Features

चोरांच्या हाती तिजोरीच्या किल्ल्या ?

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया चालू असताना कला संचालनालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या विनाअनुदानित कला महाविद्यालयांमध्ये मात्र चक्क वार्षिक परीक्षा चालू आहेत. वार्षिक परीक्षा आणि त्या देखील जुलैमध्ये ? तुमचा विश्वास बसत नाही ना ? पण ही वस्तुस्थिती आहे.

नांगरे साहेबांनी आपल्या कारकिर्दीत जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुलभ शौचालयांप्रमाणे जी असंख्य उडपटांग विनाअनुदानित कला महाविद्यालयं उघडली त्यातली जी शिल्लक राहिली त्यात चाललेला हा मुलखावेगळा प्रकार आहे. आता तुम्ही विचाराल की या परीक्षा जुलै महिन्यात का घेतल्या तर त्याचं उत्तर असं की एप्रिल – मे महिन्यात कला संचालनालयानं दरवर्षी प्रमाणेच परीक्षा जाहीर केल्या होत्या. पण विनाअनुदानित कला महाविद्यालयांच्या चालक तसेच शिक्षकांच्या संघटनेनं त्या परीक्षांवर चक्क बहिष्कार टाकला. विनाअनुदानित कला महाविद्यालयं चालवणं दिवसेंदिवस कठीण होत असल्यामुळं सरकारनं सर्वाना त्वरित अनुदान द्यावं तसेच या परीक्षा त्या त्या कॉलेजमध्ये घेण्यास परवानगी द्यावी. या त्यांच्या मुख्य मागण्या होत्या. आणि त्या सरकारनं मान्य कराव्या या साठी विद्यार्थ्यांना देखील वेठीस धरावयास त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. विद्यार्थी तर काय कलेचेच. वाचन शून्य, सामान्यज्ञान नाही, अक्कल गुडघ्यात त्यामुळे त्यांचा काहीही संबंध नसताना ते अगदी सहजपणे या संपात सहभागी झाले.

वास्तविक पाहता या विनाअनुदानित कला महाविद्यालयांनी सदर कला महाविद्यालयं सुरु करत असतानाच सरकारने या कला महाविद्यालयांच्या संचालकांकडून आपण भविष्यात अनुदानाची मागणी करणार नाही असे स्पष्ट करुन घेतले होते. किंबहुना सरकारने या साऱ्या कला महाविद्यालयांची रवानगी ‘कायमस्वरुपी विनाअनुदानित’ या यादीतच करुन ठेवली होती. संस्थेच्या संचालकांनी ती मान्य देखील केली होती. संस्था संचालकांना तेव्हा प्रचंड घाई लागली होती की कधी एकदा आपण नवीन कला महाविद्यालय उघडण्यासाठी सरकारकडून परवानगी घेतो आणि कधी एकदा कला महाविद्यालयं काढून फावड्यानं पैसा गोळा करतो. साऱ्यांना त्यावेळी महाराष्ट्रात सुरु झालेली इंजिनिअरिंग कॉलेजची भरभराट दिसत होती. (त्या कॉलेजच्या भरभराटीचा फुगा देखील कालांतरानं फुटला. ती गोष्ट अलाहिदा) त्यामुळे सर्वानी काही न विचार करता होकार दिला आणि परवानग्या पदरात पाडून घेतल्या.

मार्च महिन्यात विना अनुदानित कला महाविद्यालयांनी कला परीक्षेवर टाकलेला बहिष्कार.

