Features

जेजेत येत्या गुरुवारी भेटूच!

१९ ऑक्टोबरच्या समारंभाची तयारी जेजेत मोठ्या जोरात सुरु झाली आहे. कालच्या एका दिवसात सुमारे वीस ट्रक कचरा आणि डेब्रिज जेजेमधून बाहेर हलवलं गेलं. महाराष्ट्र सरकारनं वीसपंचवीस वर्षात एकाहून एक ना-लायक अधिकाऱ्यांची तिथं नेमणूक करून जेजेची कशी अवहेलना केली हे या एकाच उदाहरणावरून स्पष्ट व्हावं. श्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासारख्या तरुण आणि तडफदार केंद्रीय मंत्र्यांच्या जातीनं लक्ष देण्याच्या वृत्तीमुळंच जेजेत जो मूलभूत बदल होऊ घातला आहे त्याची झलक कालच्या एका दिवसानंच दाखवून दिली आहे यात शंकाच नाही. १९ ऑक्टोबरच्या या जेजेला डिनोव्हो दर्जा देण्याच्या कार्यक्रमासंदर्भात माहिती देणारा हा पहिला लेख. 

दि २५ ऑगस्ट २०२३ रोजी ‘चिन्ह आर्ट न्यूज’मध्ये आम्ही जाहीर केलं होतं की जे जे स्कूल ऑफ आर्टला डिनोव्हो दर्जा प्रदान करण्याचा कार्यक्रम ऐन दिवाळीत किंवा दिवाळीच्या आधीच होणार म्हणून. त्याप्रमाणे आता सदर कार्यक्रम होऊ घातला आहे. पण ‘चिन्ह’नं म्हटलं होतं तसं दिवाळीपूर्वी नव्हे तर चक्क दसऱ्याआधीच हा कार्यक्रम पार पडणार आहे. डिनोव्होला ज्यांचा विरोध होता ते नक्कीच म्हणतील की ‘चिन्ह’वाले खोटे अंदाज करतात. दिवाळीत कार्यक्रम होईल असं म्हणतात पण कार्यक्रम प्रत्यक्षात दसऱ्याच्याच आधी झाला आहे. पण ‘चिन्ह’चा हा अंदाज चुकल्याचं दुःख निश्चित वाटत नाही उलट आनंदच वाटतो आहे. भारतीय चित्रकलेच्या दृष्टीनं ही अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे आणि ही प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांनीज्यांनी अत्यंत मनापासून प्रयत्न केले त्या साऱ्यांचंच ‘चिन्ह’तर्फे आम्ही मनापासून अभिनंदन करतो.

या संदर्भात सर्व प्रथम केंद्रीय शिक्षणमंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांचं अभिनंदन करायला हवं, खरंतर संपूर्ण चित्रकला क्षेत्रांनच त्यांचे आधी आभार मानायला हवेत. डिनोव्होचा प्रस्ताव तयार झाल्यापासून परवाच्या कार्यक्रमाचं आयोजन होईपर्यंत श्री धर्मेंद्र प्रधान यांनी जो उत्साह दाखवला आणि प्रत्येक बाबीत किंवा प्रत्येक गोष्टीत अतिशय लक्ष घालून संबंधितांना सातत्यानं कार्यान्वित केलं त्याचंच फळ म्हणजे गुरुवार दि १९ ऑक्टोबर २०२३ रोजी जे जे स्कूल ऑफ आर्टच्या (उरल्या सुरल्या निसर्गरम्य) परिसरात हा कार्यक्रम होणार आहे.

श्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्तेच हा कार्यक्रम पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अगदी खरं सांगायचं झालं तर हा कार्यक्रम जे जे स्कूल ऑफ आर्टच्या वतीनं जरी आयोजित केला गेला असला तरी या साऱ्या कार्यक्रमामागचे सूत्रधार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हेच आहेत असं वाटावं अशी एकूण परिस्थिती आहे. असं का झालं या संदर्भात चौकशी केली असता अतिशय वेगळीच माहिती हाती आली.

श्री धर्मेंद्र प्रधान यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टविषयी आतापर्यंत खूप काही ऐकलं आहे. ओरिसा किंवा दिल्लीमधले त्यांचे असंख्य मित्र जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट आणि जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये शिकून गेले आहेत आणि आपापल्या क्षेत्रात आज कार्यरत आहेत. त्यांच्याकडून धर्मेंद्र प्रधान यांना सातत्यानं जेजेविषयी कळत असे. या कॉलेजचा महिमा आणि अनोखेपण त्यांना जाणवत असे भावत असे. आपल्या इकडल्या मराठी मंत्र्यांचं मात्र वेगळंच. ते जेजेच्या नरडीचा घोट घ्यायला निघाले होते. कुणाला तरी जेजे देवनारच्या खाटीकखान्याशेजारी हलवायचं होतं तर कुणाला तिथे टॉवर उभारायचे होते. तर कुणाला डीनचे ऐतिहासिक बंगलेच आपल्या कार्यालयासाठी वापरायचे होते. या साऱ्यांच्या आकांक्षावर आता धर्मेंद्र प्रधान यांनी चक्क बोळा फिरवला आहे. भविष्यात जेजेच्या परिसराकडे वाकड्या नजरेनं पाहायची आता कुणाचीही हिंमत होणार नाही हे निश्चित.

