Features

या गंमतीचं भविष्य काय ?

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारित कलेची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे कलेमध्ये काय क्रांती घडू शकते, कलाकारांवर याचे काय परिणाम होतील याबद्दल आपण ‘चिन्ह’च्या व्यासपीठावर सतत चर्चा करत आहोतच. पण केवळ काही किवर्डसच्या साहाय्यानं अशक्य कोटीतील घटनाही एआय तयार करू शकते आणि त्यामुळे समाजात अनेक संभ्रमही निर्माण होऊ शकतात हे सोदाहरण दाखवणारं एक चित्र नुकतंच समोर आलंय. लिओनार्डो विंची आणि मोनालिसा यांचं एक एकत्र चित्र ‘१६०४ मधील एक दुर्मिळ छायाचित्र’ या नावानं समाजमाध्यमांवर फिरू लागलं. या चित्रातील बारकावे इतके सूक्ष्म होते की अनेकांना हे छायाचित्र खरं वाटलं, पण कुणीही हा विचार केला नाही की १६०४ मध्ये कॅमेऱ्याचा शोध लागला नव्हता तेव्हा ही मंडळी एकत्र छायाचित्र कसं काढतील ? या छायाचित्रांमुळे एआय किती खोलवर जाऊन खऱ्या खोट्या शक्यता तयार करू शकते याची गंभीरता पुढे आली.  लिओनार्डो  आणि मोनालिसाचं हे फेक छायाचित्र गंमत म्हणून केलेलं असलं आणि समाजावर याचा कुठलाही गंभीर परिणाम होणार नसला तरी एआय नकारात्मक घटना घडवून आणू शकत हे ट्रम्प यांच्या व्हायरल झालेल्या डीप फेक फोटोज वरून आपण पाहिलंच आहे.

अर्थात एआयचे राजकारणावरील परिणाम हा आपल्या चर्चेचा विषय नसला तरी मोनालिसा आणि विंचीच्या एकत्र फेक फोटोनं ‘चिन्ह’च्या व्हाट्सअप ग्रुपवर मात्र बरीच गरमागरम चर्चा घडवून आणली. त्यातील काही महत्वाचे मुद्दे वाचकांसाठी इथं मुद्दाम देत आहोत. वाचकांनीही आपली मतं ९००४० ३४९०३ या क्रमांकावर जरूर व्हाट्सअप करावीत.

या फोटोवर योगिता बुटाला यांनी दीर्घ आणि महत्वाची प्रतिक्रिया दिली. ती पुढील प्रमाणे, “हा फोटो म्हणजे AI Generated किंवा फोटो एडिटींग व Manipulation चा प्रकार वाटत आहे. Original फोटो नाही वाटत. एक डिझायनर म्हणून मी सांगू शकते की त्यातील Merging ठीक नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळी अशी पोझ देणं, विवाहित स्त्री मोनालिसा हिला शक्य असेल असे नाही. कारण त्याकाळी युरोपियन देशांमधेही कर्मठपणा होता, स्त्रियांवर भारतात होती तशी बरीच बंधनं उच्च वर्गामध्ये होती. हे मी इतिहास विषयाची माजी विद्यार्थिनी म्हणून नक्की सांगू शकते. ‘Leonardo Da Vinci आणि मोनालिसा यांच्यात चित्र काढून होण्याची प्रक्रिया सुरु असताना प्रेमसंबंध निर्माण झाले असावेत, असा संशय आल्याने तिचा पती चित्र अर्धवट ठेवायला लावून मोनालिसासह दुसर्‍या गावी निघून गेला, म्हणून तिच्या भुवया रंगवायचं राहिलं. असा एक दावा केला जातो, त्यात कितपत तथ्य आहे, असे काही फारसं पुराव्यानिशी सिद्ध होऊ शकलेलं माझ्या तरी माहितीत नाही. त्यामुळे असा प्रेमसंबंध असल्यानं तिनं त्याच्यासोबत अशी पोझ दिली असेल किंवा हल्ली कॉलेजवयीन युवक-युवती सेल्फीसाठी अशा पोझ देतात तसं  स्टाईल म्हणून पोझ दिली असेल हा विचारच हास्यास्पद आहे. त्या दोघांमागे असलेलं मोनालिसाचं चित्र छेडछाड केलेलं आहे, हे कळतंय. कारण चेहऱ्याची ठेवण बदलली आहे. चित्र पूर्ण झालंच नव्हतं. चित्र अपूर्ण असताना मधेच त्यासोबत अशी पोझ द्यायला, तीसुद्धा इतकी जवळीक साधून हे अजून हास्यास्पद आहे. AI चा वापर करून काही मूर्ख माणसे इतिहास धड समजून न घेता, आपल्या मनात जे येईल ते AI Generated करून घेत आहेत. त्यामुळे उगीच चुकीचे काहीही पसरवत आहेत. शिवाय, मोनालिसा व लिओनार्डो विंची हे दोघेही हयात नाहीत, अन्यथा कदाचित त्यांनीच बदनामीचा दावा ठोकला असता याबाबतीत.”

