Features

वसंत आबाजी डहाके यांची चित्रसृष्टी

प्रख्यात साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्या रेखाचित्रांचं प्रदर्शन पुण्याच्या सुदर्शन कला दालनातं ८ ते १६ ऑक्टोबर येथे होणार आहे. प्रारंभापासूनच त्यांनी कला अभ्यास करत अनेक चित्रे काढली. कुंचला आणि रंग यांच्यापेक्षा पेन हे माध्यम त्यांना अधिक जवळचे वाटले. त्यांच्या कवितेतून जसे भोवतालच्या परिस्थितीवर भाष्य होत राहिले तसेच त्यांच्या चित्रांतूनही आजूबाजूचे भीषण वास्तव मांडले गेले आहे. झाड या फॉर्मला डहाकेंच्या चित्रात विशेष स्थान आहे. डहाकेंच्या चित्रातली ‘झाडं’ ही सृष्टीतील सौन्दर्य नाही तर भीषणता दाखवतात. सर्वसामान्यांची अगतिकता, पाशवी सत्तेचा पाश, त्यात अवगुंठित झालेलं मानव्य, त्यांतून होणारी ससेहोलपट याचं कवितेतलं नि चित्रांतून होणारं चित्रण म्हणजे कवीनं, कलावंतानं त्याच्या भवतालाला दिलेला प्रतिसाद आहे असं या प्रदर्शनाचे संयोजक मंगेश नारायणराव काळे म्हणतात. संयोजक म्हणून त्यांची भूमिका आणि वसंत आबाजी डहाके यांचे आपल्या चित्रांविषयी विचार व चित्र सोबत आम्ही प्रसिद्ध करत आहोत. ही चित्रे बघून तुम्ही प्रदर्शनाला नक्कीच भेट द्याल अशी आम्हाला खात्री आहे.

रेखाचित्रांविषयी …

 चित्र काढणे हा माझा छंद नाही. कविता किंवा इतर लेखन करणे ही जशी एक वृत्ती बनली आहे, तेच चित्र काढण्याबाबतही. छंद संपून त्याची वृत्ती केव्हा बनते हे काही सांगता येत नाही. नागपूरला एम. ए. करत असताना कविता क्वचितच लिहिल्या वर्गात लेक्चर सुरू असताना टिपणे काढण्याऐवजी रेखाटने करीत असे. त्या दोन वर्षातल्या माझ्या टिपणांच्या वह्या रेखाटनांनी भरून गेल्या होत्या. तेव्हा स्वतःच्या आणि इतरांच्या लेखनाविषयी मी असंतुष्ट होतो. म्हणून लिहीत नव्हतो. त्यामुळे माझ्यातील निर्माण शक्ती रेखाटनांच्या रूपाने व्यक्त होत होती. 

पुढे कलकत्त्याला भावाकडे गेलो. तिथे पहिल्यांदा चित्रांची प्रदर्शने पाहिली. तिथल्या अमेरिकन आणि ब्रिटीश लायब्रऱ्यांत बसून चित्रविषयक नियतकालिके चाळली. तोवर माझे चित्रकलेचे कोणतेच शिक्षण झालेले नव्हते. चित्रकला हे अभिव्यक्तीचे केवढे सशक्त माध्यम आहे हे पहिल्यांदा जाणवले. ऑईल कलर्स, पेस्टल्स, कॅनव्हास वर चित्रं केली पण काळी शाई पेन हेच मला सर्वात जवळचे आणि प्रभावी वाटलेले साधन. 

 त्या काळात कवितेपेक्षा चित्रांनी मला अधिक सोबत केली. निःसीम आणि विशुद्ध अभिव्यक्ती नेहमीच अमूर्त असते का ? विचारांचे जे विश्व माझ्या मनात आकारास येत होते ते एकीकडे कवितेतून रूप पावत होते , त्याच वेळी ते रेषांतूनही व्यक्त होत होते. आजपर्यंत मी अगणित रेखाटने केली. ती गेल्या पन्नास वर्षात मराठीतील वाङ्मयीन नियत – अनियत कालिकात प्रकाशितही झाली. ऑईल पेस्टलमध्येही खूप चित्रे केली. 

चित्रकला विषयक वाचन हीदेखील एक सवय जडली. मुंबई आणि दिल्ली येथे चित्रकारांची कित्येक प्रदर्शने पाहिली. बेंद्रे, आरा, हेब्बर, गाडे, रझा, जी.आर. संतोष , सबावाला, स्वामीनाथन, हुसेन, भूपेन खक्कर, गुलाम मोहम्मद शेख, लक्ष्मा गौड, अशी कितीतरी नावे देता येतील. 

ज्यांच्या चित्रकृती आणि चित्रशैली माझ्या लक्षात आहेत. माझ्या या चित्रजगात झाडंही आहेत. पानं नसलेली आक्रमक झाडं. हताश झाडं. नुसतीच कबंधासारखी तोडलेली झाडं. वाकलेली पोखरलेली, जिवंतता मावत नाही इतक्या रसरसत्या जाणिवेनं तरारणारं हिरवं पान या सृष्टीत नाही. तर हाडं हाडं उरावी तशा फांद्या आणि उघडी पडलेली मुळं . ही होरपळलेली, पिळवटलेली झाडं आणि तो किरणांच्या झिंज्या फिस्कारलेला सूर्य. या झाडांमध्ये एक चेहरा असतो किंवा चेहऱ्यातून झाड विस्तारत जातं. कुणाचा असतो हा चेहरा ? आपल्या भवतीच्या वास्तवाचा ? हे माझ्या मस्तकातलं जग आहे किंवा काळ्या रेषांमध्ये केलेली ही माझी विधानं आहेत. या शतकातल्या यातना आणि संत्रास ओढून काढण्याचा मी प्रयत्न करतो. 

