Features

ग्रेसगॅलरी ! – भाग १

ग्रेस! काहींसाठी विश्व, काहींसाठी भावविश्व. काहींसाठी धुकं, चकवा, भुलभुलैया. ग्रेस हे खरंतर सृजनाचं, तरल निर्मितीचं नाव आहे. सलग १८-२० तास एकांतात बसून राहणाऱ्या या मनस्वी कलाकाराची कलेकडे बघण्याची दृष्टी अतिशय सूक्ष्म आणि तरीही व्यापक होती. त्यांच्या खोलीत असलेला चित्र, शिल्प, छायाचित्रांचा संग्रह हे आठवणींनी ओथंबलेले एक कलादालनच होते. पत्रकार संजय मेश्राम यांनी २००९ मध्ये ग्रेस यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनातील त्या आठवणी जाग्या केल्या होत्या. त्यावर आधारित हा विशेष लेख चिन्हच्या वाचकांसाठी ७ भागांमध्ये प्रस्तुत करत आहोत. यामध्ये साहित्य, चित्रकला, संगीत, अभिनय या सर्वच क्षेत्रांतील दिग्गजांच्या आठवणी, किस्से आणि त्यावर ग्रेस यांचं भाष्य असा आजपर्यंत प्रकाशित न झालेला मजकूर वाचायला मिळेल. ग्रेस ज्या खोलीत बसून कविता लिहायचे, तिचा परिचय झाला तर त्यांच्या कवितेची खोली समजून घेण्यासाठी ग्रेसव्याकूळ परिवारातील सदस्यांना नक्कीच मदत होईल, अशी आशा आहे.

———-

ग्रेसगॅलरी !  

संजय मेश्राम

 भाग १

 ‘‘तासन्‌तास मी एकाच जागी बसून असतो. एकटा! मला वेळेचं काही नाही. कसा राहत असेन? वाचन तर करीत नाही कधीच. छे! वाचण्याच्या वगैरे भानगडीत पडतच नाही. माझी ही खोली हा माझा आतलाच भाग आहे. माझ्या जगण्याचा तो भाग आहे…’’

‘…मी महाकवी दुःखाचा’ अशी स्वतःची ओळख सांगणारे कवी ग्रेस बोलत होते.  त्यांच्या व्यक्तिमत्वाएवढंच त्यांच्या बसण्याच्या खोलीविषयी, खोलीतील चित्रं अन छायाचित्रांविषयी कुतुहल वाटू लागलं.

 

●●●

वर्ष २००९. गुरुवार, दि. ७ मे. मागील काही दिवसांपासून ग्रेस सरांची भेट नव्हती. १० मे हा त्यांचा वाढदिवस. ते म्हणाले होते, यावेळी मी या दिवशी नागपुरात नसणार.

ग्रेस यांना फोन केला की त्यांचा पुढील कार्यक्रम ते सांगत असत. म्हणजे कोणत्या तारखेला कुठे असणार, परत कधी येणार.

म्हटलं, मी उद्या किंवा परवा येईन, फोन करून.

ग्रेस म्हणाले, येताना एक वेळ टाळा. सायंकाळी ४  ते ५ तुम्ही यायचं नाही. त्याचं गुपित कुणाला सांगणार नसाल तर मी तुम्हाला सांगतो.

बरं. नाही सांगणार. सांगा ना!

त्याचं गुपित असं आहे, की मी सध्या ड्रायव्हिंग शिकत आहे. एक महिना झाला. दुसरं एक गुपित आहे. तेही तुम्हाला सांगतो. खरं तर हे कुणाला सांगावं, अशी लायकीची माणसं दिसत नाहीत. चिमणीएवढा किंवा हत्तीएवढा आनंद कुणाला सांगावा, अशा लायकीचा मनुष्य मला कुणी भेटत नाही.

ग्रेस सांगत होते….

मी कार घेतलेली आहे. ती माझ्या दारात आहे. ही गाडी मी आनंदासाठी घेतलीच नाही. मला उद्या त्रास होऊ नये, यासाठी घेतली. आता कॅन्सरनंतर शरीराला एवढा फटका बसला. उद्या जर पाच वर्षांनी मला माझी दुचाकी सांभाळता आली नाही, तर मी आतापासून फोर व्हीलरमध्येही निष्णात पाहिजे. मरेपर्यंत कुणावरही मला अवलंबून राहायचे नाही. आलं का लक्षात? म्हणून मी कार घेतली. परवा दारात आलेली आहे. कष्टाचा एक एक पैसा काटकसरीनं खर्च करून. आज ३२वा दिवस आहे माझा कार शिकण्याचा. मला जोपर्यंत कॉन्फिडन्स वाटत नाही, तोपर्यंत मी गाडी रस्त्यावर एकटा चालवणार नाही.

