Features

जेजेच्या बातम्या कोण देतो?

ज्यांच्या कर्तृत्वामुळे डिनोव्होअभ्यासक्रमाची पायाभरणी घातली गेली त्या जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे प्रभारी अधिष्ठाता डॉ संतोष क्षीरसागर यांच्या जागी ज्यांच्या सेवानिवृत्तीस फक्त नऊ महिने राहिले आहेत अशा नागपूरच्या श्री गिरी यांना आणून कला संचालनालय आणि उच्च शिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांनी आपली लायकीच दाखवून दिली आहे. स्वतःच्या स्वार्थापायी आपण महाराष्ट्रातल्या ५०० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचादेखील विचार करत नाही हेदेखील त्यांनी बेगुमानपणे वागून दाखवून दिलं आहे. आपण मराठी माणसांनी आता हे फक्त गप्प बसून पाहत राहायचं, दुसरं उरलंय काय?

———-

जेजे संदर्भात एखादी बातमी प्रसिद्ध झाली म्हणजे या बातम्या यांना कुठून मिळतात? कोण देतात याना या बातम्या? कोण पुरवतं अशी मुद्देसूद  माहिती? असा प्रश्न विशेषतः जेजे आणि कला संचालनालय परिसरात अगदी हमखास विचारला जातो. अगदी गेली चाळीस वर्ष सातत्यानं विचारला जातो आहे. आणि मग जेजेमधली अनेक नावं घेतली जातात. उदाहरणार्थ अमुक असेल तमुक असेल वगैरे वगैरे. आणि मग त्या व्यक्तीला टोमणे मारून सतावलं जातं. (जेजेचा आणि टोमण्यांचा संबंध तसा पूर्वापार आहे) वरिष्ठांकडे तक्रारी केल्या जातात. पण त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्यानं कालांतरानं ते टोमणे युद्ध थांबतं. मग काही दिवसानं पुन्हा बातमी आली की पुन्हा सारं नव्यानं सुरु होतं.

 

मला बातम्या ‘पुरवणारे’ असे असंख्य तथाकथित ‘खबरे’ गेल्या चाळीस वर्षात सेवानिवृत्त झाले आहेत, पण कुणालातरी दोषी ठरवायचा हा असला सिलसिला तसाच आजपर्यंत अखंडित सुरु आहे. मी मात्र या साऱ्यातून मनसोक्त करमणूक करुन  घेत असतो. या संदर्भात अगदी खरंखरं सांगायचं तर या बातम्या मला जेजे किंवा कला संचालनालयाच्या  नोकरीत असलेले कुणीही देत नाहीत  किंवा आधीही कुणी देत नव्हतं. कारण एकतर हे सारे सरकारी नोकर असतात. त्यात अलीकडे तर हंगामी, कंत्राटी नेमणुकांचा सुळसुळाट झाला असल्यानं, उद्याची शाश्वतीच नसल्यानं त्यातले तर कुणीच ‘ब्र’ देखील काढायची शक्यता नसते. बहुसंख्य सरकारी नोकर हे  बऱ्यापैकी घाबरटच  असतात. आपण काही बोललो किंवा कुणाला काही  सांगितलं आणि आपल्या नोकरीवर गदा  आली तर? ही भीती त्यांना सतत भेडसावत असते. आणि त्यातच ही मंडळी चित्रकलेसारख्या निरुपद्रवी विषयाशी संबंधित असल्यानं जरा जास्तच टरकून असतात.

साहजिकच तुम्हाला प्रश्न पडेल की, मग ही अतिशय अचूक माहिती माझ्यापर्यंत येते तरी कशी? ती येते ती चित्रकला वर्तुळातील मित्रमैत्रिणी, स्नेही, ‘चिन्ह’चे फॉलोअर्स वगैरे लोकांकडून. दिवसातला अर्धाएक तास तरी मी फोनवर असतो. त्या फोनगप्पांमधून मला बातम्यांचा सारा मालमसाला मिळत असतो. पूर्वी मी अगदी नियमितपणं गॅलरीत जायचो. कोरोना लॉकडाऊन नंतर मात्र महिन्यातून एखाददुसऱ्या वेळी मला गॅलरीत जाणं जमतं. पण या गॅलरीच्या फेरफटक्यात देखील बराचसा मालमसाला हाती लागतो. मिळालेले धागे जुळवायचं काम मात्र जिकिरीचं असतं. पण आता इतक्या  वर्षाच्या सरावानं तेदेखील मला छान जमू लागलं आहे. माझे मित्रदेखील आता बातम्या  मिळवण्यात चांगलेच तरबेज झाले आहेत. अशी काही बातमी मिळणार आहे असा नुसता संशय जरी त्यांना आला तरी ते सावधान पवित्रा घेऊन फोनमधला टेपरेकॉर्डर ऑन करून  टाकतात. त्यामुळेच माझ्या बातम्यात किंवा लेखात तपशील चुकला आहे असं सहसा होत नाही. मात्र एक व्यवधान मी पाळतो. लिहून झालं रे झालं की मी ते संभाषण डिलिट करायला विसरत नाही.

