Features

‘जेजे जगी’ : प्रकाशनाआधीच संपला !

जे जे स्कूल ऑफ आर्टमधलं शिक्षण १९८१ साली पूर्ण झाल्यापासून जेजेची सारी व्यवस्था बदलली जावी आणि तिथं विद्यार्थ्यांना चांगलं आणि अत्याधुनिक शिक्षण मिळावं या दृष्टीनं काहींनी एकांडे प्रयत्न केले. पण ८५ सालानंतर मात्र सारंच चित्र बदलत गेलं. सरकारच्या अनास्थेमुळे जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि परिसरातील अन्य महाविद्यालयांची अक्षरशः वाताहत झाली. जवळजवळ ४० वर्षाचा हा लढा डी-नोव्हो दर्जा मिळाल्यावर निश्चितपणानं संपणार आहे. आणि पुन्हा एकदा जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि परिसर सोनेरी दिवसात प्रवेश करणार आहे. हे होईल तेव्हा होईल, पण गेल्या १६५ वर्षामधल्या सोनेरी दिवसांच्या आठवणी चाळवायला काय हरकत आहे ? याच हेतूनं जे जे जगी जगले’ या ग्रंथाची घोषणा झाली. असंख्य अडचणींवर मात करून सदर ग्रंथ लवकरच प्रकाशित होऊ घातला आहे. त्यासंदर्भातला हा विशेष लेख.

जे जे स्कूल ऑफ आर्टला डी-नोव्हो दर्जा मिळवण्यासंदर्भातली चळवळ सुरु होत असतानाच ‘जे जे जगी जगले…’ या ‘चिन्ह’च्या महत्वाकांक्षी ग्रंथाचं खूप काळ रखडलेलं काम आता मार्गी लागलं आहे हे जाहीर करायला अतिशय आनंद होतो आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे तर हे काम प्रमाणाबाहेर लांबलं यात शंकाच नाही. त्यासंदर्भात ग्रंथाच्या प्रस्तावनेत सविस्तर लिहीत असल्यामुळे इथं त्याविषयी लिहिणं तूर्त तरी टाळतो आहे. प्रकाशन सोहळा होईपर्यंत या संदर्भात मी वेळोवेळी लिहिणारच आहे, पण ते एक असो.

तूर्त संपादनाचं काम जोरात चालू आहे. ते करीत असताना ग्रंथात प्रसिद्ध होणारा मजकूर वारंवार वाचावा लागतो. वारंवार त्यावर संस्कार करावे लागतात. वारंवार त्यात बदल करावे लागतात. शुद्धलेखन काळजीपूर्वक पाहावं लागतं. हे सारं करीत असताना लेखनातला प्रवाहीपणा कुठल्याही परिस्थितीत तुटून द्यायचा नसतो. कुणाही वाचकानं त्यातलं कुठलंही पान उघडलं आणि वाचलं तर पुढील मजकूर त्या वाचकाला शेवटपर्यंत वाचायला भाग पडलं पाहिजे असा संपादक म्हणून माझा अट्टाहास असतो तो पूर्ण करण्यासाठी मी अगदी आरंभापासूनच प्रयत्नशील राहिलो आहे. ‘चिन्ह’चे शेवटचे पाच अंक किंवा ‘गायतोंडे’ ग्रंथ हे या प्रयत्नांचं अत्युच्च टोक होतं असं मला नम्रतापूर्वक नमूद करावंसं वाटतं.

