Features

‘अलौकिक’ आलोक

आलोक शेलार पंधरा सोळा वर्षाचा एक स्मार्ट  मुलगा. त्याला चित्रकलेची, गाण्याची प्रचंड आवड आहे. पण सेलेब्रल पाल्सी सारख्या गंभीर आजारामुळं तो चालू फिरू शकत नाही. अडीच वर्षाचा असतानाच आलोकच्या आईवडिलांनी त्याला आश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र आजी आजोबांनी त्याची जबाबदारी घेतली आणि तेच त्याचा सांभाळ करत आहेत. अत्यंत गरीब घरातून आलेल्या अलोकच्या  सगळ्याच हालचालींना मर्यादा असल्यामुळे त्याला झोपून चित्रं काढावी लागतात. पण असं असलं तरी त्याची चित्रं मात्र सुरेख असतात. त्याची कला पाहून अनेकांचे मदतीचे हात त्याला मिळत आहेत. आलोकची ही कहाणी समजली  की एवढ्या तेवढ्या गोष्टींनी दुःखी होणारे आपण सकारात्मकतेचा धडा आयुष्यभरासाठी शिकतो. ‘अलौकिक’ आलोकच्या विलक्षण जिद्दीची ही कहाणी आवर्जून वाचा. ‘चिन्ह’च्या ऑनलाईन गॅलरीमधलं त्याच प्रदर्शनही आवर्जून पाहा.

एक दिवस ‘चिन्ह’चे मुख्य संपादक सतीश नाईक सरांचा मला फोन आला. मी एक मेसेज पाठवला आहे. आपण या मुलासाठी काय करु शकतो, ते जरा बघून सांग. मी मेसेज बघितला… गोरक्षनाथ चव्हाण या चित्रकला शिक्षकांनी तो मेसेज ‘चिन्ह’ला म्हणजे सतीश सरांना पाठवला होता. या मेसेजनी माझ्या आयुष्यात एक वेगळं वळण आणलं. आयुष्यातल्या छोट्या छोट्या प्रसंगांनी दुःखी होणारे आपण, हा मेसेज मात्र मला आयुष्यभरासाठी सकारात्मक बनवून गेला.

या मेसेजमध्ये आलोक शेलार या मुलाचे तपशील होते. आलोक शेलार… हे एक जगावेगळं रसायन आज विधात्यानी माझ्या समोर आणलं होतं. आलोकचं वय जेमतेम सोळा. जन्मापासून आलोक अंथरुणाला खिळून आहे. आलोक जन्मतःच सेरेब्रल पाल्सी या दुर्धर आजारानी ग्रस्त आहे. पण त्याच्या शरीराचं हे दिव्यांगत्व, त्याच्या मनाला मात्र कधीच स्पर्शही करु शकलं नाही. सतत आनंदी आणि उत्साही असणाऱ्या आलोकला चित्रकलेची फार आवड. त्याच्या आजोबांनी त्याला लहान असताना कडेवरुन शाळेत नेलं. पण शाळेत त्याला बसवायला शिक्षक तयार होईनात. या मुलाची हाडं खूपच ठिसूळ होती. त्यामुळे त्याला शाळेत दाखल करुन घ्यायला शिक्षक घाबरत होते.‌ मग आलोकचं शिक्षण घरातूनच सुरु झालं. आजी, आजोबा आलोकसाठी जीवाचं रान करत होते.

