Features

लडाख डायरी २

चित्रकार शरद तरडे यांनी लडाखच्या दुर्गम वातावरणातील रमणीय निसर्गाचा आणि स्थानिक जनजीवनाचा अनुभव शब्दबद्ध करणारे *लडाख डायरी* हे पाच लेख त्यांनी लिहिले आहेत. यातील पहिला लेख मागील आठवड्यात प्रसिद्ध झाला. आज या लेखमालेतील पुढील भाग – लडाख डायरी २

लेखक: शरद तरडे

एखाद्या सुंदर जागी गेलो तर त्या जागी राहणाऱ्या माणसांची मने किती निर्मळ आणि प्रामाणिक असतात याचा अनुभव मी अनेक वेळा घेतला आहे परंतु प्रत्येक वेळी त्या अनुभवाला आणखीन खोल नेणारा अनुभव आत्ताच्या या प्रवासात आम्हाला आला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि त्यातून एकमेकांना साथ देऊन जीवन व्यतीत करणे ही समज येथे लोकांना उपजतच आली आहे. या माणसांच्या रोजच्या गरजा आणि अहोरात्र काम करण्याची पद्धत हीच यांना कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग दाखवते हे लक्षात येते.

लेहमध्ये वर्षातील चार महिने पूर्ण हिवाळ्यात कोठेही बाहेर पडता येत नाही अशी परिस्थिती असताना सुद्धा या लोकांचे नातेवाईक, मित्र जमेल तसे प्रत्येकाच्या घरी जाऊन गप्पा मारत सुखदुःखाची देवघेव करत ते चार महिने आपले नाते पुन्हा घट्ट विणत असतात हे लक्षात आले. त्यांच्यामधील कोणाला आर्थिक अडचण किंवा शैक्षणिक मदत किंवा आजारपण हे काही असले तरी ते कुटुंब एकटे पडू नये म्हणून त्याला सर्वांगीण मदत करण्याचे करण्याचे भान हे या समाजात पूर्वीपासून रुजलेले आहे आणि ही बाब खूप महत्त्वाची आहे.

अजूनही काही ठिकाणी मातृसत्ताक पद्धती अवलंबित असल्याने सगळ्यात छोट्या मुलीचा नवरा हा मुलीकडे राहायला येतो आणि सर्वांची काळजी घेतो त्यामुळे फक्त मुली असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना आश्वस्त वाटते. एवढेच नव्हे तर नवरा मुलगा ही मुलीच्या कुटुंबाचा अविभाज्य घटक होतो हे इथे जाणवते. हे नुसतेच स्वतःच्या मित्रमंडळी नातेवाईक यांची काळजी करत नाहीत तर त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्याबद्दल तितक्याच आत्मयतेने ते काळजी घेतात याचा अनुभव आम्हाला प्रकर्षाने घेता आला.

लेह मधून आमचा पहिला मुक्काम “तिरी” या गावी एका होमस्टेला होता. आजूबाजूला डोंगर आणि त्या घराच्या पुढे शेती आणि लगेचच वाहणारी नदी अश्या रम्य परिसराने नटलेले हे घर होते. त्या घरात गेल्या गेल्या गरमागरम नमकीन चहाने आमचे स्वागत झाले. सगळेजण एकत्रपणे या चहाचा आनंद घेत असताना घरातील सर्व जण आमच्यासमोर उभे होते. सगळ्यांनी आपल्या आपली ओळख करून दिली आणि त्या वेळेला लक्षात आले की या घरी प्रत्येक जण चांगला सुशिक्षित आहे आणि तरीही घरातले कुठलेही काम करण्यास ते मागे पुढे बघत नाही. इथेच हळूहळू त्यांच्या मनस्थितीचा अंदाज येऊ लागला.

