Features

Camlin चे सृजनरंग: रजनी वहिनी

सी.एस.ओझा (Camlin चे निवृत्त DGM )

साधारण पन्नास वर्षांपूर्वी शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रथम प्रवेश करणारा ब्रॅंड म्हणजे Camlin. Camlin ची विविध स्टेशनरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांनाच परिचित आहेत. चित्रकलेचे विविध प्रकारचे रंगसाहित्य सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आणि चित्रकारांना परवडतील अशा किमतीत उपलब्ध करून भारतीय चित्रकला संस्कृतीच्या विकासामध्ये Camlin ने अभूतपूर्व योगदान दिले आहे. Camlin च्या मार्केटींग विभाग प्रमुख म्हणून ५० वर्षाहून अधिक काळ कारकिर्द गाजवलेल्या रजनी दांडेकर यांनी देशभरात विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण मार्केटींग कॅम्पेन्स यशस्वी करून अनेकांच्या आयुष्यात रंग भरले. Camlin ब्रॅंड देशाच्या कानाकोपऱ्या पोहोचवणाऱ्या, देशभरातील कलाकारांना परदेशांतील कलात्मक जगाचा परिचय घडवून देणाऱ्या, अनेक कलाकारांचे आधारस्तंभ असलेल्या रजनी दांडेकर यांचे २१ जुलै रोजी ८० व्या वर्षी निधन झाले. मार्केटींग विभागाचे नेतृत्व समर्थपणे सांभाळत असताना कंपनीतील सहकारी वर्ग आणि कर्मचाऱ्यांशी त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले. Camlin मधील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग त्यांना ‘वहिनी’ म्हणून संबोधत असे. Camlin चे निवृत्त DGM   सी.एस. ओझा यांनी त्यांच्यासह ३० वर्षाहून अधिक काळ काम केले. रजनी वहिनींच्या कामाची तडफ,  धडाडी, भारावून टाकणारे व्यक्तीत्व, सर्व सहकाऱ्याप्रती असणारे ममत्व, जिव्हाळा यांचे श्री. ओझा यांनी केलेले मनोज्ञ चित्रण पुढील लेखात मांडले आहे.

जानेवारी १९८६ मधील एक दिवस. कानपूरमध्ये Camlinच्या सेल्स रिप्रेझेंटेटीव्ह्सची मिटींग सुरू होती. वर्षभरापूर्वीच मी जोधपूर येथे  सेल्स रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून रूजू झालो होतो. मिटींग संपल्यावर आमची कंपनीच्या मार्केटींग विभाग प्रमुख रजनी दांडेकर यांचीशी ओळख करून दिली जाणार होती. त्या फक्त मार्केटींग विभाग प्रमुख नव्हत्या तर कंपनीचे मालक सुभाष दांडेकर यांच्या पत्नी होत्या. म्हणजेच एका अर्थी त्या कंपनीच्या मालकीणबाई होत्या. त्यामुळे आम्ही नव्यानेच रूजू झालेले उमेदवार काहीसे  दडपणाखाली होतो. पण त्याचबरोबर आपल्या कंपनीच्या मार्केटींगची धूरा पेलणाऱ्या मालकीणबाईंना भेटण्याची उत्सुकताही लागून राहीली होती. मिटींग हॉलमध्ये कमालीची शांतता पसरली होती. थोड्याच वेळात कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह त्या आल्या, सर्वांची ओळख करून देण्यात आली, थोडफार बोलणं झाल आणि त्या उठून उभ्या राहिल्या. खांद्यावरची पर्स उघडून त्यांनी काही पेरू काढले आणि एकेका उमेदवाराकडे पेरू टाकून कॅच पकडायला लावले. ‘मुलांना पहिल्यांदाच भेटायला चाललो आहे तर काहीतरी खाऊ घेऊन जावा’, असा सस्नेह सहजभाव त्यांच्या या लहानशा कृतीत होता. त्यांच्या या आपलेपणाच्या वागणूकीने आम्ही सगळेच भारावून गेलो. मनावरील दडपण क्षणात नाहीसे झाले. समोरच्याला आपलेसे करून घेण्याच्या त्यांच्या या स्वभावाचा त्यानंतरच्या काळात अनेकदा प्रत्यय आला.

