Features

पेन्टिंगचे ‘पाणी’पत !

२००८ सालातल्या २ मार्च रोजी दैनिक लोकसत्तामध्ये सतीश नाईक यांचा हा लेख प्रसिद्ध झाला होता. स्वातंत्र्योत्तर काळात स्थापन झालेल्या महाराष्ट्राच्या कला संचालनालयामध्ये १९८५ सालानंतर कसा कारभार चालवला गेला याचं विदारक दर्शन या लेखातून होईल. जेजेच्या संग्रहातील माजी विद्यार्थ्यांच्या एकेका चित्राची किंमत आज कोट्यवधींच्या घरात जाते. कल्पना करा की अशी चित्रं सर्फ साबणानं धुण्याचा आदेश जर एखाद्या अधिष्ठात्यानं किंवा महाराष्ट्राच्या कला संचालकानं दिला असेल तर त्या माणसाच्या अकलेविषयी महाराष्ट्र शासनानं खातरजमा करणं अत्यावश्यक होतं, पण संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. 

परिणामी अशी थोडीथोडकी नाही तर तब्बल दीडशे चित्रं जेजे स्कूल ऑफ आर्टच्या गच्चीवर नेऊन जाळून टाकली गेली. तीच गत गायतोंडे यांच्या चित्राची केली गेली. विद्यार्थी दशेत असताना गायतोंडे यांनी ऍसबेसटॉस पत्र्यावर रंगवलेलं भलं थोरलं म्युरल छोट्या आकाराच्या फ्रेममध्ये बसवण्याच्या आग्रहामुळं चारही बाजूंनी एकेक फूट करवतीनं कापलं गेलं. तरीही ते फ्रेममध्ये बसेना ! तेव्हा झालेल्या झटापटीत ते चित्र चक्क मधोमध दुभंगलं गेलं. आज या चित्रांची मार्केट व्हॅल्यू ९० ते १०० कोटी रुपये इतकी होऊ शकेल, पण या संदर्भातली बातमी राष्ट्रीय वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यावर देखील सरकारी अधिकाऱ्यांनी सदर व्यक्तीवर कोणतीही कारवाई केली नाही. आज ती व्यक्ती लाखो रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळवत असेल, पण कलाक्षेत्रात त्या व्यक्तीला काडीचीही प्रतिष्ठा नाही ही वस्तुस्थिती आहे. त्या व्यक्तीला सदर पदावर बसवण्याचा आग्रह ज्यांनी ज्यांनी धरला त्यांनी त्यांनी या साऱ्या उपदव्यापातून काय मिळवलं हा प्रश्नच आहे. 

या साऱ्या प्रकरणाची पुनरावृत्ती आज पुन्हा होते आहे याची सध्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांना जाणीव आहे का ? नसेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जे जेजेचे माजी विद्यार्थी आहेत, ते त्यांना करून देणार आहेत का ? ते आता पाहायचंय !

प्रवेशद्वारातून आत शिरल्या शिरल्या समोरच दिसणाऱ्या रावबहादूर म्हात्रे यांच्या ‘मंदिराकडे..’ या जगविख्यात शिल्पकृतीला आणि त्यांच्या मागच्या भिंतीवरच्या भोसुले मास्तरांनी काढलेल्या कॅ. ग्लॅडस्टन सॉलोमन यांच्या पोर्ट्रेटला मनोमन नमस्कार करीत जेजेचे विद्यार्थी वर्गावर्गावर जात असत. अगदी १९९० सालापर्यंत जेजेच्या भिंती- भिंतीवर लावलेली आणि जेजेच्या संग्रहातली दुर्मिळ चित्रे ही जेजेचा सांस्कृतिक ठेवा होती. कळत नकळत मूकपणे ती चित्रंच विद्यार्थ्यांना खूप काही शिकवून जात असत. ती चित्रे कालांतराने माळ्यावर जाऊन विराजमान झाली आणि तेथूनच त्यातली बरीचशी काळाच्या उदरात गडप झाली. मुळातच ती भिंतीवरून काढण्याचा निर्णय कोणी घेतला याची चौकशी निदान आतातरी होणार आहे काय ?

जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधलं कालपासून सुरू झालेलं जे.जे.च्या माजी विद्यार्थ्यांच्या १९८५ सालापासूनच्या अत्यंत मौल्यवान आणि फार अतिशय दुर्मिळ अशा कलाकृतींचं प्रदर्शन पाहायला आपण जरूर जा. ते प्रदर्शन पाहता पाहता जेजेच्या एकेक माजी विद्यार्थ्याच्या प्रतिभेने आणि त्यांच्या हातातल्या कसबाने आपण थक्क होऊन जाल.

त्या काळातले पेहेराव, इमारती, निसर्ग, असाधारण व्यक्तिमत्त्व, त्या काळातल जुनी मुंबई, हे सारं सारं पाहून तुम्ही कदाचित हरवून जाल, हरखून जाल. कदाचित स्मरणरंजनातही गुंगून जाल. फार दिवसांनी पुढला बराच काळ मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवता येईल असं काही तरी पाहिल्याचं एक वेगळंच समाधानही त्यातून तुम्हाला लाभेलही…

रंग-रेषांच्या सहाय्यानं कलावंत कोरा कागद अथवा कॅनव्हॉसवर आपलं विश्व कसं उभं करतो, या जाणिवेनं तुमची मती कदाचित काही काळासाठी तरी कुंठीत होईल….

पहिल्या मजल्यावरच्या प्रशस्त दालनामधून पुढे पुढे जात थेट उजवीकडे वळा आणि जेजेच्या अधिष्ठात्यांच्या कार्यालयासमोर या. या कार्यालयांच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर एक भलं थोरलं चित्र टांगलेलं आहे, ते अत्यंत काळजीपूर्वक पाहा. हे भित्तीचित्र आहे जेजेच्याच एका माजी विद्यार्थ्याचं.

१९५० सालच्या दशकातलं. जेजेचा हा विद्यार्थी पुढे भारतातला सर्वश्रेष्ठ चित्रकार झाला. अगदी खुद्द हुसेननेसुद्धा त्याच्याबद्दल म्हटलं की, ‘खरा भारतीय जिनियस चित्रकार एकमेव तोच.”

होय! ते चित्र आहे प्रख्यात चित्रकार वासुदेव गायतोंडे यांचं. हे गायतोंडे गिरगावातल्या कुडाळदेशकर वाडीत आधी राहत होते. १९७० च्या दशकात ते दिल्लीला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. हे गायतोंडे म्हणजे ज्यांच्यावर पॅरिस निवासी भारतीय चित्रकार सुनील काळदाते यांनी २०-२५ मिनिटांची डॉक्युमेंटरी केली तेच. ती पुढे जगभरच्या महत्त्वाच्या फिल्म फेस्टिव्हल्समध्ये विलक्षण गाजली. हे गायतोंडे म्हणजे तेच ज्यांच्यावर ‘चिन्ह’ या कला वार्षिकाने गतवर्षी एक संपूर्ण अंक प्रकाशित केला होता. हे गायतोंडे म्हणजे तेच ज्यांच्या चित्रांना आज जगभरच्या लिलावांमध्ये सहा ते आठ कोटींची बोली लावली जाते. ( ता. क. : आता ती बोली ४० कोटीपर्यंत पोहोचली आहे ) हे तेच गायतोंडे ज्यांच्या जेजेमध्ये विद्यार्थीदशेत काढलेल्या चित्रांच्या विक्रीवरून झालेल्या वादाने सरकारी यंत्रणेला पहिल्यांदाच कामाला लावलं होतं. हे तेच गायतोंडे ज्याचं याच जेजेच्या प्रदर्शनातलं एक चित्र आपल्या कस्टडीत तारण म्हणून ठेवून त्या बदल्यात एक नाही दोन नाही तब्बल आठ कोटी रुपये जेजे स्कूलला वापरण्यासाठी देण्यास एक परदेशी बँक अगदी अलीकडे तयार झाली होती. हे चित्र काळजीपूर्वक पाहा.