 

जेजेत तहहयात किंवा आयुष्यभर  साहाय्यक अधिव्याख्याता ते अधिव्याख्याता इतकाच प्रवास करू शकलेला अनिल नाईक हा माझा जेजेमधला सहाध्यायी. अत्यंत गुणी कलावंत आणि शिक्षक असलेल्या अनिलनं आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत कधीही माझ्याकडे साधं तोंडदेखील उघडलं नाही. ना त्यानं कधी मला जेजेबाबत साधी बातमीदेखील दिली. असं असताना त्याच्याकडे देखील संशयानं पाहिलं गेलं. २००० सालापासून जेजेची जी काही दुरावस्था झाली ती पाहून मी जेजेत जाणं कटाक्षानं टाळलं. अनिल सेवानिवृत्त  झाला त्या दिवशी त्याला भेटायला म्हणून आवर्जून गेलो. पण त्यानंतर मात्र मी जेजेत पाऊल टाकणं टाळलंच कारण माझ्या परिचयाचं तिथं कुणी उरलंच नव्हतं. अनिलसारख्या वर्गमित्राकडून मी कधी जेजे स्कूल संदर्भात  बातम्या किंवा माहिती घेतली नाही – तो मी संतोष क्षीरसागर यांच्यासारख्या जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टच्या प्रभारी अधिष्ठात्याकडून माहिती तरी  घेईन  का?  आणि ते तरी मला देतील का? खरं तर त्यांचा माझा आधी कधीही परिचय नव्हता. जेव्हा ‘चिन्ह’च्या युट्यूब चॅनलवर ‘कलाशिक्षण महाचर्चे’चा कार्यक्रम करायचं मी ठरवलं तेव्हा चित्रकार रंजन जोशी यांनी मला त्यांचं नाव सुचवलं आणि त्यांना तुम्ही जरूर तुमच्या कार्यक्रमात घ्या असं सांगितलं तेव्हा कुठे आमचं पहिल्यांदा फोनवर बोलणं झालं. ते ‘डॉक्टर’ झाले आहेत हेसुद्धा त्यांनी  जाहिरातीची आर्टवर्क करताना सांगितलं तेव्हा मला कळलं.

———-

चिन्ह तर्फे आयोजित कलाशिक्षण महाचर्चा पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

कलाशिक्षण महाचर्चा | Panel Discussion About Art Education

https://www.youtube.com/watch?v=wn16ME4hHtc

———-

नाही म्हणायला २००८ किंवा २००९ साली जेव्हा मी ‘कालाबाजार’ अंक प्रकाशित केला होता तेव्हा त्यांना कॉलेजच्याच फोनवर फोन केला होता की तुम्ही हा अंक सवलतीत जरूर विकत घ्या म्हणून सांगायला, तर या गृहस्थानी मला हे पंधरावीस मिनिटाचं  लेक्चर दिलं होतं की तुमच्या अंकामुळे जेजेचं नाव किती आणि कसं  खराब होईल वगैरे. इतकंच नाही तर  सवलत शुल्क भरायला देखील चक्क नकार दिला होता. असा गृहस्थ मला बातम्या पुरवील? या घटनेनंतर त्यांची माझी भेट झाली ती कलाशिक्षण महाचर्चेच्या कार्यक्रमात, तीदेखील ऑनलाईन. आणि आम्ही प्रत्यक्ष भेटलो ते आशुतोष आपटे यानं जेव्हा माझ्या घरी येऊन मला त्याच्या गाडीत घालून जेजेमधल्या डिनोव्होच्या पहिल्या सभेला बळेबळे नेलं तेव्हा. तेव्हादेखील हे गृहस्थ आम्ही सभेला उशिरा आलो म्हणून केव्हढे फुरंगटले होते. आयुष्यभर गिरगावात राहणाऱ्यांना काय कप्पाळ कळणार आहेत ठाणे जिल्ह्यात राहणारांची  दुःख? त्यानंतर जेमतेम दोन किंवा फार तर तीन सभांना मी उपस्थित राहिलो होतो, तेव्हड्या शिदोरीवर मला ते जेजेच्या बातम्या देतील? आणि मी त्या प्रकाशित  करेन? ‘डिनोव्हो’ च्या कार्यक्रमानंतर मात्र मी त्यांना बोलून दाखवलं की २००८ साली मी जेव्हा ‘ कालाबाजार’ अंक काढला तेव्हा तुम्ही मंडळींनी मला सहकार्य केलं असतं, ‘ चिन्ह’च्या मागे भक्कम उभे राहिला असता तर जेजेचा हा चिघळलेला प्रश्न कधीच सुटला असता वगैरे. त्यावर ते काही बोलले नाहीत किंवा लांबलचक लेक्चरही दिलं नाही. नुसते हसले.

 

असा सारा प्रकार असताना कुणीतरी उठतं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी – स्वतःच्याच पोळीवर तुपाच्या सर्वच्या सर्व  बरण्या ओतून घेण्यासाठी, माझं नाव पुढं करुन संतोष क्षीरसागराना खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न करणार असेल मी निश्चितपणे गप्प बसणार नाही. या साऱ्या कटात जे सहभागी झाले त्यांनी निदान आता तिथं शिकणाऱ्या ५०० मुलांच्या भवितव्याचा तरी विचार करायला हवा होता असं नाही  का वाटत?

 

सतीश नाईक

संपादक, ‘चिन्ह आर्ट न्यूज’

———-

सध्या गाजत असलेला चिन्हतर्फे आयोजित ‘जे जे डिनोव्हो: एक स्फोटक चर्चा!’ विडियो पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

जे जे डिनोव्हो: एक स्फोटक चर्चा!

https://www.youtube.com/watch?v=dB2anH4kIcE

———-

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.