Features

‘गायतोंडे’ आणि तरुणाई…

हल्लीचे विद्यार्थीं काही वाचत नाहीत असं म्हटलं जातं. तसे अनुभव देखील ‘चिन्ह’ला वारंवार आले आहेत. म्हणजे आम्ही कार्यक्रमाच्या ज्या निमंत्रण पत्रिका समाज माध्यमांवर टाकतो, त्यात खरे तर शब्द खूप कमी असतात पण ते देखील वाचले जात नाहीत. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा काही क्षण चक्रावूनच गेलो होतो. पण आपलं काम हे लिहिणं आहे, आपल्याला जे जाणवतं ते मांडणं आहे, असं जेव्हा मनाशी पक्क ठरलं तेव्हा कोणी वाचणं न वाचणं याचं काही वाटेनासं झालं. 
पण दुसरीकडे मात्र वेगळी परिस्थिती होती. साहित्य, पत्रकारिता, नाटक वा चित्रपट चळवळींशी किंवा अगदी सामाजिक चळवळींशी संबंधित मंडळींकडून ‘चिन्ह’च्या ब्लॉगला, वेबसाईटला किंवा फेसबुकवरील पोस्टला जो प्रतिसाद मिळत होता. तो अतिशय उत्साहजनक होता. मध्यंतरी कोरोना लॉकडाउनच्या काळात सार थंडावलं होतं. पोस्टना मिळणारा प्रतिसाद देखील कमी झाला होता. असं होतंच असतं ! असं गृहीत धरुन लिखाण केलं की बरं – वाईट काही वाटेनासंच होतं. पण मध्येच असे मोठे कालखंड मात्र जातात ज्यात लिखाण थांबतं.