हे सारं प्रचंड वेळखाऊ काम ठरलं त्यामुळेच नंतर नंतर तर एक एक अंक पुरा करावयास वर्ष वर्ष दीड दीड वर्ष लागू लागलं ( अंकात एकही चूक राहू नये म्हणून ‘नग्नता’ अंक सुमारे २०-२५ वेळा वाचला होता तर ‘गायतोंडे’ ग्रंथ सुमारे ३०-३५ वेळा, यावरून ‘चिन्ह’च्या निर्मिती मागच्या कष्टाची कल्पना यावी. )   परिणामी ‘चिन्ह’चा सारा आर्थिक डोलारा कोसळला व साहजिकच अंक बंद  करण्याची घोषणा करणं भाग पडलं. आता नवीन तंत्रज्ञानानं उपलब्ध करुन दिलेलं ‘ऑनलाईन’ प्रकरण भलतंच सोयीचं वाटतं. एक तर खूपच वेळ वाचतो आणि आर्थिक दबाव तितकासा जाणवत नाही. आणि मुख्य म्हणजे अगदी अल्पवधीत खूपच जास्त लोकांशी आपण जोडले जातो. म्हणूनच  ‘चिन्ह आर्ट न्यूज’ सुरु केलं. त्यातही असंख्य अडचणी आल्या, पण बऱ्याच प्रयत्नानंतर ते प्रत्यक्षात आलंच. अशा पद्धतीनं आता आम्ही खूप आधी केलेल्या कमिटमेंटपाशी येऊन ठेपलो आहोत.
त्यानुसार आता दिवाळीच्या सुमारास ‘जे जे जगी जगले…’ प्रकाशित होईल आणि पाठोपाठ डिसेंबरपर्यंत ‘ व्यक्तिचित्रं पण शब्दातली..’ हे देखील प्रकाशित होईल. या नंतर मात्र ‘चिन्ह’कडून छापील स्वरूपात काहीही प्रसिद्ध करायचं नाही असा निर्णय आम्ही घेतला आहे. काय असेल या ‘जे जे जगी जगले…’ ग्रंथात ? या ग्रंथात असेल जेजेचा जवळ जवळ सर्वच्या सर्व इतिहास आणि नामवंतांनी कथन केलेल्या मंतरलेल्या दिवसांविषयीच्या आठवणी.  ‘कलाबाजार’ किंवा ‘कालाबाजार’ या ‘चिन्ह’च्या गाजलेल्या अंकाची आठवण अनेकांना होईल पण तसे या अंकात तात्कालिक असे काहीच नाही, आहे ते सारं पुढली अनेक वर्ष किंवा वर्षानुवर्षं वाचलं जाईल असं कालातीत साहित्य.
‘चिन्ह’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला तो १९८७ साली. त्याला आता तब्बल ३५ वर्ष झाली आणि ‘चिन्ह’ बंद झाल्याला देखील लोटली १० वर्ष. पण इतक्या वर्षानंतर आज देखील तो अमुक एक अंक आहे का ? पहिल्या अंकाची एक तरी प्रत आहे का ? ‘भास्कर कुळकर्णी’ अंकाची एक तरी प्रत मिळेल का ? ‘गायतोंडे’ अंकाची एक प्रत पहाना असेल तर ! अशा चौकशा करणारे फोन किंवा मेसेजेस हटकून अगदी दर आठवड्याला येतातच. याचाच अर्थ असा की  ‘चिन्ह’मधलं आम्ही प्रसिद्ध केलेलं साहित्य हे केवळ वाचनीयच नव्हतं तर टिकावू देखील होतं. अक्षर वाङ्मयात ते मोडतं किंवा नाही ते आता काळच  ठरवेल, मी तसा कुठलाही दावा करणं योग्य नाही. पण अनुक्रमे ३५, ३४, ३३ वर्षांपूर्वी साध्या वृत्तपत्राच्या कागदावर प्रसिद्ध केलेल्या अंकांमधल्या मजकुराला जर इतक्या वर्षानं आजही मागणी असेल तर ‘चिन्ह’चा  प्रवास त्या दिशेनं होऊ लागलाय असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरू नये.
