Features

लोकचित्रकलेचा अनोखा आविष्कार!

लोकचित्र संगमहे भारतातील विविध लोकचित्रकला शैलींमधील चित्रांचे अनोखे प्रदर्शन सध्या नाशिक येथे पु ना गाडगीळ शोरूममधील आर्ट गॅलरी मध्ये सुरू आहे. मधुबनी, चित्रकथी, लीपण, टिकुली, साओरा, गोंड, पट्टचित्र, मांडणा, फड, गुर्जरी, कलमकारी, पीछवाई, मंडला, भिल्ल, हजारीबाग, संथाल, धुलीशिल्प अशा चित्र शैलींमधील चित्रे इथे कलारसिकांना पाहायला आणि खरेदीसाठी उपलब्ध आहेत. कलारसिक सातत्याने ललित लेखन करणारे श्री योगेश पटवर्धन यांनी त्याविषयी लिहिलेला हा समयोचित लेख.

श्रावण मासी… हर्ष मानसी

लोकचित्रे चोहीकडे…!

माझे एक ज्येष्ठ स्नेही आहेत, संजय देवधर. ते चित्रकार आणि पत्रकार दोन्हीही आहेत. महाराष्ट्राची लोकप्रिय वारली चित्रशैली त्यांनी स्वतः शिकून त्यावर सखोल अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण घेऊन त्याचा शहरी भागात प्रसार करण्यात त्यांचे योगदान दखल घ्यावी असे आहे. वारली चित्र शैलीच्या कार्यशाळा ते वर्षातून किमान दहावेळा तरी माफक मानधन घेऊन आयोजित करतात. ही कला पुढच्या पिढ्यात रुजवायला हवी हा त्या मागचा प्रामाणिक उद्देश आहे. भारतातील इतर अनेक ग्रामीण चित्रशैली तितक्याच अप्रतिम आहेत, आणि त्याचेही सादरीकरण व्हायला हवे ही त्यांची मनापासून इच्छा. ती त्यांनी प्रत्यक्षात आणली.

त्यासाठी ‘लोकचित्र संगम’ कलामहोत्सव या नावाने एक चित्रप्रदर्शन त्यांनी आयोजित केले आहे, जे चार भागांमध्ये महिनाभर चालू आहे. शिखरे वाडी समोर, पासपोर्ट ऑफिसशेजारी नाशिकरोड इथल्या पु. ना. गाडगीळ यांच्या दागिन्यांच्या शोरूममध्ये असलेल्या सुसज्ज आर्ट गॅलरीत. दि. १ ऑगस्टला मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत त्याचे उद्घाटन झाले. नंतर दर आठवड्याला ती चित्रे आणि चित्रकार बदलले गेले. शैली आणि आशय बदलला. मात्र दर्जा तोच… अप्रतिम.

देवधर स्वतः अनुभवी, लोकप्रिय चित्रकार असुनही, इतर चांगल्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे हा हेतू त्यांनी पूर्ण केला. शक्य असेल तेव्हा, स्वतः उपस्थित राहून आलेल्या रसिकांना त्या मागील भूमिका समजावून सांगितली, अनेक कलाकारांना मुलाखत घेऊन बोलते केले. अनेक मान्यवर प्रदर्शनांच्या उदघाट्नासाठी आले. विशेष म्हणजे देवधर यांच्या मार्गदर्शनाने योग्य दरात चित्रविक्रीही चांगली झाली. क्वचितच  रसिकांसमोर आलेल्या सगळ्या कलाकारांना प्रोत्साहन, आत्मिक बळ मिळाले. येथे त्यांच्या वारली चित्रशैली प्रशिक्षण कार्यशाळादेखील झाल्या. त्यांचाही लाभ अनेकांना मिळाला.