एक दोन‌ वर्षं आजी आजोबांनी शिकवलं. त्यानंतर अण्णासाहेब दादा कानबडे यांनी आलोकच्या घरी येऊन दुसरीचा अभ्यास घेतला, तर तिसरीत मंगलाताई घोलप यांनी आलोकचा नियमित अभ्यास घेतला, घरी येऊन शिकवलं. तिसरी नंतर आलोक जिथे रहायला गेला तिकडे घराच्या बाजूलाच शाळा होती. आलोकला शिक्षणाची गोडी तर होतीच, पण त्याही पलीकडे अगदी बालवयापासून शिक्षण हा त्याचा ध्यास होता. पुढे शेफालीताई मोरे आणि वेदिकाताई जामदार यांनी आलोकला इंग्रजी शिकवलं. आज आलोक नववीपर्यंत शिकला आहे. त्याला कसंही करुन दहावी पास व्हायचंच आहे. त्याच्या सरांनी त्याला सांगितलं आहे, की दहावी झालं आणि कॉंप्युटरचा कोर्स केला की त्याला नक्की नोकरी मिळेल. आज आलोकच्या घरात कमावत  असं कुणीही नाही. आजी, आजोबा आता थकत चालले आहेत. आपल्याला नोकरी लागावी, चार पैसे कमावून आजी, आजोबांना दिलासा देता यावा, यासाठी तो आता दहावीच्या परिक्षेचा नियमित अभ्यास करत असतो. 

आलोक दुसरी, तिसरीत असताना त्याला चित्रकलेची गोडी लागली. मिळेल त्या कागदावर, वहीच्या पानावर तो चित्र काढत असे. मग त्याला घरच्यांनी चित्राची वही आणि रंगाची पेटी आणून दिली. आलोक झोपूनच चित्र काढत असे. त्याची ही जन्मजात कला पाहून घरच्यांचे डोळे पाणावत. मग आजोबा शाळेत नेऊन त्याची चित्र दाखवतं. आजोबांना आशा होती, की याच्या चित्रकलेला शाळेकडून प्रोत्साहन मिळेल. निदान चित्रकलेचे धडे द्यायला कुणीतरी घरी येईल. शाळेत शिक्षक चित्रांचं  कौतुक  करत. पण त्यापेक्षा जास्त काही होत नसे. पण आजोबांनी जिद्द सोडली नाही. 

आलोकला चित्रकलेबरोबरच गाण्याची पण खूप आवड आहे. तो सतत गाणी ऐकत असे. एकदा त्याच्या बालमनात आलं की आपणचं गाऊन बघितलं तर? आणि आलोक गायला लागला. मग गावातील डॉक्टर रवींद्र गोरडे यांनी त्याला छानसा चौदा, पंधरा  हजाराचा मोबाईल भेट दिला. त्याच्यासाठी वॉकर, चाकांची खुर्ची याचीही सोय करण्यात डॉक्टर रवी आघाडीवर होते. 

या बालकाची चित्रं मात्र माझ्यातल्या चित्रकाराला थक्क व्हायला लावतात. त्याला जमिनीवर किंवा पलंगावर झोपवला की मग तो चित्र काढत बसतो. काही वेळा चित्रकलेची वही, कागद हे या अवघडलेल्या अवस्थेत झोपून काढताना सरकतात, वेडेवाकडे होतात. पण त्यावरही आलोकची जादुई बोटं जे चितारतात, ते सरळ, योग्य आकारात साकार होतं. आलोक तासनतास चित्रकलेत रंगलेला असतो.‌ त्याची आजी शाळा शिकली नाहीये, पण तिला चित्रकलेची आवड आहे. नातवाच्या चित्रकलेतील कौशल्यानी आजी हरखून जाई. आलोक चित्र काढताना आजी त्याच्याबरोबर समरसून मार्गदर्शन करे. पण प्रत्येक गोष्टीत सुधारणेचा, पूर्णत्वाचा ध्यास आलोकला उपजतच आहे. त्यामुळे एवढ्यावर थांबेल तर तो आलोक कसला. आपली चित्रकला अजून सुधारावी, त्यात सफाई यावी यासाठी युट्युबवर तो चित्र रंगवण्याच्या प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ अगदी बारकाईने बघत असतो. ते आत्मसात करतो आणि मग ते तंत्र, रंग देण्याची पद्धती त्याच्या चित्रांतून सहज साकार होत जाते. ‘आलोक, युट्युबवर असे व्हिडिओ असतात हे तुला कोणी सांगितलं?’ यावर, ‘मला रवी डॉक्टरांनी मोबाईल फोन दिलाय ना. त्यात मीच सर्फ करत बघत असतो’, आलोक मला म्हणाला. आलोकनी या आपल्या जिगरी दोस्ताबरोबरची, म्हणजे युट्युब बरोबरची आपली गट्टी अजूनच घट्ट करायचं ठरवलं. त्यानं चक्क घरात झोपल्याझोपल्या त्याचं युट्युब चॅनल सुरु केलं आहे. त्यावर तो गाणी गातो, गप्पा मारतो, छान छान डायलॉग बोलतो. आपल्या वेदनेवर आपल्या सृजनशीलतेनी मात करत, आलोक त्याच्या आणि इतरांच्या आयुष्यात अशी आनंदाची नित्य उधळण  करत असतो. 