चित्रातल्या रंग-रेषा- अवकाशाच्या मनोहारी मिलाफाने आपण थक्क होऊन जाल. पण इतक्यावर थांबू नका. चित्र आणखी बारकाईने पाहात जा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की  एस्बेस्टोसच्या ८×४ फुटांच्या भल्या थोरल्या पत्र्यावर काढलेलं ते चित्र मध्यावरून अर्धवर्तुळाकार जात जात चक्क दुभंगलं आहे. दोन अत्यंत असमान भागात ते चक्क विभागलं आहे. अतिशय काळजी घेऊन ते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न झाला आहे, पण बुंद से गई वो हौदसे नही आती….

चित्राचा विध्वंस झाल्याचे काही मात्र त्यातून लपत नाही. आता तुम्ही म्हणाल इतकी वर्षे झाली असतील तर झाला असेल काही अपघात – बिपघात किंवा भूकंप-बिकंप वगैरे… तुटलं असेल त्यामुळे वगैरे… तर नाही. तसं काही नाही. तो अपघात नाही. त्याला फार तर किंवा खरं तर घात-पातच म्हणता येईल आणि तो घडवून आणला ते दुसऱ्या तिसऱ्या कोणी तरी नाही तर दस्तुरखुद्द जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या एका माजी अधिष्ठाताने जो नंतर महाराष्ट्राचा कलासंचालकही झाला होता. (ओळखा पाहू इतका भाग्यवंत पुरुष कोण ते !) ज्याला दिसेल त्याचं सुशोभीकरण करण्याचा भारी नाद होता…. ज्याला कशाचीही साफसफाई खूप खूप आवडायची… ज्याला बागबगीचे बनवायचा फार फार छंद होता… ज्याने जेजेच्या हेरिटेज दर्जाच्या वास्तूतल्या जुन्या शोभिवंत लाद्या (कुणाचीही परवानगी न घेता) बदलल्या आणि तिथे आधुनिक लाद्या लावल्या. ज्यानं जेजेच्या इमारतीचे काळे कुळकुळीत दगडसुद्धा ऑईलपेंटने रंगवायला मागे पुढे पाहिलं नव्हतं. (जे पाहिल्यावर प्रसिद्ध वास्तुशिल्पी लॉरी बेकर यांनी कपाळावर हात मारून घेतला होता.)

ज्याने आपल्या दशकभराच्या कारकीर्दीत तिथल्या शिपायांना आणि माळ्यांना या असल्या कामाला जुंपून ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडलं होतं. ज्याने आपल्या कारकिर्दीचा बराचसा कालखंड या आणि असल्याच कामात घालवला होता आणि उरलेला कालखंड मंत्रालयातल्या तंत्रशिक्षण सचिवांच्या, उपसचिवांच्या स्वागत कक्षात किंवा कक्ष अधिकाऱ्यांच्या टेबलासमोर बसून मुलाखतीची वाट पाहण्यात घालवला होता. या साऱ्यातून वेळ मिळालाच तर त्याने किंवा त्याच्यावर घातलेल्या कोर्ट केसेससाठी तो कोर्टा कोर्टात फिरत असत… त्यांच्या कलासंचालकपदाच्या कारकीर्दीत संचालनालयावर संपूर्ण महाराष्ट्रातून (आणि मध्य प्रदेशातूनही) मिळून शंभर-सव्वाशे कोर्ट केसेस दाखल झाल्या होत्या. मध्य प्रदेशातून आलेल्या कोर्टाच्या एका निकालाची दखल न घेतल्याने कोर्टाचा अवमान झाला त्यामुळे मध्य प्रदेशाचे पोलीस अधिकारी थेट समन्स घेऊन मुंबईत धडकले ते यांच्याच कारकीर्दीत.