अपूर्वा भंडारे, सुप्रिया जोशी, देविका काशीकर, स्नेहल बंकापुरे, श्रद्धा रावल, निवेदिता पोतदार, अदिती पळसुले, पद्मजा ओतुरकर, माधवी पाठक, स्मिता गांगल, श्वेता गरे, श्रद्धा शेतकर, सायली झांबरे, मनिषा अग्रवाल, कविता बरवे, शिल्पा भाटिया, अंजली भाटे, सुषमा पाटील, सुनीता शिरोडे, सुजाता अटल, रुपाली पवार अश्या जवळपास पंचवीस युवा आणि महिला कलाकारांनी विविध शैलीतील जसे की मधुबनी, चित्रकथी, लीपण, टिकुली, साओरा, गोंड, पट्टचित्र, मांडणा, फड, गुर्जरी, कलमकारी, पीछवाई, मंडला, भिल्ल, हजारीबाग, संथाल, धुलीशिल्प अश्या भारतातील विविध दुर्गम भागात रुजलेली लोकचित्रकला या चित्रकर्तीनी आत्मसात करून त्याचे नेत्रसुखद सादरीकरण केले. प्रदर्शनामुळे रसिकांसाठी ती उपलब्ध झाली. आपल्या दिवाणखान्याची  शोभा वाढवावी असे वाटल्यास ती माफक किमतीत ३१ तारखेपर्यंत मिळणार आहेत.

रूपाली पवार - बिहारच्या मधुबनी शैलीतील चित्र
सुजाता अटल - मध्य प्रदेशच्या गोंड शैलीतील चित्र
अंजली भाटे - राजस्थानच्या फड शैलीतील चित्र
अंजली भाटे - ओडिशाच्या पट्टचित्र शैलीतील चित्र
सुजाता अटल - राजस्थानच्या पीछवाई शैलीतील चित्र

भारतातील लोकचित्र कलेचे दर्शन एकाच ठिकाणी घडवण्याचं आयोजन नक्कीच स्तुत्य आहे. पहाडी, वाळवंटी, दुर्गम भागातील आदिवासींचे सणवार, विवाह पद्धती, पशुधन, घरांची, पाड्यांची रचना, वेशभूषा, रंगभूषा, अलंकार, नृत्य, समूहनृत्य, शेतीची अवजारे, निसर्ग यांचा सुरेख, कलात्मक आविष्कार विविध रंगसंगतीतून, बारीक रेषांमधून, लयबध्द आकारातून साधला आहे.

दि. ३१ ऑगस्टला या कला महोत्सवाचा समारोप होईल. अजूनही त्यापूर्वी रसिकांनी थोडा वेळ काढून चित्रप्रदर्शनाचा जरूर आस्वाद घ्यावा आणि कलाकारांचे प्रत्यक्ष भेटून कौतुक करावे. आपल्या सहभागाने कलाकारांचा हुरूप वाढणार आहे. अशी प्रदर्शने आयोजित करणे जिकिरीचे, खर्चिक आणि कष्टाचे आहे. त्यामागे कुणाचे तरी मानसिक पाठबळ लागते, पूर्वतयारी लागते. रोजचे व्यवहार सांभाळून हे घडवून आणलंय कलारसिक पत्रकार, चित्रकार संजय देवधर यांनी. त्यांना सुहास जोशी, मेघा पिंपळे यांनी व सर्व कलाकारांनी मोलाची साथ दिली. देवधर यांच्या वारली आर्ट फाऊंडेशनने आयोजन केले. त्यासाठी त्यांचे व सहभागी कलाकारांचे, पु. ना. गाडगीळ शोरूमचे संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी यांचेही मनापासून आभार आणि पुढील उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा !

योगेश पटवर्धन

प्रदर्शनाचे ठिकाण:

लोकचित्र संगम कला महोत्सव,

पी. एन. जी. आर्ट गॅलरी,

स्टार झोन मॉल, पासपोर्ट ऑफिस शेजारी,

शिखरे वाडी, नाशिक पूना रोड,

नाशिक रोड.

वेळ: सकाळी ११ ते रात्री ८.००

संयोजक: संजय देवधर ९४२२२७२७५५ 

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.