जेजेला डिनोव्हो दर्जा देण्यासंदर्भातली फाईल श्री प्रधान यांच्या हाती येताच त्यांनी प्रस्तावाचं महत्व जाणून तातडीनं त्यावर कार्यवाही सुरु केली. संबंधितांशी आपणहून संपर्क साधून पुढं काय करायचं? कशी पावलं उचलायची? याचं मार्गदर्शन करावयासही त्यांनी मागंपुढं पाहिलं नाही. जे जे अप्लाइड आर्टमधील एक माजी विद्यार्थी आताचा आघाडीचा उपयोजित चित्रकार मंतोष लाल हा तर त्यांचा अगदी जवळचा मित्र. मंतोषनं जेजेमध्ये शिकत असतानाचा काळ अगदी प्रचंड गाजवला होता. सृजनात्मक काम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि झालेले विविध संप यात त्याचा प्रचंड सहभाग होता. स्वभाव अतिशय लाघवी आणि एकदा एखाद्याला भेटला की त्या माणसाला विसरायचं नाही. आपलंसं करून टाकायचं या त्याच्या विलक्षण स्वभावामुळं त्यानं जेजे खूप गाजवलं होतं. आपल्या जेजेतल्या दिवसांविषयी मंतोषनंच धर्मेंद्र प्रधान यांना वेळोवेळी कळवलं होतं. जे मंतोषनं केलं तेच आर्किटेक्चरच्या अनेक विद्यार्थ्यांनी केलं. साहजिकच धर्मेंद्र प्रधान यांच्या मनात जेजेविषयी प्रचंड ओलावा, उत्सुकता आणि सहानभूती निर्माण झाली. या प्रभावामुळंच डिनोव्होचं काम त्यांनी पटकन हातावेगळं केलं. आणि आता तर यूजीसीची मान्यतादेखील मिळू घातली आहे. तिचंच सेलिब्रेशन करण्यासाठी धर्मेंद्र प्रधान १९ ऑक्टोबर २०२३ ला एखाद्या यजमानासारखं म्हटलं तरी हरकत नाही स्वतः समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

खरं त्यांना त्या दिवशी जेजेमध्ये पाच तास घालवायचे होते. पण तांत्रिकदृष्ट्या ते शक्य झालं नसावं त्यामुळे किमान तीन तास तरी ते जेजेमध्ये असणार आहेत. मी तर असं ऐकतो आहे की त्यांच्या ज्या ज्या जुन्या मित्रांनी त्यांना जेजेविषयी वेळोवेळी सांगितलं होतं ते अप्लाइड आर्ट आणि आर्किटेक्चर कॉलेजमधले त्यांचे सारेच जुने मित्र या समारंभासाठी खास देश-परदेशातून येणार आहेत. मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम व्हावा असा त्यांचा प्रयत्न आहे. पण गेल्या पंधरा-वीस वर्षात जे जे स्कूल ऑफ आर्ट बंद करण्याचा घाट ज्यांनी घातला होता त्या महाराष्ट्र सरकारला किंवा त्यांच्या नोकरशाहीला हे कितपत मानवणार आहे कुणास ठाऊक?

जे जे स्कूल ऑफ आर्टमधला प्रत्येक कार्यक्रम स्कूल ऑफ आर्टच्या लॉनवर रंगला आहे. मग तो कार्यक्रम पुरस्कार वितरण समारंभाचा असो वा स्नेहसंमेलनाचा. भीमसेनजी – किशोरीताई यांच्या म्युझिकल नाईटचा असो वा जे कृष्णमूर्ती यांच्या व्याख्यानाचा. हे सारेच कार्यक्रम जेजेच्या त्या रम्य वातावरणात विलक्षण रंगत असत. तिथंच खरंतर हा कार्यक्रम व्हायला हवा पण असं कानावर येतंय की बहुदा हा कार्यक्रम अप्लाइड आर्ट किंवा आर्किटेक्चर कॉलेजच्या बंदिस्त सभागृहातच दोनशे-तीनशे माणसांच्या उपस्थितीमध्ये उरकला जाईल. तसं जर झालं तर ते मात्र जेजेच्या माजी विद्यार्थ्यांचं दुर्दैवच ठरेल यात शंकाच नाही. जेजेची महती आणि कीर्ती एखाद्या केंद्रीय मंत्र्याला कळू शकते पण या बाबतीत आमच्या महाराष्ट्रातले मंत्री आणि नोकरशाहीतले वरिष्ठ अधिकारी का कमी पडतात याची कारणमीमांसा खरोखरच कुणीतरी करायला हवी आहे. कालपरवा दिल्लीत सत्तेवर आलेल्या ‘आप’सारख्या पक्षाच्या उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनादेखील जे जे स्कूल ऑफ आर्टची महती कळते आणि ते ती उदय सामंत यांच्यासारख्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांला बोलून दाखवतात पण दिल्लीत बसून जे त्यांना कळतं ते महाराष्ट्रात राहून मंत्रालयापासून दोन-चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जेजेबाबत मात्र कळत नाही हे खरोखरच आपलं दुर्दैवं आहे. नाही का!

कालपासून या कार्यक्रमाची तयारी मोठ्या जोमात सुरु झाली आहे. ज्यांनी आयुष्यात कधी जेजेचा परिसर पाहिलेला नाही अशी मंडळी जेजेमध्ये फेऱ्या मारू लागली आहेत. कालच्या एका दिवसात वीस ट्रक भरून कचरा, डेब्रिज जेजे परिसरातून हटवलं गेलं. महाराष्ट्र सरकारनं ना-लायक माणसांची पदोपदी नेमणूक करून या जागतिक कीर्ती प्राप्त संस्थेची किती आणि कशी हेळसांड केली हे दाखवून द्यायला हे एव्हडं एकच उदाहरण पुरेसं आहे. नाही का! वीस वीस पंचवीस वर्षात साधा कचरासुद्धा यांना काढता येऊ नये? शेम! शेम!

सतीश नाईक 

संपादक

‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.