Features

जेजेच्या बक्षीस समारंभाची ऑंखो देखी हालत !

मी कलेचा निस्सीम चाहता आहे. जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि तिथून तयार झालेले कलाकार म्हणजे काय सांगू ? त्यांच्यावरच प्रेम शब्दात नाही व्यक्त करता येणार.  दरवर्षी  मी जेजेच्या वार्षिक प्रदर्शनाला हजेरी लावतो. आता मी कोण, माझा संबंध काय ते या लेखाच्या शेवटी तुम्हाला कळेलच. तोपर्यंत कळ काढा. पण जमशेदजींची शप्पथ दरवर्षी कार्यक्रमाचा दर्जा ज्या पद्धतीने खालावत चालला आहे ते बघून अतोनात दुःख होतं हो. वार्षिक प्रदर्शन तसं बरं असतं पण हल्ली म्हणे विद्यार्थी बाहेरून काम करून आणतात आणि प्रदर्शनात लावतात.

तर बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली ती मोठ्या नाट्यमय पद्धतीनं. प्रमुख पाहुणे सोडले तर शिक्षक सगळे जेजेबाहेरून शिकून आलेले. तर जेजेत  शिकलेले शिक्षक मागे कुठेतरी कोपऱ्यात ! आता नियतीचा असा कोणता क्रूर न्याय आहे ते कळत नाही की जेजेमध्ये  शिकलेले लोक कुठेतरी कोपऱ्यात जातायत आणि डिप्लोमावाले (ते पण बाहेरून आलेले) संस्थेचे प्रमुख होऊन बसत आहेत. आमच्या वेळी काय शान असायची डीनची, असो तो काळच वेगळा म्हणा.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते चित्रकार दिलीप रानडे, त्यांच्याबरोबर जेजेचे माजी प्राध्यापक उदय घरत आणि शिल्पकार अरुणा गर्गे. गर्गेबाई छान बोलल्या. घरत वयामुळे थकलेले तरीही आले आणि चांगलं भाषणही केलं. अर्थात ही जुनी मंडळी, बोलायला व्यवस्थित आणि कामाला वाघ. गर्गेबाई या वयातही न थकता काम करतात. आजकालची मुलं काम कमी आणि बोलण्यातही भयंकर चुका. एका मुलीने तर घरत यांची ओळख करून देताना ‘वस्त्र संकल्पन’ ऐवजी ‘वष्ठ संकल्पन विभाग’ केला हो त्याचा. हे ऐकून माझ्याबरोबर शिक्षकही गोंधळले ना, पण समोर बसलेल्या मुलांना मात्र काही कळलं नाही. तर अशी ही आजच्या मुलांच्या भाषेची तऱ्हा.

तसं कार्यक्रमाला असे अपशकुन होणार हे मी सुरुवातीलाच जाणलं. कारण आयोजकांनी पाहुण्यांना अक्षरशः प्रसाधनगृहाकडून कार्यक्रमस्थळी नेलं. आता टॉयलेटच्या बाजूने  म्हणायला मलाही लाज वाटते म्हणून प्रसाधनगृह म्हणतोय. तिकडून घाण वास मारत असताना ही मंडळी बिचारी याच भागातून आली. आर्ट अँड क्राफ्ट विभागाची धूळ, माती होती जोडीला. असे करत करत पाहुण्याची वरात पोहोचली इंटेरिअर विभागाचं प्रदर्शन पाहायला. इथे प्रदर्शनाचं उदघाटन झालं. आता बीएफए पेंटिंग विभागापासून सुरुवात करण्याऐवजी इंटेरिअर आधी का दाखवला असे यांनी ? ही तो ‘विश्वनाथांची इच्छा’ ! उदघाटनानंतर एमएफए आर्ट अँड क्राफ्ट विभागाचे प्रदर्शन बघताना असं लक्षात आलं की ही मुलं वर्गातच उपस्थित नसतात. एक एमएफएचा विद्यार्थी तर बाहेर व्यावसायिक कामे करतो.नुकतंच जहांगीर आर्ट गॅलरीला त्याचं प्रदर्शन पण झालं होतं. तो कॉलेजला किती उपस्थित असतो हा संशोधनाचा विषय आहे. तर अशा विद्यार्थ्याचं काम या प्रदर्शनात सुरुवातीला बघून तर मी थक्कच झालो. हीच तऱ्हा इंटेरिअर आणि टेक्सटाईलच्या विद्यार्थ्यांची. यातले बरेच स्टुडंट कॉलेजला येत नाहीत. त्यांचे शिक्षकही कुठे असतात कोणाला कळत नाही. वार्षिक प्रदर्शनाला मात्र हे कामासहित हजर असतात. एक विद्यार्थी तर पुण्याचा आहे. तो कॉलेजलाच येत नाही. त्याही विद्यार्थ्यांचं काम प्रदर्शनात मोक्याची जागा पकडून आहे.