संध्याकाळचे सात साडेसात वाजले आणि आकर्षकरीतीने बनवलेले मोमोज, टोमॅटो सूप आणि खंबीर (एक प्रकारची जाड पोळी) आणि मसुराची उसळ, भात हे सर्व गरमागरम पदार्थ जेवायला होते परंतु मला बरं वाटत नसल्याने मी थोडे फारच खाऊ शकलो आणि लगेचच खोलीमध्ये जाऊन झोपलो.

काही वेळातच सर्वांचे जेवण झाल्यानंतर या घरातले सर्व सदस्य, बरोबरीचे मित्र मैत्रिणी माझ्या खोलीमध्ये येऊन गोल उभे राहिले आणि काय झाले याची चौकशी करू लागले. त्या घरातील सर्वात वयस्कर बाईंना मला बरं नाहीये कळल्यानंतरच खूपच वाईट वाटले कारण आपल्याकडे कोणीतरी पाहुणे म्हणून आले आणि त्यांना येथे आल्यावर बरे वाटत नाही हा विचारच त्यांना खूप त्रास देत होता. पण माझा ही नाइलाज होता. त्यांच्या मुलीने मास्क लावून पंधरा मिनिटे ऑक्सीजन दिला आणि त्या सूचिताला अत्यंत धीराने लवकरच त्यांना बरे वाटेल असे समजावत राहीली. माझा उजवा कान भयानक रीतीने दुखत होता आणि असा अनुभव तिथे आतापर्यंत आलेल्यांना कोणालाच झाला नव्हता त्याच्यामुळे काय करावे ज्यामुळे मला बरे वाटेल? अशी चिंता प्रत्येक घरातल्या सदस्याला होती.

क्रोसिन घेऊन थोडी फार झोप लागत होती पण त्याचा परिणाम लगेचच कमी होत होता. रात्रभर सुचिता जागी होती आणि ती मुलगी,आई अधून मधून येऊन माझ्या तब्येतीची चौकशी करीत होते आणि हळू आवाजात एकमेकांना धीर देत होते.त्यात रात्रभर लाईट नव्हते. मी तर माझ्या दुखण्यात पूर्ण बुडून गेलो होतो.

दुसऱ्या दिवशी पहाटेच आम्ही पुढे ट्रीपला न जायचा निर्णय घेतला, आणि त्या घरातल्या मुलीने आम्हाला स्वतःच्या गाडीतून लेहपर्यंत सोडण्याची जबाबदारी घेतली, कारण तिथे गाडी मिळण्याची शक्यता फार कमी होते.तिच्या चेहऱ्यावरचे भाव एवढे सात्विक आणि आपुलकीने भरलेले होते की आम्हाला ती खूप जवळची व्यक्ती वाटू लागली.

सकाळी बाकीच्या लोकांचे सर्व आवरल्यानंतर मी अक्षरशः एक एक मिनिट एक एक तासासारखा काढत होतो. परंतु काही इलाज नव्हता शेवटी अकरा वाजता आम्हाला ती लेहला घेऊन जायला निघाली, सुचिता आणि तिच्या गप्पा चालल्या होत्या आणि मला तर खिडकीतून बाहेरही बघायला जमत नव्हते. तो दोन, सव्वा दोन तासाचा प्रवास खरोखरच माझ्या दृष्टीने कठीण होता. लेहला गेल्या गेल्या तिने आम्हाला शासकीय हॉस्पिटलमध्ये नेले आणि स्वतः केस पेपर काढून आम्हाला डॉक्टर पुढे उभे केले. त्यांनी सर्व तपासण्या केल्यानंतर कान दुखायचे कारण म्हणजे घशामध्ये झालेले इन्फेक्शन आहे असे निदान केले ते ऐकल्यावर मी हे जरा शांत झालो, ताबडतोब अँटिबायोटिक आणि पेन किलर यांच्या गोळ्या घेऊन टाकल्या आणि पुन्हा आमच्या जुन्या होम स्टे जाऊन राहीलो.

