Features

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित कलेचं भविष्य काय?

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्यावर आधारित टूल्स सध्या प्रत्येक क्षेत्रात धुमाकूळ घालत आहेत. यात कला क्षेत्रही मागं कसं राहणार? अनेकांना असं वाटतं की कला, साहित्य यांच्यासारख्या सृजनशील क्षेत्रावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाचा काहीच परिणाम होणार नाही. पण प्रत्यक्ष चित्र मात्र वेगळंच काहीतरी सांगतय. अनेक जण असं सांगतात की एआय हे कंटाळवाणी कामं करून मानवी सृजनशीलतेला हातभार लावेल. पण सध्या या तंत्रज्ञानाचा ज्या वेगानं विकास होत आहे त्यावरून असं वाटतंय की एआय मानवी कल्पकतेची जागा घेईल की काय?

2022 सालच्या शेवटच्या काही महिन्यांत चॅट जीपीटी आणि ओपन एआय यांनी अतिशय नाट्यमय रितीनं आपल्या रोजच्या आयुष्यात वेगानं प्रवेश केला. दाल ‘इ’ किंवा मिडजर्नी ही नाव घरोघरी ऐकू येऊ लागली. यानंतर मग कलाकारांनी ‘ ए आय’ च्या विरोधात मोहीमही सुरु केली. या नवीनच तंत्रज्ञानामुळं कॉपीराईटसारख्या विषयामध्ये कायदेविषयक गुंतागुंती वाढल्या.

सगळीकडून चर्चेचा मारा सुरु झाल्याने लोकांच्या मनात एआय विषयी कुतूहल निर्माण झालं. अनेकांनी हे तंत्रज्ञान सक्षमपणे वापरण्याचं तंत्र शिकून घेतलं. पण अजूनही या तंत्रज्ञानाबद्दलचे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. 25 मे 2023 रोजी मुंबईतील एनजीएमएमध्ये याच विषयावर एक महत्वाचा परिसंवाद आयोजित केला होता. कला रसिकांना एआय आणि त्यावर आधारित कला याबद्दल जे प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न या चर्चेतून झाला. सांस्कृतिक मंत्रालय आणि एव्हिड लर्निंग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

चार वक्त्यांना या कार्यक्रमात ताओ आर्ट गॅलरीच्या क्रिएटिव डायरेक्टर संजना शाह यांनी बोलतं केलं. या चार वक्त्यांमध्ये अभिनव उपाध्याय (फ्लुइड एआय चे कोफॉऊंडर आणि सीईओ), प्रतिक अरोरा – भारतीय SciFi निर्माता, पटकथा लेखक आणि बॅंग बँग मिडकॉर्पचे VP, मन्सूर खान – beatoven.ai चे सह-संस्थापक आणि सीईओ आणि पंखुरी उपाध्याय – मेकर लीगलच्या संस्थापक यांचा समवेश होता.

प्रतीक अरोरा हे विज्ञानकथांचे चाहते आहेत. त्यांनी या परिसंवादात मुद्दा मांडला की भारतात विज्ञानकथा व त्यावर आधारित चित्रपट दुर्लक्षित राहिले आहेत. पण तंत्रज्ञानाने याही क्षेत्रात नव्या साहित्य निर्मितीसाठी दारं खुली केली आहेत. एआयसारख्या तंत्रज्ञानामुळं नवीन लेखक अधिक सक्षमपणे लेखन क्षेत्रात उतरू शकतात. एआय तंत्रज्ञान अजून पूर्णपणे विकसित नसलं तरी सध्या उपलब्ध असलेल्या टूल्सच्या साहाय्यानं आपल्या लेखनाला अधिक अचूक आणि सर्जनशील करता येतं हा मुद्दा त्यांनी चांगल्या प्रकारे मांडला.