डीनही पाहुण्यांना एमएफएचं काम मोठ्या कौतुकाने दाखवत होते बघा मी कसं विद्यार्थ्यांकडून काम करून घेतो ते. सिरॅमिकचं कामही या प्रदर्शनात होत. आता सिरॅमिकचा वर्गच बंद आहे तर सिरॅमिकचं काम कॉलेजमध्ये कसं होईल. ही सगळी मुलं बाहेरून काम करून आणतात हा म्हणूनच माझा संशय आहे.

या सगळ्या दाखवादाखवीच्या कार्यक्रमातच संध्याकाळचे साडेसात वाजले. मग एक पाहुणे स्वतःच म्हणाले की प्रदर्शन पाहायला नंतर येऊ आता मुलांना बक्षीस देऊया. पोरं बिचारी वाट बघत आहेत. बक्षीस समारंभाच्या ठिकाणीही अस्ताव्यस्त होतं सगळं. एक शिक्षकांना धड पाहुण्यांचा परिचय करून देता येत नव्हता. एक शिक्षक तर म्हणाले दाढ काढल्यामुळे माझी जीभ बोलताना घसरली. आता मला सांगा दाढ काढण्याचा आणि जीभ घसरण्याचा काही संबंध आहे का ? आणि एक मुलगी जी स्टाफ म्हणून काम करते तिच्या ‘वष्ठ’ विभागाचा किस्सा तर तुम्हाला आधीच सांगितलं आहे मी ! तर ही अशी धमाल उडाली होती. डीन साहेबांनी चक्क अहवालच वाचून दाखवला. त्यांच्या भाषणात डिझाईन थिंकिंग, प्रॉडक्ट डिझाईनिंग, इनोव्हेशन, रिसर्च, रोजगार तयार करणे, मुडबोर्ड, फायनल प्रॉडक्ट, भविष्याचे व्हिजन असे मुद्दे इतक्या वेळा आले की आपण एखाद्या एमबीएच्या (की इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरच्या? ) कोर्सच्या बक्षीस वितरणासाठी बसलोय का याचा मला भास झाला. कदाचित आता जेजे कलाकारांऐवजी उद्योजक तयार करत असावे, तसंही इथले शिक्षक खूप चांगले उद्योजक आहेतच म्हणा. शिकवता शिकवता ते बाहेरची कामही करतात की !

अशा सगळ्या गोंधळात बक्षीस देण्यास सुरुवात झाली. टीचर्स ट्रेनिंग विभागापासून बक्षीस देण्यास सुरुवात झाली. बक्षिसांची संख्या एवढी होती की आलेले पाहुणे बक्षीस वाटताना दमून गेले. मग त्यांची जागा भरून काढावी म्हणूनच की काय कला संचालकांना देखील या कार्यक्रमाला आमंत्रित केले असावे. कारण कला संचालकांना दिलेला मान बघता हे नक्की कला संचालकांचा आहेत ना हा प्रश्न पडला. सगळ्या पाहुण्यांचं  स्वागत शाल श्रीफळ आणि पुस्तक देऊन केलं गेलं. पण कला संचालकांचं स्वागतच झालं नाही. शेवटी कुणाला तरी आठवलं, मग तिथेच असलेल्या पुस्तकांपैकी दोन पुस्तके देऊन त्यांचं स्वागत अक्षरश: उरकलं गेलं.

तर आता बक्षिसांमध्येही एमएफएला ज्या मुलाला बक्षीस मिळालं, तो बाहेर व्यावसायिक काम करतो. त्याने बीएफएसाठी एक ‘गोड’स बक्षीस प्रायोजित केलं होतं. तर या मुलाला बक्षिस कुठलं ते डीन यांच्या नावाचं मास्टर्स अवॉर्ड मिळालं. अजून एक लक्षात येत की डीन फक्त एमएफएची बक्षिसं प्रायोजित करतात तर बीएफएला कोणीही अगदी एमएफएचे विद्यार्थीही बक्षीस प्रायोजित करत आहेत. हा सगळं प्रकार डिनोव्होला शह देण्यासाठी करण्यात येतोय का याची शंका मला आल्याशिवाय राहत नाही. यात कुठलंही प्रतिष्ठित बक्षीस नाहीये ना नाव आहे. कोणीही सोम्या गोम्या येतोय आणि बक्षीस जाहीर करतोय असा प्रकार.

