Features

कॅनव्हासवरचा क्ष-किरण : डॉ. सुधीर पटवर्धन !

‘स्त्री शक्ती प्रबोधन’ या ‘ज्ञान प्रबोधिनीशी’ संबंधित पुण्यातील संस्थेमार्फत ‘समतोल’ या नियतकालिकाच्या ताज्या अंकात प्रख्यात चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन यांच्यावर एक प्रदीर्घ लेख डॉ. निर्मोही फडके यांनी लिहिला आहे. अतिशय ओघवत्या शैलीत लिहिलेला हा लेख चित्रकला रसिकांपर्यंत जावा या हेतूनं आम्ही पुनःप्रकाशित करीत आहोत.

कोणत्याही व्यक्तीची जडणघडण होण्याकरता त्याची स्वतःची जैविक रचना, त्याच्या आयुष्यातल्या अनेकानेक व्यक्ती, घटना, परिसर इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरत असतात. माणसाचं आयुष्य हे व्यामिश्र ठरतं ते त्यामुळेच. विरोधाभास हे माणसाच्या जगण्याचं एक मुख्य सूत्र आहे. त्याचं आंतरिक भावविश्व आणि त्याचा बाह्य भोवताल यांच्या संघर्षातून तो स्वतःच्या भावनिक, वैचारिक, व्यावहारिक चौकटी तयार करत असतो आणि कारणपरत्वे मोडतही असतो.

आज २१ व्या शतकात लोकसंख्या, ज्ञान, कला, प्रसिद्धी यांचा स्फोट होत असण्याच्या आणि जगण्यात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या काळात सतत वेगळं काही करणं, प्रयोग करणं ही गरज झाली आहे. नव्या युगाच्या या गरजेचं स्वरूप मागच्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रापुरतं तरी तितकंसं तीव्र नव्हतं. आयुष्याची ठराविक चौकट सांभाळून इतर छंद जोपासणं हा जगण्याचा एक सुरक्षित मार्ग मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय मराठी समाजानं अवलंबला होता. १९६० नंतर महाराष्ट्रात अनेक पातळ्यांवर स्थित्यंतरं झाली. त्या बदलांमध्ये ‘प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध विद्रोह’ करण्याकरता संवेदनशील मनांनी कलेची कास धरली. या नावांमध्ये डॉ. सुधीर पटवर्धन हे नाव महत्त्वाचं आहे.

वैद्यकीय शाखेतली पदवी घेतल्यानंतर त्या क्षेत्रात यशस्वीपणे काम करू लागल्यावर सात वर्षांनी एखाद्या डॉक्टरनं स्वतःच्या चित्रांचं पहिलं प्रदर्शन भरवणं ही घटना निश्चितच वेगळी वाटते; पण ती खरी आहे. तरुण वयात अनेक क्षेत्रांचे मोह खुणावत असतात प्रत्येकालाच; पण त्यामागे स्थिर विचार ठेवणारे संख्येनं कमीच. डॉ. सुधीर पटवर्धन हे अशा स्थिर विचारांच्या अल्पसंख्याकांमध्ये अग्रस्थानी आहेत.

वडिलांकडून मिळालेला कलेचा वारसा, उपजत तल्लख बुद्धिमत्ता, अफाट निरीक्षणशक्ती आणि स्वतःच्या निसर्गदत्त सर्जनशीलतेला ओळखण्याची कुवत या गुणवैशिष्ट्यांमुळे स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी निकोप होत गेली. सुतारकाम, शिल्पकला, चित्रकला इत्यादींमध्ये असलेल्या ओढीतून त्यांच्यातला वैद्यकीय अभ्यासाचा विद्यार्थी कलाक्षेत्रात मुशाफिरी करू लागला. पूर्णपणे कलाक्षेत्राला वाहून घेतलेलं असं कुणी घरात नव्हतं, मेडिसीनची आवड होती; पण चित्रकलेबद्दल अतिशय जवळीक निर्माण झाली होती. अशा द्वंद्वाच्या काळात दोन्ही गोष्टी करण्यात समतोल साधण्याचा एक निर्णय त्यांनी घेतला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार औपचारिक शिक्षणाची एक चौकट तोडून, बिनभरवशाच्या कलेच्या चौकटीत शिरण्याची ती एक वेळ होती; पण त्या वेळी एकाच चौकटीत राहून दोन्ही गोष्टी साध्य करण्याचं त्यांनी ठरवलं. रेडिओलॉजी ही वैद्यकीय शाखा निवडणं, शिक्षणानंतर मुंबईला, नंतर ठाण्याला येणं यामागे चित्रकलेबद्दलची आंतरिक ओढ आणि तिच्याबद्दलची दूरदृष्टी होती.

पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेताना डॉ. पटवर्धन यांच्या सहवासात आलेले मित्र हे चित्रकला, शिल्पकला, नाट्य-चित्रपट, साहित्य अशा क्षेत्रांमधले होते. सत्तरच्या दशकातली नवनाट्य चळवळ, कलाक्षेत्रांतले अनेक नवे प्रवाह, साहित्यातली विद्रोही विचारधारा इत्यादींबद्दलच्या चर्चा, निरीक्षणं, वाचन या सगळ्यांमधून डॉ. पटवर्धन यांच्यातल्या सर्जनशील कलाकाराला कलेबद्दल अधिकाधिक भान येत गेलं. मार्क्सवाद, अस्तित्ववाद, समाजवाद इत्यादी विचारसरणींचा प्रभाव असलेल्या तरुणाईचा एक भाग असलेल्या डॉ. पटवर्धनांना स्वतःतल्या सर्जक भाव-विचारांना कॅनव्हासवरच्या रंगरेषांतून परावर्तित करणं हे अधिकाधिक आवडू लागलं. स्वतःचं वैद्यकीय शिक्षण आणि नंतर त्यातच स्वतःचं बस्तान बसवण्याची धडपड या प्रवासात त्यांनी चित्रकलेचा कुंचला हातात घेतला. रिकामपणचा छंद म्हणून कॅनव्हासवर चित्र न काढता, गंभीरपणे आणि अभ्यासूवृत्तीनं त्यांनी कलासाधना करायला सुरुवात केली.

एक यशस्वी रेडिओलॉजिस्ट म्हणून साधारणपणे तीन दशकांची वैद्यकीय प्रॅक्टिस त्यांनी ठाण्यामध्ये केली. आपल्या जगण्याचा वैयक्तिक आणि सामाजिक परीघ विस्तारत नेत असताना माणसाच्या आणि माणूसपणाच्या विविध स्तरांच्या खोलात ते शिरत गेले; पण डोळसपणे. कॅनव्हास, कुंचला आणि रंग यांना त्यांनी आपल्या कलानिर्मितीची माध्यमं केली. साधारण २००० सालापर्यंत रेडिओलॉजिस्ट आणि चित्रकार अशा दोन्ही आघाड्या ते सांभाळत राहिले. चित्रकाराला कलाकार म्हणून समाजात मिळणारा मान आणि त्याला जगण्याकरता मिळणारं तुटपुंज धन याबद्दलचे अनुभव आपल्या वाटचालीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी घेतले. त्याचप्रमाणे चित्रकला हे कलाक्षेत्रातलं एक खर्चिक माध्यम आहे, त्यामुळे ते पूर्ण वेळेचं करियर करणं कुणाकरताही अवघड असल्याची खात्री पटत गेली. अशा वेळी वैद्यकीय प्रॅक्टिसमधलं अर्थार्जन हे त्यांच्यातल्या कलाकाराला पाठबळ देत गेलं.

एक आवड आणि एक निवड अशी कसरत करताना त्यांनी काही पथ्यं पाळली. उदाहरणार्थ मेडिकल कॉन्फरन्सेस, पाटर्या यांना कमीतकमी जाणं, स्वतःची प्रॅक्टिस मर्यादित ठेवणं आणि आवश्यक तितकंच अर्थार्जन करणं इत्यादी. असं करून ते मिळालेला वेळ हा चित्रकलेकरता देत राहिले.

