Features

हरवलेले ( ३० वर्षानं ) सापडले !

नाशिककर मित्र केशव कासार यांचा परिचय झाला तो त्यांनी लिहिलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मधल्या एका पत्रानं बहुदा ते तेव्हा जेजेमध्ये शिकत असावेत, पण ज्या भाषेत किंवा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली होती ती असंख्य वाचकांना अतिशय आवडली होती. मग कधीतरी कुणीतरी त्यांचा परिचय करून दिला आणि मग आमच्या पुस्तकांवर चर्चा सुरु झाल्या. चित्रकलेवरच्या बहुसंख्य पुस्तकांची नावं त्यांना मुखोद्गत होती. त्यांच्या बरोबर झालेल्या प्रत्येक भेटीत किंवा फोनवरील संभाषणांमध्ये एखादा तपशील चुकला तर ते अचूकपणे सांगत असे, इतका त्यांचा चित्रकलाविषयक व्यासंग आहे. ‘चिन्ह’च्या ‘वाचता वाचता’ व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परवा त्यांनी ३० वर्षांपूर्वी हरवलेल्या पुस्तकांचा किस्सा लिहिला आहे जो अतिशय वाचनीय आहे. म्हणूनच इथं देत आहोत. 

नाशिकच्या परशुराम सायखेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या फ्रेनीबाई दस्तूर हॅालमधे वाचनालयाने १९८० च्या दशकात कला दालन सुरू केलं होतं. कला प्रदर्शनांच्या सातत्याअभावी त्याची देखभाल करणं शक्य नसल्याने ते कलादालन पुस्तक प्रदर्शनांसाठी खुलं केलं गेलं. मुंबईच्या ग्रॅंड बुक बझारने ते कला दालन पुस्तक प्रदर्शनासाठी भाड्याने घेतलं. नाशिकच्या वाचकांनी त्याला इतका भरभरून प्रतिसाद दिला की ते प्रदर्शन १९८०/९० च्या दशकांत १५ ते १६ वर्षे तिथं सुरू राहीलं. आता ते वाचनालयाच्या मागे असलेल्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहाखालच्या तळघरात अधिक मोठ्या जागेत सुरू आहे. ‘वाचन संस्कृती मरतेय’ अशा बोंबा ठोकणाऱ्यांनी ग्रॅंड बुक बझारच्या संचालकांचे अनुभव ऐकावेत. जवळ जवळ तीस वर्षांपासून ते तिथं व्यवसाय करतायत.

तर त्याचं असं झालं की, १९९० मधे मी माझं सर्व प्रकारचं कला शिक्षण पूर्ण करून नाशिकलाच बस्तान बसवायचं म्हणून आलो होतो. कामांचा शोध चालू होताच. वाचनाची आवड असल्याने ग्रॅंड बुक बझारच्या फ्रेनीबाई दस्तुर हाॅलमधील प्रदर्शनात मनसोक्त वेळ घालवत असे. पुस्तके विकत घ्यायचा छंद १९८३ पासून म्हणजे नाशिकला चित्रकला महाविद्यालयात फौंडेशनला शिकत असल्यापासून होता. तर गोष्ट १९९० ची…

एके दिवशी मी पुस्तक प्रदर्शनात पुस्तके पहात फिरत असताना अचानक घबाड मिळाल्यासारखं आयर्विंग स्टोनच्या तीन कलावंतांवर लिहिलेल्या १) दि अगनी ॲंड दि एक्सटसी – मायकेल एंजलोचं चरित्र, २) लस्ट फॅार लाईफ – व्हॅन गॉगचं चरित्र, ३) डेफ्थ्स आफ ग्लोरी – कॅमिली पिसारोचं चरित्र या ग्रंथांचा एकत्रित पुठ्ठा बांधणीचा ( Hard bound) (प्रकाशक – डबलडे) संच मिळाला. मी जाम खुश झालो ! तसं तर दि ॲगनी ॲंड दि एक्सटसी आणि लस्ट फॅार लाईफच्या माझ्याकडे वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशीत केलेल्या तीन-तीन-चार-चार प्रती होत्याच. तरिही एकत्रित संच दिसल्यावर मी एकदमच तरंगायला लागलो. शिक्षणाच्या निमित्ताने पुण्या – मुंबईत असतांना दृश्य कलावंतांची चरित्र जमवायचा वेगळा छंद मी लावून घेतला होता. अनेक चित्र – शिल्पकारांची चरित्र माझ्याकडे जमा झालीयेत. त्यात हा तीन चरित्रांचा एकत्रित ठोकळा मिळाल्यावर काय विचारता… तो ठोकळा, हो ठोकळाच, घेऊन मी काउंटरवर गेलो. ग्रॅंड बुक बझारचे तेव्हाचे मालक शेठ कांतीलाल भोजानी यांना किंमत विचारली. ते म्हणाले साडेतीनशे. माझ्या खिशात पन्नास रूपयेच. मी म्हणालो, शेठ पुस्तक मला पाहिजेच आहे, पण आता खिशांत पन्नासच रूपये आहेत. मी त्यांचं नेहमीचं गिऱ्हाईक, कधी कधी त्यांच्याशी गप्पाही मारत असे. मी देवळाली कॅंपला राहतो, म्हणजे नाशिकहून सुमारे वीस किलोमीटर दूर. ते म्हणाले, टोकन म्हणून ठेवून दे, उद्या परवा कधीही बाकीचे पैसे देऊन पुस्तक घेऊन जा. परवा कशाला ? मी दुसऱ्याच दिवशी पैसे घेऊन गेलो अन ठोकळा ताब्यात मिळाल्याच्या आनंदात गोदावरीच्या चौपाटीवर जाऊन मित्रांसोबत भेळभत्ता पार्टी केली.

