Features

ग्रेसगॅलरी ! – भाग ३

ग्रेस! काहींसाठी विश्व, काहींसाठी भावविश्व. काहींसाठी धुकं, चकवा, भुलभुलैया. ग्रेस हे खरंतर सृजनाचं, तरल निर्मितीचं नाव आहे. सलग १८-२० तास एकांतात बसून राहणाऱ्या या मनस्वी कलाकाराची कलेकडे बघण्याची दृष्टी अतिशय सूक्ष्म आणि तरीही व्यापक होती. त्यांच्या खोलीत असलेला चित्र, शिल्प, छायाचित्रांचा संग्रह हे आठवणींनी ओथंबलेले एक कलादालनच होते. पत्रकार संजय मेश्राम यांनी २००९ मध्ये ग्रेस यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनातील त्या आठवणी जाग्या केल्या होत्या. त्यावर आधारित हा विशेष लेख चिन्हच्या वाचकांसाठी ७ भागांमध्ये प्रस्तुत करत आहोत. यामध्ये साहित्य, चित्रकला, संगीत, अभिनय या सर्वच क्षेत्रांतील दिग्गजांच्या आठवणी, किस्से आणि त्यावर ग्रेस यांचं भाष्य असा आजपर्यंत प्रकाशित न झालेला मजकूर वाचायला मिळेल. ग्रेस ज्या खोलीत बसून कविता लिहायचे, तिचा परिचय झाला तर त्यांच्या कवितेची खोली समजून घेण्यासाठी ग्रेसव्याकूळ परिवारातील सदस्यांना नक्कीच मदत होईल, अशी आशा आहे.

———-

ग्रेसगॅलरी !

 

भाग ३

 

सृजनानुसंधानाची रहस्यलिपी

 

‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली…’  लिहिणारे कवी नारायण सुर्वे हे १९९५ मध्ये नागपूरला आले होते.  या भेटीत ते ग्रेस यांच्या घरीही आले. दोन श्रेष्ठ प्रतिभावंतांच्या भेटीचा हा क्षण नानू नेवरे यांनी कॅमेरात टिपला. ही भेट किती प्रफुल्लित असेल हे या ब्लॅक ऍण्ड व्हाइट फोटोतील दोघांच्याही चेहऱ्यावरील मंद स्मित बघून लक्षात येतं.

 

पुढे १६ ऑगस्ट २०१० ला सुर्वे यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी सर्वांना अलविदा म्हटलं. ठाण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ग्रेस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं होतं-

 

सुर्वे गेलेत!

 

दुर्मीळ काव्यानुभवाच्या सृजनप्रतितीचा कौल, ज्या मोजक्याच कवींना मराठीत लाभला, सुर्वे त्यातील एक; आणि आत्मविभोर शैलीच्या दृष्टीने थोडेसे, एकमेवाद्वितीयही! आपल्या कवितेचा वाचाळ, ग्रंथाळ संयोजक होण्याचे सर्व मोह त्यांनी प्रारंभीच टाळलेत. म्हणूनच त्यांनी अत्यंत धैर्याने २० वर्षांपूर्वीच कवितेचा नम्रपणे निरोप घेतला. याला मी कवितासंन्यास म्हणत नाहीये! कवी आणि कविता यांच्यामधले ते सृजनाच्या परमार्थाचे गुपित आहे. त्या गुपिताची ‘कळ’ फक्त कवी आणि कविता यांनाच ठाऊक असते.

 

He was reading Marx, for whole of his life but never became his shadow. Being an artist of his own size, Mr Surve provided an amazing shade of his poetry to the wordy Marxism.

 

सुर्वे म्हणालेच होते, ‘शेवटी ग्रंथ बाटगेच निघालेत; माणसाएवढा सृजनात्मा पाहिलाच नाही!’

 

नेहरु गेल्यानंतरच्या, त्यांच्या छोट्याशाच कवितेत हा, पहाडाएवढा आशय त्यांनी खरेच मुखर केलेला आहे! आत्ता याक्षणी, सुर्वे जिथे असतील ना, त्या जागेच्या सृजनानुसंधानाची रहस्यलिपी मला(च) ठाऊक आहे.

 

So no worry … bye, Surve Sir!

 

– मी;

 

ग्रेस

 

 

●●●

आपला, जी. ए. कुलकर्णी

 

 

भिंतीवरचं एक फ्रेम केलेलं छायाचित्र दाखवत ग्रेस म्हणाले, हा रिल्के (१८७५-१९२६) चा फोटो आहे. महाकवी रेनर मारिया रिल्के.

 

जर्मन भाषेतील सर्वात महत्त्वपूर्ण कवींपैकी तो एक मानला जातो. मी तो क्लिक केला.

 

मग भिंतीकडं वरच्या बाजूला बोट दाखवत ग्रेस म्हणाले, हे सागवनाचं पान मला एका मित्रानं भेट दिलं होतं. चार वर्षे झाली. तसंच ठेवून आहे भिंतीवर. कशाला काढायचं? पडेल तेव्हा पडेल.

