Features

जेमिनी’गणेश’

आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी. संपूर्ण महाराष्ट्र आजपासून धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार. महाराष्ट्राचं लाडकं दैवत गणेशाची आपण विविध रूपे पाहतो. उजव्या सोंडेचा, डाव्या सोंडेचा हे तर आपल्याला परिचित प्रकार तर ढोल्या,चिमण्या, दगडूशेठ अशी चमत्कारिक नावे असलेले गणपती पुण्यात आहेत. लंबोदर, विघ्नहर्ता, एकदंत गणेश ही गणेशाची पारंपरिक रूपे. तर महोत्कट गणेश( दहा हात असलेला गणेश), धूम्रकेतु( दोन हात असलेला कलियुगात अवतार घेणारा गणेश) ही काही अपरिचित रूपे. श्रीगणेश हे चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून ओळखले जाणारे कलाकारांचे  आवडते दैवत. गणेशोत्सवाच्या प्रारंभानिमित्त आज आपण पाहूयाजेमिनीगणेश! अर्थात प्रख्यात चित्रकार जेमिनी रॉय यांनी आपल्या चित्रातून साकारलेली गणेशाची मोहक रूपे.  खास Chinha  Art News च्या वाचकांसाठी 

टेम्पेरा पद्धतीने कार्ड पेपरवर चितारलेले हे मोहक गणेश रूप. यात बसण्याची ढब डौलदार आहे. खास भारतीय पद्धतीचे रंग वापरले असून गणपतीला दोन हात दाखवले आहेत. यातला उंदीर बघा ! अगदी वेगवान स्थितीत दिसत आहे.  स्ट्रोक्सचा कुठलाही वापर न करताही उंदीर चपळ दिसतो आहे.  हे चित्र सध्या क्रिस्टीजच्या संग्रहात आहे. 

जेमिनी रॉय यांचे हे एक दुर्मिळ गणेशचित्र. दुर्मिळ यासाठी की सहसा हे इंटरनेट किंवा इतर माध्यमात पाहायला मिळत नाही. आर्ट न्यूज अँड व्हीव्हजच्या जुलै २०१२ च्या अंकात हे छापण्यात आले होते. लाल पार्श्वभूमीवर ब्रशने मोठे ठिपके काढून हे चित्र पूर्ण केले आहे. जेमिनी रॉय यांच्या नेहमीच्या शैलीपेक्षा हे काहीसे भिन्न चित्र आहे. 

नृत्यमुद्रेतील गणेश 

टेम्पेरा पद्धतीने कार्ड पेपरवर केलेले हे काम. या चित्राचे  वैशिष्टय म्हणजे हे गणेशाचे अतिशय मोहक असे रूप आहे. या चित्रात कमीतकमी रेषांतून साकारलेला हा गणपती  नृत्य करत आहे. पेपरच्या अवकाशात फॉर्मचा अतिशय उत्तम तोल साधला आहे. गणपतीच्या गळ्यातील जानवे हे अलंकारिक पद्धतीने चितारले आहे. कमीत कमी रंग वापरूनही अतिशय सुंदर परिणाम साधला आहे. गणपतीच्या पायाखाली उंदीर आहे. हे चित्र सध्या ग्रॉसव्हेनर आर्ट गॅलरीच्या संग्रहात आहे. 

गणेश आणि शिव 

ग्वाश पद्धतीने कार्ड पेपरवर केलेले हे काम आहे. यात शंकराने बाळ गणेशाला आपल्या खांद्यावर उचलून घेतले आहे. कमीतकमी रेषांमध्ये शंकराच्या गळ्यातील साप, त्रिशूल, तिसरा डोळा, रुद्राक्ष असे सर्व तपशील दाखवले आहेत. खट्याळ रुपातला बालगणेश शंकराच्या खांदयावर बसून काय नवीन खोडी करावी, असाच विचार करत असावा. हे चित्र सध्या बोनह्याम्स ऑक्शन हाऊसच्या संग्रहात आहे. 

दुर्गा आणि गणेश 

टेम्पेरा या पद्धतीने कार्ड पेपरवर काढलेले हे चित्र. या चित्रात गणपती दुर्गेच्या मांडीवर बसलेला आहे. वाघ हे दुर्गेचे वाहन. जेमिनी रॉय यांनी आपल्या खास शैलीत वाघ चितारला आहे. सोबत सेवक आहे. दुर्गा गणपतीला वाटीमध्ये खाऊ घेऊन भरवत आहे. मोठ्या, टपोऱ्या डोळ्यांची दुर्गा अतिशय आकर्षक आहे. हे चित्र सध्या सोदबी आर्ट गॅलरीच्या संग्रहात आहे. 

शिव आणि गणेशाचे हे अजून एक चित्र. यात शंकर बसलेले आहेत तर गणपती त्यांच्या मांडीवर विराजमान आहे. शंकराच्या एका हातात डमरू आहे. आणि हाताच्या पोझवरुन ते डमरू वाजवत आहेत हे कळते. महादेव हे एक शीघ्र कोपी दैवत. चित्रातून शंकराचा डमरू वाजवण्यात आवेश दिसून येतो. जेमिनी रॉय यांच्या बहुतांश चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे चित्राला असलेली अलंकार बॉर्डर. या चित्रातही सुंदर अशी बॉर्डर आहे. 

 रॉय यांच्या शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पाश्चात्य प्रभाव नाकारून भारतीय पारंपरिकतेला जवळ केल. सुरुवातीला त्यांच्यावर कालीघाट शैलीचा प्रभाव राहिला. पुढेच बंगाली पटचित्र शैलीला त्यांनी आपल्या कॅनव्हासवर आणलं. नंतर  मात्र त्यांनी स्वतःची अशी खास शैली विकसित केली. बदामाकृती मोठे डोळे हे त्यांच्या चित्रांचं वैशिष्टय आहे. त्यांचे चित्रविषयही खास भारतीय माती आणि संस्कृतीतले असत. आणि याच संस्कृतीचा भाग म्हणून त्यांनी चितारलेली ही काही मोहक गणेश चित्रे. 

******

चिन्हचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी खालील व्हाट्सएप लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/J3E5Y5hTzDXEEWD4cQW2rP 

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी चिन्हचे फेसबुक पेज लाईक करा.

https://www.facebook.com/chinha.art 

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.