तर गम्मत अशी की, ठोकळा आणून मी घरी माझ्या एका बॅगेत ठेवला. काही कारणाने मी पुण्याला गेलो. तिकडे मुक्काम लांबला. तिथून मुंबईला गेलो तिकडेही मुक्काम लांबला. एकूण चार पाच महिने घराबाहेर होतो. इकडे घरच्यांनी आवरतांना बॅग कुठेतरी ठेवून दिली अन विसरून गेले. मी खूप शोधली, मला सापडली नाही. त्या बॅगमधे अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या. १) नंदलाल बोस यांचं On Art हे कलेवरील चिंतनाचं पुस्तक. २) माझा मित्र धनंजय गोवर्धने याचा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी केलेल्या संशोधन प्रकल्पाची त्याच्याकडे असलेली एकमेव झेरॅाक्स प्रत. ती दोन्ही पुस्तकं मिळत नाहीत म्हणून मी बेचैन. धनंजयला वाटलं मी त्याचा प्रोजेक्ट मुद्दामहून परत देत नाही म्हणून तो नाराज. अनेक कार्यक्रमांत भेट होई पण त्याला स्वच्छपणे तोंड दाखवता येत नसे.

‘On Art’ बद्दल, नंदलाल बोसांच्या कलाविषयक मौलिक विचारांबद्दल मी अनेकांना सांगत असे. पण पुस्तक गहाळ झाल्याची रूखरूख कायमच होती. आज काही कामानिमित्त मी पुतण्या आशिषसोबत जुन्या घरी गेलो होतो. तिथं आशिषने एक जुने कपाट उघडले त्यात आयर्विंग स्टोनचा ठोकळा त्याने बाहेर काढला. तो पाहून मी आनंदाने खुश ! माझ्या लक्षातच आले की धनंजयचा प्रोजेक्टही मिळणार म्हणून. मी आशिषला सांगितले की अशी अशी झेरॉक्स असलेली पिशवी शोध. तिसऱ्या मिनिटाला त्याने ती शोधली अन माझा जीव तीस वर्षांनी भांड्यात पडला. ‘On Art’ ध्यानीमनी नसता सापडले. एकूण आजचा दिवस गेलेलं ‘धन’ परत मिळण्याचा आहे बहुतेक. आयर्विंग स्टोनचा ठोकळा तीस वर्षांनी सापडल्याच्या निमित्ताने लिहिलेली त्याची ही कथा.

माझ्याकडची चाळीस वर्षांपुर्वीचीही पुस्तके नवीनच दिसतात. हा ठोकळा तर केवळ तीस वर्षांपूर्वीचा आहे. आता ग्रॅंड बुक बझारची व्यवस्था शेठ कांतीलाल भोजानींच्या पश्चात त्यांचा मुलगा विजय भोजानी पाहतोय. इथं सगळ्या विषयांवरची मराठी, हिंदी, इंग्रजी, नवी – जुनी पुस्तकं मिळतात.

तर… हा ठोकळा मला नंतर कधीही कुठल्याही दुकानांत दिसला नाही. ना शानभागांच्या ‘स्ट्रॅंड’मध्ये, ना फौंटनच्या फुटपाथवरील स्टॅाल्सवर.
तुम्हाला त्या ठोकळ्याचं किमान दर्शन तरी व्हावं म्हणून त्याचे काही फोटो सोबत देतोय.

केशव निवृत्ती कासार,
२८ मे २०२०, देवळाली कॅंप, नाशिक

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.