Features

जेजेचे सर्टिफिकेट !

जेजेला डी-नोव्हो दर्जा मिळावा म्हणून जी चळवळ सुरु झाली आहे तिची धुरा चित्रकार आशुतोष आपटे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. अगदी पहिल्या दिवसापासून ते या संदर्भात काहीना काही फेसबुकवर नियमितपणे लिहीत आहेत. त्याच मालिकेतला हा एक अगदी ताजा लेख ! वाचा आणि विचार करा.

अरे बाबा आमच्या कडे कुठे आहे जेजेचं सर्टिफिकेट?
शिकलो जेजेत पण आमचं सर्टिफिकेट होतं
कला संचालनालय किंवा मुंबई विद्यापीठाचं
तेही आम्ही घेतलंय कुठे..?
भाऊ,
आमच्या कपाळावर शिक्का आहे जेजेचा
पोलीस बुटावरुन, शिस्तबद्ध वागण्यावरून
मिल्ट्रीवाला बारीक केसावरून,
देशाभिमान दिसणाऱ्या देहबोलीतून
तसा जेजेवाला वागणे, संस्कार,
कामावरून आणि मुख्य म्हणजे
आत्मविश्वासावरुन ओळखला जातो.
असं असताना जेजे राज्य विद्यापीठ करुन
जेजेचं सर्टिफिकेट घेऊन
जादूची कांडी फिरवल्यासारखा परिणाम होणार आहे काय ?
अरे दादा,
शिक्षण महत्त्वाचे की सर्टिफिकेट ?
ज्यांना जेजेत शिकायचं त्यांना जेजेत शिकता येईलच की..!
नाही कुणी म्हटले आहे… ?
दुसऱ्या कुठल्या आर्ट स्कूललाही शिक्षण घेता येतेच की…
पण शिकायचं दुसरीकडे,
आणि सर्टिफिकेट हवे जेजेचे
ही कोणती मागणी… ?
महाराष्ट्रात काही जुन्या कलाशिक्षण संस्था आहेत…
अतिशय दर्जेदार आहेत..
जेजेच्या जोडीच्या आहेत
काही काही बाबतीत तर जेजेपेक्षा काकणभर सरस आहेत…
त्यांचे जुने भारदस्त शिक्षक बघा
कोल्हापूरचे जुने दळवीसर
पुण्याचे डेंगळेसर, विजय कदमसर, पांडुरंग ताठे सर, सुधाकर चव्हाण सर, सुभाष पवार सर आणि सगळ्यात भारी तो कलाविश्वचा व नंतर पाषाणला शिकवणारा पराग सूर्यवंशी
नाशिकचे वा. धो. कुलकर्णी
अगदी तिथे नाशकात क्लेरीकल काम करणारे
पण निसर्ग चित्रकलेत स्वतःचा ठसा उमटवलेले शिवाजी तुपे सर
थोडे अलिकडचे शिकवायला सांगलीत असलेले
पण आम्हा जेजेवाल्यांनाही आदरणीय असे माजगावकर सर
कोल्हापूर कलामंदिरातले माझे सगळ्यात आवडते शिक्षक वडणगेकर सर
तिथेच शिकवणारे शिल्पकार संजय तडसरकर सर
नाशिकचे इंडियन आर्ट शैलीतले दिग्गज म्हणून ओळखले जाणारे दिनकर जानमाळी सर
ठाण्याच्या कलाशिक्षणाशिवाय नृत्यकलेतही पारंगत नीलिमा कढे मॅडम
खिरोद्याचे गवळी सर
नागपूरचे प्रभाकर पाटील सर व मनिषा पाटील मॅडम
औरंगाबादचे प्रिंट मेकिंगमधले वामन चिंचोळकर सर
आणि मलाही शिकवायला होते पुढे औरंगाबादला गेले ते दिलीप बढे सर
आमच्या चित्रकला मंदिर ग्रांटरोडचे नाबर सर
इंडीयन आर्टचे कवळी सर
मॉडेल आर्टचे सुप्रसिद्ध जलरंग चित्रकार एम. एस. जोशी सर
सावर्ड्याचे प्रकाश राजेशिर्के सर
मला आणि संजय सावंतला
त्यांच्यासोबत शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
इतकेच कशाला पूर्वी हळदणकर क्लासेस होते
साधे क्लासेस पण दबदबा जेजेपेक्षा भारी
तेव्हाचे विद्यार्थी खास हळदणकर क्लासला जात
मग हवं तर जेजेत नंतर येत
चित्रकार आलमेलकरही तसेच होते
मी पाहिलंय त्यांचं प्रात्यक्षिक
वसईचे कला संस्थेचे अध्यक्ष पण ग्राफिक डिझाईन मधले जागतिक कीर्ती असलेले
सुप्रसिद्ध रॉबी डिसिल्व्हा सर
मला संजय सावंत व गजानन कबाडेला मिळाली आहे रॉबींसोबत काम करण्याची संधी
ही माणसे, हे शिक्षक तोलामोलाचे होते
आणि अशा माणसांमुळे संस्था घडल्या
त्यांनी विद्यार्थी घडवले
मी आज जो काही थोडाबहुत आहे
तो मला मिळालेल्या चांगल्या शिक्षकांमुळे
त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळे
आणि जेजेच्या परिसरातील वातावरणामुळे