– वसंत आबाजी डहाके

***

 वसंत आबाजी डहाके यांची चित्रसृष्टी … 

वसंत आबाजी डहाके यांची पहिली ओळख मर्ढेकरोत्तर काळातले साठोत्तर पिढीतले एक अतिशय महत्त्वाचे कवी आणि दुसरी ओळख चित्रकार, कलाअभ्यासक अशी आहे. त्यामुळे त्यांच्या चित्रावकाशात जाण्यासाठी त्यांच्या कवितेच्या पायवाटेवरूनच जावे लागते. इथे हे लक्षात घ्यावे लागेल की, डहाके यांची कविता नि चित्रं ही दोन वेगवेगळ्या कला माध्यमातली निर्मिती असली तरी या दोघांतली साहचर्याची वीण इतकी समांतर नि घट्ट आहे की, या दोन्ही अभिव्यक्तींचा सुटा सुटा विचार करता येणं जवळजवळ अशक्य आहे . डहाके यांची कविता परात्मभावानं ग्रासलेल्या निराश, हताश, कुंठित मनाचं प्रतिनिधित्व करणारी जशी आहे, तशीच भवतालातल्या अराजकाचं, पाशवी सत्तेचं त्यातून निर्माण होणाऱ्या दहशतीचं चित्रण तितक्याच तीव्रतेनं, असोशीनं करणारी आहे.

कवितेप्रमाणेच डहाके यांचा चित्रावकाशही हा सगळा आशय घेऊन येणारा आहे. कवितेइतकीच त्यांची चित्रातील अभिव्यक्तीही सहज उत्स्फूर्त कलाकुसरीला फाटा देत प्रकट होणारी आहे. तर काय आहे डहाके यांच्या चित्रावकाशातली जीवसृष्टी? सतत सतत सामोरे येणारे, विशिष्ट अशा परिघात काही एक सांगू पाहणारे, अभावग्रस्त चेहरे . कुठल्यातरी पुरातन मिथकाची विविध रूपं पुनरावृत्त होऊन समोर यावीत नि काहीसा गूढ असा प्रदेश विस्तारत जावा अशी ही सृष्टी आहे. या सृष्टीत झाडाची वारंवार येणारी प्रतिमा आहे. निष्पर्ण झालेल्या झाडाने जमिनीशी असलेली नाळ सोडावी, उघडी पडलेली, उद्ध्वस्त होऊ पहाणारी मुळं अशी ‘झाड ‘ ही प्रतिमा खरं तर त्यांच्या कवितेतूनही त्याच वारंवारितेतून आलेली दिसते. परंपरेला आस्थेला साद घालणारी प्रतिमा म्हणून त्यांच्या चित्रातील ‘ झाडा’कडे पाहावं तर त्या भवतीची विरूपित सृष्टी ते करू देत नाही . त्यामुळे डहाके यांच्या चित्रातल्या झाडाला पाहणं हे एका अर्थानं परंपरेला, आस्थेला पाहणं जसं आहे. तसंच भवतालातल्या उद्ध्वस्ततेला, भणंगतेलाही पाहणं आहे हे संवेदन जसं खास भारतीय असं संवेदन आहे तसंच ते पाश्चात्त्य अस्तित्ववादी जाणिवेतूनही झिरपत आलेलं संवेदन आहे. 

निरर्थकता – अर्थशून्यता – असुरक्षितता ही त्रयी या संवेदनेमागे आहे; जी डहाके यांच्या कवितेत, कादंबरीत, चित्रात नेपथ्यासारखी सातत्यानं मागे उभी आहे. कवितेतली, चित्रातली ‘ झाडं ‘ ही प्रतिमा मानवी आस्थेला, भग्नतेला संप्रेषित करणारी असली तरी कवितेच्या तुलनेत चित्रात ती अधिक तटस्थतेनं आलेली दिसते. या चित्रसृष्टीतून प्रक्षेपित होणारे मानवी विरूपित चेहऱ्यांचे अवतरण या प्रतिमांच्या ‘असण्या’वर प्रभाव टाकणारे आहे. कारण ते प्रत्यक्षाचं प्रतिरूप आहे. काही वेळा तर या विरूपित चेहऱ्यांचं झाडा’त रूपांतर होण्यापर्यंत, निरर्थकता- अर्थशून्यता – असुरक्षितता या त्रयीचा लोलक अतीवतेनं आस्थेकडे झुकलेला दिसतो. हे एकार्थानं कवीच्या, चित्रकाराच्या नेणिवेतलं द्वंद्व आहे. 

एकीकडे परंपरा – श्रद्धा – आस्था नि दुसरीकडे अस्तित्ववादी जाणिवेतून सगळे काही निरर्थक आहेचा खोल संस्कार हे द्वंद्व, द्वैत जसं डहाके यांच्या चित्रांत सापडतं तसंच ते अधिक तीव्रतेनं कवितेतही सापडतं. सर्वसामान्यांची अगतिकता , पाशवी सत्तेचा पाश, त्यात अवगुंठित झालेलं मानव्य, त्यांतून होणारी ससेहोलपट याचं कवितेतलं नि चित्रांतून होणारं चित्रण म्हणजे कवीनं , कलावंतानं त्याच्या भवतालाला दिलेला प्रतिसाद आहे. हा प्रतिसाद विरोध उभा करणारा आहे, ‘ब्र’ उच्चारणारा आहे . तोही अतिशय संयतपणे त्यांची चित्रं , रेखाटनं पाहणाऱ्याला पेटवत, चेतवत नाहीत; उद्विग्न करतात, अस्वस्थ करतात. स्वतःच्या आत डोकावूनपा हायाला भाग पाडतात. 

– मंगेश नारायणराव काळे

*****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.