मग म्हणाले, मी माझ्यापेक्षा कशातच गुंतलेलो नाही. मी माझ्याहून वरचढ कुणालाच होऊ देणार नाही. गाडीला होऊ देणार नाही, घोड्याला होऊ देणार नाही.

ग्रेस म्हणाले, एक लक्षात ठेवा. ९  तारखेला म्हणजे परवा शनिवारी मी पुण्याला जात आहे. मागील वर्षी कॅन्सर असताना माझा वाढदिवस मंगेशकरांनी केला ना हॉस्पिटलमध्ये! राधाने केक कापला होता. म्हणजे पुनर्जन्मानंतरचा हा माझा पहिला वाढदिवस. त्यामुळं वाढदिवस तिथंच करायचा, हे मी ठरवलं. त्यासाठी तीन महिने आधी रिझर्वेशन करून ठेवलं.

मला दोन कॅन्सर झाले होते. एका कॅन्सरमधून बरा झालो आणि दुसरा कॅन्सर मी पाळतो आहे. तो जन्मभर पाळणार आहे. या दोन कॅन्सरमधून बाहेर पडल्यानंतरचा माझा पहिला वाढदिवस आता यावेळेला आहे परवा. आलं का लक्षात? ९ ला शनिवारी गाडीत बसणार. १० ला रविवारी पोहोचतो. मंगेशकरांकडे थांबणार. ११ ला सकाळी माझा चेकअप आहे दीनानाथमध्ये. १२ ला मी नागपूरला परतणार.

ग्रेस यांना भेटायला जाताना घरून डबा नेला होता. पोळ्या, वरण आणि मेथीची भाजी. स्वच्छ धुवून आणलेला डबा परत करत ग्रेस म्हणाले, मी इतकं खात नाही. दोन पोळ्या, एवढासा भात किंवा झालंच तर मग तीन पोळ्या. एवढं पुरे एका जेवणात. ते सांगू लागले, रेडिएशनमुळे शरीराची व्यवस्था विस्कळीत होते. ती पुन्हा जुळून यायला तीन- चार वर्षे लागतात. आता ६० किलो वजन आहे. ते आधी ७०-७५ किलो होतं. आपोआप वजन कमी झालं. काही न करता. दिनचर्येत काहीच बदल केला नाही.
माझ्या संग्रहात ‘द ग्रेट आर्टिस्ट’ सिरीजमधील व्हिन्सेंट व्हान गॉगची चित्रं असलेल्या पुस्तिकेच्या दोन प्रती होत्या. त्यातील एक प्रत त्यांना वाढदिवसानिमित्त भेट द्यायला सोबत घेऊन गेलो. बघून त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, तुम्ही नजराणा दिला मला, नजराणा! वर्णन नाही करू शकत त्याचं.

 

●●●

खोली  नव्हे; ग्रेसगॅलरी!

 

मला ग्रेस यांच्या बसण्याच्या खोलीबद्दल कायम उत्सुकता असायची. एखादी बाग कशी विविध फुलांच्या सुगंधानं व्यापलेली असते. सुगंध दिसत नाही, पण ती हवा सुगंधी झालेली असते. ही खोली अशीच कायम भारलेली वाटायची. ग्रेसमय. मी माझी इच्छा बोलून दाखवली. म्हटलं, मला तुमच्या खोलीबद्दल, खोलीतील एकेका चित्रांबद्दल, वस्तुंबद्दल लिहायचं आहे.

उत्तर आलं, “स्वातंत्र्य आहे!”

ग्रेस यांची ही खोली म्हणजे गॅलरी आहे. या खोलीत त्यांचे जिवलग, सखेसोयरे आहेत. ते एका विशिष्ट काळातील नाहीत. या सर्वांचा त्यांना सहवास असायचा. सर्वांशी त्यांचा संवाद असायचा. यातूनच त्यांच्या सृजनाला बहर यायचा. त्यांचा प्रत्येक क्षण हा निर्मितीसाठी असायचा. त्यांचं विचारचक्र यातच असायचं. या खोलीत त्यांचे स्वतःचे काही फोटो, काही चित्रं, लांब दांड्यांची शुष्क फुलं, काष्ठशिल्पं, बाहुल्या, चामड्याचा घोडा, विविध रंगांचे मणी… कितीतरी वस्तू. काय बघू नि काय नको! एक संग्रहालयच जणू.