हे सारं असं काही तरी व्हावं या हेतूनं हे सारं केलं होतं का ? मुळीच नाही. तेव्हा तितकी समज होती असंही आता वाटत नाही. पण आपण जे काही करतो आहोत ते प्राणपणानं करायचं ? काहीही हातचं राखून न ठेवता करायचं याची जाणीव मात्र ते करताना निश्चितपणं होती असं आज अगदी ठामपणं सांगताना मला मात्र कुठलाही संकोच वाटत नाही हे नक्की. मला वाटतं त्याच प्रामाणिक प्रयत्नांचं रूपांतर हे या अशा स्वरूपाच्या सततच्या मागणीमधून प्रत्ययाला येत असावं. भले त्यातनं काही आर्थिक फायदा जरी मला झाला नसला, हे सारं उभारताना तसा विचारही कधी मनात आला नाही. उदाहरणार्थ आपण पेंटींग्ज करतो,  ती करताना कुठं आपल्या डोक्यात ती विकली जातील असं असतं ? काही तरी सांगायचं आहे, काही तरी मांडायचं आहे हेच महत्वाचं असतं ना ? तसंच इथंही होतं. तो प्रामाणिकपणा सातत्यानं जपला गेला म्हणूनच तर त्याला हे असं अभूतपूर्व यश मिळालं असावं. भले ते लौकिकार्थानं व्यावसायिक नसेल, पण हे काय थोडं झालं ?
केवळ त्या मुळेच कला रसिक, वाचक महिनोन महिने अंकाची किंवा ग्रंथाची वाट पाहत असावेत ! आता उदाहरणार्थ हेच पहा ना, ‘जेजे जगी जगले’ ग्रंथाची घोषणा आम्ही केल्याला आता बराच काळ लोटला. पण मागणी नोंदवलेले वाचक अत्यंत शांतपणे त्या ग्रंथाची वाट पाहत आहेत. घोषणा केल्यानंतरच्या काळात बरीच स्थित्यंतर घडली. सर्व आराखडा निश्चित झाल्यावर देखील त्यात काहीतरी कमतरता आम्हाला जाणवू लागली. ती नेमकी कोणती ते देखील उमगावयास वेळ लागला. पण उमगल्याबरोबर आम्ही ती त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरु केले आणि ‘जे जे जगी’मध्ये जवळ जवळ जेजेचे सुमारे २० माजी विद्यार्थी, जे आता विविध क्षेत्रात काम करीत आहेत अशांच्या आत्मकथनांची त्यात भर घातली गेली. आमचा हा निर्णय ग्रंथाचं अंतरंग बदलवून टाकणाराच ठरला. ही सर्वच मंडळी सेलिब्रिटीच होती साहजिकच प्रकाशनाचा कालावधी वाढतच गेला. त्याविषयी ग्रंथाच्या प्रस्तावनेत विस्तारानं लिहिलं असल्यानं इथं हा विषय आवरता घेतो.
हे वाचल्यावर अर्थातच वाचकांची, ‘चिन्ह’च्या चाहत्यांची उत्सुकता निश्चितपणं वाढली असणार. म्हणूनच त्याची संपूर्ण माहिती देतो.’चिन्ह’च्या गाजलेल्या ‘गायतोंडे’ ग्रंथाचीच निर्मिती मूल्ये लाभणार असलेल्या या ग्रंथात काय काय असेल ? प्रामुख्यानं ‘जे जे जगी जगले…’ हे सदर किंवा ही लेखमाला. ज्यात जेजेत शिकतानाचे अनुभव सांगत सहभागी झाले आहेत जेजेचे माजी विद्यार्थी सर्वश्री ऑस्कर विजेत्या भानू अथैया,  नाटककार ‘वस्त्रहरण’कर्ते गंगाराम गवाणकर, चित्रपट दिग्दर्शक – अभिनेते अमोल पालेकर ,शास्त्रीय गायक पं शरद साठे, नृत्यांगना सुचेता भिडे चाफेकर, तसेच अभिनेते मनोज जोशी, संदीप कुलकर्णी, सतीश पुळेकर, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये, ग्रंथप्रेमी श्याम जोशी, साहित्य समीक्षक दीपक घारे, चित्रपट निर्माते विनय नेवाळकर, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण, लेखक – कवी चंद्रशेखर गोखले, नाटककार पटकथाकार संजय पवार, सेट डिझायनर नितीन देसाई, चित्रपट दिग्दर्शक गिरीश मोहिते, रवी जाधव, महेश लिमये तसेच अभिनयाच्या क्षेत्रात चित्रपट, दूरदर्शन, नाटक, जाहिरात क्षेत्र गाजवणाऱ्या सर्वश्री प्रिया तेंडुलकर, अमिता खोपकर, सुप्रिया मतकरी आणि हेमांगी कवी.

