Features

सुरेश आवारींची नियती

प्रभाकर बरवे ज्या डेस्टिनीचा उल्लेख करायचे तिचा थांग ना ज्योतिष्यांना लागतो, ना तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांना ! ही नियती काहींना भरभरून देते तर काहींना आयुष्यभर छळत राहते. चित्रकार सुरेशचंद्र भाऊराव आवारी यांच्या आयुष्याची कहाणी जाणून घेतली की नियतीच्या क्रौर्याची बोचरी जाणीव अधिक स्पष्टपणे होते. जेजे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी असलेले आवारी हे डॉली करसेटजी पदक विजेते. आवारी यांनी आयुष्यभर प्रचंड काम केलं. पण म्हणावी तेवढी प्रसिद्धी त्यांच्या वाट्याला आली नाही. अनेक दुय्यम दर्जाचे चित्रकार मोठ्या मोठ्या पदावर विराजमान होतात, काहींना जागतिक कीर्ती मिळते. पण सुरेशजींच्या बाबतीत नियतीनं असा दुजाभाव का केला असावा असा प्रश्न पडतो. बरं हा अन्याय इथेच थांबत नाही. तर वयाच्या सत्तरीत नियतीनं त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आंबा खरं तर आनंद देणारं फळ पण या आंब्यानंचं त्यांचा घात केला. नेहमीसारखं रुटीन सुरु असलेल्या एका दिवशी आंबा खाताना तो खाली पडला म्हणून ते उचलायला गेले आणि अडखळून पडले. त्यानंतर निदान झालं तेव्हा कळलं की त्याना ब्रेन हॅमरेज झालं. तेव्हापासून ते अक्षरश: एका जागी कुठलीही हालचाल न करता खिळून आहेत. या संकटामुळे आज त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर संकट कोसळलं आहे. अक्षरश: लाखो रुपये त्यांच्या इलाजावर खर्च होत आहेत. पण शासन मात्र या ज्येष्ठ चित्रकाराला कुठलीही मदत करत नाहीये. ना शासन दरबारी विशेष वजन असलेले चित्रकार या कामी प्रयत्न करत आहेत.

एवढंच नाही ज्या एनजीएमएमध्ये ‘महाराजाचा खजिना’ या प्रदर्शनाचं थाटात उदघाटन झालं, त्या प्रदर्शनाच्या क्युरेटरनीही आवारींच्या कामाची दाखल घेतली नाही. खरं तर आवारींनी जे आर डी टाटांचं सुरेख पोर्ट्रेट एअर इंडियाच्या कॅलेंडरसाठी केलं होतं. त्या पोर्ट्रेटला कुठलंही स्थान या प्रदर्शनात मिळालं नाही! चित्रकार सुरेशचंद्र आवारी यांची ही कहाणी. प्रभाकर बरवे ज्या डेस्टिनीचा उल्लेख करत त्याचा पुरेपूर अनुभव देते. आम्हाला अशी आशा आहे की हा लेख वाचून कला वर्तुळातील चित्रकार आवारींना नक्कीच मदत करतील. आपण सगळे जर एकत्र येऊन त्यांना मदत केली तर कलाकारांवर नेहमीच अन्याय करणाऱ्या नियतीला आपल्याला शह देता येईल.

आज १७ जून २०२३. गेल्या वर्षी याच तारखेला संकष्टी चतुर्थी होती. तसा तो भाविक. उपास तापास करायचा. चतुर्थीचा उपासही त्यानं धरला होता. तसा तो हेल्थ कॉन्शस होता. भरपूर चालायचा. पोहायला वगैरे जायचा. शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या मुलीच्या घरी देखील तो चार जिने चढूनच जायचा. पेंटिंग वगैरे तर सतत करायचा.

एअर इंडियाच्या कॅलेंडरची सुरेश आवारी यांनी केलेलं जे आर डी टाटा यांचं पोर्ट्रेट.

त्या दिवशी असाच संध्याकाळी तो शेजारी असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या लोकांना भेटून त्यांच्याशी गप्पा वगैरे मारून घरी आला. पाहतो तर बायको योगाच्या क्लासला गेलेली. थोडीशी भूक लागल्या सारखं वाटलं. काय घरात आहे पाहूया असं म्हणून स्वयंपाक घरात त्यानं नजर टाकली, तर त्याला आंबे दिसले. आंबा हे फळ त्याचा जीव की प्राण. त्यानं त्यातला एक आंबा निवडला. चांगला धुतला आणि स्वयंपाकघरातली सूरी घेऊन तो कापायला गेला. तितक्यात तो आंबा त्याचा हातातून निसटला आणि खाली पडला.

९ जून २०२२ रोजी आवारी यांचा ७० वा वाढदिवस साजरा झाला होता.