भिंतीवर असलेला सुळावरचा येशू लक्ष वेधून घेतो. त्याचीच छोटी प्रतिकृती टेबलावरही दिसते. ग्रेस यांनी पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत केलेल्या कार्यक्रमांच्या काही कलात्मक पत्रिका भिंतीवर आहेत. काही टेबलावर टेकून ठेवल्या आहेत. या पत्रिकांचं लेखन त्यांनी स्वतः केलेलं असायचं. त्या प्रत्येक कार्यक्रमाचं शीर्षकही वैशिष्ट्यपूर्ण असायचं. अर्थात त्यांनीच दिलेलं.

मी खोलीतले काही फोटो काढू लागलो. ग्रेस म्हणाले, फोटो येतात का चांगले? लाइट लावून देऊ का?

मी एक फोटो त्यांना दाखवला.

व्वा! मस्त आला आहे. सुंदर आला आहे हा फोटो. कम्पोझिशन तर पहा… असं म्हणत त्यांनी कौतुक केलं.

 

●●●

ग्रेस म्हणाले, ये फोटो मुझे दे दो!

 

खोलीत ग्रेस यांचं दूर बघणारं भिंतभर मोठं छायाचित्र आहे. त्यातील ग्रेस बघतात, त्या बाजूला पुरेशी मोकळी जागा सोडली आहे. अनेकांना ते छायाचित्र नानू नेवरे यांनी काढलं आहे, असं वाटतं. नानू यांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं, त्यांचे बंधू रघू यांनी ते काढलं आहे.
अच्छा! तो ये बात हैं. चला मग लावा रघू यांना फोन.
“आम्ही फिरायला गेलो होतो कन्हानला. ग्रेस, उल्हास मनोहर, यशवंत पाटील, सवाईथूल आणि मी…”
रघू यांना तो दिवस स्पष्ट आठवतो. साऱ्या आठवणी मनात ताज्या.
वर्ष १९८५. सायंकाळची वेळ. सूर्यास्त व्हायचा होता. ग्रेस सभोवताल निसर्ग बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावर पडलेला हलकासा तांबूस प्रकाश सुंदर दिसत होता. रघू यांना मनातच काही तरी क्लिक झालं. कॅमेरा सोबत होताच. पुढल्या क्षणी त्यांनी फोटो क्लिक केला. एकच क्लिक पण अप्रतिम आविष्कार. तेव्हा आजच्या सारखी अद्ययावत साधनं नव्हती. रात्री तो प्रिंट केला तेव्हा ती प्रक्रिया बघायला ग्रेस तिथंच उपस्थित होते. फोटो बघून तर तब्येतच खूश. दुसऱ्या दिवशी तो लॅमिनेट केला. ग्रेस बराच वेळ त्या फोटोकडं बघत राहिले.

पुढं दहा वर्षं ते छायाचित्र रघू यांच्या गॅलरीच्या दर्शनी भागात लावलेलं असायचं. लोक थांबून बघायचे. ग्रेस तेव्हा मॉरिस कॉलेजमध्ये शिकवायचे. कॉलेजची मुलं जाता- येता या छायाचित्राकडं अवश्य बघायची. अनेकदा तर लोकांना हे छायाचित्र आणि प्रत्यक्ष ग्रेस असं एकत्रित दृश्य बघायला मिळायचं. त्यातील दाढीच्या विशिष्ट शैलीमुळे काहींना जनता दल नेते चंद्रशेखर यांचं तरुणपणातील छायाचित्र वाटायचं. लोकं कुतूहलानं बघतात, हे कळल्यावर ग्रेस यांनाही छान वाटायचं. ते बरेचदा इथं येत असत. इंग्रजी नियतकालिकांमध्ये छापून आलेले आवडत्या अभिनेत्रींची छायाचित्रं ते त्यांना हव्या त्या आकारात नेवरे बंधूंना प्रिंट करून मागत असत.

एक दिवस ग्रेस आले अन म्हणाले, ये फोटो मुझे दे दो!

रघू म्हणाले, कोई बात नहीं. तुम्हारा ही हैं, तुम लेके जाव.

तेव्हापासून ते छायाचित्र ग्रेस यांच्या भिंतीवर विराजमान झालं.

ग्रेस यांच्या घरी गेल्यावर पहिली नजर पडायची ती या छायाचित्रावर. मग प्रश्न पडायचा, आपण छायाचित्राकडं बघत राहावं की ग्रेस यांच्याशी बोलावं?

आपला हा संभ्रम, ही कश्मकश ग्रेस अलगद हेरायचे.

 

●●●

 

(क्रमश:)

 

संजय मेश्राम

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.