतानाच्या सहयोगी अधिष्ठाता या पदाचा त्यांनी स्वेच्छेने त्याग केला असून आता पूर्णवेळ कलेचा विद्यार्थी होण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.