मला मनोमन माझी शरम वाटली. पाठदुखीनं आजारी असल्यामुळे मी दोन महिने घरात झोपून होतो. बरं… झोपून झोपूनही अंग भरुन येतं, दुखायला लागतं‌, मला तेव्हा अगदी नको झालं होतं.  हा पठ्ठ्या जन्मल्यापासून अंथरुणाला खिळून आहे, आणि आपल्या वेदनांवर आपल्याच उपजत कलेनी फुंकर घालत अखंड नवनवीन चित्र चितारत आहे. आनंदी राहत आहे.

सर, माझं ना स्वप्न आहे. मला खूप छान चित्रं काढायची आहेत, गाणी गायची आहेत. आणि माझ्या आजी आजोबांना, त्यांनी मला इतकी वर्ष जसं सांभाळय ना, तसं त्यांच्या म्हातारपणात सांभाळायचं आहे. 

मी ऐकत होतो. मनात आलं, धडधाकट मुलांना, म्हातारे झाले की आई वडील नको असतात, ओझं होतात. या श्रावण बाळाला, त्याचं आजवर ज्यांनी सगळं केलं, त्या त्याच्या आजी, आजोबांना स्वकमाईनं म्हातारपणी सुखात ठेवायचं आहे. 

आलोकसाठी गावातले डॉक्टर रवींद्र जयवंत गोरडे हे खूप तळमळीनं धडपडत असतात.  आलोकमधली ही सकारात्मक उर्जा थक्क करणारी आहे, एखाद्या चमत्कारापेक्षा आलोकची ही जिद्द, कला आणि धडपड कमी नाही, असं डॉक्टरसाहेब मला म्हणाले.  

गोरक्षनाथ चव्हाण हा तरुण चित्रकार, कला शिक्षक, खरंतर आलोकच्या गावापासून ऐंशी कि. मी. लांबच्या गावातला. पण आलोकवर याचा जीव.‌ ‘खूप गोड मुलगा आहे आलोक. त्याच्यात ना एक वेगळचं चैतन्य आहे’, गोरक्षनाय मला सांगत होता. तो आलोकला ऑनलाईन चित्रकला शिकवतो. जमेल तेव्हा आलोकला भेटायला जातो. 

मी आलोकला म्हटलं, आलोक गोरक्षनाथ सर, डॉ. रवी सर अशा तुला मदत करणाऱ्या अजून सगळ्यांची नावं मला जरा व्हॉट्सऍप वर पाठवशील का प्लीज? हो…. म्हणतं या पठ्यानी एक, दोन, तीन अशी सतरा नावं पाठवली. या सगळ्यांनी मला वेळोवेळी खूप मदत केली. आलोकचा आवाज कातर झाला होता. या सगळ्यांबद्दलची त्याची मनोमन कृतज्ञता मला जाणवतं होती. अमेरिकेतील रोहित काळे हे वेळोवेळी आलोकला मदत पाठवत असतात. या मदत करणाऱ्यांच्या नावांमध्ये एक नाव तर नुसतं कळवून आलोक थांबला नाही, तर त्याने मला परत फोन करुन परवानगी घेतली, मला तुमच्याशी त्यांच बोलणं करुन द्यायचं आहे, नंबर शेअर करु का? आणि त्यांना माझ्याशी बोलायची गळ घातली.

