Features

बॉम्बे आर्ट सोसायटीच्या अध्यक्षांचा खुलासा

संपादक ‘चिन्ह’ यास

सोशल मिडियावर एक निनावी पत्र खूप फिरते आहे. बहुदा ‘चिन्ह’कडे देखील ते आले असावे. हे पत्र मला ८-१० दिवसांपूर्वी कुणीतरी पाठविले होते व मी ते वाचले देखील होते. पण ते निनावी होते म्हणून त्यावेळी उत्तर देणे मला गरजेचे वाटले नाही व उत्तर दिले तरी कोणाला व कुठे द्यावे हा प्रश्न होताच . त्या चित्रकाराने नावानिशी सोसायटीला तक्रार केली असती तर त्याला आम्ही रीतसर उत्तर दिले असते. पण या चित्रकाराला तक्रार करण्यामध्ये नाही तर सोशल मिडियावर सोसायटीची बदनामी करण्यात रस आहे असे दिसते. परंतु ते निनावी पत्र ‘चिन्ह’वर प्रकाशित झाल्यामुळे त्याला उत्तर देणे तसे सोपे झाले.

सुरुवातीला व शेवटपर्यन्त मी हेच म्हणेन की बॉम्बे आर्ट सोसायटीची बदनामी करण्याच्या उद्देशाने ‘सोसायटीने गेल्यावर्षी २१ लाख रुपये वार्षिक प्रदर्शनाच्या प्रवेश फी मधून मिळविले व तीन लाख रुपये खर्च करून त्यातून १८ लाख रुपये पॉकेट मध्ये घातले ‘ असे आरोप केले गेले आहेत. किती प्रवेश फी आली व वार्षिक प्रदर्शनाला किती खर्च येऊ शकतो याचा अंदाज बांधता येणार नाही एवढे चित्रकार निश्चितच दुधखुळे नसतात कारण ते स्वत: प्रदर्शनं करत असतात. त्यामुळे आरोप करणारी व्यक्ती चित्रकार आहे का याची मला शंका वाटते.

सर्व प्रवेश फी आता सोसायटीच्या अकाऊंटमध्ये ऑनलाइन येते ही बाब सर्वज्ञात आहे; कुणीही आता कॅश देत नाही. ज्यांनी कुणी ही पोस्ट टाकली आहे त्यांना विनंती आहे की कृपया त्यांनी सोसायटीत यावे. त्यांच्या पुढे मागील तीन वर्षाचे सोसायटीचे बँकेचे स्टेटमेंट ठेवले जाईल. त्यांनी स्वत: किती प्रवेशिका आल्यात व किती फी आली ते सोसायटीचे बँक अकाऊंट स्वत:च बघून कृपया तपासावे व त्यांनी २१ लाखाची फी जमा झाली असे जे अकलेचे तारे तोडले ते कसे चुकीचे आहेत ते त्यांनीच कला जगताला सांगावे. बँक अकाऊंट बघून आरोप खोटे आहेत हे त्यांनीच स्वत: खात्री केल्यानंतर सोसायटीची जाहीर माफी मागावी.