या सद्गृहस्थांनी चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी, चित्रकारांची किंवा चित्रकलेसाठी नेमकं काय केलं, असा प्रश्न विचारलात तर त्याचं नेमकं आणि समर्पक उत्तर देणं अवघड आहे. जेजेचे विद्यार्थी भविष्यकाळात जेव्हा पीएचडी वगैरे करू लागतील तेव्हा कदाचित त्यांना हा विषय संशोधनासाठी घेता येईल. जवळपास ६०-७० वर्षे जे.जे. स्कूलचं कॅन्टीन चालवणाऱ्या रामय्याच्या मुलाला, लक्ष्मणला कॅन्टीन आणि तिथलं त्याचं राहतं घर भर पावसात खाली करायला लावून त्याला बेघर करणं ही जर ‘कलात्मक’ आणि पुरुषार्थाची कामगिरी असेल तर ती मात्र या गृहस्थांनी केली याची नोंद त्यांच्या कला संचालक पदाच्या कारकिर्दीतल्या कामांबाबत करता येईल. तर अशा गृहस्थांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट नीटनेटके करण्याच्या मोहिमेत गायतोंडे यांचं हे ४x८ आकाराचं भव्य भित्तीचित्र जेजेतच पडलेल्या एका जुन्या फ्रेममध्ये टाकण्यासाठी चारही बाजूंनी करवतीने कराकरा – कराकरा कापलं आणि फ्रेममध्ये बंदिस्त करून भिंतीवर टांगलं ( हुश्श ! ). पण हे असं कर्तृत्व अशक्यप्राय वाटतं ना ? पण हे अस्संच घडलंय. कुणी कलावंत जाऊ द्या ! कलाशिक्षक जाऊ द्या… झालंच तर अधिष्ठाताही जाऊ द्या नि कलासंचालकही जाऊ द्या. चार बुक न शिकलेला, कलेचा गंधही नसलेला माणूस हे असलं उफराटं कृत्य करायला धजावला नसता ते कृत्य या गृहस्थांनी जेजेच्याच आवारात बिनदिक्कतपणे केलं. त्या बिचाऱ्या चित्रालाही ते अत्याचार सहन झाले नसावेत. ते मधोमध वेडंवाकडं तडकून दोन तुकडे होऊन दुभंगलं. अद्यापही हे खरं वाटत नाही ना ? तर मग या लेखासोबत छापलेलं फ्रेममध्ये टाकण्याआधीचं त्या चित्राचं छायाचित्र पहा आणि तुमचं तुम्हीच ठरवा.

पुढचा किस्सा तर यापेक्षाही भयंकर आहे. जे.जे. स्कूल ऑफ आर्टकडे ‘बेगरी कलेक्शन’ नावाचा खूप मानाचा समजला जाणारा संग्रह आहे. या संग्रहामध्ये आपली चित्रं जावीत म्हणून त्या काळात चित्रकारांमध्ये अहमहमिका लागायची. अशा या संग्रहातलं चित्र आज कुठल्याही लिलावात कोट्यवधी रुपयांना खरीदलं गेलं असतं. ‘गेलं असतं’ हे शब्द मी जाणीवपूर्वक वापरले. भूतकाळ. कारण या बेगरी कलेक्शनमधली चित्रच तिथून आता नाहीशी झाली आहेत. वर उल्लेखलेल्या साहेबमजकुरांची नजर एके दिवशी या चित्रांवर पडली आणि तिथेच घात झाला. साहेबांनी ऑर्डर सोडल्या, उद्याच्या उद्या ही चित्रं साबणाने धुवून स्वच्छ करा. त्यासाठी सर्फचं पाकीट साहेबांनीच स्वतः जाऊन आणून दिलं. (अशा छोट्या छोट्या गोष्टी साहेब स्वतःच करायचे) शिपायांच्या हाती सुपूर्दही केलं आणि मग काय शिपायांची ‘सर्फकी धुलाई’ सुरू झाली. अर्जुनवाडे मास्तर म्हणे एकटे बिचारे कळवळून म्हणाले की, ‘नको रे, नका रे असं करू !’ पण साहेबांच्या ऑर्डरपुढे कुठला शिपाई लक्ष देतोय. साहेबाने सांगितलय धुवायचं तर धुवायचं, आपल्याला काय ? असं म्हणून त्यांची ही धुलाई सुरू झाली.