माणसाच्या आयुष्यात एकच क्षण असा असतो. की तो क्षण सारं होत्याच नव्हतं करतो. चित्रकार प्रभाकर बरवे त्याला डेस्टिनी म्हणायचे. म्हणायचे माणसाची डेस्टिनी त्याच्याबरोबर चालतच असते. त्याच्या बाबतीत ते खरोखरच लागू पडलं. त्यानं हातात आंबा घेतला सुरीनं तो कापायला गेला. इतक्यात तो त्याच्या हातातून खाली पडला आणि घरंगळला. पकडायसाठी म्हणून तो धावला आणि तिथंच डेस्टिनीनं त्याला पकडलं असावं.

योगाचा क्लास संपून बायको आठ साडेआठ वाजता घरी आली. तर घरात तिला काळोख दिसला. दरवाजा उघडून आत शिरली पाहतो तर हा बेशुद्ध पडलेला. बाजूला उलटी झालेली. एका बाजूला आंबा तर दुसऱ्या बाजूला सूरी. तिनं किंकाळी फोडली. आजूबाजूचे शेजारी धावत आले. शेजारच्या विंगमध्ये त्याची लग्न झालेली मुलगी राहत होती तिलाही कोणीतरी बोलवून आणलं. डॉक्टरांना देखील कोणीतरी शेजाऱ्यांनी बोलवून आणलं. डॉक्टरांनी त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवायला सांगितलं.

मोठ्या मोठ्या डॉक्टरांच्या तपासण्या झाल्या. ब्रेन हॅमरेजच निदान झालं. मोठ्या प्रमाणावर आतल्या आत रक्तस्त्राव झाला होता. शस्त्रक्रिया करणं अत्यावश्यक होतं. मुलीनं परवानगी दिली. पहाटेपर्यंत तब्बल चार तास शस्त्रक्रिया चालू होती.

ही घटना घडली १७ जून २०२२ च्या सायंकाळी सात साडेसातच्या सुमारास. उघडकीला आली आठ साडेआठच्या सुमारास. आज १७ जून २०२३. बरोबर एक वर्ष झालं. तेव्हा पासून ते आजतागायत तो एकही शब्द बोललेला नाही. उठणं, बसणं, चालण्याची गोष्टच सोडा, तो साधं बोलू देखील शकलेला नाही. जसाच्या तसा बेडवर झोपलेला आहे.

तब्बल एक महिना तो हॉस्पिटलमध्ये होता. आठ – नऊ लाख रुपये त्याच्यावर खर्च झाले. अखेरीस डॉक्टरांनी त्याला घरी न्यायला सांगितलं. गेले अकरा महिने त्याच घर म्हणजे हॉस्पिटलमधली एक खोली झाली आहे. सर्व काही त्याला तिथंच दिलं जातं. फिजिओथेरपी दिली जाते. बारा बारा तासाच्या अंतरानं दोन नर्स त्याची देखभाल करतात. महिन्याला तब्बल एक लाख रुपये यातच खर्ची होतात.

हा लेख लिहीत असतानाची तारीख देखील १७ जून हीच आहे. गेल्या वर्षभरात त्याच्या आयुष्यात काही एक घडलेलं नाही. आंबा वगैरे उचलताना तो पडला ही त्याच्या घरच्यांची समजूत आहे. खरं काय घडलं हे कोणालाच ठाऊक नाही. आणि इथून पुढं देखील ते कुणालाच कळणार नाही.

******

ही गोष्ट आहे सुरेशचंद्र भाऊराव आवारी या सत्तरी गाठलेल्या चित्रकाराची. हा सुरेश जेजेत मला तीन – चार वर्ष सिनियर होता. नगरहून आला होता. मोठ्या कष्टानं त्यानं त्याचं शिक्षण पूर्ण केलं. शिकत असतानाच जेजेतलं मानाचं ‘डॉली करसेटजी’ अवार्ड देखील त्यानं मिळवलं होतं. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, आर्टिस्ट सेंटर या संस्थांची पारितोषिक त्यानं सतत पटकावली होती. इतकंच नाही तर ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार देखील त्यानं पटकावला होता. २००४ सालापर्यंत त्यानं आपल्या चित्रांची पंचवीस एक प्रदर्शनं देखील भरवली होती. इलस्ट्रेटेड विकली सारख्या साप्ताहिकाच्या मुखपृष्टासाठी त्यानं असंख्य पोर्ट्रेट्स रेखाटली होती. हे सर्व त्यानं वीव्हर्स सर्व्हिस सेंटरची नोकरी सांभाळून केलं होतं.

