Features

अंबानींंचं ‘NMACC’ आहे तरी कसं ?

मागच्या दोन आठवड्यात इंटरनेटवर ज्या कार्यक्रमाची प्रचंड चर्चा झाली तो कार्यक्रम म्हणजे नीता अंबानी यांच्या ‘NMACC’ या सांस्कृतिक केंद्राचं उदघाटन. हॉलिवूड, बॉलीवूड अशा दोन्ही ठिकाणच्या झाडून साऱ्या सेलिब्रिटी या कार्यक्रमाला हजर होत्या. ही ताकद अंबानींचीच. अंबानीनी या सेंटरमध्ये दृश्यकलेला जे महत्वाचं स्थान दिलं आहे ते पाहून कोणत्याही कलाकाराला आनंदच होईल. प्रचंड गाजावाजा करून सुरु झालेल्या या सेंटरला ‘चिन्ह’चे लेखक विनील भुर्के यांनी भेट दिली. या भेटीनंतर हे सेंटर कसं वाटलं, इथं काय काय पाहता येईल आणि या सेंटरला कलेच्या दृष्टीने काय महत्व आहे याबद्दल हा लेख त्यांनी खास ‘चिन्ह आर्ट न्यूज’च्या वाचकांसाठी लिहिला आहे.

NMACC – मुख्य प्रवेशद्वार.

NMACC – नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राचे नुकतेच ३१ मार्च २०२३ रोजी उद्घाटन करण्यात आले. मुंबईतील BKC येथे असलेले हे केंद्र भविष्यात भारतातील एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाणार आहे. इथे भेट देणाऱ्या कलारसिकांना वेशभूषा, नृत्य व नाट्यकला आणि दृश्यकला यांच्या माध्यमातून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासाचा संवेदनाक्षम प्रवास अनुभवायला मिळेल, अशी घोषणा केंद्राच्या वतीने केली गेली आहे.

या केंद्राच्या संस्थापिका आणि अध्यक्षा नीता मुकेश अंबानी यांनी या केंद्राबद्दलचे त्यांचे महत्त्वाकांक्षी स्वप्न, “आपल्या राष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरेल असे हे केंद्र असून, भारतीय कलांचे जतन आणि संवर्धन करणे हे या सांस्कृतिक केंद्राचे उद्दिष्ट आहे. मला आशा आहे की आमचे हे केंद्र प्रतिभेचे संगोपन करेल आणि कलाकारांना प्रेरणा देईल, त्यामुळे संपूर्ण भारतातील आणि जागतिक कलासमुदाय एकत्र येतील.” अशा शब्दांमध्ये व्यक्त केले आहे.

परफॉर्मिंग आर्ट्स, व्हिज्युअल आर्ट्स, वेशभूषा आणि चित्रपटांच्या क्षेत्रात जागतिक दर्जाचे कला-अनुभव भारतात आणण्याचा प्रयत्न करत असलेला हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ही भव्य उद्दिष्टे साकार करण्यासाठी NMACC मध्ये काही प्रमुख सुविधा निर्माण केल्या आहेत – द ग्रँड थिएटर, बॉक्स ऑफिस, द आर्ट हाउस, जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, द क्यूब आणि स्टुडिओ थिएटर. यातील प्रत्येक सुविधेची सुरुवात त्यांच्या पहिल्या कार्यक्रम किंवा प्रदर्शनाने झाली आहे आणि भविष्यातही असेच स्वतंत्रपणे क्युरेट केलेले शो आयोजित करण्यात येणार आहेत. इथे येणारे कलारसिक त्यांच्या आवडीचे शो निवडून त्यांचे ऑनलाइन बुकिंग करू शकतील.