चित्रकार गोपाळ देऊसकर यांनी काढलेले रजनी दांडेकर यांचे चित्र

कंपनीमध्ये आम्ही सर्वजण त्यांना ‘वहिनी’ म्हणत असू. कोणतेही दडपण न घेता आपले मत स्पष्टपणे मांडण्याचे, मनातले बोलण्याचे, नव्या कल्पना, सूचना मोकळेपणे मांडण्याचे हक्काचे आणि जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे आमच्या रजनी वहिनी. आज वहिनी आपल्यात नाहीत. मनात अनेक आठवणी दाटून आल्या आहेत. त्यातील काही शब्दबद्ध करून रजनी वहिनींच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या कारकिर्दीत Camlin समूहाच्या झालेल्या यशस्वी वाटचालीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न मी या लेखाच्या निमित्ताने करत आहे.

मी १९८५ साली कंपनीत रूजू झालो. रजनी वहिनींच्या साधारण पन्नास वर्षांच्या कार्यकाळातील ३० वर्ष मला त्यांचा सोबत काम करण्याची संधी मिळाली. मला असं वाटत असे की मी त्यांच्या सर्वांत जवळची व्यक्ती आहे. पण असे अनेकांना वाटत असे. त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकालाच वाटत असे की आपण वहिनींसाठी इतरांपेक्षा जास्त महत्वाचे आहोत. त्यांच्या हा विशेष स्वभाव गुण आणि प्रभावी व्यक्तिमत्व यांचा कंपनीच्या उत्कर्षामध्ये महत्वाचा वाटा होता.

रजनी वहिनी अनेकदा माझ्या जोधपूरच्या आणि दिल्लीच्या घरी येऊन गेल्या. २००३ साली दिल्लीला असताना माझ्या दोन्ही किडण्या बंद झाल्या. ह़ॉस्पीटलच्या वाऱ्या सुरू झाल्या. ट्रिटमेंटनंतर माझी प्रकृती सुधारू लागली आणि २००४ मध्ये मला कंपनीच्या कामानिमित्त युरोप टूर करण्याची संधी मिळाली. मी जायला तयार होतो. पण वहिनींनी माझी प्रकृती नक्की ठिक आहे ना याची स्वतः डॉक्टरांशी बोलून खात्री करून घेतली. मी नुकताच आजारपणातून उठलेला असल्याने परदेशवारीसाठी माझ्या पत्नीची परवानगी असणे आवश्यक आहे, असे वहिनींना वाटत होतो. तिचे मत जाणून घेण्यासाठी त्या स्वतः माझ्या घरी येऊन गेल्या. आपल्या कर्मचाऱ्याच्या तब्येतीची एवढी काळजी करणाऱ्या, त्याच्या कुटुंबियांच्या मतालाही महत्व देणाऱ्या वहिनींचे हे वागणे पाहून मी भरून पावलो.

त्याच दरम्यान माझ्या आईला कॅन्सरचे निदान झाले. मुंबईमध्ये तिची ट्रीटमेंट सुरू होती. त्यावेळी माझ्या जोधपूर येथील मूळ घरी चोरी झाली. तिथे तातडीने जाऊन येणे आवश्यक होते. त्यावेळी वहिनी स्वतः मदतीला धावून आल्या. ‘आईची सर्व काळजी आम्ही घेऊ, तू निश्चिंतपणे गावी जाऊन ये.’ असे सांगून त्यांनी मला आश्वस्त केले. हॉस्पीटल बाहेरच्या दगडी बेंचवर बसून त्यांनी माझ्या आईशी तासभर गप्पा मारल्या. तर महत्वाच हे की वहिनी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आश्वस्त करत असत. माझ्याप्रमाणेच कंपनीतील कित्येकांनी वहिनींच्या या आपलेपणाचा अनुभव घेतला आहे. एकदा कंपनीमध्ये नवीन असताना मी रंगाच्या बाटल्यांवरील स्टीकर्सवर छापलेल्या मजकूरातील एक चूक त्यांच्या ध्यानी आणून दिली होती. त्यावेळी तत्काळ ती दुरुस्ती करून घेत त्यांनी माझे कौतुक केले होते.

हे सारे व्यक्तिगत अनुभव झाले. आता Camlin च्या भारतातील रंग साहित्य उत्पादनांच्या बाजारपेठेच्या उभारणीत वहिनींनी दिलेले योगदान थोडे तपशिलाने मांडणे मला अगत्याचे वाटते.