ते दीपक जयराम शेवाळे. नाशिकचे. रिक्षा  चालवण्याचा त्यांचा व्यवसाय. दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांनी आलोकला दिगंबर शेवाळे यांच्या मदतीने एक छान, नवीन लॅपटॉप भेट दिलाय. आलोकसाठी ही भेट अनमोल आहे. यावर तो त्याचा अभ्यास करतो. जगातल्या अनेक ठिकाणी आता त्याची लॅपटॉपच्या माध्यमातून भ्रमंती सुरु असते. दीपक काकांच्या या भेटीने आलोकचं छोट्या खोलीतल्या बिछान्यावरचं जग आता सर्वव्यापी झालं आहे. या कृतज्ञतेमुळेच त्यांनी दीपकरावांना आत्ता मी हा लेख लिहित असताना मला फोन करायला लावला. केवळ  लॅपटॉप एवढी महागडी भेट दिली म्हणून नाही, तर श्री. विजय बोरसे यांनी मला औषधांसाठी दीड हजारांची मदत केली होती, हे पण त्याने आवर्जून कळवलं. या मुलाचं वय… फक्त सोळा.  आणि समज? 

या सगळ्या सतरा, अठरा जणांची नावं इथं देणं मला जागेच्या अभावी शक्यच नाहीये. पण या सगळ्यांना माझा प्रणाम. आजच्या धकाधकीच्या, स्वार्थी जगात माणूसकी शिल्लक आहे, हा विश्वास तुम्ही तुमच्या कृतीतून दिलात.

https://www.youtube.com/@thealoksingerart1425

आलोकच्या चित्रांचं ऑनलाईन गॅलरी प्रदर्शन करताना, माझा मित्र दीप याला मी आलोकची चित्र पाठवली. आणि मला दीपचा पुढल्या सेकंदाला फोन.‌ वी वील किप हीज एक्झिबिशन ऑन ‘चिन्ह’ज् ऑनलाईन गॅलरी. प्लीज अलाऊ मी टू पे आलोक्स फीज्… उत्तराची वाटही न पहाता, दीपनी ‘चिन्ह’च्या अकाऊंटला पैसे पाठवले पण. त्यानंतर मी आणि ‘चिन्ह’च्या कार्यकारी संपादिका कनकजी, आलोकच्या चित्रांबद्दल, गॅलरीबद्दल ठरवत असताना, मी त्यांना म्हटलं, तुम्ही या प्रदर्शनाला खास ईंट्रो द्या. त्यांना ही कला फार छान अवगत आहे. त्यांनी लिहिलेला छोटा ईंट्रो किंवा मेसेज वाचकांना अगदी थेट जाऊन भिडतो‌. त्या म्हणाल्या मी लिहिते लगेच. मध्यरात्री त्यांनी मला आलोकच्या ऑनलाईन प्रदर्शनाची लींक त्याच्या शॉर्ट ईंट्रोसह पाठवली. मी ती सगळ्या परिचितांना पोस्ट केली. सकाळी नागपूरवरुन आदरणीय श्री. चन्ने गुरुजींचा फोन. माझी बसोली आलोकला सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. बोल काय करु? सरांच्या त्या आश्वासक शब्दांनी माझा आनंद गगनात मावेना. मी म्हटलं, मी त्याच्या सरांशी आणि डॉक्टरांशी बोलतो. माझ्या एका आवडत्या मिडिया पत्रकाराचा मेसेज. आवडता यासाठीच की एकूणच जे चॅनल्सना बाजारु स्वरुप आलंय , त्यात हा कायम स्वतःचं वेगळेपण, सामाजिक भान ठेवत कव्हरेज करत असतो. त्यानीही आलोकसाठी फिचर करणार असल्याचं कळवलं.  