हे आरोप करणारे महाशय ३५०० प्रवेशिकांचे सहाशे रुपये प्रमाणे हिशेब करत आहेत. सोसायटीचे बँक अकाऊंट बघून ३५०० प्रवेशिका आल्यात का हे आधी तपासवे. नंतर त्या प्रवेशिका ६०० रुपये प्रमाणेच आल्या आहेत का ही गोष्ट देखील तपासावी. सर्व चित्रकार निदान दोन कामं पाठवितात म्हणजे ते ५०० रुपये प्रमाणे फी देतात (६०० नाही). पुन्हा लाईफ मेंबर्सना त्यात १०० रुपये सूट आहे, म्हणजे एका प्रवेशिकेचे फक्त ४५० रुपये होतात. त्यात पुन्हा विद्यार्थ्यांच्या दोन प्रवेशिकांचे फक्त ५०० रुपये म्हणजे विद्यार्थ्यांच्या एका प्रवेशिकेचे फक्त २५० रुपये आहेत. म्हणजे विद्यार्थी विभाग आणि व्यावसायिक चित्रकारांच्या विभागाची प्रवेश फी सरासरी फक्त ३५० रुपये आहे (सहाशे नाही). विद्यार्थ्यांच्या प्रवेशिका जवळजवळ अर्ध्या असतात. व्यावसायिक आणि विद्यार्थी मिळून किती प्रवेशिका आल्या , किती फी आली ते बॉम्बे आर्ट सोसायटीचे बँक स्टेटमेंट बघून कृपया त्यांनी ती रक्कम स्वत:च कला जगताला सांगावी. या महाशयांना खर्च माहित नसताना वार्षिक प्रदर्शनाचा खर्च ते फक्त ३ लाख सांगतात. वार्षिक प्रदर्शनात सोसायटीचा खर्च त्यांनी स्वत: चौकशी करून काढावा व सर्वांना सांगावा. जहांगीर आर्ट गॅलरी (चारही दालने) भाडे – साडे तीन लाख रुपये, कॅटलॉग डिझाईनिंग व प्रिंटिंग – १००० कॉपीज – ३५ ते ४० पेजेस. या चित्रकार महोदयाने एखाद्या प्रिंटरला विचारावे किती पैसे लागतील – एक लाखापेक्षा कमी असेल तर पुढच्या वर्षी त्या प्रिंटरने डिझाईन करून कॅटलॉग छापून द्यावा. पाच परीक्षकांचा प्रवास भत्ता, मानधन, रुपधर पुरस्कार राशी- १ लाख, रुपधर पुरस्कार मानकरी यांचा प्रवास भत्ता, बाहेरगावचे असतील तर त्यांची राहण्याची व्यवस्था, स्पॉन्सर सोडून सोसायटीचे स्वत:चे पुरस्कार – गोल्ड, सिल्व्हर, ब्रांझ मेडल व त्या पुरस्कारची रक्कम, सोसायटीची स्वत:ची विद्यार्थी विभागाची बक्षीस – एक लाख (विद्यार्थ्यांच्या बक्षिसांना कोणी प्रायोजक फारसे मिळत नाहीत ), पारितोषिक विजेत्यांची प्रमाणपत्र , मेडल्स, रुपधर मानपत्र, उद्घाटन सोहळा, स्टेजचा खर्च, व सोसायटीच्या कर्मचाऱ्यांचा प्रदर्शनाच्या काळातील तीन महिन्याचा पगार. हा सर्व एकूण किती खर्च होतो हा त्या आरोप करणाऱ्या महाशयांनी स्वत: सोसायटीत येवून तपसावा व सर्वांना सांगावा देखील. पुन्हा ९० ते ९५ टक्के खर्च चेक पेमेंटने केलेला असतो म्हणजे त्यात कुणी पैसे मध्ये काढू शकत नाही.

सोसायटीची तीन कलादालनं चालवतांना त्यासाठी ८ ते १० लोकांचा स्टाफ सोसायटीत आहे. वातानुकूलित यंत्रणा, इलेक्ट्रिक बिल, इंटरनेट, फोन, लिफ्ट मेटेनन्स, दहा लोकांचा पगार – या एकूण खर्चाएवढा निधी तरी सोसायटीकडे यायला हवा. परंतु तेवढा निधी येत नाही. Prafulla Dahanukar Foundation चा आदर्श ठेवायला सोसायटीला देखील खूप आवडेल. पण पैशाची सोंग आणता येत नाहीत. वार्षिक प्रदर्शनं करायला कुठून पैसे आणायचे हे जर या चित्रकार महोदयानी सांगितले तर पुढच्या वर्षी आम्ही एंट्री फी देखील ठेवणार नाही. Prafulla Dahanukar Foundation ही एक गर्भश्रीमंत व परोपकारी व्यक्तीची संस्था आहे; ते स्वत: पैसे टाकू शकतात. सोसायटी कुठून पैसे आणेल? १८८८ सालापासून हे वार्षिक प्रदर्शन होतेय. प्रवेश शुल्क सुरुवातीपासून घेतात, आज नव्हे. प्रवेश शुल्क निवड झाली नाही तर परत देण्याची प्रथा तेव्हा देखील नव्हती . थोडक्यात या महोदयांना म्हणायचे लॉटरी लागली तर पुरस्काराचे पैसे द्या व लॉटरी नाही लागली तर तिकिटाचे पैसे परत करा.

प्रदर्शनाचे स्वरूप व ढाचा आजही तसाच आहे. फक्त महागाई वाढली त्या प्रमाणात प्रवेश शुल्क
वाढत गेलं. हे चित्रकार महाशय चित्रपट बघायला निश्चित जात असतील व तेथे हजार रुपये तरी उडवून येतील पण इथे सहाशे रुपये द्यायला त्यांच्या जिवावर येते.

सोसायटीची नवीन बिल्डिंग झाल्यानंतर सोसायटी आताशी कुठे रुळावर येतेय. सोसायटीच्या बांद्रा येथील दालनांमध्ये थोडीतरी नियमित प्रदर्शने होत आहेत; बुधवार ते रविवार निदान थोडे फुटफॉल देखील झालेत. चार-पाच प्रदर्शनाआड काही चित्रकारांच्या चित्रांचा थोडा सेल देखील होतो आहे (आरोप करणाऱ्यांनी स्वत: चौकशी करावी). राजकारण प्रत्येक क्षेत्रात असते. सोसायटीची गाडी थोडी रुळावर येते हे काही लोकांना बघवत नसेल व त्यातून आरोप केले असतील तर ती वेगळी गोष्ट आहे. पण जर अज्ञानातून २१ लाख आले, १८ लाख कमविले हा आरोप केला असेल तर कृपया तसे मान्य करून सोसायटीची बदनामी केल्याबद्दल माफी मागावी. कृपया बॉम्बे आर्ट सोसायटीची बदनामी थांबवा हे अत्यंत कळकळीचे आवाहन.

