Features

महाराजाच्या खजिन्याचे अंतरंग

महाराजाचा खजिना हे प्रदर्शन ऑगस्ट महिनाच्या मध्यावर संपणार आहे. दोन महिने एनजीएमएच्या प्रशस्त गॅलरीत सुरु हे प्रदर्शन तरुणांना दृश्यकलेलकडे आकर्षित करण्याची एक चांगली संधी होती. पण एनजीएमएने ती संधी साधली का? हा खरा प्रश्न आहे. कारण अनेक कलाकृती कुठल्याही संवर्धनाशिवाय तशाच प्रदर्शित केलेल्या होत्या. एका शिल्पामध्ये तर किड्यानं घर केलेलं होतं. कलाकारांची नाव चुकीची लिहिलेली होती. धूळ तर सगळीकडेच दिसत होती. एवढ्या मोठ्या प्रदर्शनाला जर वाईट पद्धतीनं संयोजित केलं असेल तर मग आपलं सरकार कलेला किती महत्व देतं हे दिसूनच येत आहे. ‘चिन्ह’च्या प्रतिनिधी कनक वाईकर यांनी या प्रदर्शनाला काही दिवसापूर्वी भेट दिली होती. तिथं आलेला अनुभव आणि काही मान्यवर चित्रकारांना या प्रदर्शनाबद्दल विचारलेलं मत यातून या प्रदर्शनाच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूंचा लेखाजोखा या लेखात वाचता येईल.

एनजीएमएचं महाराजाचा खजिना हे प्रदर्शन आता ऐन भरात आहे. हे प्रदर्शन कधी संपणार याची ठळक तारीख जरी कुठेच दिली नसली तरी ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर हे प्रदर्शन संपेल असे समजते. मागील महिन्यात मी या प्रदर्शनाला भेट दिली होती. १३ जूनला सुरु झालेल्या या प्रदर्शनाला रसिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. एरवी तुरळक लोक एनजीएमएला भेट देत असतात पण ‘महाराजांचा खजिना’ हे प्रदर्शन बरीच गर्दी खेचत आहे. शनिवार – रविवार या प्रदर्शनाला भेट द्यायला बरेच लोक येतात.

प्रदर्शनातील बी प्रभा यांची एक कलाकृती.

मीही एका शनिवारी या प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा बऱ्यापैकी गर्दी असल्यामुळे काही मिनिटांसाठी मला रांगेत उभं राहावं लागलं होतं. खरं तर हा एक सुखद धक्का होता. त्यामुळे कुतूहलापोटी मी प्रवेशद्वारावर आपलं कर्तव्य बजावणाऱ्या सिक्युरिटी गार्डला विचारलंही ‘दादा एवढी गर्दी कशी काय ?’ त्यांचं उत्तर विचार करण्यास भाग पडत होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की ही गर्दी साल्वाडोर दालीने डिझाईन केलेला ऍश ट्रे बघण्यासाठी आली आहे. मलाही हे जरा आश्चर्यकारकच वाटलं. कारण एवढी तरुण मुलं साल्वाडोर डालीची कलाकृती बघायला कशी काय जमली ?

विचार केल्यानंतर लक्षात आलं सध्या तरुणाईत ‘मनी हाईस्ट’ या वेब सिरीजची बरीच क्रेझ आहे. काही वर्षांपासून ही सिरीज तरुणांनीही डोक्यावर घेतली आहे. या सीरिजचं मध्यवर्ती कथानक एक प्रोफेसर आणि त्यांनी प्रशिक्षित केलेल्या चोरांभोवती फिरतं. हे चोर स्पेनची रॉयल मिंट अर्थात नोटा छापणाऱ्या टांकसाळीमध्ये घुसून पैसे चोरण्याचा प्लॅन आखतात. आता या सिरीजमध्ये पुढे काय होतं, तो आपला विषय नाही. तर या सिरीजमध्ये साल्वाडोर दालीच्या चेहऱ्याशी साम्य असलेला मास्क हे चोर वापरतात. या मास्क वापरण्याला एक प्रतीकात्मक अर्थ आहे. या चोरांना आणि त्यांच्या प्राध्यापकाला क्रांती करायची आहे. आणि आयुष्यभर सरियालिस्ट माध्यमात चित्रं काढणारा दाली हा स्पेनमध्ये क्रांतीचं प्रतीक आहे.

मनी हाईस्टमध्ये वापरलेला साल्व्हाडोर दालीचा मास्क.