दुसऱ्या दिवशी आल्यावर साहेबांचं धाबं दणाणलं. सर्फने आपलं काम चोख केलं होतं. कॅनव्हासवरचे तैलरंग कॅनव्हासपासून वेगळे होऊन चित्रांवरून खाली सांडले वा ओघळले होते. चित्र होत्याची नव्हती झाली होती. ते पाहताच पुढली ऑर्डर सुटली. आताच्या आता गच्चीवर नेऊन चित्रे जाळून टाका…. टाकली ! शिपायांनी पुढले विधीही चोख उरकले. अग्निसंस्कार झाले. त्यातून जी थोडीफार चित्रं उरली ती तुम्हाला या प्रदर्शनात पाहावयास मिळतील. उदाहरणार्थ नंतर जर्मनीत स्थायिक झालेल्या चित्रकार नागेशकरांचं चित्र पाहा. ते चित्रच तुम्हाला त्याच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची कहाणी सांगेल. बिचारे नागेशकर, दुसऱ्या महायुद्धातून सहीसलामत बचावले, पण या जन्मभूमी आणि कर्मभूमीतल्या तिसऱ्या महायुद्धात मात्र बेचिराख झाले. त्यातल्या त्यात ते नशीबवान आकार छोटा असल्यामुळे त्यांचं चित्र विध्वंसापासून संपूर्ण नाही पण काही प्रमाणात बचावलं पण इतरांचे काय ?

‘सर्फ की धुलाई’ने झालेल्या ‘पाणी’पतात किती मराठी मोत्ये गळाली त्याची शिरगणतीच नाही. शिरगणती करण्यासाठी सूची असावी लागते, पण तीच मुळी जेजेत उपलब्ध नाही. प्रा. आरवाडेच्या काळात एक सूची केली गेली पण तिलाही पाय फुटले.