१९६० च्या दशकात सुभाषदादांनी स्कॉटलॅंडला जाऊन कलर केमिस्ट्रीचा अभ्यास केला. भारतात परत येऊन त्यांनी Camlin मध्ये रंगांवर संशोधन सुरू केले. तेव्हा रंग आणि संबंधित साहित्याची निर्मिती आणि त्याची बाजारपेठ हे आपल्या देशातील अगदी अस्पर्शित क्षेत्र असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा चित्रकलेसाठीचे रंग परदेशातून आयात केले जात. सहाजिकच ते रंग महागडे होते. त्यामुळे चित्रकलेचा सार्वत्रिक विस्तार होऊ शकत नव्हता. त्यामुळेच  किफायतशीर आणि दर्जेदार रंग निर्मिती बरोबरच त्यासाठी देशांतर्गत बाजारपेठ निर्माण करणे हे त्यांच्या समोरील मोठे आव्हान होते. रंग आणि पूरक साहित्याची देशव्यापी बाजारपेठे निर्माण करण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरांमध्ये चित्रकलेची अभिरूची निर्माण करणे गरजेचे होते. अशा कठीण प्रसंगी रजनी दांडेकर यांनी पती सुभाष दांडेकर यांच्यासह काम सुरू करून मार्केटींगची कठीण जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी आर्ट मटेरिअलच्या पब्लिसिटीसाठी कंपनीकडे फारसा निधीही नव्हता. यावर तोडगा म्हणून रजनी वहिनींनी आपल्या रंगसाहित्यांची प्रसिद्धी करण्यासाठी देशातील चित्रकारांच्या भेटी घेण्यास सुरूवात केली. या कामी वहिनींना त्यांच्या माहेरच्या कलात्मक सांस्कृतिक वारशाचा खूप उपयोग झाला. दादर शिवाजीपार्क परिसरात सुसंस्कृत वातावरणात  बालपण  गेलेल्या रजनी वहिनींच्या माहेरच्या घरी कलाकारांचा राबता असे. अनंतराव वर्तक हे प्रख्यात रंगकर्मी त्यांचे वडील. त्यामुळेच Camlin चा मार्केटींग विभाग सांभाळताना निव्वळ व्यावसायिकदृष्टीकोन न ठेवता एक समृद्ध कलात्मक अभिरूची घेऊन त्या चित्रकारांच्या भेटी घेत. याचा मार्केटींगमध्ये खूप उपयोग होत असे.

चित्रकारांना दर्जेदार-किफायतशीर रंग हवे होते, काम करण्यासाठी प्रेरणा हवी होती, प्रसिद्धी हवी होती आणि त्याचबरोबर तयार झालेल्या चित्रांना मार्केट देखील हवे होते. त्यांच्या या सर्व अपेक्षापूर्ण होतील अशा रीतीने त्यांनी चित्रकारांना सर्वार्थाने प्रोत्साहन दिले. त्यावेळी कुलाबा वगळता अन्य कोठेही आर्ट गॅलरी नव्हती. यावर उपाय म्हणून वहिनींनी त्यांच्या दादरच्या घरातच ‘Oasis’ या नावाने आर्ट गॅलरी सुरू केली. त्यांनी सुरू केलेला अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे Rent a painting. ज्या ग्राहकांना चित्र खरेदी करणे शक्य नाही किंवा ज्यांना नेमके कोणते चित्र खरेदी करायचे हे निश्चित करता येत नाही अशा ग्राहकांसाठी ही योजना होती. अगदी अल्प शुल्क भरून या गॅलरीतील चित्रे महिन्याभरासाठी भाड्याने दिली जात. चित्रांना मागणी असली तरच रंगांना मागणी वाढेल हे हेरून त्यांनी चित्रांच्या प्रमोशनसाठी विविध उपक्रम सुरू केले. मार्केटींग कॅम्पेनमध्ये देशभरातील चित्रकारांना Camlin च्या रंगांच्या सॅम्पल ट्युब्स दिल्या गेल्या. पण एका विशिष्ट परदेशी कंपनीचे रंग वापरण्याची सवय झालेले चित्रकार Camlin च्या रंगांना हात लावायला राजी नव्हते. या चित्रकारांना आपल्या रंगांचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी वहिनींनी एक अनोखी युक्ती शोधून काढली.