नाही का निर्माण करता येत जेजेसारखं वातावरण
आणि शिक्षण आपल्या आपल्या कला संस्थेत ?
सांगा ना…
आपल्याला काय द्यायचे आहे विद्यार्थ्यांना..
सर्टिफिकेट की ज्ञान ?
आपण नाही का घडवू शकत सक्षम कलाकार ?
का आपल्याला हवा आहे सर्टिफिकेटचा पांगुळगाडा… ?
हो, डिग्री हवी,
कारण उच्च शिक्षणाची संधी आणि सोय हवी, प्रामाणिक आणि कसदार शिक्षक हवेत हवेत…
मूलतत्व तीच ठेवून अभ्यासक्रम काळानुरूप हवा…
म्हणून राज्य विद्यापीठ हवेच की
मात्र दहावीनंतर कमी कालावधीत करीअर करता येणारे सक्षम डिप्लोमा कोर्सही हवेतच
त्या डिप्लोमा कोर्ससाठी अधिकृत बोर्ड हवे.
जेणेकरून डिप्लोमा झाल्यावर पुढे शिकायचे असल्यास डिग्रीच्या थेट द्वितीय वर्षाला
मेरीट नुसार प्रवेश घेता येईल..
हवं की सगळं हे… !
पण मागणी काय करताय तर
जेजेचे डिनोव्हो होऊ देऊ नका…
आम्हाला जेजेचे सर्टिफिकेट द्या… !
म्हणजे यांना उपाशी ठेवा
आणि यांचे जेवण आम्हाला द्या !!
ही कोणती संस्कृती ?
अरे तुम्ही तुम्हाला पचतंय ते खा
त्यांना त्यांचे खाऊ द्या..!
साधा हिशोब आहे…
दोस्तांनो,
तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी
शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचा आमचा प्रयत्न हवा
शिक्षण क्षेत्र तळागाळाला नेण्याचा नाही…!
सर्वांना एकाच प्रकारचे शिक्षण मागणे
हा वेडेपणा आहे..
अजीर्ण होईल किंवा उपास घडेल..
काय उपयोग?
ज्याला जे पचतं त्याला ते देणारे
विविध प्रकारचे शिक्षण हवे…
समाजाला गवंडीही हवा असतो
इंजिनियरही हवा असतो
आर्किटेक्टही हवा असतो
आणि
त्या त्या क्षेत्रात संशोधन करुन
नव्या वाटा शोधणारा शास्त्रज्ञही हवा असतो
तसेच त्याहून महत्वाचा या विविध पातळीवर
मार्गदर्शन करणारे सत्पात्री शिक्षकही हवे असतात…
ज्या संस्थाना त्यांची स्वत:ची ओळख आहे
स्वतःची शिक्षण परंपरा आहे
ती ओळखच अधोरेखित करायला हवी…
आम्ही आमच्या वाडवडिलांची परंपरा पुढे न्यायला हवी
आम्हाला आमचे नाव आहे
ते पुसून
दुसऱ्याचे आडनाव कशाला हवे?
चांगले शिक्षण मागुया
शिक्षणाचा दर्जा वाढवूया
जेजे डिनोव्हो हे अप्लाइड आर्ट, आर्किटेक्चर, पेंटिंग, स्कल्पर, सिरॅमिक्स, मेटल क्राफ्ट, टेक्सटाईल, कलाशिक्षण या विविध शाखांमधील स्पेशलायझेशन तसेच
आंतरशाखीय अनन्यसाधारण अभ्यासक्रम राबवण्यासाठी आहे…
आणि हे अद्ययावत शिक्षण देण्याची सोय
महाराष्ट्रातच काय जगातही सध्या कुठे नाही…
त्यामुळे डिनोव्हो दर्जा एकमेवाद्वितीय म्हणून
जेजेला मिळतोय…
मग का खोडा घालण्याचा डाव रचताय ?
आणि हे जेजे डिनोव्हो शिक्षण
महाराष्ट्रातील कोणाही विद्यार्थ्याला
मिळणार आहे…
जेजे डिनोव्हो महाराष्ट्र शासनाचेच राहणार आहे…
म्हणून फीही जास्त नसणार आहे
शिवाय फी सवलती असणारच आहेत…
प्रवेशाची प्रक्रियाही शासनमान्यच असणार आहे…
इथे जे. जे. त महाराष्ट्रातील ग्रामीण, शहरी, निमशहरी
असा कोणत्याही भागातला, कोणत्याही स्तरावरचा विद्यार्थी शिकू शकणार आहे…
मग का विरोध…?
चला एकजुटीने जेजे डिनोव्हो साठी मागणी करुयात…
तेवढ्याच एकजुटीने डिप्लोमासाठी कला शिक्षणाचे अधिकृत बोर्ड असावे अशी मागणी करुयात…
आणि होय स्वतंत्र महाराष्ट्र कला विद्यापीठही होऊच द्या की… !
विचार बदला
विचार सकारात्मक करा
विचार एकोप्याचा करा
चला लढूया..!!
अवघ्या महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाचा दर्जा वाढण्यासाठी लढूया !
-आशुतोष राम आपटे
[ आपट्याची पानं ]

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.