या सर्व प्रकारात ज्या आत्मीयतेने आणि प्रेमाने त्या मुलीने आणि बाकी बरोबरच्या सहकाऱ्यांनी आमची काळजी घेतली की खरोखरच आमच्यासाठी जगावेगळी गोष्ट होती. आपल्या घरात राहणाऱ्या पाहुण्यांसाठी जवळजवळ त्या मुलीने एक दिवस खर्च केला होता हा सर्व अनुभव बघता आपुलकीने वागणे, लोकांची दुःख समजून घेणे आणि त्यावर जमेल तसे नव्हे तर सर्व काम सोडून त्यांची काळजी घेणे हे खरोखरच आमच्यासाठी तरी खूप वेगळा अनुभव आणि शिक्षण देऊन गेला.

संध्याकाळी ती परत आम्हाला बघण्यासाठी रूमवर आली आणि मला खूपच बरे वाटत आहे हे बघून तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य पसरले.आता पुन्हा ट्रीपला सुरुवात करायची आहे उद्यापासून! असे मनाला बजावत होतो.

परंतु तिने पुढे जे सांगितले त्यामुळे आम्हालाही पराकोटीचे आश्चर्य वाटले. ती आम्हाला सोडून घरी गेली असता तीच्या वडिलांनी तिला आम्हाला एकटे हॉस्पिटलमध्ये सोडून घरी का आलीस? तुला तिथेच त्यांच्याबरोबर थांबायला पाहिजे होते असे सांगितले. ते आपल्या घरचे पाहुणे आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे असे तिला सुनावले.

सर्व ऐकून मात्र काय बोलावे कोणालाच कळेनासे झाले पण यामुळे त्या मुलीचा मात्र चेहरा पडलेला होता शेवटी तू केलेस ते पुष्कळ झाले हे सांगायचा प्रयत्न आम्ही करत होतो आणि मी तर तुमच्यासाठी काहीच केले नाही हे सांगण्याचा प्रयत्न ती करत होती.

हे सर्व आम्हाला एकाच गोष्टीमुळे लक्षात येत होते आणि ती गोष्ट म्हणजे “होम स्टे” आपण जिथे जातो त्या संस्कृतीची माणसांची जडणघडण, खाणे पिणे, संस्कार, एकमेकांशी वागणे हे सर्वजण जवळून बघायचं असेल तर होम स्टेला पर्याय नाही असे माझ्या पूर्वीपासून लक्षात आलेले होते.

आपण जर फक्त हॉटेलमध्ये राहिलो तर जास्तीत जास्त तिथल्या वेटरची आपल्याशी दोन शब्द बोलणे होते परंतु ज्याला आपण होम स्टेला जातो तेव्हा तर ते संपूर्ण कुटुंब आपल्यासाठी सदैव काहीतरी करत असते, गप्पा मारत असते, विचारांची अदला बदल होत असते हिच गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते.

हे सर्व पराकोटीची काळजी घेणे, वागणे , त्यांना काय हवे नको ते बघणे हे सर्व ज्या सामाजिक परिस्थितीतून किंवा संस्कारातून येत असेल तर किती महत्त्वाचे असते हे आम्हाला कळत होते परंतु इतक्या ममत्वाने कसे वागायचे हे मात्र कळत नव्हते हे नक्की.

असा अनुभव, प्रामाणिकता, सेवाधर्म हा हिमाचल प्रदेशात सर्व ठिकाणी आढळतो बहुतेक हा तिथल्या मातीचा आणि संस्कारांचा गुणधर्म आहे.

त्यामुळेच हिमालय नेहमी बोलवत असतो असेच वाटते. पण आता हे मिळालेले प्रेम,आपुलकी त्यांना पुन्हा परत तर देता येत नाही ,त्यापेक्षा आपल्यात ती कशी रुजवता येईल ते वारंवार तपासून पाहिले पाहिजे तरच मन अधिक शांत होईल!

क्रमश:

लडाख डायरी भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://chinha.in/features/ladakh-diary-travel-vloggers-sharad-tarde-suchita-tarade/

लेखक : शरद तरडे   संपक्र क्र. ९४२२०१०४१८

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.