नांगरे साहेबांनी या संचालकांसमोर कॉलेजच्या भवितव्याचं गुलाबी चित्र रंगवलं होतं. नांगरे साहेबांच्या त्या रंगवण्याला फसून या संचालकांनी मिळतील तिथं मिळेल त्या जागेत कला महाविद्यालयं (?) उघडली. कुणी शाळेच्या वर्गात, तर कुणी देवळात, कुणी चावडीत, तर कुणी ओसरीत एका महाभागानं तर चक्क खाटीकखान्यातच कला महाविद्यालय उघडलं, म्हणजे खाली तळमजल्यावर तो बोकडं कापायचा आणि वरच्या मजल्यावर तो विद्यार्थ्यांना. या विनाअनुदानित कला महाविद्यालयांचे एकाहून एक किस्से आम्ही ‘चिन्ह’च्या २००८ साली प्रसिद्ध केलेल्या ‘क(का)लाबाजार’ विशेष अंकात प्रसिद्ध केले होते. ते तेव्हा अतिशय गाजले होते. हे सारं वाचल्यावर जर कोणाला ते किस्से वाचायची इच्छा झाली तर त्यांच्यासाठी आम्ही ‘चिन्ह’च्या याच वेबसाईटवर त्या अंकाची पीडीएफ प्रसारित केली आहे. ती अवश्य वाचा. त्याची लिंक अशी आहे. https://chinha.in/2008_edition

नांगरे यांनी भरलेल्या फुग्यांची हवा कालांतरानं फुस्स होऊ लागली. एकापाठोपाठ एक फुगे फुटू लागले. या संचालकांची सर्वात मोठी फसवणूक केली गेली होती ती फाउंडेशन कोर्स आणि आर्ट टीचर डिप्लोमा वर्गांच्या बाबतीत. जवळ जवळ प्रत्येक कला महाविद्यालयाला हे दोन कोर्स दान केले गेले. हे दान काही सत्पात्री नव्हतं. ते करण्यासाठी संबंधितांनी भरपूर ‘दक्षिणा’ गोळा केली होती. या ‘दक्षिणे’मुळे कला संचालक आणि त्या वेळच्या कला निरीक्षकांनी कला महाविद्यालयाच्या अवस्थेकडे संपूर्णतः दुर्लक्ष केलं परिणामी प्रत्यक्षात अस्तित्वातच नसलेली पण कागदावर असलेली कला महाविद्यालयं जन्माला आलीत. कला निरीक्षकांनी या कला महाविद्यालयांकडे इतकं दुर्लक्ष केलं होतं की अस्तित्वातच नसलेल्या या कला महाविद्यालयांना देखील मान्यता दिली गेली. इतकंच नाही तर परीक्षा केंद्र देखील वाटली गेली. आता तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे. तर तेही समजावून सांगतो.

कला संचालनालयाकडून मान्यता मिळाली की सदर कला महाविद्यालयाचा संचालक वृत्तपत्रात जाहिराती द्यायचा किंवा हॅंडबिल्स वाटायचा आणि विद्यार्थी गोळा करायचा. एवढे एवढे पैसे भरा आणि प्रवेश घ्या. प्रवेश घेतल्यावर कॉलेजमधे यायची देखील गरज नाही. प्रवेश शुल्क आणि देणगी भरल्याबद्दल एक चांगली सायकल मिळेल. ती घेऊन घरी जायची. घरच्या घरी सर्व अभ्यासक्रम शिकता येईल. परीक्षेला यायची देखील गरज नाही. असाइनमेंट करुन द्यायचे असतील ते एवढे पैसे. ट्युटोरिअलस द्यायच्या असतील तर एवढे पैसे. परीक्षेसाठी पोर्टफोलियो तयार करायचा असेल तर एवढे पैसे. परीक्षा द्यायची असेल तर एवढे पैसे. परीक्षेचे पेपर करुन द्यायचे असतील तर एवढे पैसे. पास करुन द्यायचं असेल तर एवढे पैसे. फर्स्ट क्लास – सेकंड क्लास हवे असतील तर एवढे एवढे पैसे. कॉलेजमधून पहिलं यायचं असेल तर एवढे पैसे. जिल्ह्यांमधून पहिलं यायचं असेल तर एवढे पैसे. आणि महाराष्ट्रातून पहिलं यायचं असेल तर त्याचं विशेष शुल्क. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची लूटमार करुन या संस्था चालकांनी महाराष्ट्राच्या कोणे एके काळी सर्वोच्च पदावर असलेल्या कला शिक्षणाचं अक्षरशः मातेरं केलं.

