Features

एंजेलो  दा फोन्सेका :  विस्मृतीत गेलेला गोवन चित्रकार

रोज सकाळी कुठे काय आर्ट न्युज येतात ते बघण्याचा माझा शिरस्ता असतो. नेहमीप्रमाणे बघता बघता एक न्यूज वाचनात आली ती म्हणजे गोव्याच्या ‘ Architecture Autonomous’  या संस्थेतर्फे गोवन चित्रकार एंजेलो डी फोनसेका यांचे आत्मचरित्र 6 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर एंजेलो डी फोनसेका यांचा परिचय करून देणार हा लेख

गोव्याने भारताला अनेक चित्रकार दिले. त्यापैकी गायतोंडे, सुझा ही काही प्रसिद्ध नावे. सुबोध केरकरांसारखे समकालीन प्रसिद्ध चित्रकारही गोव्याचेच. पण या सगळ्यांमध्ये कुठेही फोन्सेका यांचे नाव वाचनात येत नाही. असे का हा प्रश्न पडतो.

कलात्मकदृष्ट्या त्यांची कला ही उच्च दर्जाची आहे. तरी त्यांना विस्मृतीचा शाप का मिळाला असावा? फोन्सेका यांना बहुचर्चित अशा शिल्पकार चरित्र कोशातही स्थान मिळाले नाही. कदाचित याचे कारण फोन्सेका यांच्या चित्रविषयात दडले असेल का? अमूर्त अशा हिंदू देवतांना मूर्त रूप देणाऱ्या राजा रवी वर्मा यांना भारतीय कलाविश्वात अढळ असे ध्रुवस्थान आहे. त्याचप्रमाणे युरोपिअन ख्रिश्चन देवतांना भारतीय साज चढवणाऱ्या फोन्सेकांना भारतीय कलाविश्वात साधी दखलही मिळाली नाही.

फोन्सेका यांचा जन्म गोव्याच्या सान्तो एस्तेवाम इथे झाला. त्यांच्या आईवडिलांना खरे तर बरीच मुले झाली पण ती जगत नसत. मग आईवडिलांनी गावदेवीला नवस बोलला आणि त्यानंतर जगलेले बाळ म्हणजे अँजेलो दि फोन्सेका. फोन्सेका हे मुंबई एलाख्याजवळचे असले तरी त्यांनी बॉम्बे स्कुलची वाट न धरता बंगाल स्कुलचा रस्ता पकडला. फोन्सेका खरे तर गोव्यातून  मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडले. पण तिथून त्यांनी जे जे ची वाट धरली, पण जेजे हे पाश्चात्त्य प्रभावाखाली आहे असे त्यांचे मत पडले आणि मग अस्सल भारतीय मातीतली चित्रे करायची म्हणून त्यांनी बंगाल स्कुलची वाट स्वीकारली.

नंदलाल बोस हे त्यांचे गुरू. ऑइल कलर, जलरंग या माध्यमात त्यांचे बहुतांश काम आहे. एनटॉमीवरील अद्भुत पकड, शास्त्रशुद्ध चित्रण तंत्र, तेजस्वी रंगाचा वापर आणि एकूणच पूर्ण चित्रातून सौंदर्याची उधळण ही त्यांच्या कामाची ठळक वैशिष्ट्ये. त्यांच्या चित्रांचे विषय हे ख्रिश्चन आर्ट शी संबंधित होते. Madonaa, मदर मेरी आणि चाईल्ड असे ख्रिश्चन आर्ट शी संबधित विषय त्यांनी कॅनव्हासवर रंगवले. त्याकाळी भारतात जो कॅथलिक समाज होता त्यांना ज्या धार्मिक चित्रांची गरज होती, ती सर्व युरोपिअन धर्तीवर नकललेली असत. या पार्श्वभूमीवर फोन्सेका यांनी अस्सल भारतीय मातीतली मदर मेरी रंगवली. त्यांच्या चित्रातील मदर मेरी साडी नेसते, कुंकू लावते आणि मंगळसूत्र पण घालते. ख्रिश्चनिटीमध्ये लिली हे पवित्रतेचे प्रतीक आहे, त्याऐवजी फोन्सेका यांची मेरी हातात कमळ धारण करते. अशी भारतीय मेरी बघून त्यांना धार्मिक priest लोकांचा विरोध झाला नसता तरच आश्चर्य होते. त्यामुळे त्यांची चित्रे ही दुर्लक्षिली गेली असावीत. आणि आजच्या धार्मिक अस्मिता टोकदार होण्याच्या काळात तर बहुसंख्य लोकांकडूनही त्यांच्या चित्रांना दुर्लक्षिले जाण्याची शक्यताच जास्त आहे.  असे असले तरी फोन्सेका यांची चित्रे ही आजच्या पार्श्वभूमीवर धार्मिक सलोख्याचे एक आदर्श उदाहरण ठरू शकतात. खर तर कलेकडे धार्मिक अंगाने न बघता केवळ कला म्हणून बघणेच उचित आहे. आणि उच्च कलात्मक मूल्य असलेली ही चित्रे केवळ कुठल्या एका धर्माची धार्मिक गरज पूर्ण करण्यापूर्ती नसून एक छान कलात्मक अनुभव देणारी आहेत.