२००० सालाच्या आगेमागे वैद्यकीय क्षेत्रात काही नकारात्मक उलथापालथी होऊ लागल्याचं त्यांच्या आणि त्यांच्या समकालीन डॉक्टरांच्या लक्षात आलं. समाजातल्या एका अतिशय महत्त्वाच्या सेवाक्षेत्राला तद्दन व्यावसायिक स्वरूप येऊ लागल्याचा तो प्रारंभकाळ होता. अशा काळात साधेपणानं आणि सचोटीनं वैद्यकीय सेवा देणं कठीण आहे हे त्यांनी जाणलं. तसंच आपल्या रेडिओलॉजी क्षेत्रात होणाऱ्या तांत्रिक बदलांच्या अनुषंगानं नवी यंत्रसामग्री, जागा घेणं, ते घेण्याकरता कर्ज घेणं, कर्जाचे हप्ते फेडण्याकरता पेशंटची फी वाढवणं, इतर डॉक्टरांशी जोडून राहणं इत्यादींची साखळी न संपणारी आहे हे त्यांना स्पष्टपणे समोर दिसत होतं. ह्या व्यवस्थेच्या गढूळ प्रवाहात नाइलाजानं सामील व्हायचं की आत्ताच कठोर निर्णय घेऊन बाजूला व्हायचं अशा द्वंद्वात्मक अवस्थेपर्यंत ते पोहोचले. आयुष्याच्या मध्यान्हीला ही द्विधा अवस्था निर्माण झाली होती. संसाराकरता, जगण्याकरता अर्थार्जन तर आवश्यक होतं. डॉक्टर म्हणून समाजात असलेला मान अभिमानास्पद वाटत होता; पण जी वैद्यकीय सेवा हे आयुष्याचं एक मिशन होतं, त्याचं पैसे कमवायचं मशीन करणं हे त्यांच्या संवेदनशील मनाला आणि विवेकी विचारबुद्धीला पटेना. तीन दशकांचा मांडलेला मांड मोडायचा की, मनाविरुद्ध तसाच मांडून ठेवायचा हा ‘टु बी ऑर नॉट टु बी’चा प्रश्न समोर उभा ठाकला होता.

अशा मनोवस्थेत आणि परिस्थितीत विवेकबुद्धी आणि सर्जनशील मानसिकता वरचढ ठरली. वैद्यकीय क्षेत्रातली आपली कारकीर्द पूर्णपणे बंद करून चित्रकलेकरता उर्वरित आयुष्य देण्याचा सर्वांत मोठा आणि काहीसा धोकादायक निर्णय त्यांनी घेतला. २००५ पासून रेडिओलॉजीची प्रॅक्टिस सोडून त्यांनी चित्रकलेचा कुंचला हाती घेतला. जी कला आयुष्याच्या पूर्वार्धात जगण्याला पूरक छंद म्हणून अस्तित्वात होती, तीच जगण्याचा मुख्य स्रोत ठरली.

इथे एक प्रश्न उभा राहतो की, तीस वर्षं वैद्यकीय क्षेत्रात कारकीर्द केलेली व्यक्ती चित्रकलेचं कोणतंही औपचारिक शिक्षण न घेता या कलाक्षेत्रात इतक्या ठामपणे स्वतःचे पाय कसे काय रोवू शकते ? कारण चित्र – शिल्प – संगीत – नृत्य या कलांमध्ये तुमच्याकडे पदवी, डिप्लोमा – तत्सम औपचारिक शिक्षण असावं असा एक आग्रह असतो. नाहीतर तुम्ही केवळ हौशी कलाकार राहता. त्यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर कलेची पदवी नसलेला; पण कलेच्या बेभरवशी क्षेत्रात शिरणारा वैद्यकीय माणूस म्हणजे काहीसा विक्षिप्त आणि दुर्लक्षित ठरण्याची शक्यता जास्त होती. डॉ. सुधीर पटवर्धन हे या शक्यतेला अपवाद ठरले.

अर्थात असं प्रत्येकाच्याच बाबतीत घडेल ही शक्यता अगदीच कमी असल्याचं त्यांना वाटतं. ज्या काळात त्यांनी आपल्या जगण्याचे मांड बदलले, तो काळ त्या बदलाला पूरक ठरला; पण तोही फार तर दशकभरापुरता. एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक हे चित्रकलेच्या दृष्टीनं चांगल्या बदलांचं आणि बऱ्यापैकी बहराचं होतं. अनेक प्रस्थापित आणि उदयोन्मुख चित्रकारांनी या काळात चित्रकलेत नाव आणि पैसा दोन्ही कमावलं; पण २००९ नंतर पुन्हा या कलाक्षेत्रात पडझड होऊ लागली. गेल्या दोन वर्षांतील जागतिक आपत्तीच्या काळात तर तिनं विक्राळ रूप धारण केलं. मुळातच आपल्याकडे चित्र, शिल्प इत्यादी कलांच्या आणि कलाकारांच्या बाबतीत एक प्रकारची उदासीनता आहे. तसंच माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट, डिजिटल कलेवर निर्भर असणारं कलाक्षेत्र इत्यादींमुळे अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला प्रतिभावान कलाकार अशा अंदाधुंद काळात इतकी महागडी कला कशी जोपासू शकेल?