सोसायटीत सेक्रेटरी, चेअरमन, ट्रेझरर, अध्यक्ष व कमिटी मेंबर्स अशी मोठी साखळी आहे. एखाद-दोन व्यक्ती तेथे पैसे खाऊ शकत नाही. पैसे खाण्यासाठी मुळात तेथे पैसे असायला लागतात. सोसायटीत पैसेच नाहीत.

मी ऑक्टोबर २०१९ मध्ये अध्यक्षपदाची जाबाबदारी स्वीकारली तेंव्हा मला कळले की सोसायटीकडे स्टाफला पुढच्या महिन्याचा पगार द्यायला देखील पुरेसे पैसे नाहीत. कलादालनांची वातानुकूलित यंत्रणा बंद होती व त्यानंतर पाच महिन्यात कोरोना आला. तेवढ्या पाच महिन्यात आम्ही फंड जमवून कला दालनांची नवी वातानुकूलित यंत्रणा बसवली व कलादालने सुरू केली . कोरोना मध्ये सर्व कमिटी मेंबर्सनी प्रत्येकी दहा हजार रुपये सोसायटीच्या अकाऊंट मध्ये टाकले. राजीनामा दिला तरीही कामत सरांनी देखील कोरोनामध्ये सोसायटीत पैसे पाठविले होते. कोरोना काळात सोसायटीकडे मदतीसाठी ८ चित्रकारांकडून ईमेल आले होते. कामत सर, नाईक सर व बहुळकर सर यांच्या कामिटीने चौकशी करून त्यांना खरोखर मदतीची गरज आहे असे सांगितल्यानंतर सोसायटीने त्या चित्रकारांना प्रत्येकी दहा हजार रुपयाची आर्थिक मदत कोरोनामध्येही पाठविली होती. फक्त याची जाहिरात मात्र सोसायटीने केली नाही. सोसायटीला आर्थिक समस्या नेहमीच असते. गरज असते तेव्हा सोसायटीचे पदाधिकारी स्वत: सोसायटीला आर्थिक मदत करतात. विचारे सर, चंद्रजीत यादव, अजिंक्य चौलकर, विक्रांत मांजरेकर, सुरेन्द्र जगताप, अनिल नाईक सर व इतर सर्व कमिटी मेंबर्सनी सोसायटीला वेळोवेळी आर्थिक मदत पाठविली आहे. कामत सर अध्यक्ष असतांना मी उपाध्यक्ष होतो. सेक्रेटरीनी एक वेळा फोन करून सोसायटीला निदान एक लाख रुपयाची अजून गरज आहे असे मला सांगितल्यावर मी माझ्या अकाऊंट मधून सोसायटीला एक लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत. या सर्व आर्थिक मदतीचा पुरावा सोसायटीच्या बँक अकाऊंट मध्ये आहे. वेळोवेळी सोसायटीच्या सर्व कमिटी मेंबर्स व पदाधिकाऱ्यांनी सोसायटीला केलेली आर्थिक मदत ही सोसायटीचे मागील काही वर्षाचे बँक अकाऊंट स्टेटमेंट तपासून या आरोप करणाऱ्या चित्रकार महोदयांना बघता येईल व कला जगातला देखील सांगता येईल.

पूर्वी सोसायटीचे जहांगीर कलादालनात बिना भाड्याचे एक ऑफिस होते (आजही आहे); व फक्त एक वार्षिक प्रदर्शन व्हायचे. वार्षिक प्रदर्शन सोडले तर फारसा खर्च नव्हता. आता सोसायटी चालवणे पूर्वी सारखे सोपे नाही. सोसायटीचे मोठे कला संकुल आहे, तिथे तीन कला दालने, ऑडिटोरियम आहेत. १० लोकांचा स्टाफ आहे. लाइट – एसी यंत्रणेचे बिल, लिफ्ट मेंटेनन्स, पाणीपट्टी १० लोकांचा महिन्याचा पगार, व बीएमसीचा वर्षाला ११ लाख रुपये एवढा प्रॉपर्टी टॅक्स! सोसायटी म्हणजे सध्या पांढरा हत्ती आहे. सोसायटीने जर कमीत कमी महिन्याला चार ते साडे चार लाख रुपये सरासरी कमविले नाहीत तर सोसायटीवर कर्ज होईल. पूर्वी जहांगीर आर्ट गॅलरीत ऑफिस असतांना सोसायटीचे अध्यक्ष, चेअरमन, सेक्रेटरी व पदाधिकारी यांना फार व्याप नव्हता. आता या सर्वांपैकी कुणीतरी एकाने दररोज किमान चार तास काम केले नाही तर आता सोसायटी चालणार नाही. स्टाफला दररोज मार्गदर्शन केले नाही व लक्ष ठेवले नाही तर सिस्टिम कोलमडेल. जशी जहांगीर आर्ट गॅलरीची दालने आहेत व ती चालवतांना स्टाफ लागतो, इतर खर्च होतो, तशी सोसायटीची तीन कला दालने असल्यामुळे सोसायटीचा देखील खर्च जहांगीर आर्ट गॅलरी सारखाच होतो. जहांगीर पेक्षा कमी असेल पण सोसायटीसाठी तो खर्च भरपूर आहे, कारण उत्पन्न मर्यादित आहे.