एवढी बक्षीस देऊन दमल्यामुळे आणि बराच उशीर झाल्याने प्रमुख पाहुणे गर्गेमॅडम अर्ध्या कार्यक्रमात निघाल्या. त्यांच्या मागे काही शिक्षकही गायब झाले. आता हे शिक्षक त्यांच्यासोबतच का निघाले, त्यांना काय बोलायचं होत ते अजून गुलदस्त्यातच आहे. बीएफएची प्रमुख बक्षिसे बाकी असताना कला संचालकही निघाले पाहुण्यांशी बोलण्यासाठी. गर्गेमॅडम यांना निरोप देण्यात अर्धा तास निघून गेला. या काळात बीएफएची बक्षिसे देऊन झाली होती. यानंतर हळूच पुन्हा काही शिक्षक आणि कला संचालक एमएफएची बक्षिसे देण्यासाठी परत आले, जणू काही झालंच नाही अशा अविर्भावात. आता या सगळ्या वेळात मग प्रेक्षकही गायब झाले. ज्यांच्या मुलांना बक्षीस मिळाले ते पालकही गायब झाले. असं करता करता मागच्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या. मुळात बक्षिसांची संख्याच एवढी जास्त होती की प्रेक्षक आणि बक्षीस यांची संख्या बरोबरीत होती की काय अशी शंका यावी.

बक्षिसांचं अवाढव्य गणित मी वर सांगितलंच होतं. पेंटिंग विभागात बीएफए आणि एमएफएचे मिळून १४० विद्यार्थी आहेत. यापैकी ८१ विद्यार्थ्यांना बक्षिसांची खैरात वाटण्यात आली आहे. युनिव्हर्सिटीने मान्यता देऊन मेटल क्राफ्ट, टेक्स्टाईल, इंटेरिअर, सिरॅमिक, शिल्पकला यांचे एमएफएचे वर्ग जेजेमध्ये सुरु केले. प्रत्येक विभागाला पाच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मान्यता आहे. पण तिथे विद्यार्थ्यांना बसण्याची सोयच नाहीये तर मग ही मुलं कॉलेज अटेंड कशी करतात ? ही मुलं बाहेर नोकऱ्या करतात आणि कॉलेज अटेंड करत नाहीत. एक मुलगा तर स्पेशल स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करतो आणि सोबतच एमएफएचं शिक्षणही घेतो. हे शक्य कसं होतं ? या डिपार्टमेंटला टीचिंग स्टाफच नाहीये तर वर्ग कसे होतात ?

ही मुलं फक्त वार्षिक प्रदर्शनाच्या वेळी कॉलेजमध्ये हजर होतात, प्रदर्शनात काम प्रदर्शित करतात (तेही ते स्वतः करतात का कोणाकडून करून घेतात हा मोठा प्रश्नच आहे) वर्षभरात त्यांची हजेरीही कोणी घेत नाही आणि अगदी बक्षीस वगैरे घेऊन यांचं एमएफए पूर्णही होतं.

जेजे स्कूल ऑफ आर्टमधील सर्व डिपार्टमेंट्स (बीएफए + एमएफए) यांची एकत्रित बेरीज केली तर एकूण ४४२ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी १९३ विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाली आहेत. त्यापैकी अनेक बक्षिसे ही खुद्द डीन साबळे यांनीच प्रायोजित केली आहेत. खरं तर आधी शिक्षकांची मिटिंग घेऊन रीतसर ठराव पास करून किती बक्षिसं द्यायची याची बैठकीत मंजुरी घ्यावी लागते. मगच बक्षीस देता येत. इथं मात्र डीन साहेबांनी आपल्या मर्जीतल्या विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी म्हणा किंवा एमएफएची ऍडमिशन्स वाढावी म्हणून म्हणा कुठल्यानं  कुठल्या कारणाने अक्षरश: खैरात वाटल्यासारखी बक्षिसं वाटली गेली आहेत. अभ्यास केला की असं दिसून येत की एमएफएच्या सर्व विभागानं प्रवेश घेणारे विद्यार्थी हे डीन साबळे यांच्या मर्जीतलेच असतात. त्यांना आपल्या गुडबुकमध्ये ठेवण्यासाठी म्हणा, किंवा बाहेरची कामे करून घेण्यासाठी म्हणा डीन प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काहीतरी बक्षीस देतातच. एकाला अवॉर्ड दे, एकाला प्रमाणपत्र दे, काहींना पहिल्या वर्षी बक्षीस, काहींना दुसऱ्या वर्षी बक्षीस असं पुढं मागे केलं की सर्वच मुलं एमएफएच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षी बक्षीस घेऊनच घरी जातात.

जाता जाता: पाहुण्यासाठी अल्पोपहारच्या मेनूमध्ये सामोसा, कटलेट, खारी बुंदीचा लाडू असा ‘हेल्दी’ मेन्यू होता. आलेले सर्व पाहुणे डाएटवाले होते असे कळले त्यामुळे हा मेन्यू आवडला की नाही ते कळले नाही.

कलादीपचे अध्यक्ष, जीएस, एलआर यांची कार्यक्रमात आणि स्टेजवर उपस्थिती नव्हती. सूत्रांकडून असे कळते की कलावेध स्पर्धेचा हिशेब मागायला पालक इथेही येतील अशी भीती असल्याने त्यांनी प्रेक्षकातच बसण्याचा निर्णय घेतला.

*****
लेखक
एक आजी नाही, माजी नाही, पाजी विद्यार्थी.

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.