Features

ही वेळ का आली ?

जे जे स्कूल ऑफ आर्टला एआयसीटीईकडून मान्यता काढून घेण्याची भयंकर शिक्षा दिली गेली आहे. आशिया खंडात प्रख्यात असलेल्या १६६ वर्ष जुन्या शिक्षण संस्थेवर अशी वेळ येणं हे अतिशय दुर्दैवी आहे. सीईटीचे निकाल लागून कॉलेजेस सुरू होण्याची वेळ आली तरी अद्याप जेजेला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे सीईटीत उत्तीर्ण झालेल्या मुलांनी कुठे प्रवेश घ्यायचा असा प्रश्न त्यांच्या पालकांना पडलेला आहे. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी फी भरून प्रवेश देखील घेतला आहे. पण शिकलो तरी हे शिक्षण अधिकृत असणार आहे का ? असा प्रश्न विद्यार्थ्यांना वारंवार पडतो आहे. हे सारं कशामुळे घडलं याचा शोध घेणाऱ्या लेखमालेतील हा दुसरा लेख.

स्कूल ऑफ आर्ट कॅम्पस मधल्या जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट या दोन कला महाविद्यालयांपैकी एका कला महाविद्यालयाची मान्यता एआयसीटीई अचानक काढून घेते आणि दुसऱ्याची म्हणजे अप्लाइड आर्टची ठेवते याचा अर्थ काय ? याचा अर्थ उघड आहे की एआयसीटीई ज्या कागदपत्रांची मागणी करते, ज्या गोष्टी पुराव्यादाखल दाखवा म्हणून सांगते ती गोष्ट जे जे स्कूल ऑफ आर्टला म्हणजेच पर्यायानं जे जे स्कूल ऑफ आर्ट या १६६ वर्षाच्या नामांकित कला महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना वेळच्या वेळी करता आली नाही हेच या मागचं खरं कारण असावं.

कला संचालक पदी नेमणूक झाल्यावर साबळे यांच्या हितचिंतकांनी केलेला जल्लोष.

गेली अनेक वर्षे या संदर्भात ‘चिन्ह’नं सातत्यानं आवाज उठवला होता. कदाचित वेळोवेळी दिलेल्या बातम्या किंवा लेख आता या क्षणी पुराव्यादाखल देता येणार नाहीत. पण यु ट्यूबवर असलेल्या ‘चिन्ह आर्ट न्यूज’च्या चॅनलला भेट दिलीत तर ‘चिन्ह’नं वेळोवेळी सादर केलेले व्हिडीओज सहजपणे पाहावयास मिळतील. अनेक कलारसिकांकडून त्या त्या वेळी ‘तुम्ही या गोष्टी लक्षात आणून दिल्या होत्या’ असं सांगणारे फोन ‘चिन्ह’कडे सातत्यानं येत आहेत. जे कलारसिकांना कळलं ते जेजे स्कूल चे अधिष्ठाता प्रा ( ? ) विश्वनाथ साबळे यांना योग्य वेळी का कळलं नाही असा प्रश्न अनेक कलारसिक विचारत आहेत. पण हा प्रश्न त्यांनी ‘चिन्ह’ला विचारण्या ऐवजी थेट विश्वनाथ साबळे यांनाच विचारावा अशी आमची त्यांना सूचना आहे.

कारण हे जे काही सारं घडलं आहे, जेजे सारख्या दीडशे वर्ष जुन्या शिक्षण संस्थेची छी थू झाली आहे त्या साऱ्याला विश्वनाथ साबळे हे एकमेव गृहस्थ कारणीभूत आहेत. त्यांनी शिक्षण झाल्या बरोबर लगेचच सह अधिव्याख्याता हे पद मिळवलं आणखीन काही वर्षातच ते प्राध्यापकही( ? ) झाले. पाठोपाठ बहुदा विभाग प्रमुख पद देखील त्यांना मिळालं. विभाग प्रमुख पद मिळाल्यानंतर अधिष्ठाता पद मिळवायला त्यांना फार कालावधी लागला नाही.
( पुरुषस्य भाग्यम ) खरं तर त्यांना थेट महाराष्ट्राचं कला संचालकच व्हायचं होतं. पण त्याच वेळी महाराष्ट्रात सत्ता बदल झाला. युतीचं राज्य आलं. आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी साबळे यांच्या घोडदौडीला चाप लावला. अन्यथा साबळे यांनी महादेव इंगळे यांचीच री ओढून सुखनैवपणे कला संचालक पदाचा कारभार हाकून कला संचालनालयाची आणखीन लवकर वाट लावली असती.