NMACC चे भौगोलिक स्थान मुंबईतील BKC (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स) या मध्यवर्ती व्यावसायिक परिसरात आहे, त्यामुळे शहराच्या कोणत्याही भागातून इथे सहज येता येईल. शिवाय, हे ठिकाण मुंबईबाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठीसुद्धा  सोयीचे आहे. NMACC कॅम्पस BKC च्या सुनियोजित कॉर्पोरेट क्षेत्रात चपखल  बसतो. तसेच सांस्कृतिकदृष्ट्या, तिथल्या कॉर्पोरेट क्षेत्राला कला, संस्कृती आणि मनोरंजनाचे पैलू जोडून, त्याला पूरक वातावरण निर्माण करतो. या केंद्राचा कॅम्पस उत्तम प्रकारे डिझाइन केलेला असून, एखाद्या आधुनिक आणि मोठ्या कॉर्पोरेट उद्योग समूहाशी तुलना करता येण्यासारखा आहे, आणि जिओ साम्राज्याच्या प्रतिमेला अगदी साजेसा आहे.

‘संगम – Confluence’

या प्रदर्शनात विविध कला माध्यमे आणि तंत्रांचा संगम असलेल्या चित्रे, शिल्पे, कोरीवकाम, छायाचित्रे आणि समकालीन कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन समकालीन भारतीय आणि जागतिक कलाकारांच्या कलाकृतींद्वारे सादर केलेला भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृती आणि परंपरांचा उत्सव आहे, असे म्हटले जाते. हे प्रदर्शन अमेरिकन क्युरेटर जेफ्री डीच आणि भारताचे आघाडीचे सांस्कृतिक सिद्धांतकार रणजीत होस्कोटे यांनी मिळून क्युरेट केले आहे. या प्रदर्शनात १० कलाकारांच्या (५ भारतीय आणि ५ आंतरराष्ट्रीय) अनोख्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. इथे आघाडीच्या भारतीय कलाकार भारती खेर तसेच, छत्तीसगडमधील बस्तर येथील आदिवासी समाजातील कलाकार शांतीबाई या त्यांच्या कलाकृतींमधून महिलांचे जीवनप्रवास आणि दृश्य-अनुभव मांडतात, तर भूपेन खाखर, रंजनी शेट्टार आणि रथीश टी या भारतीय कलाकारांनी त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कला-दृष्टिकोन मांडले आहेत. तसेच भारतापासून प्रेरणा घेत असलेले त्यांचे जागतिक समकक्ष कलाकार – अँसेल्म किफर (जर्मनी), सेसिली ब्राउन (ब्रिटन), फ्रान्चेस्को क्लेमेंट (इटली), लिंडा बेंगलीस (अमेरिका) आणि रकीब शॉ (जन्माने भारतीय, लंडनस्थित कलाकार) यांचे भारतात प्रथमच एकत्रित प्रदर्शन होत आहे. सह-क्युरेटर रणजित होस्कोटे यांच्या आवाजातील अभ्यासपूर्ण ऑडिओ मार्गदर्शन या प्रदर्शनासह उपलब्ध आहे. ते कार्यक्रमस्थळी उपलब्ध असलेला QR कोड स्कॅन करून एका मायक्रो-साइटद्वारे ऐकता येते. त्यासाठी कलारसिकांना स्वत:च्या स्मार्टफोनवरून हे ऐकता यावे यासाठी त्यांना स्वतःचे हेडफोन घेऊन येण्याचा सल्ला केंद्राच्या वतीने दिला गेला आहे. तसेच, गॅलरीत वेगवेगळ्या मजल्यांवर उपलब्ध असलेल्या स्मार्ट किऑस्कवर कलाकारांबद्दलचे ऑडिओ आणि व्हिडिओ भाष्यही अनुभवता येईल. प्रत्येक कलाकाराच्या कलात्मक प्रक्रियेची ओळख आपल्याला आपल्या गतीने करून घ्यायची असेल, तर त्यासाठी याची चांगली मदत होऊ शकेल.

