FeaturesGachhivaril Gappa

हे सरकारनं करायला हवं होतं!

भारतात ज्यांनी पहिल्यांदा अमूर्त चित्रकलेचा पाया रचला त्या चित्रकार वासुदेव संतू गायतोंडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला उद्यापासून सुरुवात होत आहे. २ नोव्हेंबर १९२४ रोजी गायतोंडे यांचा नागपुरात जन्म झाला. गायतोंडे कुटुंबीय मूळचे गोव्याचे. नोकरी निमित्तानं गायतोंडे यांचे वडील काही काळासाठी नागपुरात गेले होते. तिथंच गायतोंडे यांचा जन्म झाला. नोकरीत मतभेद झाल्यामुळं त्यांनी ती नोकरी सोडली आणि ते पुन्हा गोव्यात परतले आणि त्या नंतर ते मुंबईत स्थायिक झाले.

मुंबईत गिरगावच्या कुडाळदेशकर वाडीत त्यांचं बहुतांशी वास्तव्य झालं. सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी गायतोंडे यांनी मुंबई सोडली. दिल्लीत स्थायिक होईपर्यंत गायतोंडे यांनी चित्रकार म्हणून मोठं नाव कमावलं होतं. भारतीय अमूर्त चित्रकलेचे ते प्रणेते मानले जात होते. दिल्लीत ज्यावेळी त्यांनी प्रवेश केला त्याच वर्षी भारत सरकारनं त्यांना पद्मश्री बहाल केली. त्या संदर्भातला एक अफलातून किस्सा ‘चिन्ह’च्या गायतोंडे ग्रंथात समाविष्ट केला आहे. जागेअभावी तो इथं देता येत नाही याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. जिज्ञासूंनी तो मूळ ग्रंथातच वाचावा.

निजामुद्दीनमधल्या बरसातीत असलेल्या स्टुडिओत एकटं राहणं, अगदी मोजक्याच मित्र-मैत्रिणीत रमणं, अत्यंत कमी बोलणं, सतत चिंतन मनन आणि वाचनात असणं या गुणवैशिष्ट्यांमुळं  अन्य भारतीय चित्रकारांपेक्षा गायतोंडे यांना भारतीय कलाविश्वात खूपच मोठं मानाचं स्थान मिळालं होतं. ज्याला ‘लोकविलक्षण’ म्हणता येईल असंच त्यांचं सारं जगणं होतं. जगण्यासाठी त्यांनी आत्यंतिक संघर्ष केला पण चित्रकला कधीच सोडली नाही. पन्नाशीनंतर अतिशय भयंकर अपघाताला त्यांना सामोरं जावं लागलं आणि अपंगत्वाला तोंड द्यावं लागलं. तब्बल नऊ वर्ष स्टुडिओत पेंटिंग न करता ते नुसते बसून राहात होते. पण त्यावेळीदेखील त्यांनी चित्रांविषयी विचार करणं सोडलं नाही. २००१ साली ते गेले. पण त्याआधी चारपाच वर्ष त्यांनी पुन्हा जोमानं काम सुरु केलं होतं.

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चित्रांच्या किंमती मोठ्या वेगानं वाढू लागल्या. लिलावात त्यांच्या चित्रांना विक्रमी बोली लागू लागल्या. ज्यांनी त्यांच्या निधनाची बातमी अवघ्या सहा ओळीत दिली होती त्या राष्ट्रीय वृत्तपत्रावर गायतोंडे यांच्या चित्राला लागलेल्या किंमतीची बातमी पहिल्या पानावर देण्याची वेळ आली आणि नंतर तर तो त्यांचा शिरस्ताच झाला. आज केवळ भारतातल्याच नव्हे तर जगभरच्याच लिलावांमध्ये गायतोंडे यांच्या चित्रांना मोठ्या बोली लावल्या जातात. ‘गायतोंडे’ हे नाव आता जगमान्य झालं आहे.

असं जरी असलं तरी ज्या गोव्याचे ते मानले जातात त्या गोवा राज्यानं किंवा ज्यांनी वयाची ४० वर्ष मुंबईतल्या एका चाळीत घालवली त्या महाराष्ट्र राज्यानं किंवा चाळिशीनंतर ७७ पर्यंत ज्यांनी आपलं आयुष्य राजधानी दिल्लीत घालवलं त्या दिल्लीनंदेखील गायतोंडे यांच्या संदर्भात आपलं कर्तव्य पार पाडलं नाही ही वस्तुस्थिती आहे. वाटलं होतं आता जन्मशताब्दी वर्षात तरी गोवा, महाराष्ट्र, दिल्ली किंवा केंद्र सरकार गायतोंडे यांच्या संदर्भात काहीतरी भरीव असं कार्य करील. किमानपक्षी जन्मशताब्दी वर्ष तरी साजरं करील असं वाटलं होतं. पण राजकीय वाटमारी करण्यात मग्न असलेल्या राज्यकर्त्यांनी या विषयाकडे संपूर्णतः दुर्लक्ष केलं आहे.

म्हणूनच ‘चिन्ह’नं गायतोंडे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष वेगळ्या पद्धतीनं साजरं करायचं ठरवलं आहे. २ नोव्हेंबर पासून संपूर्ण वर्षभर दर गुरुवारी ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर गायतोंडे यांच्या आठवणी जागवल्या जाणार आहेत. याखेरीज ‘चिन्ह’च्या गाजलेल्या ‘गायतोंडे’ या मराठी ग्रंथाची इंग्रजी आवृत्तीदेखील मोठ्या दिमाखात प्रकाशित केली जाणार आहे. हा इंग्रजी ग्रंथ जगभरातली वस्तुसंग्रहालय, ग्रंथालयं, कलादालनं, कला संस्था आणि कलारसिक यांच्या पर्यंत पोहोचावा यासाठी ‘चिन्ह’ विशेष प्रयत्न करणार आहे. ‘चिन्ह’चा आवाका फार छोटा आहे, त्यामुळे ‘चिन्ह’ एवढंच करू शकणार आहे. तुम्ही या आमच्या छोट्याशा प्रयत्नाला प्रतिसाद देऊन आम्हाला मोलाचं सहकार्य करू शकता.

उद्या म्हणजे गुरुवार दि २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता म्हणूनच ‘चिन्ह’नं ऑनलाईन संवाद आयोजित केला आहे. हा कार्यक्रम आपण अवश्य पाहा. एखादा प्रश्न विचारावासा वाटला तर अवश्य विचारा. तर भेटू उद्या सायंकाळी ‘चिन्ह’च्या युट्यूब चॅनेलवर.

सतीश नाईक 

संपादक

‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 74

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.