Prateek Arora’s AI generated Sci-Fi images

अभिनव अग्रवाल यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ब्रिजिंग द एआय गॅप’ हे पुस्तक लिहिलंय. या पुस्तकात त्यांनी एआय तंत्रज्ञानाचा विकास, त्याची प्राथमिक स्वरूपातील सुरुवात आणि सध्याचे विकसित प्रारूप याचा लेखाजोखा मांडला आहे. त्याचबरोबर रोजच्या जीवनात एआयचा वापर करून छोटी छोटी कामं कशी कमी वेळात पूर्ण करता येतील हे सोदाहरण स्पष्ट केलं आहे. अभिनव यांचं असं मत आहे की, “प्रत्येक कलाकार हा दुसऱ्या कोणत्या तरी कलाकारांकडून प्रेरणा घेत असतोच. एआय देखील असंच काम करत आहे. फरक एवढाच आहे की हे तंत्रज्ञान अधिक वेगानं आणि सक्षमपणे हे काम करत आहे.”

“Bridging the AI gap” – A book fully generated using AI tools

मन्सूर खान हे सतार वादक आहेत. नामांकित संगीत घराण्याच्या सातव्या पिढीतील मन्सूर खान हे सदस्य आहेत. त्यांनी एआयचा उपयोग करून एक अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. ‘बिटोवेन.एआय’ हे त्यांचं स्टार्टअप (याचं नावही अभिनव आहे, बीथोवेन या पाश्चात्य पियानोवादकाच्या नावाशी साधर्म्य सांगणारं) एआयवर आधारित संगीत आपल्या ग्राहकांना मोफत पुरवण्याचं काम करतं. या टूलला श्रोते आपल्या मूडनुसार किंवा गरजेनुसार आज्ञा देऊन हवं ते संगीत तयार करून घेऊ शकतात. त्यांचं असं म्हणणं आहे की “सोनी म्युझिकसारख्या कंपन्या कॉपीराईट हा मुद्दा अतिशय कडकपणे लावून धरतात. अशा परिस्थितीत हे स्टार्टअप रॉयल्टी मुक्त संगीत निर्माण करणारं चॅट जीपीटीसारखं मुक्त साधन आहे. ”

Mansoor Khan and his AI based music search engine ‘beatoven.ai’

पंखुरी उपाध्याय यांनी एआयच्या थेट वापरातील कायदेशीर खाचाखोचा श्रोत्यांना व्यवस्थित समजावून सांगितल्या. त्यांच्या मते “अजून जरी एआय आणि कॉपीराईट यांच्यावर स्पष्ट असे कायदे तयार झाले नसले तरी जगभरातील कायदेततज्ञ यावर काम करत आहेत.” त्यामुळं आज जरी या तंत्रज्ञानाचा मुक्त वापर सुरु असला तरी भविष्यात मात्र वापराची कायदेशीर दिशा सुस्पष्ट होईल. गेटी इमेजेस आणि स्टेबल डिफ्युजन यांच्यामधील ब्रिटिश न्यायालयात चालू असलेला खटला देखील, हेच दर्शवतो की, यासंबंधी बऱ्याच बाबी अजून सुस्पष्ट नाहीत. भारतापुरतं बोलायचं झालं तर सध्या नीती आयोगाने एआयचा वापर सर्जनशील प्रक्रियेत कसा केला जावा याची काही मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत.

“Responsible AI for all” – tagline by Niti Aayog
Irresponsible use of AI – A Deepfake image

या चर्चेतून नव्या काळात एआय तंत्रज्ञान सक्षमपणे वापरण्यास लागणाऱ्या कौशल्याची कौशल्यांची माहितीही देण्यात आली. हे महत्वाची कौशल्ये म्हणजे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, एआयला चपखल बसणाऱ्या कमांड्स किंवा ‘प्रॉम्प्ट्स’ देण्याचं कौशल्य,  इतरांचं अनुकरण न करता आपल्या वेगळेपणाला जपणं, एआय वापरासंबंधी कायदेशीर बाबी माहीत असणं, भारतकेंद्रित अद्यावत डेटा वापरकर्त्याकडं असणं ही ती काही कौशल्ये आहेत. या सर्व बाबींची माहिती आणि कौशल्य जर कलाकाराकडे असेल तर तो या तंत्रज्ञानाचा वापर सक्षमपणे करू शकतो.

एकूणच या परिसंवादानं प्रेक्षकांना एआय बद्दल सजग तर केलंच पण या तंत्रज्ञानाबद्दल नवीन माहिती मिळवण्याबद्दल उत्सुकताही वाढवली.

******

– विनील भुर्के,
चिन्ह आर्ट न्यूज

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.