Features

मालवण समुद्रावरची संध्याकाळ आणि चित्रकार गायतोंडे …

कोरोनामुळे गेली वर्ष दीड वर्ष कुठं जाण झालंच नव्हतं. जावंस देखील वाटतं नव्हतं. हा कदाचित कोरोना काळाचा परिणाम असावा. नाही म्हणायला मध्ये एकदा अजिंठ्याला जाऊन आलो होतो. अर्थात तो अभ्यासाचा भाग होता. पण संपूर्णपणे विनाउद्दिष्ट कुठं जाणंच झालं नव्हतं. तो योग अखेरीस गेल्या आठवड्यात आला.
दौरा अर्थातच मालवणचा होता. खर तरं ते माझं गाव, पण तिथं देखील दीड वर्षात जात आलं नव्हतं. तो योग आता आला. त्याविषयी सविस्तर नंतर लिहिणारच आहे. पण आज इतक्या तातडीने लिहितो आहे त्याला कारणही तसंच आहे. या प्रवासात माझ्या सोबत ,माझा चित्रकार मित्र प्रकाश वाघमारे देखील होता. तो मूळचा कोकणातलाच. म्हणजे रोह्याचा, पण मालवणचं नाव काढताच तो अलीकडे नेहमीच माझ्या सोबत येतो. या वेळच्या प्रवासात आणखीन एक नाव जोडलं गेलं ते म्हणजे चित्रकार आणि संगीत अभ्यासक माधव इमारते याचं. तोही या प्रवासात आनंदाने सहभागी झाला होता. त्याविषयी नंतर कधीतरी लिहीनच.
हा प्रकाश वाघमारे हा चांगलाच फोटोग्राफर आहे. साध्या मोबाईलच्या कॅमेऱ्यावर देखील तो अप्रतिम फोटोग्राफ घेतो. आपल्या व्हाट्सअप मध्ये त्यांने ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केला आहे त्यातल्या सर्वानाच तो सकाळी सकाळी गुडमॉर्निंग सोबत काढलेले फोटो पाठवतो. गेले चार पाच दिवस तो मालवण मध्ये काढलेले एकाहून एक अप्रतिम फोटो पाठवतो आहे. आज सकाळी त्याने असाच एक फोटो मला पाठवला, जो त्याने मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर शूट केला होता. तो शूट करत असताना मी शेजारीच होतो. तो पाहून मी त्याला लगेचच अप्रतिम असल्याचं कळवलं देखील.
आणखीन सुमारे अर्ध्या तासाने त्याचा आणखीन एक मॅसेज आला. तो होता आमचा आणखीन एक अवलिया मित्र चित्रकार आणि शास्त्रीय गायक सुनील बोरगावकर याचा. त्यालाही प्रकाशने तो फोटो पाठवला होता. आणि उत्तरादाखल त्यानं गायतोंडे यांच्या एका पेंटिंगचा फोटो पाठवला. आणि मेसेज मध्ये त्याने लिहिलं होतं ‘किती सुंदर ! गायतोंडे सरांचं चित्र आठवलं ! ‘
ते वाचलं आणि सुनीलच्या अभ्यासूपणाचं, संवेदनशीलतेचं मला कौतुक वाटलं. किती मोजक्या शब्दात तो व्यक्त झाला होता. गायतोंडेंचं हे चित्र पन्नास किंवा साठच्या दशकातलं असावं. भुलाभाई इन्स्टिट्यूट मधल्या एका बाकावर अगदी मूकपणे तासनतास बसून गायतोंडे समोरच्या समुद्राचं निरीक्षण करत असतं आणि मग स्टुडिओत जाऊन चित्र रंगवत असतं. त्या काळात त्यांनी अशी असंख्य समुद्र चित्रं रंगवली. ज्या चित्रांना आता खूप महत्व प्राप्त झालं आहे. मोठंमोठाले कला संग्राहक या चित्रांसाठी अक्षरशः जीव टाकतात. गायतोंडे यांच्या या चित्रांच्या किंमतीं देखील आता लिलावात चाळीस ते पन्नास कोटीच्या घरात मोजल्या जातात. गायतोंडे यांचं ते चित्र आणि प्रकाशचा मूळ फोटो पोस्ट सोबत दिला आहे. अवश्य पहा.
अमूर्त कलेचा प्रसार करण्यासाठी आणखीन कुठलं उदाहरणं समर्पक ठरेल ?

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.