आजही हा प्रश्न अनुत्तरित आहे. म्हणूनच चित्रकारानं आधी आपल्या पोटापाण्याची एक पक्की व्यवस्था लावावी या निष्कर्षाप्रत मी आलो आहे, असं डॉ. पटवर्धन नमूद करतात. तसंच कॅनव्हासवरची प्रत्यक्ष रंगरेषा हीच कलाकाराच्या आतल्या संवेदनांना खऱ्या अर्थानं मुखरित करते, यावर ठाम विश्वास असूनही आज डिजिटल चित्रकलेमधल्या सकारात्मक शक्यता स्वीकारणं गरजेचं आहे, असं त्यांना वाटतं.

एका महत्त्वाच्या सेवाक्षेत्राच्या अभ्यासाकरता तरुणाईतली वर्षं देऊन पुढची तीन दशकं त्यामध्ये केलेल्या कामानं जे दिलं, त्याचा उपयोग आधी छंद म्हणून जोपासलेल्या नि नंतर ध्येय म्हणून साधना केलेल्या चित्रकलेत नक्कीच झाल्याचं डॉक्टर सांगतात. माणसांच्या आणि त्यांच्या समस्यांमधून जे उमजत गेलं, ते कॅनव्हासवर उमटत गेलं. शहरातच आयुष्य गेल्यामुळे शहरी जीवनशैली, शहरातला निसर्ग आणि शहरी भावविश्व यांच्यातून मनात निर्माण झालेल्या प्रतिमा त्यांनी कॅनव्हासवर जिवंत केल्या. त्यांची स्वतःची अशी चित्रशैली विकसित होत गेली. आयुष्याच्या पूर्वार्धात एकमेकांना पूरक ठरणाऱ्या त्यांच्या जगण्याच्या दोन चौकटी एकमेकांमध्ये अडकलेल्या होत्या. उत्तरार्धात त्यांना जाणीवपूर्वक वेगळं करताना, त्या अनुभवांबद्दल त्यांनी सकारात्मकताच ठेवली. चित्रकलेचा नवा मांड मांडताना त्यांनी आधीची चौकट आदरपूर्वक घडी घालून जपून बाजूला ठेवून दिली आणि कॅनव्हासच्या इझलची नवी चौकट उघडली. आपल्या जगण्यातला प्रत्येक क्षण फक्त चित्रकलेच्या तपसाधनेत ते घालवू लागले. एखाद्या कलाकाराच्या ठिकाणी कलेकरता आवश्यक असलेली अशी समर्पित वृत्ती आणि दृष्टी आता विरळ होत चालली आहे.

डॉ. सुधीर पटवर्धन यांच्यातला अस्सल कलाकार जेव्हा भोवतालातल्या मानवी आकृती, निसर्ग प्रतिमा यांच्या आरपार बघत त्यांना रंगरेषांमध्ये बद्ध करतो तेव्हा ते केवळ एक पेंटिंग न राहता एका जीवनानुभवाचं साक्षात होणं असतं.

लेखक श्री. पद्माकर कुलकर्णी यांनी डॉ. पटवर्धन यांच्या कलाकृतींबद्दल संपादित केलेल्या एका पुस्तकाचं शीर्षक आहे, ‘माणूसपणाच्या जाणिवा विस्तारणारा चित्रकार’, जे त्यांच्या चित्रकृतींबद्दल समर्पक आहे. या पुस्तकात डॉ. सुधीर पटवर्धन यांनी स्वतःच्या चित्रकार असण्याबद्दल आत्मपरीक्षणात्मक काही गोष्टी नोंदवल्या आहेत, त्यांतील त्यांची काही विधानं प्रस्तुत करून या लेखाला विराम.

‘मी चित्रकार होण्याच्या मार्गावर पहिलं पाऊल टाकलं तेव्हा चित्रकला म्हणजे काय याविषयी माझ्या कल्पना स्पष्ट होत्या. चित्रकला माणसांबद्दल असते असा माझा ठाम विश्वास होता व आहे. या विश्वासाच्या पाठीशी उभी आहे, समकालीन भारतीय चित्रकलेतील मानवी आकृती चित्रित करण्याची पन्नास वर्षांची अखंड परंपरा. म्हणूनच सुरुवातीच्या काळापासूनच माझ्या चित्रांमध्ये मानवी आकृतीस मध्यवर्ती स्थान लाभलेलं आहे. माणसांच्या आकृती रेखाटणे किंवा रंगवणे याला मी एक बांधिलकी आणि जबाबदारी समजतो. मी माणसांचा चित्रकार नसतो, तर चित्रकार असण्याचे समर्थन करू शकलो नसतो.

डॉ. निर्मोही फडके

‘समतोल’
वर्ष १३, अंक ४, चैत्र-वैशाख, शके १९४४ या नियतकालिकाच्या सौजन्यानं

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.