हा भयंकर प्रकार घडला त्याच्या नऊच दिवस आधी त्याचा सत्तरावा वाढदिवस साजरा झाला होता. त्या वाढदिवसाचा फोटो इतरत्र दिला आहे. सदा हसतमुख, शांत आणि आपल्या कामाला प्राधान्य देणाऱ्या सुरेश बद्दल मला खरं तर आधीच लिहायचं होतं. गेल्या वर्षभरात मी त्याला अनेक वेळा फोन केला पण त्यानं काही तो उचलला नाही. असेल कामात म्हणून नसेल उचलला. म्हणून मीही पुन्हा काही फोन केला नाही. असं जवळ जवळ दोन तीन वेळा घडल्यानंतर मात्र मी त्याचा मित्र प्रकाश भिसे याला फोन केला. त्यानं हा घडला प्रकार मला कथन केला. प्रभाकर बरवे ग्रंथाच्या निमित्तानं एकदा चेंबूरला बिप्लव दत्तच्या घरी जाणं झालं. बिप्लव सुरेशचा वीव्हर्स मधला सहकारी. त्यानंही बरंच काही सांगितलं. त्याच्या घरापासून सुरेशचं घर जवळ होतं. पण त्याच्याकडे जाण्याचं मात्र धाडस माझ्याच्यानं झालं नाही.

हे सर्व ऐकल्यानंतर मी सुरेशवर लिहायचं पक्क ठरवलं होतं. पण त्याला निमित्त मिळत नव्हतं. परवा गायतोंडे आणि बरवे यांची चित्रं शोधता शोधता मी जे एअर इंडियाचं कॅलेंडर शोधून काढलं. त्या एअर इंडियाच्या २००४ सालच्या कॅलेंडरच्या दर्शनी पानावरच जे आर डी टाटांचं भलं मोठं पोर्ट्रेट होतं. स्टाईल ओळखीची वाटली म्हणून खाली सही पाहिली तर ती सुरेशची होती. एअर इंडियानं हे पोर्ट्रेट सुरेशकडून खास काढून घेतलं असावं. मला आश्चर्य वाटलं त्या प्रदर्शनात एअर इंडियाच्या काल्पनिक महाराजांची अविनाश गोडबोले यांच्या सारख्या श्रेष्ठ उपयोजित चित्रकारानं रेखाटलेली चित्रं देखील लावली गेली होती. मग ज्यानं हा सारा मोठा प्रचंड पसारा उभा केला त्या टाटा समूहाच्या सर्वेसर्वा जे आर डी टाटा यांचं देखील पोर्ट्रेट त्या प्रदर्शनात लावायला काय हरकत होती ?

सुरेश आता मानसन्मान वगैरे साऱ्याच्या पलीकडे गेला आहे. पण अशा एका मोठ्या प्रदर्शनात त्याचं चित्र जर झळकलं असतं तर गेली एक वर्ष त्याला त्याच्या प्रत्येक क्षणात साथ देणाऱ्या कुटुंबियांच्या दुःखावर निश्चितपणे फुंकर घातली गेली असती. एअर इंडियाचा तो संग्रह पाच हजार चित्राचा आहे. त्यातली फक्त दोनशेच चित्र प्रदर्शनात लागली आहेत. मला खात्री आहे उरलेल्या ४८०० चित्रांमध्ये सुरेशची चित्रं नक्कीच सापडतील. हे एअर इंडियाचं सदर प्रदर्शन कुणी क्युरेट केलं आहे याची मला माहिती नाही. कारण उदघाटनाच्या दिवशी कॅटलॉग आलेच नव्हते. ज्या काही सात आठ प्रती आल्या त्या प्रमुख पाहुण्यांमध्येच वाटल्या गेल्या. त्यामुळे मी त्यावर भाष्य करु इच्छित नाही. पण क्युरेटरनं एअर इंडियाच्या संग्रहाचा अधिक अभ्यास करायला हवा होता असं मात्र मी निश्चितपणे म्हणेन.

केंद्र सरकारच्या असंख्य योजनांमधून सुरेशच्या कुटुंबियांना साहाय्य होऊ शकतं पण ते बिचारे या साऱ्या घटनांमध्ये एवढे गुंतून पडले आहेत की त्यांना हे सारं करायला सवडच मिळालेली नाही. त्यामुळे वीव्हर्स सर्विस सेंटरचे त्याचे सहकारी बॉम्बे आर्ट सोसायटीशी संबंधित त्याचा मित्र परिवार यांना मी आवाहन करेन की आपण सारेच येऊन त्याच्या कुटुंबियांना मदत करूया. ही आपली नैतिक जबाबदारी आहे.

( टीप : या लेखासाठी सुरेशची मुलगी दीपाली जाधव, त्याचा मित्र प्रकाश भिसे त्याच्या सोसायटीतला चित्रकार मित्र निलेश जाधव आणि वीव्हर्स सर्व्हिस सेंटरमधला त्याचा सहकारी बिप्लव दत्त यांनी खूपच माहिती दिली. त्यांचे मनापासून आभार. )

******

– सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’

सुरेशचंद्र आवारी यांनी इलस्ट्रेटेड विकलीसाठी केलेली काही कामे.

सुरेशचंद्र आवारी यांनी केलेली निवडक व्यावसायिक पोर्ट्रेट्स.


Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.