या खेरीज जेजेच्या परिसरातील दीडशे पेक्षा जास्त वर्षं जुन्या अशा ऐतिहासिक डीन बंगाल्यात राहण्याचं भाग्य ज्यांना लाभलं त्या सुभार्या शंकर पळशीकर, भारती मंगेश राजाध्यक्ष आणि शील बाबुराव सडवेलकर यांच्या बंगल्यातल्या वास्तव्याविषयीच्या आठवणी.

जमशेदजी जीजीभाई ( विश्वास यंदे )
कॅप्टन सॉलोमन ( चिंतामण गोखले )
धोंड मास्तरांचं ‘रापण’ ( शशिकांत सावंत )
जेजेतले सोनेरी दिवस ( बी डी शिरगांवकर )
यंदे सर ( मंगेश राजाध्यक्ष )
पळशीकर सर ( अरविंद हाटे )
सडवेलकर सर ( सुधाकर लवाटे )
कदम सर ( माधुरी पुरंदरे )
सोलापूरकर सर ( माधव इमारते )
जेजे कॅन्टीन मधलं वास्तव्य ( आशुतोष आपटे )
जगभरातली महत्वाची आर्ट स्कूल्स आणि जेजे ( देवदत्त पाडेकर )
जेजे संदर्भातलं असं बरंच बरंच बरंच काही या ग्रंथात संकलित अथवा संपादित करण्याचा प्रयत्न ‘चिन्ह’नं या ग्रंथात केला आहे.

हे सारं मी आताच का सांगतोय ? तर खूप काळ थांबलेलं काम आता पुन्हा नव्यानं सुरु झालंय आणि ज्यांनी हा ग्रंथ आधीच सवलत शुल्क भरून बुक केला आहे अशाना दिवाळीच्या सुमारास तो मिळणार आहे हे सांगण्यासाठी. आगाऊ मागणी नोंदवणाऱ्या वाचकांना या ग्रंथाचे अपडेट्स सातत्यानं मिळावेत यासाठी  व्हॉटसअपवर लवकरच एक ब्रॉडकास्ट ग्रुप देखील सुरु केला जाणार आहे. आणि प्रकाशन समारंभापर्यंतच नाही तर प्रत्येक वाचकांपर्यंत त्याची प्रत पोहोचेपर्यंत तो कार्यान्वित ठेवला जाणार आहे.

आणखी एक महत्वाचं म्हणजे या ग्रंथाच्या सर्वच्या सर्व प्रती या प्रकाशनपूर्व सवलत योजनेमध्येच नोंदवल्या गेल्या आहेत. नव्याने आवृत्ती काढण्याच्या सोपस्कारात अडकवून घेण्याची आणि त्यात वेळ दवडायची इच्छा नसल्यानं आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच या ग्रंथासंदर्भात कोणतीही चौकशी करू नये अशी नम्र विनंती करीत आहोत. हे जे निवेदन आम्ही प्रसिद्ध करीत आहोत ते ज्यांनी या ग्रंथाच्या सवलत योजनेत भाग घेतला आहे त्यांना अपडेट्स मिळावे या हेतूनं करीत आहोत. इतकंच नाही तर ‘चिन्ह’च्या यु ट्यूब चॅनलवर ‘जेजे जगी’ ग्रंथात सहभागी झालेल्या सर्वच जेजेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मुलाखतींचे कार्यक्रम देखील सादर करणार आहोत. हा ग्रंथ लवकरात लवकर प्रसिद्ध व्हावा आणि जेजेला डी-नोव्हो दर्जा मिळावा यासाठी तुमच्या शुभेच्छांची आम्हाला आवश्यकता आहे. देणार ना ?

सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.