चारच दिवसांपूर्वी मी माझ्या एका इंग्रजी लेखमालेचा अंतिम भाग लिहिला आणि तो ‘चिन्ह’मध्ये प्रकाशितही झाला. बालपणी पाठीला गोण मारुन दिल्ली रेल्वे स्टेशन परिसरात कचरा गोळा करणाऱ्या आणि पुढे मीरा दीदींच्या सलाम बालक ट्रस्टच्या सावलीत लहानाचा मोठा होत, आजचा आघाडीचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा फोटोग्राफर हा अलौकिक टप्पा गाठलेल्या विकी रॉयची ती गोष्ट. मी विकीलाही आलोकच्या या प्रदर्शनाची लींक पाठवली होती. आज सकाळी विकीचा मला मेसेज आला, मला व्हिडिओ पाठव. मी आणि फिरोज सर जेव्हा भेटणार आहोत, तेव्हा मी त्यांच्याशी आलोकबद्दल नक्की बोलेन. फिरोज यांच्या देशभरातील दिव्यांगांसाठी असलेल्या सामाजिक प्रकल्पासाठी विकी गेली अडीच वर्ष विनामुल्य काम करत आहे‌. योगायोग असा की दीप, ज्याने आलोकच्या प्रदर्शनाचे पैसे स्वतःहून भरले, त्या मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीचे श्री. फिरोज हे मालक आहेत. 

म्हणजेच हळूहळू मदतीचे हात पुढे येत आहेत. तशा प्रयत्नांना सुरवात तरी झाली आहे. पण… आज आलोकच्या घरात कमावतं कुणीही नाही. त्याचं जुनं  घर पावसात भिंती ढासळून पडलं आहे. आज आलोक, त्याचे आजी आजोबा एका लहानशा घरात तात्पुरतं राहत आहेत. त्या घराचं भाडंही त्यांना परवडत नाहीये, अशी परिस्थिती आहे. आपल्यापैकी ज्यांना शक्य आहे त्यांनी जरुर आलोकला मदतीचा हात द्या. आपल्या चित्र गॅलरीत आलोकचा आणि त्याच्या गोरक्षनाथ सरांचा नंबर दिला आहे. किमानपक्षी, त्याला एक फोन किंवा मेसेज करुन त्याच्या या जिद्दीचं, असामान्य सकारात्मकतेचं, चित्रकलेचं कौतुक तरी नक्की करा. तेही त्याच्यासाठी खूप मोलाचं आहे. 

शरीरानी दिव्यांग असलेला आलोक… आणि अनेकदा छोट्या, छोट्या आघातांनीही मनातून मोडणारे, खचून जाणारे आपण…  

खरंतर आलोकच्या मनातला हा सकारात्मक भाव हा आपल्या सगळ्यांच्या मनावर कधीतरी जेव्हा नैराश्याचं मळभ येतं तेव्हा श्रावणातल्या सोनेरी सूर्यकिरणांप्रमाणे मनाला प्रसन्नता देणारा, प्रेरणा देणारा एक अखंड उर्जा स्त्रोतच आहे. पण त्याच्या सभोवतीचा परिस्थितीचा काळाकुट्ट अंधारही आपल्याला विसरता येणार नाही. 

माझ्या अश्रूंचा बांध अडवणं मला शक्य झालं नाही. ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांच्या ओळी मनात दाटून आल्या… 

मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना,

त्या अनाथांच्या उशाशी दीप लावू झोपताना,

कोणती ना जात ज्यांची कोणता ना धर्म ज्यांचा,

दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे… माणसांना!

***********

प्रतोद कर्णिक 

आलोकचं ऑनलाईन चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी लिंक

ARTFUL SPIRIT

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.