जेजे सोडून विविध कार्यक्रमात व्यस्त असलेले प्रा. साबळे एक सत्कार स्वीकारताना.

विनोद तावडे यांनी कला संचालनालय वाचवण्यासाठी ही मोठी गोष्ट केलीच. आणि याच बरोबर त्यांनी जेजेची वाटचाल डिनोव्होकडे नेली. पण राज्याच्या राजकारणात पुन्हा एक मोठा बदल घडला आणि शिक्षणमंत्री पदी आले उदय सामंत. त्यांना महाराष्ट्रात म्हणे कलेचं विद्यापीठ स्थापन करायचं होतं. पण त्या आधीच डिनोव्होचं घोडं भरधाव धावू लागलं होतं. त्याला चाप बसावा म्हणून सामंतांनी डिनोव्होसाठी नेमलेल्या समितीतील एक सदस्य राजीव मिश्रा, जे प्रभारी कला संचालक होते – त्यांना आर्किटेक्चर कॉलेजमध्ये परत पाठवलं आणि त्यांच्या जागी प्रभारी कला संचालक म्हणून प्रा ( ? ) विश्वनाथ साबळे यांची वर्णी लावली. साबळे यांनी आल्या आल्या पहिलं काम काय केलं असेल तर कला महाविद्यालयांनी बाहेरची व्यावसायिक कामं करावी यासाठी शासनाची परवानगी देणारा विशेष जीआर थेट काढला.

आणि मग काय धमालच उडाली. महाराष्ट्रातल्या विनाअनुदानित कला महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि संचालकांनी एकत्र येऊन साबळे यांचा जंगी सत्कार करायची योजना आखली. हा सत्कार त्यांनी कुठं केला तर अप्लाइड आर्टच्या सभागृहात. त्यासाठी अध्यक्ष कोण होते तर दस्तुरखुद्द शिक्षणमंत्री उदय सामंत. खरं तर शासकीय रितीरिवाजात असे समारंभ बसत नाहीत. पण साबळेंना हो कोण विचारतो ? आणि त्यांच्याशी पाठीशी तर काय स्वतः शिक्षणमंत्रीच होते. काय तो समारंभ ? काय ती भाषणं ? काय ती उपस्थिती ? आणि सर्वावर कडी म्हणजे या समारंभात साबळे साहेबांना सर्व विनाअनुदानितच्या शिक्षक, प्राचार्य आणि संचालकांनी उचलून अक्षरशः हवेत उडवले. एखाद्या कुस्तीगीराला हवेत उडवतात तसे.

जेजेच्या प्रमुखपदी विराजमान व्यक्तींची नावे. जसा काळ पुढे जात राहिला जेजेची दुर्दशा सुरु झाली.

कॅम्पसमधले सुशिक्षित – सुसंस्कृत विद्यार्थी आणि शिक्षक हा सारा प्रकार पाहून अक्षरशः हसत होते. काहींना तर भीती वाटत होती. की यांची गावात जसे गुलाल उधळून मिरवणूक काढतात तशी मिरवणूक जेजेच्या परिसरात काढतात की काय असा प्रश्न त्यांना पडला होता. पण सुदैवानं त्यांनी ती पायरी गाठली नाही हे कला संचालनालयाच्या परिसराचे नशीब.

त्यानंतर प्रा साबळे यांचा वारू स्वैर उधळला. खरं तर महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाला गती मिळावी यासाठी साठच्या दशकात कला संचालनालयाची स्थापना झाली. पण साबळे साहेबांना त्याची काही पडलेली नव्हती. ती पडली असती तर कलाशिक्षणात त्यांनी काही तरी करून दाखवलं असतं. पण त्यांना पडली होती सरकारी आणि निमसरकारी कामांची. कला संचालक झालो आहोत तर मंत्रालयातून निघणारी सारीच्या सारी कामं जे जे स्कूल ऑफ आर्टच्या द्वारे केली जावी यासाठी त्यांनी एक प्लॅन बनवला. खरं तर तो त्यांनी बनवला असं म्हणणं चुकीचं आहे कारण ते जेजेचे अधिष्ठाता झाल्या पासूनच तो अस्तित्वात आणला होता. तो त्यांनी इथं कला संचालनालयात अगदी कायदेशीर स्वरूप देऊन प्रत्यक्षात आणला.

जेजेमधील कलाकृती धूळ खात पडलेल्या आहेत.