 

मला तेव्हा काही लक्षात आलं नाही. आता वाटतं, हे पान देणारी व्यक्ती दुसरी कुणी नव्हे, केशव जोशी असावेत. (म्हणजे ग्रेस यांचा प्रिय केशव). ग्रेस यांच्या साहित्याचे संग्राहक आणि त्यांचे लेखनिकही. त्यांच्या भावविश्वाचा केशव हा एक महत्त्वाचा भाग होता. अनेक ललितलेखांमध्ये त्यांचा उल्लेख येतो.

 

या काही दुर्मीळ वस्तू दिसतात. त्या तुम्ही कुठून जमविता?

 

‘‘या अगदी क्षुल्लक आणि नगण्य आहेत. एक वाल हँगिंग आहे. ही खुंटी आहे. हार्डवेअरच्या दुकानात मिळते. मला ती रस्त्यात सापडली. तिचं डिझाइन मला आवडलं. मी आणून स्वच्छ केली. हे मुखवटे मला कुणी तरी दिले. छोटे छोटे. माझा जीव जसा रमेल, तशा मी वस्तू मांडून ठेवतो.’’

ग्रेस सांगत आहेत, काही दाखवत आहेत…

 

‘‘हे एक कम्पोझिशन बघा. याच्यात जी. ए. कुलकर्णी आहेत. खूप सुंदर. हे हे हे… हे बघा. तो वरच्या बाजूला पिकासो आहे. त्यानं प्रेयसीच्या डोक्यावर छत्री धरलेली आहे. गाजलेलं छायाचित्र आहे ते. हे इकडे भिंतीवर व्हिन्सेंट व्हान गॉगचं चित्र. समोर सूर्य आहे. इकडं ग्रीन पुतळा आहे. इकडं मी आहे. हे कम्पोझिशन तुम्हाला घेता आलं तर उत्तम.”

 

दि. २३ मार्च १९७३ रोजी पाठवलेल्या पत्रात जीए काय लिहितात, बघा-

 

पत्रानेच पण प्रत्यक्ष भेटलेला एक मित्र ग्रेस यांस सप्रेम भेट …

 

इतरांना कधी दिसत नाहीत त्या चांदीच्या घंटा त्याला दिसतात, इतकेच नाही तर त्यांचा मधुर उदास नाददेखील ऐकू येतो. मला त्याचा हेवा वाटतो, कारण त्याच्या शब्दांच्या अंगात कविता येते. कळावे.

 

आपला जी. ए. कुलकर्णी

या शिवाय,

 

दि. २६ ऑगस्ट १९७६ रोजी पाठवलेल्या पत्रात जीए म्हणतात,

 

प्रिय श्री. ग्रेस,

 

पत्राला काहीच कारण नाही. तुमची आठवण झाली म्हणून पत्र. बस्स.

 

कधीही प्रत्यक्ष न भेटता केवळ पत्राद्वारे भेटलेल्या जीए यांच्याबद्दलचं प्रेम आणि आदर ग्रेस यांच्या बोलण्यात स्पष्ट दिसत होता. जीए यांचं छायाचित्र याचीच साक्ष देत होतं.

 

व्हिन्सेंट व्हान गॉगच्या चित्रात एक बगीचा आहे. सुरुची झाडं आहेत. ग्रेस म्हणाले, गॉग तर माझं दैवत आहे हो! गॉगवर बोललो तर वेडे व्हाल. पुढल्या वेळी बोलू आपण. तुम्ही ते सगळं लिहून घ्या.

 

 

●●●

तुझी पिशवी किती छोटी; चित्र किती मोठं!

 

ग्रेस बसायचे, तिथं अगदी मागे भिंतीवर लावलेलं त्यांचं साधारण ए-थ्री आकारातील एक रेखाचित्र लक्ष वेधून घ्यायचं. उजव्या कोपऱ्यात सही- सुभाष अवचट.

‘‘मी गोल्ड सीरिज करीत होतो. तेव्हाचं ते चित्र आहे. मुंबईच्या माझ्या स्टुडिओत काढलं आहे. तो समोर बसायचा, मी चित्र काढायचो. हे नेहमीचंच. विशेष प्रसंग वगैरे काही नाही. अॅक्रेलिक आणि इंक या माध्यमात ते काढलं आहे. कवितेच्या ओळीही आहेत चित्रांवर…’’  ज्येष्ठ चित्रकार सुभाष अवचट यांनी आठवण सांगितली.

 

ग्रेस आणि अवचट यांची अत्यंत घट्ट मैत्री होती.  दोघांनी मोठा काळ सोबत घालवला आहे. सोबत प्रवासही केला आहे. अवचट यांची तयार चित्रे ग्रेस यांनी त्यांच्या पुस्तकात वापरली आहेत. मुखपृष्ठासाठीही त्यांच्याकडूनच चित्रे काढून घेतली आहेत.