क्युरेटर्सनी लिहिलेल्या संकल्पनात्मक टिपणामध्ये नमूद केले आहे की, समृद्ध आणि वैविध्यपूर्ण अशा भारतीय संस्कृतीने कल्पना आणि भौतिकता यांच्यातील परस्परसंवाद सतत होत राहिला आहे. त्यात पुढे असे म्हटले आहे की ‘संगम – Confluence’ हे प्रदर्शन भाषिक आणि कलात्मक विविधतेचे रूपक केवळ कला-निर्मितीची भाषा, माध्यम किंवा शैली यापुरते मर्यादित ठेवत नाहीत. तर, ते निर्मितीच्या विविध शक्यता कशा प्रकारे आजमावून पाहतात, याचादेखील विचार करते. कलाकारांनी वापरलेल्या अभिव्यक्तीच्या पद्धती, निर्मिती प्रक्रिया आणि कलामाध्यमांच्या विविधतेवरून हे स्पष्ट होते. प्रत्येकजण वरवर भिन्न भासणारी कला-परिभाषा वापरत आहे, तरीही सर्वांचा प्रयत्न एक समग्र, एकत्रित दृश्य-अनुभव, म्हणजेच अनेक दृश्य-अनुभवांचा ‘संगम’ होण्याची पराकाष्ठा करत आहे, अशी यामागची संकल्पना आहे.

प्रदर्शनातील कलाकृतींच्या जोडीने त्यात सहभागी कलाकारांची उद्बोधक अवतरणेसुद्धा दिली आहेत. ही अवतरणे त्यांच्या कलाविषयक तत्वज्ञानाचे सार, त्यांच्या कलाप्रक्रिया आणि त्यांच्या कलेच्या पद्धतींचे प्रतिनिधित्व करतात. ही अवतरणे या गॅलरीच्या पायऱ्यांच्या आजूबाजूला सौंदर्यपूर्ण पद्धतीने मांडलेली आहेत. त्यामुळे ती वाचत पायऱ्या चढत असताना ती कलारसिकांना शब्दश: आणि रूपकात्मक या दोन्ही प्रकारे एका उंचीवर घेऊन जातात. अशाप्रकारे, ही अवतरणे कलाकृती पाहण्याच्या रसिकांच्या समग्र अनुभवामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात, तरीही कलाकृतींच्या दृश्य-अनुभवात रसिकांवर अतिरिक्त भार मात्र टाकत नाहीत.

फ्रान्चेस्को क्लेमेंट – ‘Everything only’, 2020

आर्ट गॅलरीच्या आतील अवकाश (उंची आणि क्षितिजाला समांतर विस्तार या दोन्ही प्रकारे) आणि त्या अवकाशाला व्यापणारा नैसर्गिक प्रकाश यांचादेखील रसिकांच्या दृश्य-अनुभवामध्ये महत्त्वाचा सहभाग असतो. प्रत्येक वरच्या मजल्यावर जाताना, तिथल्या छताची उंची खालच्या मजल्यापेक्षा अधिक असल्याचे लक्षात येते, ज्यामुळे साहजिकच एक प्रकारची विशालतेची भावना निर्माण होते. गॅलरीच्या एका बाजूला संपूर्णपणे व्यापून असलेल्या पारदर्शी काचेच्या दर्शनी भागातून येणारा नैसर्गिक प्रकाश एक प्रकारचे बौद्धिक प्रदीपन करतो आणि त्याचवेळी आपण अवकाशात तरंगत असल्याची भावना निर्माण करतो. हे सर्व त्या वरच्या मजल्यांवर प्रदर्शित केलेल्या मोठ्या आकाराच्या कलाकृती पाहण्याचा अनुभव देखील अधिकच समृद्ध करते. इथे असलेल्या मोठ्या आकाराच्या कलाकृतींमध्ये, अँसेल्म कीफरची ‘The fertile crescent’ आणि ‘There are still songs to sing beyond mankind’ या शीर्षकांची चित्रे, लिंडा बेंगलीसचे ‘Power Tower’ नावाचे शिल्प आणि रंजनी शेट्टार यांचे ‘Sundew’ नावाचे मांडणीशिल्प या कलाकृती त्यांच्या प्रचंड मोठ्या आकारांमुळे विशेष उल्लेखनीय आहेत. गॅलरीच्या वरच्या मजल्यांवर उपलब्ध असलेल्या पुरेशा मोठ्या जागेमुळे या कलाकृती अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येतात. गॅलरीच्या चार मजल्यांवरून या प्रदर्शनाचा आरामात अनुभव घेत फिरण्यासाठी किमान एक तास किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो. या संपूर्ण दृश्य-अनुभवामुळे निर्माण झालेली अत्युच्च आनंदाची अवस्था अनुभवत कलारसिक अजून काही मिनिटे तिथेच व्यतीत करू शकतात.