तर या मास्कमुळं दाली आपल्या तरुण मुलांच्या परिचयाचा झाला. जेव्हा ही सिरीज आली तेव्हा सणावाराला घातल्या जाणाऱ्या रांगोळीपुरता कलेशी संबंध असलेली माझी एक तरुण नणंदही मला साल्वाडोर दालीबद्दल विचारू लागली तेव्हा मी चक्कर येऊन पडायचीच बाकी होते. पण चला कोण्या का निमित्तानं होईना तरुणाईचा कलेशी कनेक्ट तयार झाला आणि त्यानिमित्तानं त्यांनी एनजीएमएच्या कलादालनला भेट दिली हेही नसे थोडके. आता भेट दिल्यानंतर दालीच्या निमित्तानं त्यांनी इतर कलाकारांची चित्रेही पहिलीच असणार. तेव्हा कलेशी या तरुणांना जोडून घेण्याचं हे प्रदर्शन म्हणजे एक छान माध्यम होतं.

दालीच्या ऍश ट्रेच्या संरक्षक पेटीवरचे ओरखडे स्पष्ट दिसत आहेत.

असं असलं तरी एनजीएमएनं या संधीचा पुरेसा वापर केला का हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. खरं तर एनजीएमएनं प्रदर्शनासाठी प्रशासकीय व्यवस्था अतिशय चोख ठेवली होती. जागोजागी सिक्युरिटी गार्डस नेमले आहेत. तिकीट काढताना सर्व प्रेक्षकांची चोख तपासणी केली जाते. आत गेल्यानंतर तुम्ही पेंटिंगच्या फार जवळ गेलात तर सिक्युटी गार्डस तुम्हाला हटकतात. पण हे बहुतेक पहिल्या मजल्यावरच. वरच्या मजल्यावर काही सिक्युरिटी गार्डस मात्र चक्क मोबाईलवर सिनेमा बघत बसले होते एका कोपऱ्यात. पेंटिंगसोबत रसिकांना फोटो काढण्याची परवानगी नव्हती. म्हणजे तुम्ही पेंटिंगचा फोटो काढू शकता पण तुम्ही पेंटिंगबरोबर फोटो काढू शकत नाही. आता याचं कारण काय ते माहित नाही. पण ही खरं एक चांगली संधी होती कलेला, आदरणीय कलाकारांना सर्वदूर पोहोचवण्यासाठी. कारण येणाऱ्या रसिकांनी हे फोटो आपल्या सोशल माध्यमातून सर्वदूर पोहोचवले असते. पण असो. यातही एक गंमत म्हणजे प्रदर्शनाच्या एक दोन दिवसता मी अनेकांना पेंटिंगसोबत फोटो पोस्ट केलेलं पाहिलं. पण नंतर या अशा फोटो काढण्यावर बंदी का आली हे माहित नाही. साल्वाडोर दालीसाठी जशी गर्दी जमा झाली होती तशी ती सगळ्यात वरच्या मजल्यावर मारिओ मिरांडा यांची जी मोजकी इलस्ट्रेशन्स प्रदर्शित झाली होती तिथेही गर्दी होती. अनेकांना या कलाकृती बरोबर फोटो काढायचे होते पण परवानगी नसल्याने ते शक्य नव्हतं.

या दालीच्या कलाकृतीने गर्दी खेचली पण तिचा डिस्प्ले अत्यंत वाईट होता. संरक्षक ऍक्रॅलिक पेटीवरचे स्क्रॅचेस अतिशय स्पष्टपणे दिसतात.

सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या प्रदर्शनाचं नाव ‘महाराजाचा खजिना’ आहे. हे नाव किती सार्थ आहे ते प्रदर्शनातील कलाकृती पाहताना कळतं. भारतातल्या सर्वोत्तम कलाकारांच्या कलाकृती इथे प्रदर्शित झाल्या आहेत. व्ही.एस. गायतोंडे, के.एच.आरा, एन.एस. बेंद्रे, जी.आर. संतोष, मनू पारेख, बी.प्रभा, एम.एफ. हुसेन, अंजोली एला मेनन आणि बी विठ्ठल अशा अनेक कलावंतांच्या कलाकृती इथे पाहता येतात. या प्रदर्शनाची लाइटिंग व्यवस्थाही अतिशय उत्तम करण्यात आली आहे. लाईटचा फोकस फक्त कलाकृतीवर राहील याची पूर्ण काळजीही घेण्यात आली आहे. पण कलाकृतींची जपवणूक व्यवस्थित केली न गेल्यानं अनेक कलाकृती या वाईट अवस्थेत आहेत. काही कलाकृतीवर स्क्रॅचेस उमटले आहेत.