यानंतर बहुतांश प्रतिक्रिया या हा फोटो फेक आहे या आशयाच्या आल्या. पण अनेकांना हा फोटो खरा वाटला हेही तितकंच खरं आहे. ‘चिन्ह’चे एक वाचक मिलिंद खाडिलकर यांनी या फोटोतील नावीन्यपूर्णता त्यांना आवडली अशी प्रतिक्रिया दिली. काही वाचकांना हा फोटो गंमत म्हणून आवडला. पाश्चात्य देशात अशा फोटोंच्या छेडछाडीबद्दल मोकळेपणा असल्यानं आणि विशेष म्हणजे ज्यांच्या प्रतिमांसोबत छेडछाड केली त्या दोन्ही व्यक्ती हयात नसल्यानं  फोटो तयार करणाऱ्यानं गंमत म्हणून असा फोटो केला असावा असे काहींचं  मत होतं. काहीजणांना तर या फोटोमधील लिओनार्डो हा डार्विन वाटला, तर काहीजणांनी या लिओनार्डोची तुलना भारतीय बाबाच्या चेहऱ्याशी केली.
मोनालिसा मात्र खरी वाटेल अशीच होती. नंदकुमार वैद्य यांनी प्रतिक्रिया दिली की “माझ्या मते चित्रातल्या मोनालिसाला खऱ्या मोनालिसाची असूया वाटतेय कारण माझा निर्माता माझ्याचकडे दुर्लक्ष करतोय अशी तिची मनोमन धारणा झाली असावी !”

ही चर्चा वाचल्यानंतर मला असा प्रश्न पडला की असा अगदी वास्तवाच्या बऱ्यापैकी जवळ जाणारा लिओनार्डो आणि मोनालिसाचा फोटो तयार करणं हे एवढं सोपं नाहीये. कारण एआय हे किवर्डच्या आज्ञेवर काम करतं.  हे असे मॉर्फ फोटो तयार करण्यासाठी ए आय ला विशिष्ट संदेश द्यावा लागतो. हा संदेश फक्त काही शब्दांचा असतो. पण तो अचूक देणं फार महत्वाचं असतं. मनात आलं आणि फोटो तयार झाला हे निदान सध्या तरी तंत्रज्ञानाला शक्य नाहीये. मिडजर्नी नावाचा एक बॉट आहे. सध्या तरी हा बॉट वापरकर्त्याला हवे तसे रिझल्ट बऱ्यापैकी देतो. त्यामुळे हा  फोटो जरी तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार केला असला तरी त्याला काही किवर्ड्सचा आदेश अचूकपणे द्यावा लागतो. योग्य आदेश मिळाला तरच एआय असे फोटो तयार करू शकते. त्यामुळे करामत जरी तंत्रज्ञानाची असली तरी त्यामागे डोकं हे मानवी आहे हे कोणाला नाकारता येणार नाही. इथं मग काही कॉपीराइटचे मुद्दे देखील समोर येतात. जर आदेश मानव देत असेल तर त्या कलाकृतीवरील मालकी हक्क कोणाचा ? आदेश ( किवर्डस ) देणाऱ्या व्यक्तीचा का मिडजर्नीचा की एआय तंत्रज्ञान तयार करणाऱ्या कंपनीचा ?

“भारतीय चलनी नोटेवर लक्ष्मी” हे किवर्डस मिडजर्नी या बॉटला दिले असता मिळालेलं चित्र

मी देखील काही दिवसापूर्वी या तंत्रज्ञानाच्या शक्यता जाणून घेण्यासाठी असाच एक प्रयत्न करून पाहिला होता. ‘भारतीय चलनी नोटेवर लक्ष्मी’ असे काही कीवर्ड्स मी मिडजर्नी या एआय बॉटला दिले. त्यावर मला खालील चित्रं मिळाली. या चित्रांमधील अचूकपणा पाहून मला थक्क व्हायला झालं होतं. सध्या जरी ही चित्रं काहीशी फेक वाटत असली तरी भविष्यात याचा अचूकपणा वाढत जाणार आणि खऱ्या खोट्यातला फरक मानवी मेंदूला कळेनासा होणार. त्यानंतर फोटोशॉप पेक्षाही भयानक तंत्र तयार होईल. जे मानवी मेंदूलाही चकवा देईल.

मानवी संस्कृतीला खरा धोका इथूनच सुरु होतो. कारण गंमत म्हणून हे सर्व ठीक आहे पण पुढे जर मानवी मेंदूलाच भ्रमित करण्याचे प्रकार सुरु झाले तर विनाश अटळ आहे.

*****

– कनक वाईकर
चिन्ह आर्ट न्यूज

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.