भारती खेर – ‘An absence of assignable cause’, २००७ (समोरील शिल्प) – ‘I never saw you for what you really are’, २००८ (उजवीकडे मागच्या बाजूला असलेले चित्र)

सेसिली ब्राउन – ‘Jungle Treatment’, 2013-14

लिंडा बेंगलीस – ‘Power Tower’, 2019

अँसेल्म किफर – ‘The fertile crescent’, 2009

अँसेल्म कीफर – ‘There are still songs to sing beyond mankind’, 2012

शांतीबाई – ‘शीर्षकविरहित’ (लाकडी कोरीवकाम)

रंजनी शेट्टार – ‘Sundew’, 2023

‘इंडिया इन फॅशन’

‘इंडिया इन फॅशन’ हे भारतीय पारंपरिक फॅशन आणि कोटूरचा प्रभाव असलेल्या  आंतरराष्ट्रीय स्तरावरील फॅशन उद्योगातील ट्रेंड्सचे अगदी मंत्रमुग्ध करणारे प्रदर्शन आहे. ते ब्रिटिश फॅशन पत्रकार Hamish Bowels यांनी क्यूरेट केले आहे. यात १० उत्तम प्रकारे क्युरेट केलेले विभाग आहेत. त्यामध्ये फॅशनमधील गेल्या २५० वर्षांमध्ये आलेली विविध युगे, जागतिक मेगा-ट्रेंड्स आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त, ज्यांच्यावर भारतीय फॅशन घटकांचा मोठा प्रभाव आहे अशा आंतरराष्ट्रीय आणि भारतीय फॅशन डिझायनर्सचे काम बघायला मिळते. यामध्ये जगप्रसिद्ध Paris couture मधील Chanel, Christian Dior, Yves Saint Laurent, तसेच ब्रिटन मधील Alexander McQueen या सन्माननीय नावांचा, तसेच मनीष मल्होत्रा, सब्यसाची, अबू जानी-संदीप खोसला, अनुराधा वकील व राहुल मिश्रा या समकालीन भारतीय फॅशन डिजायनर्सच्या नवनवीन कामांचा समावेश आहे. हे प्रदर्शन म्हणजे भारतीय फॅशनचा जागतिक स्तरावर पडलेल्या प्रभावांचा एक दृश्य-इतिहास आहे. कारण यात अगदी १७५० पासून २०२३ पर्यंतचा काळ समाविष्ट आहे.

