Features

मुंबईत जपान

जगात अनेक देश आहेत… प्रत्येकाची वेगळी भाषा, वेगळी संस्कृती. त्यांपैकी जपानच्या संस्कृती बद्दल नेहमी एक वेगळेच आकर्षण असायचे. आणि योगायोगाने ही जॅपनीज संस्कृती अनुभवण्याची संधी मागच्या आठवड्यात मला मिळाली. एका मैत्रिणीकडून के जे सोमय्या या महाविद्यालयात ‘टीचर्स असोसिएशन ऑफ जपान’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘जॅपनीज कल्चर सेमिनार’ बद्दल माहिती मिळाली आणि मी व माझे गुरु अच्युत पालव आम्ही दोघांनी या सेमिनारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तिथे कॅलिग्राफी, इकेबाना, जपानी खाद्यपदार्थ ‘सुशी’ अशा विविध कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. या कार्यक्रमातून सहभागी रसिकांना जपानी संस्कृतीची ओळख झाली. भारतालाही समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आहे. अनेक प्रांताच्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत. भारतही अशी  प्रदर्शने आयोजित करून आपल्या संस्कृतीची
ओळख जगाला करून देऊ शकतो. 

१८ सप्टेंबरला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत सुरु असलेल्या या कार्यक्रमात आम्ही दुपारी १ पर्यंत पोहोचलो. तिथे पोहोचताच एक वेगळीच लगबग सुरु होती. एकूण दोन  मजल्यांवरील विविध वर्गांत वेगवेगळ्या कार्यशाळा सुरु होत्या. सर्वप्रथम आम्ही कॅलिग्राफीच्या कार्यशाळेत प्रवेश केला. तिथे जॅपनीज कॅलिग्राफर हरूना तिच्या टीम सोबत सर्वांना जॅपनीज अक्षरांची ओळख करून देत होती. त्यांचा विशिष्ट हॅन्सी पेपर , ब्रशेस , शाई आणि विशिष्ट स्ट्रोक्सच्या साहाय्याने अक्षरे निर्माण करणारी ती कला… सारेच खूप आनंददायी होते. आम्ही सुद्धा काही अक्षरे त्याच पद्धतीने कागदावर उमटवण्याचा सफल प्रयोग केला. या सर्वात त्यांच्याशी बोलताना प्रामुख्याने जाणवला तो म्हणजे त्यांच्या बोलण्यातला नम्रपणा. त्यांची संस्कृती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक सफल प्रयत्न. हिरगाना, कटकाना किंवा कांजी असो … आम्हाला अक्षरे फारशी कळत नव्हती परंतू तरीही ती निर्माण करताना खूप मजा आली. 

जपानी कॅलिग्राफर हरूना आणि कार्यशाळेत सहभागी झालेला एक छोटा रसिक

त्यानंतर आसपास सुरु असलेल्या ओरिगामी, इकेबाना, कॉई मेकिंग, कोकेशि डॉल्स, युकाता वेष परिधान, वागाशी, कराओके अशा विविध कार्यशाळांना भेट दिली. प्रत्येक ठिकाणी अगदी आनंदाने तो तो विशिष्ट प्रकार शिकवला जात होता. की-चेन आणि चॉपस्टिक्सवर आपल्या मनाने हवे तसे नक्षीकाम करण्यासाठी रंग उपलब्ध होते. त्याचप्रमाणे , कोकेशि डॉल्सच्या कार्यशाळेतसुद्धा योग्य मार्गदर्शनाखाली सुंदर वेष परिधान करणाऱ्या  जॅपनीज बाहुल्या बनवण्यात खूप मज्जा आली. कॅलिग्राफी प्रमाणेच मला विशेष आवडलेली आणखी एक कार्यशाळा म्हणजे इकेबाना. मुळातच मला फुले आवडतात. त्यामुळे त्यांच्या विशिष्ट रचना करण्यात, त्यांबद्दल माहिती समजून घेण्यात समाधान वाटत होते. आजपर्यंत जॅपनीज प्रसिद्ध खाद्यप्रकार ‘सुशी’ हा फक्त ऐकून माहित होता . पण इथे तो कसा करतात ते पाहून तो खाण्याचा अनुभव सुंदर होता. रविवारची सुट्टी अशाप्रकारे मार्गी लावल्याचे समाधान आमच्या चेहऱ्यावर होते . काहीतरी नवीन अनुभवण्याची मजा काही औरच . 

इकेबाना कार्यशाळा

हे सर्व पाहिल्यानंतर सहज एक विचार मनात येऊन गेला . चीन आणि जपान प्रमाणेच आपली भारतीय संस्कृती सुद्धा कितीतरी समृद्ध आहे. येथे प्रत्येक प्रांताचे वेगळे असे वैशिष्ट्य , भाषा , पेहराव, लिपी , कला, खाद्यसंस्कृती, इतिहास आणि नावीन्य आहे. मनात आणून कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्यास अशाप्रकारे किती काही करू शकणार. आपल्या संस्कृतीची ओळख जगभरात करून देण्यासारखे महत्त्वपूर्ण काम करणे हे देखील आपल्या देशाबद्दल आपल्या मनातील राष्ट्रप्रेम दर्शविण्याचा एक भाग आहे . विचार करा अनेक जमाती ज्या आजच्या युगात चाचपडत आहेत पण त्यांच्याकडे आपल्या इतिहासाचा एक विशिष्ट वारसा आहे त्या सर्वाना एक रोजगार उपलब्ध होईल. असे कार्यक्रम केवळ जगातील  इतर देशांतच नव्हे तर इथे देखील करण्याची आज  गरज आहे. पाश्चात्य संस्कृतीला कवटाळू पाहणारी आपली नवी पिढी आपल्याच संस्कृतीच्या काही विशिष्ट पैलूंपासून वंचित राहू नये हा या मागचा एक उद्देश. 

जशी आज मी मुंबईत जपानची सैर अनुभवली त्याचप्रकारे भारताची सैरसुद्धा सर्वांना अनुभवता यावी. असे सेमिनार जर आपणही इतर देशांसाठी आयोजित केले तर भारताची समृद्ध कला आणि संस्कृती जगभरात पोचेल यात शंका नाही. 

*****

– रुपाली ठोंबरे
लेखिका या कॅलिग्राफी आर्टिस्ट असून त्या नियमितपणे ब्लॉग लेखन करतात.

रुपाली ठोंबरे यांच्या ब्लॉगची लिंक:
http://umatlemani.blogspot.com/?m=1

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/ch

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.