१९६७ मध्ये दिल्लीमध्ये एक प्रदर्शन भरवले गेले. यामध्ये दिल्लीतील शांती दवे, रामकुमार यांसारख्या प्रस्थापित चित्रकारांना Camlin चे रंगसाहित्य देऊन चित्रे साकारण्यास सांगितले. या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले. ललित कला अकादमीचे चेअरमन आणि प्रख्यात आर्टीस्ट नारायण श्रीधर बेंद्रे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या चित्रांमधून उमटलेली Camlin च्या रंगांची गुणवत्ता चित्रकार, कला समीक्षक, कला रसिक यांनी  प्रत्यक्ष अनुभवली आणि हे रंग कलाकारांच्या हात विसावले. या प्रदर्शनाचा अजून एक फायदा म्हणजे या देशी रंगांची गुणवत्ता आणि किफायतशीरपणा पाहून सरकारने परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या रंगांवर दिली जाणारी कर सवलत रद्द केली आणि देशांतर्गत रंग निर्मितीला चालना मिळाली. या पूर्ण कॅम्पेनमध्ये रजनी वहिनींचे अत्यंत मोलाचे योगदान होते.

चित्रकारांना कंपनीच्या उपक्रमांद्वारे प्रोत्साहित करण्याबरोबरच त्यांनी कित्येक कलाकारांना व्यक्तिगत स्तरावरही सहकार्य केले. कला महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील  शिक्षणाचा खर्च न परवडणाऱ्या कित्येक नवोदीत कुशल कलाकारांचे शैक्षणिक शुल्क भरून, रंगसाहित्य पुरवून त्यांना प्रोत्साहन दिले आहे. काही गरजू चित्रकारांची चित्रे खरेदी करून त्यांना सहकार्य केले आहे. कंपनी स्तरावर एखाद्या विशिष्ट कलाकाराच्या चित्रांचे प्रदर्शन भरवणे शक्य नव्हते. त्यामुळे  १९९८ रजनी वहिनींनी Camel Art Foundation ची स्थापना केली. याद्वारे देशभरात विभागीय स्तरावर प्रदर्शने भरवण्यात येत. यामधील सहभागी कलाकारांमधुन ८-१० जणांची निवड करून त्यांना काही अनुभवी चित्रकांरांसह परदेशांतील प्रसिद्ध आर्ट गॅलरींची सफर घडवून आणली जाई. याचा संपूर्ण खर्च फाऊंडेशन करत असे. यामध्ये एका वेळेस पुरेसा बँक बँलन्स नसल्यामुळे एका चित्रकाराला व्हिसा नाकारण्यात आला होता. वहिनींनी त्यांच्या बँकेत ती रक्कम भरून त्याची अडचण दूर केली. अशाप्रकारे १० वर्षात २०० हून अधिक कलाकारांना विदेशवारी घडवण्यात आली.

देशभरातील शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा भरवणे, ठिकठिकाणच्या स्थानिक चित्रशैलीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या भेटी घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे, महिलांसाठी तसेच चित्रकलेत अभिरुची असलेल्या पण चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेणे शक्य नसलेल्यांसाठी hobby classes चालवून त्यांना चित्रकलेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे असे विविध उपक्रम रावबून वहिनींनी Camlin ब्रॅंडला समाजातील सर्वस्तरातील लोकांपर्यंत पोहोचवले. Camlin साठी हक्काची बाजारपेठ निर्माण केली आणि त्याबरोबर कलात्मक अभिरुचाला प्रोत्साहन देऊन अनेकांच्या आयुष्यात सृजनाचे रंग भरले. आज रजनी वहिनी आपल्यात राहील्या नाहीत. मी रजनी वहिनींचा निकटवर्तीय असल्याचे माहित असल्याने त्या गेल्याची बातमी समजल्यावर सांत्वन करणारे अनेक संदेश मला आले. या संदेशामध्ये रजनी वहिनींची जनमानसात रूजलेली प्रतिमा Generous, Humble, Beautiful, Dignified, Graceful याच शब्दांत चित्रित झाली आहे. स्वतःच एक ब्रॅंड होऊन राहिलेल्या या लोभस व्यक्तिमत्वाला माझे शतशः नमन.

(शब्दांकन : संध्या लिमये)

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.