जामा , शाल आणि पटका – यॉर्क आर्ट गॅलरी, इंग्लंड 1750

इंग्लंडमधील यॉर्क आर्ट गॅलरीच्या संग्रहातील १७५० मधील जामा, शाल आणि पटका (‘संपूर्ण पोशाख’ या अर्थाचा ‘जामा-निमा’ असा शब्द आहे, त्यातील ‘जामा’ तो हाच!) हा खास भारतीय पोशाख इथे बघायला मिळतो. १७५० मधील बेल्जियम मधील Antwerp येथील दक्षिण भारतीय कलेचा प्रभाव दाखवणारे पोशाख, ब्रिटिश संग्रहालयातील १८३० सालातील शानदार भारतीय रेशमी Court suit, १८५१ साली लंडनमध्ये झालेल्या फॅशन शो मधील भारतीय पोषाखांवरून प्रेरणा घेऊन तयार केलेले पोशाख, १९०३ मध्ये Jean Philippe Worth या जगप्रसिद्ध फ्रेंच फॅशन डिझायनरने तयार भारतीय पोषाखांवरून प्रेरणा घेऊन तयार केलेले पोशाख, भारतीय साडीवरून प्रेरणा घेतलेला लंडनमधील Christian Dior ने १९५६ मध्ये बनवलेला Evening dress, २००९ मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी व्हाइट हाऊस येथे झालेल्या इंडिया स्टेट डिनरसाठी नईम खान यांच्याकडून खास डिझाईन करून घेऊन परिधान केलेला, भारतीय पद्धतीची फुले असलेले भरतकाम करून सजवलेला पोशाख (प्रदर्शनात ठेवला आहे तो खरा पोशाख नव्हे, त्याची प्रतिकृती ठेवली आहे.) अशा अनेक ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अतिसुंदर चमत्कृती इथे बघायला मिळतात. 

नईम खान – मिशेल ओबामा यांचा पोशाख, 2009 (प्रतिकृती)

त्यामुळे हे प्रदर्शन फॅशन डिझाईन आणि टेक्सटाईलच्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम दर्जाची शैक्षणिक सहल म्हणूनही उपयुक्त आहे. इथे फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश आहे. तसेच २५० वर्षांहून अधिक वर्षांच्या इतिहासातील पोशाखांच्या शानदार मांडणीमुळे हे प्रदर्शन फॅशनप्रेमी आणि अन्य सामान्य माणसांसाठीही तितकेच आकर्षक आहे. सर्वच पोषाखांवर त्यांची थोडक्यात माहिती देणारी लेबले आणि टिपा दिल्या आहेत. तसेच आकर्षक प्रकाशयोजना व उत्कंठावर्धक पार्श्वसंगीत यामुळे प्रदर्शन चित्तवेधक झाले आहे. या प्रदर्शनात अनेक शालेय विद्यार्थी सुद्धा आलेले दिसले. त्यांच्यापैकी काहींना भविष्यात फॅशन डिझाईन मध्ये करियर करण्याची प्रेरणा नक्कीच मिळाली असेल. जगातील महत्त्वाचे फॅशन डिझायनर्स आणि त्यांच्या कलेक्शनमागील भारतीय प्रेरणास्रोत लक्षात घेत हे प्रदर्शन आरामशीर बघायला साधारण एक तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

Jean Philippe Worth – कोर्ट ड्रेस, 1903

पाश्चिमात्य जगातील फॅशन डिझायनर्स गेल्या काही शतकांपासून भारतीय पारंपारिक पोशाख, फॅशन आणि कोटूरने प्रभावित झाले आहेत असे दिसते, परंतु त्याच वेळी भारत मात्र वसाहतवादी परचक्राच्या वेदना सहन करत होता. त्यामध्ये भारताच्या पारंपारिक हस्तकला, हातमाग अक्षरशः नष्ट केल्या गेल्या होत्या. हा एक फार मोठा विरोधाभास आहे! आता आधुनिक काळात मात्र आपण पुन्हा एकदा भारतीय फॅशनपासून जगाला प्रेरणा मिळाली होती, हे सत्य साजरे करत आहोत.

NMACC कॅम्पसमध्ये बघण्यासारखे अजून काही 

‘स्वदेश’ विभागामध्ये एक विणकर हातमागाचे प्रात्यक्षिक दाखवताना.