कलाकृतींवरचे स्टिकर्सही नीटपणे काढले नव्हते.

चित्रकार आणि संयोजक विक्रम मराठे यांनी या प्रदर्शनाला नुकतीच भेट दिली. त्यांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितलं की, “हे प्रदर्शन अत्यंत वाईट तऱ्हेने क्युरेट केलं आहे. चित्र शिल्प मांडण्यापूर्वी त्यांची प्राथमिक स्वच्छता पण करण्यात आलेली नाही. अनेक चित्रकारांची नावे चुकीची अर्धवट लिहिली आहेत. गोपाळराव अडिवरेकर यांचे आडनाव लिहिले आहे, इतका मोठा कलाकार पण त्यांचे पूर्ण नाव यांना शोधून लिहिता आले नाही. शिल्प लावताना त्याची साफ सफाई केलेली नाही, एका लाकडी शिल्पामध्ये किड्याने मातीचे घर केलेले तसेच ठेवले आहे, एका ब्राँझ शिल्पाच्या खाली धुळीचे थर तसेच आहेत. चित्राच्या फ्रेम वर आधीची लेबलं तशीच अर्धवट फाडून ठेवली आहेत. दाली सारख्या जग प्रसिद्ध कलाकाराची कलाकृती अत्यंत घाणेरड्या ऍक्रॅलिक बॉक्स ज्यावर असंख्य स्क्रॅच आहेत. या आणि अशा अनेक गोष्टी दर घासात खडा लागल्यासारखा रसभंग करतात. एअर इंडियाचं  कलेक्शन जरी वाईट अवस्थेत ठेवलं गेलं असलं तरी एनजीएमए सारख्या राष्ट्रीय संस्थेने किमान प्राथमिक संवर्धन करून ते प्रेक्षणीय करणं अपेक्षित होतं. एवढं महत्वाचं प्रदर्शन पण ते इतक्या निष्काळजीपणे प्रदर्शित केलेलं पाहून खूप वाईट वाटतं.”

काही चित्रकारांची नावेही चुकीची लिहिलेली होती.

चित्रकार दत्तात्रय पाडेकर यांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. त्यांच्या मते, ” या प्रदर्शनाची जितकी चर्चा झाली तेवढ्या चांगल्या कलाकृती या प्रदर्शनात प्रदर्शित नव्हत्या. एअर इंडियाचा कला संग्रह खूप मोठा होता. त्यातल्या उत्तमोत्तम कलाकृती निवडून त्या प्रदर्शनात अभ्यासानिशी प्रदर्शित करण अपेक्षित होतं. पण प्रदर्शनातील काही मोजक्या कलाकृतीचं उत्तम होत्या.”

एका शिल्पामध्ये किड्यानी चक्क मातीच घर तयार केलं होतं. आणि शिल्प कुठलीही सफाई आणि रिस्टोरेशन न करता तसच प्रदर्शित केलं होत.

शेवटी जेव्हा प्रदर्शन बघून आपण बाहेर येतो तेव्हा, या प्रदर्शनाचा कॅटलॉग कुठेही विक्रीसाठी उपलब्ध केला गेला नाहीये असं दिसून येतं. अनेक रसिक बाहेर असलेल्या स्टॉलवर कॅटलॉगची विचारणाही करत होते, पण त्यांना अजून कॅटलॉगची छपाई बाकी आहे अशी उत्तरे देण्यात येत होती. ‘चिन्ह’ देखील या कॅटलॉगच्या प्रतीक्षेत आहे. आम्ही कॅटलॉग आला का असं फोनवर वारंवार चौकशी करत आहोत पण अजूनही हा कॅटलॉग उपलब्ध झाला नाहीये.

कलाकृतीवरची धूळ.

कुठलंही प्रदर्शन जेव्हा देशाच्या एक महत्वाच्या संस्थेत आयोजित करण्यात येत तेव्हा योग्य तयारी आणि अभ्यासानिशी ते आयोजित करणं अपेक्षित असतं. खरं तर एप्रिल महिन्यातच हे प्रदर्शन आयोजित होणार होतं पण ऐनवेळी या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. आणि अंगाईड अचानक जूनमध्ये या प्रदर्शनाचं उदघाटन झालं. एवढा वेळ घेऊनही अशा प्रकारे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असेल तर मग आपलं प्रशासन कलेला किती महत्व देतं ते दिसूनच येत आहे. तुम्ही या प्रदर्शनाला भेट दिली का ? तुमचं मत काय आहे ते आम्हाला जरूर कळवा.

*******

कनक वाईकर

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.