त्यासाठी त्यांना वेगळं काही करावं लागलं नाही. कारण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे तयारच होतं. त्यातलेच त्यांनी चार शिक्षक उचलले आणि त्यांना कामाला लावलं. एकानं पत्रव्यवहार आणि व्यवस्थापन पाहायचं. दुसऱ्यानं मंत्रालयात जाऊन कुठल्या कुठल्या विभागातून कुठली कुठली कामं मिळू शकतील याची पाहणी करायची. तिसऱ्यानं या सर्व कामांची प्रत्यक्ष जबाबदारी घ्यायची आणि ती पूर्ण करायची. तर चौथ्यानं कामासाठी लागणारं मनुष्यबळ ( म्हणजे काय तर चांगलं काम करणारे हुशार विद्यार्थी किंवा शिक्षणक्रम संपवून बाहेर पडलेले माजी विद्यार्थी ) यांना गोळा करायचं. अशी विभागणी झाली.

हे सारं साबळे यांनी डीन म्हणून बस्तान बसल्यावरच सुरू झालं होतं. पण प्रभारी कला संचालक म्हणून चार्ज मिळाल्यावर त्यांनी हे सारं उघड उघड करायला सुरूवात केली. या संदर्भात असंख्य किस्से कला वर्तुळात आणि जेजेच्या परिसरात प्रचलित आहेत. हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे शिक्षण देण्याचं आपलं मूळ काम सोडून साबळे यांनी जेजे आणि कला संचालनालयात बसून जो पॅरलल उद्योग सुरू केला होता त्या उद्योगामुळेच आज जे जे स्कूल ऑफ आर्टची ही जाहीरपणे नाचक्की झाली आहे. या व्यावसायिक कामात सदैव गुंतल्यामुळेच एआयसीटीई सारख्या संस्थेची मान्यता मिळवणं वगैरे शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणं त्यांना शक्य झालं नाही. परिणामी संस्थेची मान्यता गेली. १६६ वर्ष जुन्या शिक्षण संस्थेची मान्यता काढून घेणं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हे. पण ती घडून आली आहे या अशाच साबळे यांनी केलेल्या उफराट्या उद्योगामुळे.

या उद्योगांकडेच त्यांचं चौफेर लक्ष असल्याचा आरोप तिथले शिक्षक जाहीरपणे करतात. म्हणूनच आपल्या जवळ जवळ दीड दोन दशकांच्या कारकिर्दीत जेजेच्या शिक्षण प्रक्रियेत कुठल्याही शैक्षणिक उपक्रमाची ते भर टाकू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यांचं लक्ष सदा सर्वकाळ कामं मिळण्या मागे आणि मिळालेली कामं पूर्ण करण्यामध्येच होतं. बरं ही कामं काही छोटी मोठी नव्हती कोट्यवधी रुपयांची होती. अशी कामं मिळाल्यावर कुठलाही माणूस आपल्या नोकरीकडे लक्ष देईल की अशा लक्षावधी रुपये मिळवून देणाऱ्या कामांकडे लक्ष देईल ? तिथंच साबळे यांचं सारं गणित चुकलं. त्यातच वर कुणी विचारणा करणारे नसल्यामुळं ( जे होते त्यांना साबळे यांनी साम दाम दंड भेद वापरून आपलंस करून घेतलं होतं ) या संदर्भातल्या बऱ्याचशा बातम्या ‘चिन्ह’नं वेळोवेळी पुराव्यानिशी प्रसिद्ध केल्या. पण ना कला संचालकांनी त्याकडे लक्ष दिलं. ना मंत्रालयातल्या उच्च व तंत्रशिक्षण खात्यातल्या कला संचालनालया संबंधीच्या डेस्कवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी.

जेजेमधील वर्गखोल्यांची दुरावस्था.

त्यांनी केलेल्या या अक्षम्य दुर्लक्षामुळेच आज जेजेवर ही परिस्थिती ओढवली आहे. या लेखमालेमध्ये या सर्व गोष्टी आम्ही पुराव्यानिशी देणार आहोत. या संदर्भात माहितीच्या अधिकारात ‘चिन्ह’नं अर्ज देखील केले आहेत. पण महिना दीड महिना उलटला तरी त्या पत्रांना उत्तरे आलेली नाहीत. असे असंख्य अर्ज आमच्यापाशी तयार आहेत. पहिल्या अर्जाला कसं उत्तर मिळतं ते पाहूनच आम्ही पुढील कारवाई करणार आहोत. ही लेखमाला कधी संपणार हे आता त्या मिळणाऱ्या प्रतिसादावरच अवलंबून आहे. तोपर्यंत आम्ही लिहीत राहणार आहोत आणि तुम्ही वाचत राहणार आहात. नाही का !

********
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
www.chinha.in

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.