१९८० सालापर्यंत स्टुडिओ असिस्टंटची पदं जेजेत स्थित होती. त्यांचं कामच होतं की चित्रांच्या याद्या करणं, संस्थेतील वस्तूची, कलावस्तूंची गणती करणं, उदाहरणार्थ इझल किती आहेत, डॉकीज् किती आहेत, भिंतीवर चित्रं किती आहेत. मग त्यावर ऑईल पेंटने क्रमांक टाकणं आणि या साऱ्यांची नोंद एका रजिस्टरमध्ये करणं वगैरे. पण ती पदंच १९८० सालानंतर ‘व्यपगत’ झाली. (‘व्यपगत’ हा खास सरकारी शब्द) आता औरंगाबाद मुक्कामी जमलेले उमाकांत साळुंके आणि दिलीप बडे (अलीकडेच यांचं निधन झालं ) हे यातले शेवटचे मालुसरे. त्यानंतर तिथं कुणाची नेमणूक झाली नाही आणि तेथूनच हे चित्रांचं नष्टचर्य सुरू झालं. जेजेला उतरती कळा लागायलाही तेथूनच सुरुवात झाली.( नवे कलासंचालकसाहेब, आता तरी या पदांवर माणसे नेमणार काय ? जुनी रजिस्टर्स काढून त्यातल्या चित्रवस्तू आणि इझल जुनी टेबल, खुर्च्या इत्यादी मौल्यवान सामानांच्या यादीची पडताळणी करण्यासाठी, संबंधितांना आदेश देणार आहेत काय ? साऱ्यांचा उलगडा होण्यासाठी आता तीच एक शक्यता बाकी आहे) असो.
या संदर्भात काही कारवाई झाली असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे. असं काही झालं असल्याचंच मुळी कुणाला ठाऊक नाहीय. तंत्रशिक्षण खात्यात अशा प्रसंगी काही कारवाई करण्याचीच कोणती प्रथा नाही. उलट अशा व्यक्तींना तिथले सचिवादी पदोन्नती देतात. येथेही तेच झालं. १९९० ते २००० सालापर्यंत जेजेचं अधिष्ठातापद अक्षरशः उपभोगलेल्या (आणि त्याच काळात ही अमानवी कृत्य केलेल्या) या गृहस्थांना महाराष्ट्र शासनाने थेट महाराष्ट्राच्या कला संचालक पदावरच बसवलं. कला संचालक पदावर आणखी पाच-सहा वर्षे उपभोगून, महाराष्ट्राच्या चित्रकलेचा पुरता सत्यानाश करून हे गृहस्थ नंतर रीतसर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तही झाले. कहाणी सुफळ संपूर्ण झाली, पण कहाणी अशी संपू द्यायची नाहीय. ज्यांनी हे सारं केलं, हे सार घडवलं त्याच्याच गळ्यात त्यांच्या तंगड्या अडकवायच्या आहेत. म्हणूनच त्याचं नाव जाहीर करतोय. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि महाराष्ट्राच्या कला परंपरेवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या त्या जेजेच्या माजी अधिष्ठात्याचं आणि महाराष्ट्राच्या माजी कला संचालकांचं नाव आहे प्रा. महादेव भानजी इंगळे. तंत्रशिक्षण खात्याला, महाराष्ट्र शासनाला मनाची नाही तर जनाची तरी थोडी लाज असेल तर एखाद्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या साऱ्या प्रकरणाची चौकशी त्यांनी सुरू करावी आणि दोषी व्यक्तींना अशी जबरदस्त शिक्षा द्यावी की पुढली पन्नास-शंभर वर्षे असले चाळे करावयास कुणी धजावणार नाहीत. शिक्षणमंत्री वळसे-पाटील हे आव्हान स्वीकारणार काय ?

ताजा कलम : लेखन संपवता संपवता सुचलेले आणखी काही (भयंकर) प्रश्न।

१) जेजेमध्ये एक मिनिएचर आर्ट गॅलरी होती. त्या गॅलरीत भारतीय पारंपरिक शैलीतील सुमारे ४० मूळ लघुचित्रं लावली जात होती, जिचा कालावधी जवळजवळ ४००, ५००, ६०० वर्षे इतका किंवा त्याहीपेक्षा जुना होता, ज्यांची एकेका चित्राची किंमत जागतिक कलेच्या बाजारात आज अक्षरश: कोट्यवधी रुपयांच्या घरात असेल, ती चित्रं गेली कुठे ? २) शावक्ष चावडांची ब्राऊन पेन्सिलमधली १६ रेखाटने वर्गावर्गात लावली जात होती ती चित्रे कुठे गेली ?

३) परवा एक जुने स्नेही भेटले, ते म्हणाले, अमृता शेरगीलची जेजेने बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनातून घेतलेली दोन ड्रॉइंग अडुरकरांच्या काळात त्यांच्या स्टुडियोत लावलेली पाहिल्याचे आठवते. ती चित्रं गेली कुठे ? रिस्टोरेशनसाठी ती कुणी नेली असल्याची नोंद जेजेत आहे काय ?
४) जेजेच्या माजी विद्यार्थ्यांचे कुटुंबीय, वंशज अथवा आप्तजन जेजेच्या संग्रहातील त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या सहभागाविषयी काही प्रकाशझोत टाकू शकतील काय ?

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.