त्यांचे ‘ख्रिस्त द न्यू टेम्पल’ हे चित्र अस्सल भारतीयत्वाचे प्रतीक आहे. या चित्रात त्यांची मेरी ही टिकली लावते तसेच साडी ही नेसते. सोबत  कुठल्याही प्राचीन भारतीय शिल्पात ज्याप्रमाणे सेवक किंवा रक्षक पायथ्याशी असतात त्याप्रमाणे दोन सेवक किंवा रक्षक  या चित्रात दिसतील. या चित्रातील सर्वच्या सर्व घटक हे भारतीय आहेत. कुठल्याही कलाकृतीचा दर्जा ठरवताना त्यातले भूमीतत्व विचारात घ्यावे लागते. फोन्सेका यांच्या चित्रात ते पुरेपूर आहे. भावनाहीन युरोपिअन रंगातली मेरी न रंगवता त्यांनी अस्सल सावळ्या रंगातली  भारतीय मेरी रंगवली. तिला भारतीय साज चढवला. या कलाकृती नाविन्यपूर्ण आणि अर्थपूर्ण आहेत. बायबलमधील प्रसंग, कॅथलिक संत यांची चित्रेही पारंपरिक युरोपिअन चौकटीत न रंगवता भारतीय रूपात बघण्यात नवीन काहीतरी पाहिल्याचा आनंद मिळतो. म्हणजे एॅडम आणि इव्ह जर भारतीय असते तर कसे दिसतील? ते फोन्सेका यांच्या चित्रात बघा.

इथे  जोडलेले ‘द लास्ट सपर ” चित्र बघा. यात ख्रिस्त हा आपल्या बारा शिष्याबरोबर जेवण घेत आहे. लास्ट सपर चा विषय खर तर जगभरातल्या चित्रकारांनी रंगवलेला आहे. पण या चित्रातले नावीन्य म्हणजे फोन्सेकांचा ख्रिस्त खास भारतीय बैठकीत बसला आहे. समईच्या मंद उजेडात शिष्य जेवण घेत आहेत.  डावीकडे सगळ्यात शेवटी जुडास हातात त्याच्या कुप्रसिद्ध अशा बटव्यासह आहे. हे सर्व अगदीच अद्भुत आहे

असा महत्वाचा आणि कल्पक चित्रकार विस्मृतीच्या गर्तेत का पडला असावा याचे उत्तर गोव्याचे प्रसिद्ध चित्रकार सुहास शिलकर यांनी दिले. ते म्हणतात ” फोन्सेका यांनी त्याकाळी प्रस्थापित अशा बॉम्बे स्कुलची वाट न धरता बंगाल स्कुल शैलीला जवळ केले. बॉम्बे स्कुल हे पाश्च्यात शैलीवर आधारित असल्याने प्रस्थापित होते त्यामुळे त्या स्कुलच्या चित्रकारांना संधी जास्त मिळाली. शिवाय बॉम्बे स्कुलच्या चित्रकारांची उच्चभ्रू वर्तुळात उठबस होती. त्याचा त्यांना फायदा मिळाला. तुलनेने फोन्सेका हे बंगाल शैलीमुळे रघुवीर चिमूलकरांप्रमाणे दुर्लक्षित राहिले.”

फोन्सेका यांना अंधारातून प्रकाशात आणण्याचे काम सध्या Architecture Autonomous ही संस्था करत आहे. फोन्सेका यांचे चरित्र  उद्या दिनांक ६ ऑगस्ट रोजी गोवा क्लब हार्मोनीया इथे प्रकाशित होत आहे. 252 पानी सचित्र रंगीत अशा या पुस्तकाचे लेखन डेलिओ मेंडोका यांनी केले आहे. पुस्तक नोंदणी करण्यासाठी पुढील वेबसाईटवर भेट देऊ शकता. 

https://www.angelofonseca.com/index.html

अधिक माहितीसाठी +91 832 241 0711 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

(सर्व चित्रे इंटरनेटवरून साभार)

कनक वाईकर 

www.chinha.in

 ७७३८९५०२१६

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.