फॅशन प्रदर्शनाव्यतिरिक्त, इथे ‘स्वदेश’ नावाचा भारतीय हस्तकलेला समर्पित एक स्वतंत्र विभाग आहे. त्यात भारतातील पारंपारिक कला आणि हस्तकलेची झलक दाखवणारे कारागिरांचे बूथ आहेत. त्यामध्ये भारताच्या विविध भागांमधील कारागिरांचा समावेश आहे, हातमागावर विणकाम करणे, साड्या आणि पैठणी तयार करणे, पट्टचित्र कला, कार्पेट्स, मेणबत्त्या तयार करणे या भारतीय कारागिरांच्या काही उत्कृष्ट हस्तकला इथे प्रदर्शित केल्या आहेत. इथे त्यांची उत्पादने प्रदर्शित केली आहेत, तसेच तिथे ते प्रेक्षकांना त्यांच्या कलेचे व कारागिरीचे कलाकुसरीचे लहानसे पण आकर्षक प्रात्यक्षिक देतात, तसेच त्यांची उत्पादने विक्रीसाठीही उपलब्ध आहेत.

यायोई कुसामा – ‘Clouds’, 2019

याशिवाय, संपूर्ण कॅम्पसमध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या चित्र आणि शिल्पांचे कायमस्वरूपी संग्रह आणि प्रदर्शन केले आहे. हा संग्रह शैली, तंत्र आणि प्रक्रियांच्या बाबतीत वैविध्यपूर्ण आहे. ‘न्यूयॉर्क स्कूल’ समूहातील यायोई कुसामा सारखी जागतिक स्तरावर प्रशंसित समकालीन कलाकार तसेच सतीश गुजराल आणि सुबोध गुप्ता यांसारखे प्रसिद्ध समकालीन भारतीय कलाकार यांच्या आकर्षक शिल्पांचे सादरीकरण इथे केले आहे.

अशा प्रकारे NMACC भारताच्या कला-परिदृश्यावर छाप पाडण्यासाठी सज्ज आहे.

आता भारतीय कलाकार आणि कलाप्रेमी या ऑफरला कसा प्रतिसाद देतात, यावर सर्व अवलंबून आहे.

NMACC मधील आताचे काही प्रमुख कार्यक्रम असे आहेत:

1. ‘द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन’ 

फिरोज अब्बास खान यांची एक संगीतमय कलाकृती जी भारतीय नृत्य, नाटक, संगीत, कला इत्यादींच्या माध्यमातून भारताच्या प्रवासाचा मागोवा घेते.

तारखा: ३ एप्रिल ते २३ एप्रिल २०२३

स्थळ: ग्रँड थिएटर

तिकीट दर: रु ४०० पासून पुढे 

2. ‘संगम – Confluence’

भारताचा प्रभाव असलेल्या समकालीन भारतीय व आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या कलाकृतींचा उत्सव.

तारखा: ३ एप्रिल ते ४ जून २०२३

स्थळ: आर्ट हाऊस

तिकीट दर: रु १९९ 

3. ‘इंडिया इन फॅशन’

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय फॅशनचा प्रभाव दर्शवणारे प्रदर्शन.

तारखा: ३ एप्रिल ते ४ जून २०२३ 

स्थळ: पॅव्हेलियन १

तिकीट दर: रु १९९ 

4.‘द साऊंड ऑफ म्युझिक’

Tony Award® विजेता आंतरराष्ट्रीय ब्रॉडवे म्युझिकल NMACC ने प्रथमच भारतात आणले आहे.

तारखा: ३ मे ते २१ मे २०२३

स्थळ: ग्रँड थिएटर

तिकीट दर: रु १००० पासून पुढे

 

या व्यतिरिक्त, नाट्य, कविता, नृत्य, संगीत यासह विविध कार्यक्रम इव्हेंट कॅलेंडरमध्ये आहेत. कोणत्याही शोसाठी आगाऊ ऑनलाइन बुकिंग करणे आवश्यक आहे. 7 वर्षांखालील मुले, ज्येष्ठ नागरिक आणि फॅशन आणि आर्ट स्कूलचे विद्यार्थी कॅम्पसमध्ये विनामूल्य प्रवेश करू शकतात.

तिकीट बुकिंग आणि संपूर्ण इव्हेंट कॅलेंडर पाहण्यासाठी संकेतस्थळ 

https://nmacc.com/ 

*******

– विनील भुर्के

लेखक स्वयं-शिक्षित कलाकार आणि कला-अभ्यासक आहेत.

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.