जुने सहकारी जातात नवे सहकारी येतात. त्यामुळे लिखाणावर देखील नाही म्हटलं तरी प्रतिकूल परिणाम होतोच. विस्कटलेली घडी बसवण्यात बराचसा वेळ जातोच. अलीकडे देखील तसंच काहीतरी घडलं होतं. पण ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर ‘जे जे’ आणि ‘कला संचालनालय’ तसेच महाराष्ट्राच्या कला शिक्षणावर ‘चिन्ह’नं घणाघाती हल्ले करायला सुरुवात केल्यावर तरुण मंडळींकडून विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून जो प्रतिसाद मिळू लागला किंवा आज देखील मिळतोय तो केवळ अभूतपूर्व होता. अर्थातच फेसबुकवरचा प्रतिसाद कमी झाला आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. कदाचित फेसबुक अधिक चांगलं व्हावं यासाठी जे अंतर्गत बदल केले जात आहेत ते लोकांना मानवले नसावेत. मग हा प्रतिसाद कुठे मिळतोय ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे. “इन्स्टाग्राम”
खरं तर इन्स्टाग्रामवर ‘चिन्ह’चं अकाउंट आधीपासून होतंच. पण त्या काळात फेसबुकवर प्रचंड भर असल्यामुळं इन्स्टाग्रामकडं आमचं दुर्लक्ष झालं होतं खरं, पण जेजे संदर्भातल्या लिखाणाला जो तरुण मुलांचा भरभरून प्रतिसाद मिळू लागला, तो थक्क करणारा होता यात शंकाच नाही. तरुण मुलं वाचत नाहीत या संकल्पनेला छेद देणारा होता. आमचे विषय देखील शिक्षण प्रणालीशी संबंधित असल्यामुळे देखील असेल आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला हे खरंय. जेजेच्या साऱ्या समस्या आम्ही याच माध्यमाद्वारे समाजापर्यंत पोहोचवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. खरं तर त्या त्यांच्याच समस्या होत्या. त्यांना त्या साऱ्या चांगल्या ठाऊक देखील होत्या. पण त्या सांगायच्या कोणाला आणि कशा हाच त्यांच्या पुढचा यक्षप्रश्न होता. आणि तो सोडवण्यात आम्ही यशस्वी ठरलो असणार आणि त्यामुळेच ‘चिन्ह’ला भरभरुन प्रतिसाद मिळाला असावा.
या तरुण वाचकांसाठी लवकरच आम्ही आमच्याच साऱ्या जुन्या अंकांच्या पीडीएफ वेबसाईटवर टाकत आहोत. अर्थातच निशुल्क. त्याला थोडासा वेळ लागणार आहे. कारण ज्या काळात ‘चिन्ह’ सुरु झालं त्या काळात कॉम्प्युटरचा प्रवेश भारतात झालाच नव्हता. त्यामुळे सुरुवातीचे सारे अंक आम्हाला नव्याने करुन घ्यावे लागत आहेत. दरम्यानच्या काळात ज्या अंकाच्या पीडीएफ आमच्याकडे उपलब्ध होत्या ( खरं तर तंत्रज्ञान एवढं पुढं गेलंय की त्या देखील आता ओपन होत नाहीत. ) त्या आता दर महिन्याला एक या गतीने आम्ही वेबसाईटवर टाकणार आहोत.
चित्रकलेशी संबंधित क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या साऱ्याच विद्यार्थी मित्रांना आमचं सांगणं आहे की, अंक उपलब्ध होतील तेव्हा होतीलच. पण त्या आधी ‘चिन्ह’चा ‘गायतोंडे’ ग्रंथ मात्र वाचायला विसरु नका. ‘डिलक्स’ आणि ‘जनआवृत्ती’ अशा दोन्ही प्रकारात हा ग्रंथ उपलब्ध आहेत. तुमच्या खिशाला परवडेल तो पर्याय निवडा. आणि आपली प्रत हस्तगत करा. कारण ”चिन्ह’च्या अन्य अंक आणि पुस्तकांप्रमाणे याच्याही प्रती लवकरच संपण्याच्या मार्गावर आहेत. आणि छापील स्वरुपावर संपूर्णतः काट मारल्याने आणि ‘चिन्ह’नं पूर्णतः डिजिटल स्वरूप धारण केलं असल्यामुळं पुन्हा त्या छापण्याची कुठलीही योजना आमच्या स्वप्नांत देखील येण्याची शक्यता नाही. त्यामुळे लवकरात लवकर ‘गायतोंडे’ ग्रंथाच्या प्रती हस्तगत करा. कारण चित्रकला शिक्षण क्षेत्रातल्या भयावह परिस्थितीला जर तोंड द्यायचे असेल तर ‘गायतोंडे’ ग्रंथाचं मनापासून वाचन करणं हाच सर्वोत्तम उपाय ठरेल. आजच्या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर या ग्रंथात उपाय योजना आहेत.
‘गायतोंडे’ हे देखील जेजेचेच विद्यार्थीं. आता हे विद्यार्थी ज्या प्रतिकूल परिस्थितीत शिकत आहेत तशीच काहीशी  प्रतिकूल परिस्थिती ‘गायतोंडे’ जेव्हा जेजेत शिकले तेव्हाही असणार. ( पण आजच्या एवढी भीषण नसणार हेही नक्कीच.) तेव्हा तर आपल्याला स्वातंत्र्य देखील मिळायचं होतं. त्यातच गायतोंडे यांनी वडिलांचा विरोध पत्करून चित्रकला शिक्षणासाठी जेजेत प्रवेश घेतला होता. वडिलांनी फी चे पैसे देखील द्यायला नकार दिला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत गायतोंडे यांनी आपल्या शिक्षणावर कसं लक्ष केंद्रीभूत केलं. सतत स्केचिंग करुन आपल्या रेषेत जिवंतपणा आणला. कसं, काय काय आणि किती वाचून आपल्या मेंदूला बौद्धिक खुराक पुरवला या साऱ्यांचं अगदी काटेकोर चित्रण त्याच्या सख्या बहिणीच्या आणि आप्त – मित्रांच्या शब्दातून करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत आणि म्हणूनच हा ग्रंथ आता जागतिक पातळीवर नेण्यासाठी आम्ही इंग्रजीतून प्रकाशित करत आहोत.
आणखीन नऊ महिन्यानंतर म्हणजे २ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ वर्ष सुरु होत आहे. त्या दिवशी आम्ही हा ग्रंथ प्रकाशित करणार आहोत. “गायतोंडे ग्रंथ इंग्रजीत आहे का ?” या संदर्भात प्रारंभा पासूनच मोठ्या प्रमाणावर विचारणा होते आहे. त्या साऱ्यांना या ग्रंथाची निर्मिती समाधान देईल याची आम्हाला खात्री आहे. पण तोपर्यंत मराठी बोलणाऱ्या, मराठी वाचू शकणाऱ्यानी हा ग्रंथ वाचून स्वतःला अपडेट करायला काय हरकत आहे ? आम्हाला खात्री आहे हा ग्रंथ वाचल्यानंतर चित्रकलेच्या संदर्भात, आयुष्याच्या संदर्भात, जगण्याच्या संदर्भात तुम्हाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. केवळ श्रेष्ठ चित्रकार होण्यासाठीच नाही तर कुठल्याही क्षेत्रात श्रेष्ठत्व मिळवण्यासाठी गायतोंडे ग्रंथ उपयुक्त ठरेल असं आमचं मत आहे. या संदर्भातले आतापर्यंतचे सर्व अपडेट्स फेसबुकच्या ‘Gaitonde’ या पेजवर उपलब्ध आहेत किंवा गूगलवर देखील तुम्ही सर्च करु शकता.
(लेखासोबत जी फिचर इमेज आहे ते आहे १५ ऑगस्ट १९४७ रोजी जेजेत घेतलेलं प्रकाशचित्र. डावीकडे गायतोंडे, शेजारी लेखक फिरोज रानडे, आणि चौथे विश्वास यंदे.)
– सतीश नाईक,
संपादक, चिन्ह

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.