पहिला बहर ओसरल्यानंतर आपण फसवले जातोय, आपल्याला साधी कला शिक्षकाची नोकरी देखील मिळत नाही हे लक्षात येऊन विद्यार्थी आणि पालक या कला महाविद्यालयापासून दूर जाऊ लागले. साहजिकच जी काही दोनशे अडीचशे कला महाविद्यालयं पावसाळ्यातल्या कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी उगवली होती ती हळूहळू बंद पडत गेली. आता त्यातली निम्मीच उरली आहेत आणि कला शिक्षणाचं (?) भलं मोठं कार्य करीत आहेत. हे होणारच होतं हे आम्ही वेळोवेळी लिहिलेल्या लेखांमधून जाहीरपणे मांडलं होतं. पण मागल्या सरकारमधल्या एक तालेवार मंत्र्यांनं यांना चुचकारल्यामुळं ते भलतेच शेफारले आणि त्यांनी यंदा चक्क परीक्षेवरच बहिष्कार टाकला. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांनाही देखील सहभागी करुन घेतलं. मूर्ख विद्यार्थी कुठलाही पुढचा मागचा विचार न करता त्यात सहभागी देखील झाले.

कधी नव्हे ती कला संचालनालयांनं ठाम भूमिका घेतली. शिक्षण सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी तर अतिशय कडक धोरण अवलंबलं. अनुदानित कला महाविद्यालयांमध्ये परीक्षेची अधिक सेंटर्स उघडून, प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा त्याच्या पालकाला मेल पाठवून त्यांनी विनाअनुदानित कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची सोय केली. पण विनाअनुदानित कला महाविद्यालयांच्या संचालक, प्राचार्य आणि कला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं नाही. आणि परिक्षांवरचा बहिष्कार तसाच जारी ठेवला.

कला संचालनालय आणि तंत्रशिक्षण खातं यांनी मात्र मग कडक भूमिका घेतली आणि परीक्षा घेऊन देखील टाकल्या. त्याचे निकाल देखील लावून टाकले. पण पुढं काय झालं कुणास ठाऊक. दोंघांमध्ये मांडवली झाली आणि परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय झाला. हा अक्षरशः आचरटपणाचा निर्णय होता. पण उच्च व तंत्रशिक्षण खात्यानं नाक दाबून तोही घेतला.

एकदा परीक्षा झाल्यावर अशा पुन्हा परीक्षा कुणी घेतं का ? पण उच्च व तंत्रशिक्षण खात्यानं कला संचालनालयाच्या साहाय्यानं तोही आचरटपणा करुन दाखवला. इतकंच नाही तर या विनाअनुदानित कला महाविद्यालयांनी जी प्रमुख मागणी केली होती ती ‘त्या त्या कला महाविद्यालयातच परीक्षा घ्यायच्या’ ती देखील उच्च व तंत्रशिक्षण खात्यानं मान्य करुन टाकली. आणि चोरांच्याच हाती जणू तिजोरीच्या किल्ल्या दिल्या. आता हे लिहीत असताना काय तर म्हणे जिल्ह्या जिल्ह्यात त्या परीक्षा चालू आहेत. त्या कधी पूर्ण होणार ? त्यांचे निकाल कधी लावले जाणार ? ते कधी जाहीर केले जाणार ? आणि समजा ते जाहीर करण्याला नेहमी प्रमाणे सरकारी विलंब लागला का उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश तरी कसा घेता येणार ? कारण शैक्षणिक वर्ष तर जून मधेच सुरु झालंय. या सगळ्या घोळामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक दृष्ट्या मोठं नुकसान होणार आहे. त्यांच्या पुढील शिक्षणाचे देखील वांधे होणार आहेत, पण त्याची काळजी विद्यार्थीही करत नाहीत ना त्यांचे शिक्षक. ना त्यांच्या शैक्षणिक संस्था. कला संचालनालय व तंत्रशिक्षण खातं यांना तर शिक्षणाची काही पडलेलीच नाही. नाही का ?

*****

सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.