ग्रेस यांचा विषय निघाला, की काय सांगू नि काय नको, असं त्यांना होतं.

 

ते सांगू लागले,  अद्भुत मित्र होता. पण रागावला की दात-ओठ खायचा. माझ्या पुण्याच्या आणि मुंबईच्या स्टुडिओतही असायचा. मी त्याला माणिक म्हणायचो. त्याचं वैशिष्ट्य हे होतं की तो ‘वेडा’ होता.  माझ्या चित्रांवर तो अगदी वेड्यासारखा प्रेम करायचा. तो काय विचार करायचा, हे मला पूर्णपणे माहिती होतं.

 

त्याला सतत माझी चित्रं हवी असायची. त्याच्या खांद्यावर झोळी असायची, शबनम बॅग. प्रत्येक चित्रापाशी जायचा. हातानं आकार मोजायचा. मग पिशवीचा आकार मोजायचा. त्याला ती पिशवीत घालून न्यायची असायची ना! टेबलावरील चित्रं घेऊन जायचा, गुंडाळी करून. मग ते कितीही छोटं का असेना! मी म्हणायचो, तुझी पिशवी किती छोटी, चित्र किती मोठं!

ग्रेस यांना स्वत:ची चित्रे, छायाचित्रे फार आवडत. याविषयी अवचट यांनी आठवण सांगितली. ते म्हणाले,  माझ्या मृत्यूनंतर  म्युझियम व्हावं माझं. मी आतापासून त्याची तयारी करतोय, असं तो म्हणायचा.

 

मी त्याच्यावर लिहिणार होतो, पण राहिलं.

 

मी चित्र काढत असायचा, अन तो ज्ञानेश्वर, तुकाराम सांगत येरझारा घालायचा. त्याची कल्पनाशक्ती फार विलक्षण होती. तो जगाच्या पुढचा होता, काळाच्या पुढचा होता. त्यामुळं त्याला न्याय नाही मिळाला.

 

 

●●●

तो निजला नाही बाळे!

 

प्रसिद्ध चित्रकर्ती शुभा गोखले यांचं एक चित्र लक्ष वेधून घेतं. उजव्या कुशीवर झोपलेल्या व्यक्तीचं. निळ्या रेषा आणि निळ्या रंगात ते साकारलेलं. चित्राखाली इंग्रजीत स्वाक्षरी आहे – शुभा.

ग्रेस यांचं अक्षर हा कॅलिग्राफीचा उत्तम नमुना असतो. चित्राच्या खालच्या भागात त्यांच्या शैलीदार अक्षरात त्यांच्याच कवितेच्या ओळी आहेत –

 

 

तो निजला नाही बाळे!

 

तो थकला आहे बाळे!

 

जे निजेत थकते मरते

 

ते माय मुलींचे जाळे

 

 

 

तो उठला म्हणजे देईल

 

डोळ्यांत नदीचे पाणी..!

 

तू आवर सावर करता

 

फिरशील पुन्हा अनवाणी..!”

 

 

 

शेवटी त्यांची स्वाक्षरी- ग्रेस.

शुभा गोखले यांना म्हटलं, सांगा ना काही आठवण. त्या म्हणाल्या, ग्रेस असेच एकदा दुपारनंतर माझ्या स्टुडिओत आले. ते म्हणाले, मला चक्कर आल्यासारखं वाटतंय.

त्यांना विश्रांती घ्यायला सांगितलं. मी इकडं बसून माझं काम करीत होते. काही वेळानं बघितलं तर ते उजव्या कुशीवर झोपले होते. उजवा हात त्यांनी डोक्याखाली घेतला होता. खिडकीतून छान प्रकाश येत होता. माझ्या मनात आलं, हे स्केच करायला हवं. साध्या छोट्या स्केचबूकमध्ये निळ्या रेषांनी भराभर स्केच केलं. त्यात रंगाच्या काही छटा दिल्या. सरांना बरं वाटल्यावर ते उठून बसले. त्यांना ते चित्र दाखवलं. त्यांना खूप आवडलं. चित्राच्या खाली नकळत मोकळी जागा सोडली  होती. त्यांनी त्या जागेचा योग्य उपयोग केला. तिथं त्यांची कविता लिहिली. ती त्या चित्राला अगदी चपखल बसली. तो दिवस होता शुक्रवार, दि. १२ जुलै २००२.

हे चित्र ‘ सांजभयाच्या साजणी’ या पुस्तकात घेतले आहे. ‘संध्यासुक्तांचा यांत्रिक’ भाग -२ या ग्रेस यांच्या दृक- श्राव्य मुलाखतीच्या सीडीमध्येही ते आहे.

 

शुभा गोखले म्हणतात, ग्रेस यांच्या बऱ्याच आठवणी आहेत. कोणतीही ललित कला असू द्या. त्यांना त्यातलं खूप कळायचं. ही वाज अमेझिंग.

 

 

 

●●●

 

 

(क्रमश:)

 

संजय मेश्राम

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.