आरोप करायला सर्व सहज पुढे येतात. गेल्या महिन्यात सोसायटीची वार्षिक सर्व साधारण सभा झाली होती. कोणते लाईफ मेंबर्स सभेला आले? का तुम्ही फक्त आरोप करता ? का मीटिंग मध्ये येवून जाब विचारत नाही ? हिशेब तपासत नाही ? सोसायटीचे लाईफ मेंबर्स ऑडिट रिपोर्ट बघून सर्व उत्पन्न व खर्च तपासू शकतात. पण त्यासाठी मीटिंगला यावे लागेल, वेळ द्यावा लागेल; तो वेळ सोसायटीला कुणीही द्यायला तयार नाही. वार्षिक सर्व साधारण सभेची पत्र पाठवली होती, लाईफ मेंबरच्या ग्रुपवर देखील टाकली होती , खात्री लायकपणे पाचशे लाईफ मेंबरना सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे असे कळले होते याचा पुरावा सोसायटीकडे आहे. पण त्या पैकी किती लाईफ मेंबर्स सोसायटीत मीटिंगला आले? धड पाच टक्के लाईफ मेंबर्स देखील सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत येत नाही. त्यांना वेळ नाही. पण घरी बसल्या मोबाईलवरून वाट्टेल त्या चकाट्या पिटून आरोप करायला वेळ आहे.

गेल्या वार्षिक प्रदर्शनात ललित कला अकादमी तर्फे २० हजार रुपयांची पाच पारितोषिके, म्हणजे एक लाख रुपयांची पाच अवॉर्ड जाहीर केली गेली होती. पण ललित कला अकादमीने त्याचे पैसे दिलेच नाहीत. त्या पारितोषिकांचा पैसा – एक लाख रुपये सोसायटीने दिले, कारण अवॉर्ड शेवटी सोसायटी देते. चित्रकार अवॉर्ड मनी सोसायटीकडे मागतात. गेल्या वर्षी असेच एक स्कॉलरशिपचे देखील घडले आहे. सोसायटी पैसे कमावत नाही. जे काही थोडे पैसे येतात ते कला जगतावरच खर्च होतात. शेवटी एक ग्वाही देतो. निदान मी सोसायटीचा अध्यक्ष असे पर्यन्त सोसायटीत आलेला सर्व पैसा कला क्षेत्रावरच खर्च होईल याची खात्री बाळगा . सोसायटीचे सध्याचे सर्व पदाधिकारी व सर्व कमिटी मेंबर्स यापैकी कोणीही आरोप करणाऱ्यांसारखे रिकामटेकडे नाहीत. सर्वांना स्वत:चे भरपूर व्याप आहेत. सर्वांकडे भरपूर कामं देखील आहेत and they all are well to do. सर्व पदाधिकारी व कमिटी मेंबर्स स्वत:चे सारे व्याप सांभाळूनच सोसायटीला वेळ देतात. कलाक्षेत्राने, चित्रकारांनी त्याची परतफेड कृपया असे आरोप करून करू नये. १३३ वर्षे जुन्या संस्थेला बदनाम करू नका. विद्यार्थी आणि व्यावसायिक विभाग मिळून सरासरी फी रुपये 350 इतकीच येते. तुम्ही हिशेब करा; जरी सहाशे रुपये प्रवेश फी असली तरी महागाईच्या प्रमाणात हळूहळू वाढलेली ती रक्कम आहे. आरोप करणाऱ्या वैफल्यग्रस्त व्यक्तीने (मला तो चित्रकार आहे असे वाटत नाही) आत्मचिंतन करावे; त्याचे फ्रस्टेशन सहाशे रुपयासाठी सोसायटीवर काढू नये.

धन्यवाद
राजेंद्र पाटील,
अध्यक्ष, बॉम्बे आर्ट सोसायटी

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.